Halloween Costume ideas 2015

नियोजित 13 वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

सुफी संतांचे मराठी साहित्यात महत्वपूर्ण योगदान


मुस्लिम सुफी संतांनी 13व्या शतकापासून मराठी साहित्याला महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. गेल्या अनेक शतकांपासून मुस्लिम समाज पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राच्या भाषिक, वांग्मयीन आणि संस्कृतिक पर्यावरणात तसेच वातावरणात जगतो आहे. सर्वात आधी मराठी भाषेला कोणी राजभाषेचा दर्जा दिला असेल तर तो एका मुस्लीम राज्यकर्त्याने.विजापूरच्या इब्राहिम आदिल शहा या शासनकर्त्याने आपल्या राज्यात मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला होता. इतकेच नव्हे तर स्वतः इब्राहिम आदिलशहा याने मराठी भाषेतून साहित्यनिर्मिती ही केली होती. म्हणजेच मुस्लीम मराठी साहित्य  चळवळीला अनेक शतकांचा इतिहास आहे. मध्ययुगीन मराठी साहित्यात एकूण 49 मुस्लिम मराठी संत कवींनी मराठी भाषेत उत्कृष्ट साहित्यनिर्मिती करून मराठी भाषा आणि संस्कृतीला जतन करण्याचे, तिचे  संवर्धन करण्याचे खूप महत्त्वाचे कार्य केलेले आहे. 

अशी प्रगल्भ ऐतिहासिक पार्श्वभूमी असतानाही आजही मुस्लिमांना तुम्ही मुस्लिम असून मराठी कसे काय बोलता ? तुम्हाला मराठी लिहिता वाचता येते का? असे भाषेच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. मराठी वांग्मय हे व्यापक स्वरूपाचे आहे. मराठी साहित्य निर्मितीची सुरुवात  9व्या, 10व्या शतकापासून झालेली आहे. आधी मराठी  वांग्मयावर एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. ते मनोरंजनात्मक साहित्याची निर्मिती करीत असत. परंतु आज मराठी  साहित्याला अनेक प्रवाहांनी समृद्ध केलेले आहे. त्यामुळे आजचे मराठी साहित्य जात, धर्म, पंथ ,लिंग,भौगोलिकस्थिती अशा साऱ्या सीमा ओलांडून आपले वर्चस्व प्रस्थापित करीत आहे. विविध जाती-धर्माच्या प्रतिभावंतांनी आपली प्रज्ञा आणि प्रतिभा पणास लावून मराठी साहित्याला व्यापक आणि सर्वसमावेशक बनविले आहे. अशा विविध साहित्य प्रवाहात आंबेडकरवादी साहित्य, ग्रामीण साहित्य, मार्क्सवादी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, विज्ञानवादी साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिम मराठी साहित्य, ख्रिस्ती साहित्य, जैन मराठी साहित्य, वीरशैव मराठी साहित्य, विद्रोही साहित्य प्रवाह आहेत . अशा अनेक साहित्य प्रवाहांनी मराठी साहित्यविश्वाला अधिकाधिक सर्जक, ठळक , सकस आणि समृद्ध केल्याचे जाणवते.

     मध्ययुगीन काळापासून मुस्लिमांनी मराठीमध्ये साहित्यनिर्मिती केली आहे.  20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून मुस्लिम साहित्यिकांनी मराठीतून साहित्य निर्मिती केल्याचे दिसून येते. यात ठळकपणे सांगलीचे सय्यद अमीन यांचे नाव प्रामुख्याने घेण्यात येते. साठोत्तरी साहित्यात इतर प्रवाहा बरोबरच मुस्लीम मराठी साहित्य प्रवाहही जोमाने पुढे आल्याचे जाणवते. तरीसुद्धा मराठीतील प्रस्थापितांनी , समीक्षकांनी मुस्लिम मराठी साहित्यिकांची आणि त्यांच्या साहित्याची दखल घेतली नाही. याचे शल्य अनेक मुस्लीम मराठी साहित्यिकांना होतेच. त्यामुळे 1988 साली मुस्लिम मराठी साहित्यिकांना, विचारवंतांना, पत्रकारांना, समाजसुधारकांना एकत्र आणण्याचे  काम कॉम्रेड विलास सोनवणे, डॉक्टर इक्बाल मिन्ने, प्राध्यापक फक्रुद्दीन बेन्नूर, ए के शेख, डॉ अजीज नदाफ, अब्दुल लतीफ नल्लामंदू, मुबारक शेख, एडवोकेट उदय टिळक, प्राध्यापक मीर इसहाक शेख यांनी केले. या सर्वांनी मिळून सोलापूर येथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. 1990 साली सोलापूर येथेच पहिले अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन प्राध्यापक फ. म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. उपेक्षित असलेल्या मुस्लिम अल्पसंख्यांकांचे दुःख त्यांची व्यथा, त्यांच्या वेदना, त्यांचे जगणे मुस्लीम मराठी साहित्यद्वारे अभिव्यक्त होऊ लागले. स्वातंत्रोत्तर काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक मुस्लिम हे समाज घटक जे आधी मूक होते ते अभिव्यक्त व्हायला लागल्यामुळे मराठी साहित्यात खऱ्याखुऱ्या साहित्याची भर पडू लागली. सामान्य माणसाचे जगणे त्याचे दुःख, त्याची अवहेलना, त्यांच्या व्यथा, त्याच्या जगण्या-मरण्याचा गोष्टी साहित्यातून प्रकट व्हायला लागल्या. त्यामुळे मराठी साहित्य आणखीनच समृद्ध झाले. इतर साहित्य प्रवाहा बरोबरच मुस्लीम मराठी साहित्य प्रवाहानेही मराठी वांग्मयाला अत्यंत सकस आणि समृद्ध केले आहे. मुस्लिम हा शब्द जातीवाचक किंवा धार्मिक अथवा सांप्रदायिक नसून तो मूल्यात्मक आहे. या शब्दाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. शांतता हेच मूळ बाळगून असणाऱ्या इस्लामचा  अनुनय करणाऱ्या व्यक्तीला मुस्लिम असे संबोधले जाते. त्यामुळे मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या मुस्लिम या शब्दाला साहित्यमूल्य तर आहेच पण त्यात मानवमुक्तीच्या संघर्षाच्या वाटाही आहेत.

        1990साली अत्यंत यशस्वी झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनानंतर मुस्लिम मराठी साहित्य चळवळ  संघटित झाली. या संमेलनानंतर महाराष्ट्रच नव्हे तर आजूबाजूच्या इतर प्रांतातील मुस्लिम मराठी साहित्यिक मराठीतून अभिव्यक्त व्हायला लागले. त्यानंतर डॉक्टर अजिज नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे दुसरे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन थाटात पार पडले. त्याच्या पुढच्याच वर्षी रत्नागिरी येथे कविवर्य ए के शेख यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाले. मराठी साहित्याची आणि संस्कृतीची राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये त्यापुढचे चौथे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन प्राध्यापक फक्रुद्दीन बेन्नूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एखाद्या स्त्रीला अध्यक्षपद भूषविण्यास 100 वर्षांहून जास्त काळ वाट पाहावी लागली. परंतु 1995 साली प्राचार्य डॉक्टर जुल्फी शेख यांच्या रूपाने पाचव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाला अध्यक्षपदी एक विदुषी आणि महिला मिळाली. हे साहित्य संमेलन मुंबई येथे साकार झाले. कवी खलील मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली त्यापुढचे 6वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे घेण्यात आले. यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरवर 7वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन विख्यात गुढकथाकार बशीर मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याची जबाबदारी आली. औरंगाबाद येथे 2008 साली विख्यात गजलकार डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली आठवे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन अभूतपूर्व यशस्वी झाले. यावेळी मुस्लिम मराठी साहित्य  सांस्कृतिक मंडळाची निर्मिती झाली होती. मुस्लीम मराठी साहित्य चळवळीचे 9वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सांगली येथे प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी झाले. सूफी साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक मुहम्मद आझम यांनी  भूषवलेल्या अध्यक्षपदाखाली जळगाव येथे 10वे संमेलन पार पडले. यापुढचे 11वे साहित्य संमेलन 2017 मध्ये पनवेल, नवी मुंबई येथे प्राचार्य बीबी फातिमा मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी झाले. 2019 मध्ये पुन्हा एकदा पुण्यातील आझम कॅम्पस मध्ये 12वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन डॉक्टर अलीम वकील यांच्या अध्यक्षतेत पार पडले.

          गेल्या 32 वर्षात मुस्लीम मराठी साहित्य चळवळीची केवळ 12 अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलने झाली असून आज मितीस 1000 च्या वर मुस्लिम मराठी साहित्यिक मराठीतून साहित्य निर्मिती करीत आहेत. कथा, कविता, कादंबरी, गझल, बालसाहित्य, नाटक, आत्मकथन ,वैचारिक लेखन असे साहित्यातील विविध प्रकार मुस्लिम मराठी साहित्यिक यशस्वीपणे लिहीत आहेत. मुस्लिम मराठी साहित्य प्रवाह आता बऱ्यापैकी प्रस्थापित झाला असून  मराठी साहित्यात या प्रवाहाने एक वेगळे पण सकस आणि यशस्वी असे दालन उघडले आहे. मुस्लिम मराठी साहित्यावर आतापर्यंत पस्तीस च्या आसपास एम फिल आणि जवळजवळ पन्नासच्या वर पीएचडी झालेल्या आहेत. मुस्लिम मराठी साहित्यावर अजून विपुल संशोधन होण्याची गरज आहे. मध्ययुगीन काळापासून थेट विसाव्या शतकापर्यंत जे मुस्लिम मराठीमध्ये अभिव्यक्त होत होते किंवा मराठीत साहित्य निर्मिती करीत होते अशा साऱ्या साहित्यिकांचा, त्यांच्या साहित्याचा शोध घेणे आवश्यक आहे. या संशोधनामुळे अनेक मुस्लिम मराठी साहित्यिक उजेडात आणले जातील.

         मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला कायमस्वरूपी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत शासनाकडून दिली जात नाही. अनेक साहित्य संमेलनातून अनेक राज्यकर्त्यांनी मदत देण्याच्या घोषणा केल्या. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दर वर्षी जसा निधी उपलब्ध करून दिला जातो, तशी कोणतीही तरतूद मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी केली जात नाही. प्रत्येक वेळेला मागणी करूनही शासनाद्वारे त्याची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे लोकसहभागातून, पदरमोड करून अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करावे लागते. समाजातील काही दानशूर व्यक्ती संमेलनाच्या आयोजनाला हातभार लावतात परंतु शासकीय आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे गेल्या 32 वर्षात आम्ही केवळ बारा साहित्यसंमेलने घेऊ शकलो आहोत. परंतु ही साहित्य संमेलने भरवणे समाजाच्या कृतिशीलतेसाठी, अभिव्यक्तीसाठी महत्त्वाची असतात म्हणून येत्या 25, 26 ,27 मार्च या तीन दिवशी नाशिक येथे 13 वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

- डॉ. इकबाल मिन्ने 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget