न्यूनगंड म्हणजेच आत्मविश्वासाचा अभाव हा प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील फार मोठा अडथळा ठरतो. याची सुरुवात कुठेतरी मनुष्याच्या लहानपणीच्या घटनेतून होते, त्यामुळे संपूर्ण आयुष्यात त्या मनुष्याला सातत्याने अपयशाच्या एकापेक्षा एक पायर्या चढाव्या लागतात. तो कोणत्या ही प्रसंगी यशस्वी होत नाही. या व्यक्तीला नेहमी मला हे जमणार नाही, असे मनापासून वाटत असते किंवा मी यशस्वी होणारच नाही, असा सतत विचार त्याच्या डोक्यात घुमू लागतो. त्यामुळे कोणतेही कार्य सुरू करायचे म्हटले, की त्याच्या छातीत आधीच काहीही कारण नसताना धडधडू लागते, तो भीत भीतच कार्याचा प्रारंभ करीत असतो.या शुभारंभातच त्याच्या अपयशाची नांदी दडलेली असते.अर्थात त्यामुळे पुढे कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, अफयशाचा तो धनी होतो. मात्र त्याला या अपयशाचे खरे कारण काय आणि कोणते हे अनेकदा कळून येत नाही किंवा त्या दृष्टीने समजावून घेण्याची त्याची मानसिकताच नसते. वास्तविक दुर्दैवाने मानसशास्त्राचा आणि अशा व्यक्तीचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. त्यामुळे अशी व्यक्ती सतत दूर्मुखलेली , निराश व उदास असल्याचे दिसून येते. त्याला आपल्या जीवनात रस वाटत नाही. एक प्रकारचा फार मोठ्या समस्येचा डोंगर त्याच्या जीवनाच्या वाटेवर आडवा आलेला असतो.हा डोंगर कसा पार करावा आणि त्याच्यावर मात करून यशाची मंदिराकडे कसे आगेकूच करायचे हे समजत नाही. पण मित्रहो, जगद्गुरू संत तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सांगितलेला मंत्र आपण विसरलो आहोत तो मंत्र म्हणजे "तूज आहे तुजपाशी, परंतु जागा चुकलाशी". किंवा "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण"
न्यूनगंडावर मात करण्याचा उपाय तुमच्यापाशीच असतो, पण तो तुम्ही शोधायचा कधी प्रयत्नच करीत नाही.
आपल्या शरीरामध्ये दोन मने असतात, एकाला जागृत मन (काॅन्शन्स माईंड) व दुसर्याला सुप्त मन (अनकाॅन्शन्स माईंड) असे म्हणतात, जागृत मन हे मालक असेल, तर सुप्त मन हे सेवक असते. जागृत मनाकडून आलेल्या सर्व बऱ्यावाईट सूचना ग्रहण करण्याची आणि त्यावर
हुकूम कामगिरी करण्याचे किंवा पूर्वपरिस्थिती निर्माण करण्याचे काम हे सुप्त मन करीत असते. सुप्त मन हे सर्व काम श्रमाविना पार पाडत असते. सुप्त मन हे सेवकाप्रमाणे मिळालेल्या सुचनेनुसार काम करत असते, त्याने तुमच्या जागृत मनाला, मनोमन मालक म्हणून मानलेले असते. त्याने दिलेला हुकूम (ऑर्डर) ते शतप्रतिशत पाळत असते.जागृत मनाने सांगितलेल्या कामाचा उरक सुप्तमन अक्षरश: कंबर कसून तात्काळ पूर्ण करण्याच्या मागे लागते. त्याला स्वत:ची बुद्धी नसते. ते सांगितलेल्या हुकूमावर काम करीत असते, जागृत मन हे केवळ 10 टक्के असते, ,पण सुप्त मन 90 टक्के असते. कार्यक्षमतेच्या बाबतीत सुप्त मन अतिशय प्रभावी, ताकदवान व क्रीयाशील असते, सर्व मानसिक, शारीरिक, आर्थिक शक्तीपणाला लावण्याचं काम सुप्त मन करीत असते, हे काम चांगले असो अगर वाईट असो, त्याचा विचार हे सुप्त मन करीत नाही, केवळ 10 टक्के असलेल्या जागृत मनाचे हुकूम पाळणे आणि तात्काळ कामाला लागणे एवढेच सुप्तमनाला माहीत असते, अर्थात यासाठीच मुख्य म्हणजे जागृतमनाद्वारे सुप्तमनाला योग्य, विधायक आणि आपल्या सर्वांगीण फायद्याचेच हुकूम दिले पाहिजेत, हेच आपण विसरून जातो, आणि इथेच अपयशाची पहिली पायरी चढायला सुरुवात होते.
