Halloween Costume ideas 2015

ऑफलाइन परीक्षा सर्वसमावेशक असाव्यात


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापनासाठी विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षेला प्राधान्य द्यावे. हे करत असताना नवीन शैक्षणिक धोरणात अभिप्रेत निरनिराळ्या मूल्यमापन पद्धतीचा वापर करावा. जेणेकरून ऑफलाईन परीक्षा पद्धत सर्वसमावेशक होईल. राज्यातील विद्यापीठांना १५ फेब्रुवारीनंतर ऑफलाईन परीक्षा घेण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. मात्र परीक्षा ऑफलाईन घ्यायची की ऑनलाईन हा निर्णय विद्यापीठ स्तरावर घ्यावा, असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे ऑनलाईन परीक्षेतील त्रुटी आणि मर्यादा लक्षात आल्या आहेत. मूल्यमापन पद्धतीबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, ‘परीक्षा ऑफलाईनच घ्यायला हवी, या मताचा मी आहे. ऑनलाईन परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांचे परिपूर्ण मूल्यमापन होत नाही. नवीन शैक्षणिक धोरणात सुचविलेल्या विविध मूल्यमापन पद्धतींचा आपण अवलंब करू शकतो. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करायला हवा.’ शासनाने जरी ऑफलाईन परीक्षेला परवानगी दिली असली, तरी काही विद्यापीठांची ऑनलाईन परीक्षेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरातच विद्यापीठांच्या परीक्षापद्धतींबद्दल स्पष्टता येईल.

ऑनलाईन परीक्षेमुळे एकांगी मूल्यमापन परिपूर्ण पर्याय असूच शकत नाही. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईनच असावी. सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करावा. मुलाखत, प्रात्यक्षिके, प्रकल्प, चर्चा आदी नवीन शैक्षणिक धोरणातील मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. अंतर्गत मूल्यमापनावर अधिक भर द्यावा. ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षांचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. या बद्दल विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, ऑनलाईन परीक्षा हा मूल्यमापनाचा परिपूर्ण पर्याय ठरू शकत नाही. मात्र, कोरोनाची परिस्थिती आणि तेव्हाचे शासन निर्णय पाहून विद्यापीठाने मागेच ऑनलाईन परीक्षांचा निर्णय घेतला आहे. आता त्या परीक्षांचे नियोजनही सुरू आहे. पुढील काही दिवसांतच परीक्षांच्या तारखा घोषित होतील. या संबंधीचा काही निर्णय घ्यायचा असेल, तर तो कुलगुरू आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळ घेईल.

परीक्षासंदर्भात विद्यार्थ्यांची मानसिकता सध्या दोलायमान स्थितीत आहे. ऑनलाईन परीक्षांमुळे त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षांना प्राधान्य द्यायला हवे. सातत्यपूर्ण मूल्यांकन आणि निरनिराळ्या पद्धतींचा वापर करत ऑफलाईन परीक्षा घ्यायला हव्यात. यासंबंधी विद्यापीठानेच कार्यपद्धती निश्चित करायला हवी. आता ऑनलाईन परीक्षेतही विद्यार्थ्यांवर वॉच राहील. पारदर्शी परीक्षेसाठी विद्यापीठ हे व्यवस्थापन राबवणार आहे. त्यामुळे कॉपी बहाद्दरांना वचक बसणार आहे. परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात म्हणून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. सध्या पार पडलेल्या औद्योगिक प्रशिक्षणच्या ऑनलाईन परीक्षेत या पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

कोरोना काळात सुरु झालेल्या ऑनलाईन परीक्षा पद्धती सुरु झाली. मात्र या परीक्षा पद्धतीचा गैरफायदा घेत कॉपी बहाद्दरांचे स्तोम माजले होते. या कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी आता त्यांच्यावर वॉच ठेवण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यासाठी परीक्षेदरम्यानची व्यवस्था सक्षम करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. यावर्षी ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे व्हिडीओ व ऑडिओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

परीक्षा पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. येत्या 15  फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. या परीक्षांमध्ये बहुपर्यायी (एमसीक्यू) पद्धती असणार आहेत. गेल्यावर्षी झालेल्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घ्यायला सुरुवात केली. यावर्षी त्यात आणखी कडक नियम लागू करण्यात येणार असून परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे . एखादा विद्यार्थी परीक्षा देताना बोलताना आढळल्यास तसेच स्क्रीन सोडून बाहेर जात असतील तर त्यांना परीक्षेतून बाद करण्यात येणार आहे. परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले आहे.

यामुळे कॉपी बहाद्दरांना चाप बसणार आहे. प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेण्याचा अनुभव विभागांना आहे. त्यामुळे विद्यार्थी नेमके कशा प्रकारे गैरप्रकार करू शकतात याची माहिती तसेच अंदाजही विभागांना आहे. याबाबत सर्व माहिती विभागांना आहे, नेमक्या याच गोष्टींवर परीक्षेच्या दरम्यान लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कॉपी करणा-या विद्यार्थ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. तसेच विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेणा-या अंध विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा देण्याची मागणी केली तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी विद्यापीठाने सहा अंध विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर परीक्षा राबवली होती. तो प्रयोग यशस्वी झाला आहे.

- सुनील शिरपुरे

कमळवेल्ली, यवतमाळ

भ्रमणध्वनी-7057185479


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget