(३९) हे कैदेतील साथीदारांनो, तुम्ही स्वत:च विचार करा की पुष्कळसे विभिन्न पालनकर्ते उत्तम आहेत अथवा तो एक अल्लाह जो सर्वांवर प्रभावी आहे?
(४०) त्याला सोडून तुम्ही ज्याची भक्ती करीत आहात ते याशिवाय काहीच नाहीत की बस्स काही नावे आहेत जी तुम्ही व तुमच्या वाडवडिलांनी ठेवली आहेत. अल्लाहने त्यांच्यासाठी कोणतेही प्रमाण अवतरिले नाही. शासनाची सत्ता अल्लाहखेरीज इतर कोणासाठी नाही. त्याचा आदेश आहे की त्याच्या स्वत:शिवाय तुम्ही इतर कोणाचीही भक्ती करू नका. हीच थेट सरळ जीवनपद्धती आहे, पण बहुतेक लोक जाणत नाहीत.
(४१) हे कैदेतील साथीदारांनो! तुमच्या स्वप्नांचा अर्थ हा आहे की तुम्हापैकी एक तर आपल्या पालनकर्त्या (मिस्राधिपती३३अ) ला दारू पाजील. उरला दुसरा तर त्याला सुळावर चढविले जाईल आणि त्याचे डोके पक्षी चोच मारून मारून खातील. निर्णय लागला त्या गोष्टीचा जे तुम्ही विचारीत होता.’’३४
३३अ) आयत २३ ला या आयतीशी मिळवून वाचल्यास स्पष्ट होते की पैगंबर यूसुफ (अ.) यांनी जेव्हा ``माझा रब!'' म्हटले तेव्हा त्यांचे म्हणणे अल्लाहशी होते. जेव्हा इजिप्त्च्या बादशाहाच्या गुलामास म्हटले की तू तुझ्या स्वामीला मदिरा पाजणार आहे तर याचा अर्थ इजिप्त्चा बादशाह आहे. कारण तो गुलाम आपल्या बादशाहालाच स्वामी समजत होता.
३४) हे व्याख्यान या पूर्ण घटनेचा प्राण आहे. कुरआनमध्ये एकेश्वरत्वाच्या श्रेष्ठतम व्याख्यानापैकी हे एक आहे. या व्याख्यानाचे अनेक पैलू आहेत ज्यांच्यावर लक्ष देऊन विचार करणे आवश्यक आहे.
(१) हा पहिला प्रसंग आहे जेव्हा पैगंबर यूसुफ (अ.) सत्यधर्म प्रचारकार्य करताना दिसत आहेत. या अगोदर त्यांच्या जीवनाचे वर्णन कुरआनमध्ये प्रस्तुत केले गेले त्यापासून त्यांचे श्रेष्ठ चारित्र्य दिसून येते. परंतु सत्य प्रचार तेथे होताना दिसून येत नाही. याने सिद्ध होते की प्रथम चरण शिक्षण-प्रशिक्षणाचा आणि तयारी करून घेण्याचा होता. पैगंबरत्व कार्य आता कैदेत त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. पैगंबराच्या भूमिकेतील हे त्यांचे पहिलेच व्याख्यान आहे. धर्माकडे लोकांना येण्याचा उपदेश त्यांनी लोकांना दिला. (२) पहिल्यांदा त्यांनी लोकांसमोर आपली वास्तविकता प्रकट केली. यापूर्वी ते मोठ्या धैर्याने आणि आलेल्या त्या प्रत्येक स्थितीचा अंगीकार करीत होते. कधीही त्यांनी पूर्वजांचे नाव घेऊन परिस्थितीशी सामना करण्याचे मागील चार-पाच वर्षापासून टाळले नाही. परंतु आता त्यांनी केवळ धर्म प्रचार-प्रसार कार्यासाठी या वास्तविकतेपासून पडदा उठविला की मी नवीन धर्म प्रस्तुत करीत नाही. माझा संबंध तर एकेश्वरत्व आवाहनाच्या त्या विश्वव्यापी आंदोलनाशी आहे, ज्या आंदोलनाचे नेते इब्राहीम (अ.) इसहाक (अ.), आणि यावूâब (अ.) आहेत. (३) (स्वप्नफळ विचारणाऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना) यूसुफ (अ.) ज्याप्रकारे त्यांच्या म्हणण्यातून आपले म्हणणे पुढे ठेवण्याची संधी काढत होते आणि त्यांच्यासमोर एकेश्वरत्व ठेवत होते. या प्रसंगाने माहीत होते की एखाद्याच्या मनात प्रचार-प्रसाराची ओढ असेल आणि