खरं तर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर किंवा अपयश टाळायचं असेल तर तुम्ही फक्त तुमची ईच्छा संपूर्ण श्रद्धेने, विश्वासाने जागृत मनाद्वारे सुप्तमनाकडे पाठवा, त्याच्यावर तुमच्या यशस्वीतेची जबाबदारी सोपवा, सुप्तमनाला जबरदस्ती आवडत नाही, ते जागृत मनाकडून सहजपणे आलेल्या हुकूमांची ताबेली करीत असते. तुमच्या यशासाठी जे व जसे करायला पाहिजे ते ते सुप्तमन करीत असते. अर्थात सुप्तमन म्हणजे एक चमत्कार असल्याचे दिसून येईल. क्षणोक्षणाला चमत्कार झाल्याप्रमाणे सुप्तमनाकडून कामगिरी पार पाडल्याची प्रचिती तुम्हाला येवू लागेल. तुम्ही जे बोलाल ते प्रत्यक्षात झालेले दिसेल. मात्र यासाठी आपल्या प्रत्येक वाक्यात सकारात्मक विचारांची पेरणी झालेली असली पाहिजे. आपण बोलणं नेहमी शुभचिंतनपर पाहिजे,दुसर्याचे नुकसान करणारे असू नये. जीवनात अपयश येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या बोलण्यात नेहमी खालील वाक्ये सहजपणे येतात,ती म्हणजे ....
"मला हे काम जमणारच नाही."
"सगळ्या गोष्टी बिघडतच चालल्यात"
"मला समोरून चांगला प्रतिसाद कधीच मिळणार नाही."
"माझ्यासमोर सतत कटकटी आणि समस्याच उभ्या राहतात."
"सगळं होपलेस आहे, हे असंच चालायचं."
"मी या स्पर्धेत टिकूच शकत नाही."
"माझे मलाच काय कळेनासे झाले आहे."
"माझे नशिबच फुटके आहे."
अशी सततची ना... ना... ची घोकंपट्टी जेव्हा जेव्हा तुम्ही पढत असता, तेव्हा तेव्हा सुप्तमन लक्ष देवून ऐकत असते, आणि जागृत मनाकडून आलेला हा हुकूमच आहे अशी समजून करून घेवून ते त्याप्रमाणे इमाने इतबारे शतप्रतिशत आपली कामगिरी पार पाडत असते आणि त्यामुळे तुम्ही पुढेही जात नाही आणि मागे ही जात नाही. तुम्ही तिथल्या तिथे जागेवरच ठप्प होता आणि अपयशाचे खापर डोक्यावर स्वत:हून फोडून घेता. न्यूनगंडाचे आपण आपल्या मनात घर करून घेता आणि आत्मविश्वासही गमावून बसता, यासाठी तुम्ही नेहमी जागृत मनाला चांगल्या सूचना दिल्या पाहिजेत, नकारात्मक एखादाही शब्द उच्चारायचा नाही, जागृत मनात सकारात्मक विचार पक्का करून तुम्ही त्याला चिकटून राहिलात की, तुमचं सुप्तमन तुम्हाला घवघवीत यश देईल,सूप्त मन प्रत्येक क्षणाला तुम्हाला भरघोस मदत करेल.
एखादा मॅकनिक बंद पडलेल्या गाडीचा नेमका फॉल्ट शोधून काढतो, रिपेअरी करतो व बंद पडलेली गाडी दुरुस्त करतो, नेमके सुप्तमन तुमच्या यशाची सोपी पद्धत तुम्हाला दाखवेल, तुमच्यातला न्यूनगंड घालवून त्याठिकाणी प्रचंड आत्मविश्वास निर्माण करेल.
परिक्षेत उत्तम गुण मिळावेत ही इच्छा तुम्ही व्यक्त केलीत, पण ऐनवेळी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे मी विसरणार नाही ना? असा अविश्वास व्यक्त केलात की, नक्की तुम्ही नापास होता, कारण सुप्तमन आळशी असते, विसरण्याची क्रीया सोपी असल्याने ते उत्तमगुण मिळवून देण्याच्या इच्छेच्या अवघड कामगिरीला बगल देते आणि विसरण्याला प्राधान्य देते. म्हणून केवळ जे आपल्याला हवं आहे.
त्याचीच मागणी सुप्तमनाकडे करायला शिका, अर्थात जागृत मन (कॉन्शन्स माईंड) आणि सुप्तमन (अनकॉन्शन्स माईंड) यांची कार्यपद्घती समजावून घ्या, ती एकदा का समजली की नेहमी सकारात्मक,विधायक, जीवनोपयोगी सूचना कशा द्यायच्या तेही समजावून घ्या आणि मग तुमच्या यशोमंदिराचे द्वार आपोआपच उघडलेले आपल्याला दिसेल, मात्र त्यासाठी सातत्य, निष्ठा व प्रयत्न आवश्यक आहेत. सुप्तमनाचे चमत्कार पाहून आपण अचंबित तर व्हालच शिवाय तुमच्या जीवनातील अपयश, निराशा, औदासिन आणि दुर्दैव कुठल्याकुठे पळून जाईल.
- सुनीलकुमार सरनाईक
कोल्हापूर, भ्रमणध्वनी - 9420351352
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)
Post a Comment