अंबड ( सलीम खान )
सुपर मार्केट मधून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जमाते इस्लामी हिंद अंबड शाखेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना प्रशासनाद्वारे निवेदन पाठवून सदर निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री करण्याचा समाजविघातक निर्णय घेण्यात आला. वाईन ही दारू नसून एक आरोग्यदायी पेय आहे, असा परोक्ष प्रचार सरकार मधील काही जबाबदार मंडळी करीत आहेत. वास्तविक पाहता वाईनला दारूपेक्षा वेगळी समजणे चूकीचे ठरेल. वाईन ही दारूच आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. म्हणून तर ती आजपर्यंत केवळ दारूच्या दुकानातुनच विक्री होत होती. दारूचे दुष्परिणाम सर्वांना माहीत आहेत. या दारूमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. याच दारूच्या व्यसनामुळे आजची तरुण पिढी वाया चालली आहे. युवक अधःपतनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आता जर वाईन किराणा मालासोबतच दुकानात सहजासहजी मिळायला लागली तर व्यसनाधीनता वाढल्या शिवाय राहणार नाही. मग शासन दरबारी असलेल्या दारूबंदी विभागाचा फायदा काय? आणि दारूबंदी कायद्याचं काय. त्यामुळे केवळ आणि केवळ महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून जर हा निर्णय घेण्यात आला असेल तर तो एकदम चुकीचा आहे. कारण असं करून राज्य सरकार लोकांच्या संसाराचा व भावी पिढीच्या भविष्याचा खेळ करीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करून सदर निर्णय मागे घ्यावा. अशी मागणी तहसीलदार अंबड व आमदार नारायण कुचे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी जमात-ए-इस्लामी चे स्थानिक अध्यक्ष मौलाना सादेख मज़ाहीरी, हकिम पटेल, शेख नासेर, अय्यूब खान, शेख शब्बीर, यासीन खान, मुश्ताक कूरैशी, नोमान शेख, शेख उस्मान, शेख साबेर तसेच नईम बागवान, नसीर तांबोळी, नईम पठाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment