आखिर गिल अपनी सर्फ-ए-दर-ए-मयकदा हुई
पहूंची वहीं पे खाक जहां का खमीर था
कतेच महाराष्ट्र शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा समाजविघातक निर्णय घेतला. वाईन ही दारू नाही ते एक आरोग्यदायी पेय आहे, असा युक्तीवाद (खरे तर) अपप्रचार सरकारतर्फे करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत वाईन म्हणजे काय? हे समजून घेणे तसेच या निर्णयाचे भविष्यात समाजावर काय परिणाम होतील, याचा आढावा घेणे उद्बोधक ठरेल. म्हणून हा लेखन प्रपंच.
वाईन म्हणजे काय?
’वाईन इज ए अल्कोहोलिक ड्रिंक. टिपिकली मेड फ्रॉम फ्रॅगमेंटेड ग्रेप्स, इस्ट कन्झ्युम्स द शुगर इन द ग्रेप्स अॅन्ड कन्व्हर्ट इट इन टू इथेनॉल अॅण्ड कार्बन डाय ऑक्साईड, रिलिजिंग हिट इन द प्रोसेस’ अशी वाईनची शास्त्रीय व्याख्या आहे. वाईन हे द्राक्षापासून बनविण्यात येणारे एक मद्य आहे. वाईन तयार करण्यासाठी द्राक्षांचा चोथा केला जातो. (फ्रान्समध्ये उच्चभ्रू लोकात पिल्याजाणाऱ्या अतिशय महाग वाईनमध्ये वापरल्या जाणाऱ्या द्राक्षाचा चोथा कुमारिकांच्या पायांनी तुडवून तयार केला जातो.) त्यात ईस्ट (किन्व, खमीर, आंबट पदार्थ) मिसळतात. त्यामुळे फर्मंटेशन (सडण्याची प्रक्रिया) होऊन त्यातून इथेनॉलची (मद्या)ची निर्मिती होते. हे द्रव्य लाल असते. या द्रव्यालाच वाईन म्हणतात. हे पेय उंची मद्य या श्रेणीत येते म्हणून महाग असते. उच्चभ्रू लोकांमध्ये वापरले जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये याचे निर्मिती केंद्र आहे. वाईनला दारू न मानता एक आरोग्यदायी पेय असल्याचा प्रचार केला जातो. परंतु फर्मेंटेशनच्या प्रक्रियेमध्ये त्यात 4 ते 14 टक्के अल्कोहोल आपोआप तयार होत असल्यामुळे वेगवेगळ्या वाईनमध्ये कमी जास्त अल्कोहोल (दारू) असतेच असते. म्हणून याला आरोग्यदायी पेय म्हणणे चुकीचेच नसून समाजाची दिशाभूल करणारे आहे. नुकतेच अजित पवार यांनी म्हटले आहे की, ’’वाईन आणि दारू यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण काही लोक समजून घ्यायलाच तयार नाहीत.
सामनाच्या अग्रलेखामधून सुद्धा वाईन विक्रीचे समर्थन करण्यात आलेले आहे. खरे तर मद्य वाईटच, ते आरोग्यदायी पेय आहे का नाही याच्यावर चर्चाच करणेच चुकीचे आहे. औरंगाबाद येथे सेवारत असलेले सहयोगी प्रा. डॉ. ऋषिकेश खाडिलकर यांच्या मते गेल्या 10 वर्षात 10 ते 15 टक्क्यांनी व्यसनाधिनता वाढली आहे. दरवर्षी आपला देश 18 हजार 500 कोटी रूपयांची क्रयशक्ती गमवित आहे.’’ हे नुकसान दारू विकून सरकारला मिळणाऱ्या महसुलापेक्षा जरी कमी असले तरी यातून होणारे सामाजिक नुकसान हे नक्कीच मोठे आहे, याचा सरकारने न्नकीच विचार करायला हवा.
मॉलमध्ये वाईन विक्री
पहिले शराब जिस्त थी अब जिस्त है शराब
कोई पिला रहा है पिये जा रहा हूं मैं
साधारणतः प्रत्येक दारूच्या दुकानात वाईन उपलब्ध असतेच. अशात सुपर मार्केटमधून वाईन विक्री करण्याचा हेतू साहजिकच जास्तीचा महसूल गोळा करण्याशिवाय दूसरा असूच शकत नाही. साधारणतः समाजामध्ये आजही एवढी नैतिकता शिल्लक आहे की, चांगल्या संस्काराचे लोक स्वतः दारूच्या दुकानात जाऊन दारू किंवा वाईन, इच्छा असूनही खरेदी करत नाहीत. सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध झाल्यामुळे अशा लोकांमधील जी लाज होती ती ही राखली जाईल आणि वाईनही खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर महिला आणि मुलंसुद्धा ती खरेदी करतांना संकोच करणार नाहीत, एवढे निश्चित. कारण आपल्या सर्वांचा एक अनुभव असतो मॉलमध्ये वस्तू इतक्या आकर्षक पद्धतीने सजवून ठेवलेल्या असतात की चार वस्तू खरेदी करण्याच्या इराद्याने गेलेला ग्राहक 8 वस्तू खरेदी करून येतो. ग्राहकांची नेमकी हीच प्रवृत्ती सरकारने हेरलेली आहे. यामुळे सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री केल्याने सरळ-सरळ तिचा खप वाढणार आहे.
’महाराष्ट्रात वर्षाला 30 ते 32 कोटी लिटर्स देशी दारू, 25 ते 30 कोटी लिटर्स विदेशी दारू, 60 ते 70 कोटी लिटर्स भारतीय बनावटीची विदेशी दारू आणि 20 कोटी लिटर्स बिअरचे प्राशन होते. या तुलनेत वाईन प्राशन फक्त 5 टक्के आहे.’ (संदर्भ : लोकसत्ता, 29 जाने. 2022).
या अफाट आकडेवारीवरून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे का फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे मद्यराष्ट्र आहे, हे वाचकांनी स्वतःच ठरवावे.
दारूचा प्रचार व प्रसार
लुत्फ-ए-मय तुझसे क्या कहूं जाहीद
हाय कंबख्त तू ने पी ही नहीं
आज कुठलाही चित्रपट, मालिका अशी नाही ज्यातील पात्र दारू प्राशन करताना दाखविले जात नाही. वाईन तर महिलापात्र सुद्धा सर्रास पितांना दिसून येतात. ओटीटी प्लेटफार्मवरून सुरू असलेल्या एकापेक्षा एक भयानक सिरीजमधून तर मद्यप्राशनाचा अतिरेक दाखविला जातो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दारूचे उत्पादन आणि कंझप्शन दोन्ही सरकारमान्य असतात. दरवर्षी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी साधारणपणे 500 नवीन तरूण नववर्षाच्या आगमनानिमित्ताने बिअर प्राशन करून या क्षेत्रात पर्दापण करतात. त्यातील अनेक पुढे चालून दारूडे बनतात. या तरूणांवर कोणाचेच नियंत्रण नाही. उलट त्यांनी मद्यप्राशन करावे, यासाठी सामाजिक परिस्थिती अनुकुल आहे.
दारू बंदीचे प्रयोग
बारीश शराब-ए-अर्श है ये सोंच कर ’अदम’
बारिश के सब हुरूफ को उल्टा के पी गया
समग्र दारूबंदी करण्याचे अनेक प्रयोग जगात करण्यात आले होते व सध्या करण्यात येत आहेत. परंतु सातव्या शतकातील अरबस्थानमधील प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ईश्वरीय आदेशावरून केलेली दारूबंदी वगळता जगात इतर कुठेच दारूबंदीचा प्रयोग यशस्वी झालेला नाही. आता अरबस्थानात सुद्धा मक्का आणि मदीना वगळता इतरत्र थोड्याशा प्रयत्नाने का होईना पण दारू उपलब्ध होते. इतर 55 मुस्लिम देशांमध्ये दारू तेवढ्याच मुबलक प्रमाणात मिळते जेवढी की इतर देशांमध्ये मिळते.
दारूबंदीचा सर्वात मोठा प्रयोग 1920 साली अमेरिकेत करण्यात आला. कोट्यावधी डॉलर खर्च करून समग्र दारूबंदीचा हा निर्णय राबविण्यात आला. या अंतर्गत 5 लाख लोकांना अटक करण्यात आली. परंतु, 14 वर्षे दारूबंदीचा हा अशस्वी निर्णय राबविल्यानंतर सरकारने तो मागे घेतला. दरम्यान अनेक अमेरिकी नागरिक विषारी दारू पिऊन मरण पावले. गुजरातमध्ये 1960 पासून तर बिहारमध्ये 2016 पासून दारूबंदी आहे. पण या दोन्ही राज्यात मुबलक दारू मिळते. बिहारच्या मुजफ्फरपूर, समस्तीपूर या ठिकाणी नोव्हेंबर 2021 मध्ये विषारी दारू पिऊन 33 लोक मरण पावले तर नालंदा जिल्ह्यामध्ये 11 लोकांचा जीव गेला. या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे प्रवक्ते अरविंद कुमार सिंह यांनी दारूबंदी कायद्याचाच विरोध केला. ते म्हणाले की, ’’प्रशासनात बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हा कायदा निरोपयोगी करून टाकलेला आहे.’’ म्हणून लवकरच बिहारमध्येही दारूबंदीचा कायदा निरस्त केला गेला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एन.टी. रामराव यांनी सुद्धा आंधप्रदेशमध्ये दारूबंदीचा अशयस्वी निर्णय राबविला होता.
दारूबंदी फक्त इस्लामी श्रद्धेमध्येच शक्य आहे
आज भारतात दारू पिणाऱ्यांची प्रचंड संख्या पाहता तुलनेत श्रद्धावान मुस्लिम या द्राक्षांच्या मुली (अंगुर की बेटी) च्या मोहापासून लांब असल्याचे दिसून येते. यावर ईश्वराचे कितीही आभार मानले तरी कमी आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ‘हे श्रद्धावंतांनो, ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.’ ‘शैतानाची तर अशीच इच्छा आहे की दारू व जुगाराद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल? (सुरे अल मायदा आयत नं. 90-91)
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फर्माविले आहे की, ’दारू ही सर्व पापांची जननी आहे.’ कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिलेल्या या निर्देशांबद्दल अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. वाचक यांचा अर्थ स्वतः लावू शकतात.
दारूमुळे होणारे नुकसान
दारूचा सर्वात जास्त वाईट परिणाम किडनी (मुत्रपिंड) आणि यकृता (लिव्हर) वर होतो. जास्त दारू पिल्याने जास्त मुत्र निर्माण होते आणि त्यामुळे मुत्रपिंडावर जास्त दबाव पडतो. मुत्रपिंड त्याचा भार झेलू शकत नाही आणि काही काळानंतर याच कारणामुळे मुत्रपिंड निकामी होते. दारूचा सरळ परिणाम यकृतावर होतो. कारण दारू सर्वात पहिल्यांदा येथेच पोहोचते आणि ईथूनच दारूचे 90 टक्के विघटन होत असते. त्यामुळे जितके अधिक मद्यप्राशन केले जाईल, यकृत तितक्या लवकर खराब होईल हे वैद्यकीय सत्य आहे. मग हे मद्य दारूच्या स्वरूपात असो की बिअरच्या स्वरूपात असो की वाईनच्या. अल्कोहोल अल्कोहोल असते. दारूमुळे रक्तातील साखर कमी होते. आपले शरीर रक्तामध्ये विशिष्ट प्रमाणात साखरेचे प्रमाण मेंटेन ठेवत असते. पण अल्कोहोल जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेचे संतुलन बिघडते. याशिवाय रक्ताभिसरण (बी.पी.) वाढतो. तरूणांमध्ये वीर्य उत्सर्जन लवकर होते व त्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. महिलांच्या बाबतीतही मद्य प्राशनामुळे वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो. एवढेच नाही तर माणसाची रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा याने कमी होते.
असे म्हंटले जाते की, दारूचे व्यसन त्याचवेळेस सुटू शकते ज्यावेळेस माणूस कधीच दारू पीत नाही. एकदा दारू पिण्यास सुरूवात केली मग काही केल्या ती सुटत नाही. दारूचा कोणताही प्रकार असो तो हानीकारकच असतो. हे अनुभवातून सिद्ध झालेले आहे. कोट्यावधी संसार या दारूमुळे उध्वस्त झालेले आहेत, होत आहेत आणि भविष्यात होणार आहेत. अनेक लोक देशोधडीला लागलेले आहेत. गुन्हेगारीमधील आर्धी गुन्हेगारी व अपघातातील अर्धे अपघात केवळ दारू पिल्यामुळे होतात. इस्लामी श्रद्धेच्या कडक अंमलबजावणीशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट माणसाला साधारणपणे दारूच्या व्यसनापासून रोखण्यास यशस्वी ठरू शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
’सुपर मार्केट’ मध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाचा जमाअते इस्लामी हिंद विरोध करते. आमची अशी धारणा आहे की, दारू, ज्यात वाईनचाही समावेश होतो आपल्या समाजासाठी हानीकारक आहे. एवढेच नव्हे तर यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत आणि घरेलू हिंसा वाढत आहे. शिवाय, हा निर्णय भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 47 च्या विरूद्ध आहे. ज्यात सरकारांना संविधानाने संपूर्ण नशाबंदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. एवढेच नव्हे तर महात्मा गांधी आणि देशातील महिलांनी दारूबंदीचा पहिल्यापासून विरोध केलेला आहे. राहता राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा, तर त्यांना व्याजमुक्त कर्ज, एमएसपी, पीक विमा आणि इतर सामाजिक सुरक्षिततेच्या माध्यमातून मदत करता येते. इतर राज्य उदा. गुजरात, बिहार, मिझोराम प्रमाणे आम्ही महाराष्ट्रातही पूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी करतो.
- रिझवानुर्रहेमान खान, अध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र.
’’वाईन तसेच इतर मद्यांमधील फरक समजून घेण्याची भूमीका घेतली पाहिजे. ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टींसंदर्भात वेगळा विचार केला तरी माझा विरोध असण्याचे कारण नाही. हा चिंताजनक विषय आहे असं वाटत नाही. पण काहीजणांना वाटत असेल तर त्यासंबंधी राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर त्याच्यात फारस वावगं होणार नाही. ’’ - खा. शरद पवार,
- अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
Post a Comment