१९ फेब्रुवारी १६३० ला जाणता राजा शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीत झाला. माता जिजाबाईंच्या कुशीत स्वराज्याचे, स्री-सन्मानाचे, उदारमतवादाचे व दूरदृष्टीचे धडे शिकले. सर्वधर्मांचा आदर करत, जातीधर्माच्या भिंती ओलांडून जनतेवर प्रेम करणारा राजा, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले, जनकल्याणाची दृष्टी ठेवणारे, चोख शासन व्यवस्थेचे प्रतीक होते. सर्व धर्मांत मानवताच श्रेष्ठ हा विचार राजांचे सूत्रच होते. हिंदू-मुस्लिम धर्मगुरुंचा आदर करत मशिदींना, श्रद्धास्थानांना त्यांनी संरक्षण दिले. प्रसिद्ध इतिहासकार काफीखान लिहितात,
‘‘मशिदी व कुरआन या श्रद्धास्थानांना कोणताही उपद्रव देऊ नये, अशी सक्त ताकीद शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिली होती. मशिदीला धक्का लागता कामा नये. महाराज ईशग्रंथ कुरआनचा आदर करत. एखादी कुरआनची प्रत हाती आली तर ती सन्मानपूर्वक एखाद्या मुस्लिम सैनिकास दिली जाई.’’ (संदर्भ- के. के. मूर, पान क्र. २६०)
शिवरायांनी इस्लामचा अभ्यास केला होता. शिवरायांच्या काळातच पवित्र ईशग्रंथ कुरआनचे भाषांतर फारसीत झाले होते. त्यांची लढाई ही कोणत्याही धर्माविरुद्ध किंवा जातीविरुद्ध नव्हती.
शिवरायांचे स्त्रीविषयक धोरण
शिवाजी महाराज रयतेचा राजा, गरिबांचा कैवारी, स्त्री-रक्षणासाठी स्त्रीविषयक धोरण हे कोणत्याही एका धर्मासाठी नव्हते. शत्रुपक्षाच्या स्त्रियांचादेखील ते आदर करीत. स्त्रियांना कैद करायला त्यांच्या राज्यात बंदी होती. कोठेही स्त्रीचा अनादर होणार नाही याची काळजी घेतली जात असे. त्यासाठी ऐतिहासिक दाखले पाहावयास मिळतात. मोगल फौजेतील रायबाघिण शिवरायांच्या युद्धात मिळाल्या. तिला पराभवानंतर सुद्धा राजांनी आदरपूर्वक तिच्या छावणीत व्यवस्थित पोहचविले.
मोहिमेत शत्रुपक्षाकडील कोणत्याही परस्त्रीला कधी त्यांनी कसलाच त्रास होऊ दिला नाही. परस्त्रीचे माताभगिनीप्रमाणे रक्षण करत. त्यांना सन्मानपूर्वक पाठवत. स्त्री-अब्रूचे रक्षण करण्याचा राजांचा आदेश होता. जर कोणी त्याविरुद्ध पाऊल उचलले तर त्याला अपराधाबद्दल कडक शासन केले जाई. महिलांवर अन्याय होणार नाही याची महाराज दक्षता घेत.
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘स्त्री पुरुष समानता आहे. जो महिलांबाबत शिष्ट विचार बाळगतो तोच तुमच्यात सर्वोत्तम आहे.’’ ‘‘हे सारे जग म्हणजे संपत्ती आणि जगातील सर्वोत्कृष्ठ संपत्ती म्हणजे सुशील पत्नी.’’
शिवाजी राजे अन्यायाच्या बाबतीत खूप कडक होते. याचे उदाहरण म्हणजे राझेगावच्या गरीब कुटुंबातील मुलीला पळवून नेल्याच्या आरोपाखाली गुन्हा सिद्ध झाल्यानंतर राजांनी त्या गुन्हेगाराला भर चौकात त्याचे हातपाय तोडण्याची व मृत्युदंडाची शिक्षा सर्वांसमक्ष दिल्याचे व त्या गरिबाला न्याय त्वरित दिल्याचे, त्यांची न्यायप्रियता व सत्यनिष्ठा ऐतिहासिक दाखल्यात पाहावयास मिळते. त्यांनी कधी स्त्रीवर अन्याय होऊ दिला नाही. शिक्षा करताना नातीगोती पाहिली नाहीत. स्त्री-शीलाचे रक्षण केले. हात-पाय शरीराचे अवयव तोडण्याच्या या कडक शिक्षेमुळे मावळ्यांमध्ये त्यांचा वचक व दरारा होता.
अशा प्रकारे कडक शिस्तीचे नियम प्रस्थापित करून शिवरायांनी जनतेला भयमुक्त केहे. नीतीमुल्यांचे रक्षण करून स्त्री-पुरुष भेदभाव केला नाही.
ईशग्रंथ पवित्र कुरआनात म्हटले आहे, ‘‘व्यभिचारी स्त्री व व्यभिचारी पुरुष दोहोंपैकी प्रत्येकास १०० फटके मारा. त्यांची कीव करू नका.’’ (सूरह अन-नूर, आयत २)
तसेच, ‘‘चोर, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, दोघांचे हात कापून टाका. हा त्यांच्या कर्माचा मोबदला आहे. आणि अल्लाहकडून अद्दल घडविणारी शिक्षा!’’ (सूरह अल माइदा, आयत ३८) पुढे ईशग्रंथात म्हटले आहे, ‘‘अल्लाह न्याय करणाऱ्याला पसंत करतो.’’ (सूरह हुजरात, आयत ९)
वरील कुरआनातील श्लोकांवर खोलात विचार केला तर आपल्या लक्षात येते की आदर आणि अपराध्याला कडक शासन यांच्या अंमलबजावणीमुळेच समाजाची घडी व्यवस्थित राहण्यास मदत होते.
नीतीमूल्यांचे रक्षण करत शिवाजी महाराजांनी कुणाशी भेदभाव केला नाही. सत्यनिष्ठ राहिले. माता जिजाबाईंसह राजांच्या स्वराज्याच्या युद्धात इतर महिलांनीही सक्रिय सहभागी होऊन इतिहास गाजविल्याचे आपणास आढळून येते. जनतेचे कल्याण, महिलांचे संरक्षण, अन्यायाविरुद्ध कडक शासन हीच शिवरायांची आदर्श तत्त्वे आम्हा भावी पिढीसाठी उपयोगी पडतात. नीतीमत्ता टिकविण्यासाठी त्यांचा आदर्श आपल्या समोर आहे.
- डॉ. आयेशा पठाण
नांदेड
Post a Comment