Halloween Costume ideas 2015

यशस्वी होण्याचा दृढनिश्चय करा!


“माणूस आधी मनातून मरतो, मग प्रत्यक्षात मरतो! आपल्या सर्वांना अजून खूप जगायचे असेल, तर कोविडमुळे मरणाचा विचार करून उपयोग नाही.” अलि कडेच हे ‘लिव्ह इन विथ कोरोना’ या मथळ्याच्या लेखातील डॉ. निलेश मोहिते यांचे विचार वाचले, आणि त्यांना भेटलेल्या 108 वर्षांच्या माणसाचे अनुभवही वाचनात आले. कोरोनाच्या या अस्मानी संकटात माणूस प्रचंड भयग्रस्त झाला आहे, अशा भयग्रस्ततेला दूर्मीळ दिलासा देणारा हा अनुभव मनाला उभारी देतो. वास्तविक यापूर्वीही अशा नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवर अनेकांनी विजय मिळविला आहे. अशा लोकांच्यामध्ये विजय मिळविण्यासाठी जे गूण लागतात; त्याच गुणांची जोपासणा करून पराक्रमी होऊन संकटांवर मात केली पाहिजे.

संकटांना संधी समजून धैर्याने वाटचाल करणार्‍या काही यशस्वी लोकांच्या युक्त्या पहा 

1. निर्णय घेण्यात ते तत्पर असतात. धैर्य व चिकाटीमुळे ते स्वत: कामाला लागतात व इतरांना कार्याचा नकाशाच काढून देतात.

2. पुढाकार घेणे, सकारात्मकपणे आशावादी होऊन कार्यात इंटरेस्ट निर्माण करणे, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे हे त्यांना जमलेले असते. नेतृत्व त्यांच्या रक्तांत उसळत असतं.

3. एकाग्रता करण्याची सवय, वेळेची किंमत जाणण्याची सवय, हेतूकडे लक्ष देऊन उत्साहाने, स्वेच्छेने कार्यारंभ करण्याची धमक या गोष्टी त्यांच्या हालचालीत उघड उघड दिसतात. तिथे लपवाछपवी काहीच नसते.

4. कार्यातला जोम, जिवंतपणा रसरसताना दिसतो. जीवनामध्ये जर खरं काही लागत असेल तर ते म्हणजे निरोगी व्यक्तिमत्त्व असे व्यक्तिमत्त्व तयार करणे आपल्या हातात असते. “मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्घीचे कारण” असे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी फार पूर्वी सांगितलेच आहे.

5. प्रत्येकाने प्रचंड आत्मविश्वास अंगी बाणवला पाहिजे. माणसांबद्दल विश्वास अढळ पाहिजे. यामुळे “कर्तुम्-अकर्तुम-अन्यथा कर्तु” अशी सत्ता त्यांच्या ठायीठायी दिसते.

6. यशस्वी माणसांचा मनावर प्रचंड ताबा असतो. भावना व सवयी त्यांच्या मुठीत असतात. सर्व बाजू विचारात घेण्याचा संयम त्यांच्याकडे असतो.

तुमचं भविष्य तुमच्यासमोर आहे! कसे ते पहा...

1. व्यक्ती जितक्या समर्थपणे लोकांकरिता किंवा लोकांच्या सोयींकरिता, सुविधांकरिता किंवा समाज कारणाकरिता तनमनधन अर्पण करतात, तितक्याच समर्थपणे लोक त्या व्यक्तींना सलाम करतात. समाज त्यांना स्विकारतो.

2. व्यवहारज्ञान माणसाला  शहाणे करते आणि माणूस म्हणूनच ओळखते. तेव्हा तुम्ही तुमच्यातला माणूस जागवा. तुमची प्रज्ञा, तुमची बुद्धिमत्ता विनोदी झाली पाहिजे.

3. तुम्ही आज जे कुणी तपस्वी आहात ते तुमच्या आजुबाजूच्या सर्व तुम्ही इतिहास पुरुषांकडून, घराण्यातील पूर्वसुरींकडून स्त्रीदेवतांकडून, गुरुंकडून, पारंपारिक व नवनवीन साहित्यातून, विज्ञानातून शिकलेले व समजून घेतलेले आहात म्हनच! हे लक्षात असू द्या. आणि उद्या जे कुणी तुम्ही होणार आहात, ते सर्व तुमच्या कालच्या, आजच्या सेवेवर, वर्तणुकीवर अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला जे काही द्यायचे आहे ते देऊन टाका. दान हे सर्व यशाचे गमक आहे. “देणाऱ्याने देत जावे...” खरेच आहे ते!

4. तुम्ही तुमचं आयुष्य सार्थकी लावू शकता पण कसल्याही अपेक्षा ठेवू नका. पदभार हा जितका गोंडस तितकाच कुचकामी असतो. निरपेक्ष प्रेम म्हणजेच सुखसमाधान होय.

5. शारीरिक आपत्तीचा संभव सांगता येत नाही. कुणाला माहीत, कधी काय होईल. पण विवेक सतत आचरणात आणला तर मनावर ताबा ठेवता येईल. मनावर ताबा ठेवला की, यश तुमच्या मुठीत येते.

6. तुमचं नशीब तुम्ही घडवू शकता; तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता; याकरिता तुम्ही “जाऊ दे” म्हणत, स्वकार्यांत तल्लीन व्हा. भूतकाळाला विसरून जा, भविष्यात रमू नका, वर्तमान तुमच्या हातात आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करा.

आपल्या अंगिकृत कार्यात जीव ओतून मग्न झाला की, मनात कोणताही विकार उत्पन्न होत नाही. मनाची शक्ती प्रचंड असते: मनोबलावर विश्वास असू द्या, मनाच्या दृढ निश्चयाने प्रचंड मोठी कार्ये पार पाडली आहेत. मनाच्या या अगाध आणि प्रचंड शक्तीच्या बळावर तुम्ही येणार्‍या कुठल्याही संकटाला तोंड देऊन त्यातून सहीसलामत यशस्वी होऊ शकता, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे; प्रत्येकाने मनाची शक्ती ओळखून सकारात्मक विचारांची पेरणी करायला हवी! 'निश्चयाचे बळ। तुका म्हणे हेचि फळ॥' उठा, आता या क्षणापासून यशस्वी होण्याचा दृढनिश्चय करा.

सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारतसरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ‘करवीर काशी’चे संपादक आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget