(२८) त्याने म्हटले, ‘‘हे देशबंधुंनो! जरा विचार तरी करा जर मी आपल्या पालनकत्र्याकडून एका स्पष्ट साक्षीवर अटळ होतो आणि त्याने मला आपल्या विशेष कृपेनेदेखील उपकृत केले.३४ परंतु ती तुम्हाला दिसली नाही तर शेवटी आमच्याजवळ कोणते साधन आहे की तुम्ही मान्य करू इच्छित नाही आणि आम्ही जबरदस्तीने तुमच्या माथी मारावे?
(२९) आणि हे देशबंधुंनो! मी या कामासाठी तुमच्याकडून कोणताही माल मागत नाही,३५ माझा मोबदला तर अल्लाहपाशी आहे, आणि मी त्या लोकांना पिटाळू शकत नाही ज्यांनी माझे ऐकले आहे, ते स्वत:च आपल्या पालनकत्र्याच्या पुढे हजर होणार आहेत३६ परंतु मी पाहात आहे की तुम्ही अडाणीपणा करीत आहात.
(३०) आणि हे देशबंधुंनो! जर मी या लोकांना हाकलून लावले तर अल्लाहच्या तावडीतून मला वाचविण्यासाठी कोण येईल? तुम्हा लोकांना एवढी गोष्टदेखील कळत नाही का?
(३१) आणि मी तुम्हाला सांगत नाही की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत, हेदेखील सांगत नाही की मला परोक्षाचे ज्ञान आहे, हासुद्धा माझा दावा नाही की मी दूत आहे३७ आणि हेदेखील मी सांगू शकत नाही की ज्या लोकांना तुमचे डोळे तुच्छतेने पाहतात त्यांना अल्लाहने कोणताच भलेपणा दिला नाही, त्यांची मन:स्थिती अल्लाहच अधिक चांगली जाणतो, जर मी असे म्हटले तर अत्याचारी ठरेन.’’
(३२) सरतेशेवटी ते लोक म्हणाले, ‘‘हे नूह (अ.) तुम्ही आमच्याशी भांडण केले आणि आता खूप झाले. आता तर फक्त तो प्रकोप घेऊन या ज्याची तुम्ही आम्हाला धमकी देत आहात, जर तुम्ही खरे असाल.’’
(३३) नूह (अ.) ने उत्तर दिले, ‘‘तो तर अल्लाहच आणील जर त्याने इच्छिले आणि तुमच्यात ते सामर्थ्य नाही की तुम्ही त्याला रोखू शकाल.
(३४) आता जर मी तुमचे काही हितचिंतन करू इच्छिले तरी माझे हितचिंतन तुम्हाला कोणतेच लाभ देऊ शकणार नाही जेव्हा अल्लाहनेच तुम्हाला भटकविण्याचा इरादा केला असेल.३८ तोच तुमचा पालनकर्ता आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला परतावयाचे आहे.’’
३४) ही तीच गोष्ट आहे जी मागील आयतींमध्ये मुहम्मद (स.) यांच्याद्वारा सांगितली गेली, ``पूर्वी सृष्टीतील अल्लाहच्या निशाण्या पाहून आणि आपल्या स्वत:तील निशाण्यांपासून मी एकेश्वरत्वाच्या वास्तविकतेला जाणून होतो. अल्लाहने त्याच्या कृपेने आता मला उपकृत केले. (म्हणजे दिव्य अवतरण माझ्यावर अवतरित केले) या दिव्य प्रकटनाद्वारे मला त्या सत्याचे ज्ञान दिले ज्यास माझे मन पूर्वीपासून मानत होते.'' यावरून हेसुद्धा माहीत होते की सर्व पैगंबर पैगंबरत्व बहालीपूर्वी आपल्या िंचतन मननाने परोक्षवर ईमान धारण करून होते. नंतर अल्लाह त्यांना पैगंबरत्वाचे पद प्रदान करतेवेळी प्रत्यक्षावर ईमानची साक्ष प्रदान करीत होता.
३५) म्हणजे मी एक नि:स्वार्थ उपदेशक आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर तुमच्या भल्यासाठी या सर्व अडथळयांना व यातनांना तोंड देत आहे. तुम्ही एखाद्या वैयक्तिक स्वार्थाकडे बोट दाखवू शकत नाही जे या सत्याचे आवाहन करण्यात आणि त्याच्यासाठी जीव तोडून मेहनत करण्यासाठी आणि संकटांना झेलण्यासाठी माझ्यासमोर आहे.(पाहा सूरह २३ टीप ७०, सूरह ३६ टीप १७, सूरह ४२ टीप ४१)
३६) म्हणजे त्यांचे मूल्य जे काही आहे ते त्यांच्या पालनकत्र्याला माहीत आहे आणि ते त्याच्यासमोरच हजर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. जर हे अमूल्य हिरे असतील तर माझ्या आणि तुमच्याकडून फेवूâन दिल्याने दगड बनणार नाहीत. जर हे मूल्यहीन दगड आहेत तर यांच्या स्वामीला अधिकार आहे की याने वाटेल तिथे फेवूâन द्यावे.
३७) हे त्याचे उत्तर आहे जे विरोधकांनी सांगितले होते की तुम्ही तर आमच्यासारखेच मनुष्य आहात. यावर आदरणीय नूह (अ.) सांगतात की खरोखर मी एक मनुष्यच आहे. मी मनुष्यापेक्षा दुसरा कोणी असण्याचा दावा कधीही केला नव्हता की तुम्ही माझ्यावर हा आक्षेप घेत आहात. माझा दावा हा आहे की अल्लाहने मला ज्ञान आणि कर्माचा सरळमार्ग दाखविला आहे. त्याची परीक्षा तुम्ही ज्याप्रकारे करू इच्छिता त्याप्रकारे करावी. परंतु या दाव्याच्या परीक्षेचा हा कोणता प्रकार आहे की तुम्ही कधी माझ्याशी परोक्षाची माहिती विचारता आणि कधी अशा विचित्र मागण्या माझ्यापुढे करता जणूकाही अल्लाहच्या खजीण्याचा चाव्या माझ्याकडे आहेत. तुम्ही कधी माझ्यावर हा आरोप करता की मी मनुष्यासारखा खातो-पितो, चालतो-फिरतो, जणूकाही मी देवदूत (फरिश्ता) असण्याचा दावा केला आहे. ज्या मनुष्याने विश्वास, चरित्र आणि संस्कृतीमध्ये मार्गदर्शन करण्याचा दावा केला आहे त्याच्याशी अशा गोष्टीविषयी विचारण्याऐवजी तुम्ही विचित्र गोष्टी विचारता जसे म्हशीविषयी ती नर व्यायील की मादी हेसुद्धा विचारता. जणूकाही मानवीजीवनासाठी नीतीमत्ता, संस्कृतीविषयीचे नियम दाखविण्याचा संबंध त्या म्हशीच्या गर्भाशी आहे. (पाहा सूरह ६, टीप ३१-३२)
३८) म्हणजे अल्लाहने तुमचा दुराग्रह, दुष्टता आणि भलाईशी द्वेष पाहून हा निर्णय केला आहे की तुम्हाला सरळमार्ग स्वीकारण्याचे सौभाग्य प्रदान करू नये आणि ज्या मार्गांवर तुम्ही स्वत: भरकटू पाहता आहात, त्यातच तुम्हाला भरकटत ठेवावे. तेव्हा आता तुमच्या भलाईसाठी माझा कोणताच प्रयत्न सफल होऊ शकत नाही.
Post a Comment