तो बुद्धीविवेकाने काम घेत असेल तर उत्तमरीतीने तो संवादाची दिशा आपल्या प्रचार-प्रसार कार्याकडे वळवू शकतो आणि आपले म्हणणे लोकांपुढे प्रभावीपणे मांडु शकतो. (४) याने हेसुद्धा माहीत होते की लोकांसमोर जीवनधर्माचा संदेश मांडण्यासाठी आदर्श पद्धत कोणती आहे. पैगंबर यूसुफ (अ.) हे कैदेतून सुटताक्षणी सत्यसंदेश कार्य सुरु करीत नाही तर लोकांसमोर ते धर्माच्या (दीन) आरंबिंदूला ठेवतात. या आरंभ बिंदूपासून सत्य आणि असत्य मार्ग वेगवेगळे होतात म्हणजेच एकेश्वरत्व आणि अनेकेश्वरत्वाचा फरक स्पष्ट होतो. मग या फरकाला ते समुचितपणे लोकांपुढे ठेवतात ज्यामुळे सामान्य बुद्धीचा मनुष्यसुद्धा त्याला समजून घेतो. यूसुफ (अ.) यांच्या काळातील लोकांच्या मनात हा फरक खोलवर रुजविला गेला. कारण ते लोक नोकरदार गुलाम होते. त्यांना यूसुफ (अ.) यांनी स्पष्ट करून सांगितले की एक स्वामीचा गुलाम बनून राहाणे योग्य आहे की अनेक स्वामींचा गुलाम बनून राहाणे, तसेच सृष्टीच्या स्वामीची गुलामी योग्य आहे की दासांची दास्यता योग्य आहे. लोकांना हा फरक मनापासून पटला. यूसुफ (अ.) लोकांना त्यांचा धर्म सोडून आपला धर्म स्वीकारण्यास सांगत नव्हते. त्यांनी विशिष्ट शैलीत लोकांना आवाहन केले. ते म्हणत, ``अल्लाहची किती मोठी कृपा आमच्यावर आहे की त्याने इतरांपेक्षा फक्त त्याचाच दास आम्हाला बनविले. परंतु लोक अल्लाहचे कृतज्ञ बनून जीवन जगत नाहीत तर विनाकारण स्वत: हाताने घडवून अनेक बनावटी ईश्वर बनवितात आणि त्यांची पूजा करतात.'' मग ते लोकांच्या धर्माची अत्यंत उचित पद्धतीने आलोचना करतात. लोकमन दु:खी होऊ नये याची फार काळजी घेतात. यूसुफ (अ.) लोकांना उत्तमरीतीने पटवून देतात की तुम्ही काहींना अन्नदाता प्रभु ठरविले तर काहींना सुखसमृद्धीची देवता ठरविले आहे. कोणा ईश्वराला तुम्ही पृथ्वीचा स्वामी बनविला तर कोणाला धनाची देवता बनवून टाकले. काहींना स्वास्थ देणारा, तसेच सुखकर्ता, दु:खहर्ता बनवून टाकले. हे सर्व दुसरे-तिसरे काहीच नसून फक्त त्यांची नामावली आहे. या नामावलीमागे कोणीच वास्तविक अन्नदाता, सुखकर्ता, दु:खहर्ता प्रभु व स्वामी विद्यमान नाही. वास्तविक स्वामी सर्वोच्च् अल्लाह आहे. तुम्हीसुद्धा सृष्टीनिर्माणकर्ता व पालनकर्ता म्हणून अल्लाहच आहे असे मान्य करता. अल्लाहने कोणालाही आपल्या अधिकारात भागीदार बनविले नाही. सत्ताधिकार पूर्णत: अल्लाहकडेच आहे आणि अल्लाहचा आदेश आहे की त्याच्याशिवाय इतर कोणाचीच भक्ती करू नका. (५) याने हा बोध होतो की पैगंबर यूसुफ (अ.) यांनी कैदेतील आठ दहा वर्ष कशाप्रकारे घालवली असतील. लोक समजतात की कुरआनमध्ये त्यांच्या एकाच उपदेशाचा प्रसंग आला म्हणून त्यांनी धर्मप्रचार-प्रसारासाठी एकदाच तोंड उघडले होते. परंतु पैगंबरांविषयी असा अनुमान काढणे की पैगंबरत्वाच्या कार्याविषयी तो गाफील होता; हा अत्यंत चुकीचा अनुमान आहे. दोन माणसे स्वप्नफळ विचारतात तेव्हा संधीचा फायदा घेऊन ते धर्मप्रचार कार्य सुरु करतात. अशा पैगंबराविषयी कसा विचार कराल की त्याने कैदेतील अनेक वर्ष मौनावस्थेत घालवले असतील.
Post a Comment