प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की अल्लाह आपल्या मानवांना सांगतो की अत्याचार करणे मी स्वतःसाठीही निषिद्ध केले आहे आणि तुमच्यामध्येही निषिद्ध केले आहे. म्हणून एकमेकांवर अन्याय-अत्याचार करू नका. तुम्ही सर्व लोक मार्गभ्रष्ट आहात. ज्याला मी मार्ग दाखविला त्याच्याव्यतिरिक्त. तुम्ही माझ्याशी मार्गदर्शनाची विनंती करा मी तुम्हाला मार्ग दाखवीन. मी ज्यांना जेवणाची व्यवस्था करतो त्याशिवाय तुम्ही सर्व जण उपाशी आहात. तुम्ही माझ्यापाशी अन्नाची मागणी करा, मी तुमची सोय करीन. माझ्या मानवांनो, तुम्ही सर्व विवस्त्र आहात. तुम्ही माझ्याकडे वस्त्र मागा, मी तुम्हाला ते पुरवीन. माझ्या लोकहो, तुम्ही रात्रंदिवस गुन्हा करत राहता, मी तुम्हाला क्षमा करत राहतो. तुम्ही माझी माफी मागा, मी तुम्हाला क्षमा करीन. माझ्या लोकहो, तुम्ही मला नुकसान पोहचवू शकत नाही आणि तुमच्यात मला नफा पोहोचविण्याची क्षमताही नाही. माझ्या मानवांनो, तुमच्यातील सर्वांत पहिला आणि शेवटचा माणूस तसेच जिन्न वगैरे सर्वचे सर्व सदाचारी झालेत तरी देखील माझ्या अधिराज्यात काही वाढ होणार नाही. आणि तसेच जर तुमच्यामधील सर्वांत पहिला आणि शेवटचा माणूस सर्वचे सर्व दुष्ट माणसं झाली तरी माझ्या राज्यात कोणती कसर राहणार नाही. तुमच्यातील सर्वांत पहिला आणि शेवटचा माणूस आणि इतर सर्व निर्मिती (पहिल्या दिवसापासून जन्मणारे आणि शेवटचे सर्व लोक म्हणजे आजवर जन्मलेली आणि पुढे जन्माला येणारी सारी मानवता) कुठं एका मैदानात जमा झाले आणि या सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही मी दलं तरी जे काही माझ्याकडे आहे त्यातून सुईला समुद्राच्या पाण्यात बुडवून बाहेर काढल्यावर तिच्या टोकावर जेवढे पाणी लागलेले असेल तेवढा सुद्धा फरक माझ्या खजिन्यात पडणार नाही. माझ्या लोकहो, हे तुमचे कर्म आहेत, ज्यांचा मी हिशेब ठेवतो आणि त्याचा पुरेपूर मोबदला देतो. तर ज्यांना भलं लाभले असेल त्याने अल्लाहचे आभार मानावे आणि ज्याला याच्या उलट दुसरे काही मिळाले असेल त्याने आपल्या स्वतःचीच निंदा करावी. (ह. अबू जर (र.), मुस्लिम)
पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो की, ज्याला अल्लाह मार्ग दाखवतो तोच सरळमार्गी आहे आणि ज्याला अल्लाहनेच मार्गभ्रष्ट केले असेल त्याचा कुणी वाली नसेल. (प. कुरआन, अल कहफ-१७)
अल्लाह लोकांसाठी दयेचा जो दरवाजा उघडेल त्याला रोखणारा दुसरा कुणी नसेल आणि जर त्याने दरवाजा बंद केला तर इतर कुणी तो उघडू शकत नाही. (प. कुरआन, फातिर-२)
जमिनीवर फिरणारा कुणी प्राणी असा नाही ज्याच्या उपजीविकेसाठी अल्लाह जबाबदार नाही. (प. कुरआन, हूद-६)
अल्लाहनेच तुम्हाला जन्म दिला, तुम्हाला उपजीविका दिली, तोच तुम्हाला मृत्यू देतो, पुन्हा तुम्हाला जीवित करील. तुम्ही ज्यांना भागीदार केले त्यांच्यातून कुणी असा आहे जो यातले एकही काम करू शकेल. तो धन्य आहे आणि लोक ज्यांना त्याचे भागीदार बनवतात (अशापासून). (प. कुरआन, अर्रुम-४०)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment