दिवसेंदिवस असे वाटत आहे की मानव स्वतःहून मृत्यूच्या जवळ जात असल्याचे दिसून येते. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी पृथ्वीतलावरील 70 टक्के जंगल संपदा नष्ट करून शहरीकरण, औद्योगिकरण, मोठ्या प्रमाणात अणुचाचण्या, युध्दामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचा वापर, जगातील प्रत्येक देशांनी जमाकेलेला मोठ्या प्रमाणात दारुगोळा इत्यादी मानवनिर्मितीमुळे साधनसामग्रीमुळे पृथ्वीचे संतुलन अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आले आहे.
जगातील तलाव, विहीरी, नदी-नाले आटल्याने तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे व समुद्राची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. तापमानात वाढ झाल्याने जगातील अनेक जंगल आताही जळतच आहे. वाढत्या तापमानामुळे अकाल सारखी परिस्थितीने मानवाला विहिर, नदी, तलाव यांचे पाणीसुद्धा कमी पडायला लागले. त्यामुळे स्वतःची तहान भागवण्यासाठी मानव 700 फुट जमीनीच्या पोटात जाणवु पाणी काढत आहे व आपली तहान भागवीत आहे. जे पाणी पाताळात असते ज्यावर आपला अधिकार नाही. अशा ठिकाणी आपण अतिक्रमण केले आहे. हेच जगातील संपूर्ण देशांनी केले आहे व करीत आहेत यामुळेच उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.
युरोपमध्ये काही दिवसांपासून उष्णतेची लाट आली असून, या लाटेने विक्राळ रूप धारण केले असल्याने पश्चिम युरोपातील संपूर्ण नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येते. सध्या युरोपमध्ये असलेल्या उष्णतेच्या लाटेच्या तुलनेत पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर स्पेन व अन्य देशांमध्ये वणव्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे संपूर्ण युरोप सध्या भयभीत असल्याचे दिसून येते. स्पेनमध्ये सलग दहा दिवसांपासून कमाल तापमान 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे.
कार्लोस इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार 10 ते 14 जुलै या काळात उन्हामुळे 237 जणांचा मृत्यू झाला ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ब्रिटनमध्ये सध्या 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे हे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.फ्रान्स आणि स्पेनच्या उत्तर भागातही कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.
नेदरलॅंड, जर्मनी, बेल्जियमचा पारा चाळीशी पार करण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.युरोपमधील वाढत्या तापमानामुळे फ्रान्स, पोर्तुगाल, अमेरिका, स्पेन,ग्रीस,स्लोव्हेनिया व क्रोएशिया या भागात वणवे लागल्याने नागरिक व वन्यप्राणी यांना आगीशी सामना करावा लागत आहे ही अत्यंत धक्कादायक स्थिती आहे. युरोपमध्ये उष्णतेच्या लाटा आता जास्त येतं आहे व यामध्ये वाढसुध्दा झाली आहे. यामागे हवामान बदलाचे कारण असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
हवामान बदलामुळे दुष्काळ,अतिपाऊस,अतिथंडी, अतिउष्णता, सुनामी, ग्लेशियर वितळणे, वणवे लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या संपूर्ण घटनांना आमंत्रण मानवानेच दिले आहे.ब्रिटनने गर्मीचे संपूर्ण रेकॉर्ड तोडल्याचे दिसून येते. ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच 40 अंश सेल्सिअस तापमानामुळे रोडवरील डांबर पिळायला लागले आहे व शाळा सुध्दा बंद ठेवण्यात आल्या.वाढते तापमान जगाला दिवसेंदिवस घातक सिद्ध होत आहे.
युरोपमधील सिसली व इटलीमध्ये 2021 ला (48.8 अंश सेल्सिअस), उत्तर अमेरिकेतील डेथवैली, कैलिफोर्नियामध्ये 1913 ला (57.7 अंश सेल्सिअस), दक्षिण अमेरिका रिवादेविया, अर्जेंटिनामध्ये 1905 ला (48.9 अंश सेल्सिअस), आफ्रिकेतील केबिली, ट्युनिशियामध्ये 1931 ला (55 अंश सेल्सिअस), अंटार्क्टिकामधील आइसलँड,सिमोरमध्ये 2020 ला (20.7 अंश सेल्सिअस), आशियातील अहवाज, ईरानमध्ये 2017ला (54 अंश सेल्सिअस), आशियातील भारतामधील फलौदी, राजस्थानमध्ये 2016 ला (51 अंश सेल्सिअस), ओशनियातील ऊदनादत्ता, ऑस्ट्रेलियामध्ये 1960 ला (50.7 अंश सेल्सिअस) यावरून स्पष्ट होते की जगातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून भयानक स्थिती निर्माण करीत आहे. याकरिता निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जगातील प्रत्येक देशांनी युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.
सध्याच्या परिस्थितीत फ्रान्समध्ये गर्मी पासुन होणारे बेहाल रोखण्यासाठी पाण्याचा फवाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. युरोपमध्ये गर्मी रोखण्यासाठी अनेक टेक्नॉलॉजीचा वापर सुध्दा करण्यात येत आहे. कारण युरोपमध्ये गर्मी,आग व वणवा यांचा कहर सुरूच आहे. जगातील वाढते तापमान, वाढता दुष्काळ व हवामानातील बदल रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे.यामुळे उष्णतामानात कमी होऊन तापमान समतोल राखण्यास मोठी मदत होईल.
- रमेश कृष्णराव लांजेवार
नागपूर,
मो.नं.9921690779
Post a Comment