Halloween Costume ideas 2015

माणसाच्या व्यक्तिमत्त्वात परिवर्तन

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी माणसाला जीवनमूल्ये दिली. त्यांचाय जिवांचे मोल बहाल केले. त्या जीवनमूल्यांनुसार एका सौहार्दपूर्ण समाजाची उभारणी केली. नव्या संस्कृती-सभ्यतेचे बी रोवले आणि शुद्ध, नितळ व निःस्वार्थी समाजाची रचना केली. प्रेषितांच्या आगमनापूर्वी मानवजाती विनाशाकडे वाटचाल करत होती. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, “अल्लाहने त्याच लोकांमधून एक प्रेषित पाठवून त्यांच्यावर उपकार केले. ते (प्रेषित) त्यांना अल्लाहची शिकवण सांगतात, त्यांना पावन करतात आणि ज्ञान देतात. त्यांच्या आगमनापूर्वी हे लोक भरकटलेले होते.” (पवित्र कुरआन-३)

प्रेषितांच्या स्वभावाविषयी कुरआन म्हणते की, “ते लोकांसाठी मायाळू स्वभावाचे आहेत. जर कठोर वृत्तीचे असते तर लोक त्यांचायापासून दुरावले असते.” आणि म्हणूनच प्रेषितांना एका नव्या समाजाची, सभ्यतेची, जगाची निर्मिती करणे शक्य झाले. प्रेषित त्यांना जे आदेश, उपदेश देत असत ते त्या आधी स्वतःच्या अंमलात आणत असत. त्यांनी ज्या धर्माचा प्रसार केला त्याच्या शिकवणी साध्यासुध्या आहेत. यासाठी सर्वांना धर्मग्रंथाचे भलेमोठे ज्ञान संपादन करण्याची गरज नाही. उपासना म्हणजे काही ठराविक वेळेवर ठराविक विधींची पूर्तता करणे एवढेच नाही. लोकांशी चांगले बोलणे, त्यांना क्षमा करणे, कुणाला भेटताना स्मितहास्य करणे, रस्त्यातून त्रासदायक वस्तू बाजुला सारणे; अशी परोपकारी कार्ये उपासनाच आहेत. नातेवाईकांशी आपुलकीचा व्यवहार करणे, विधवा महिलांची देखरेख करणे, वंचितांच्या-पीडितांच्या हक्कासाठी झटणे हेदेखील अल्लाहची उपासनाच आहे.

प्रेषित म्हणतात की, आपसातील संबंध जोपासने नमाज अदा करण्यापेक्षाही महत्त्वाचे आहे. प्रेषितांनी सांगितलेल्या शिकवणीतला गोडवा, साध्यासुधे धर्मविधी, सामाजिक बांधिलकी यामुळे लोक त्यांच्या मोहात पडले. प्रेषितांनी लोकांना विचार दिले. विचारांना शक्ती दिली. साचेबंद आचारविचारांतून माणुसकीला मुक्त केले आणि त्यांना उर्जितावस्था प्रदान केली. त्या ऊर्जेला वैचारिक शक्ती दिली, नैतिक बंधने लावली. याच बंधनांतून जीवनाची प्रत बदलली.


ज्ञान संपादन

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे, “ज्ञान संपादन करणे प्रत्येक मुस्लिम पुरुष आणि स्त्रीसाठी अनिवार्य कर्तव्य आहे.” ते पुढे म्हणतात की प्रतिभासंपन्न लोक आकाशातील ताऱ्यांसारखे असतात जे अंधार पसरला असताना लोकांना दिशा दाखविण्याचे कार्य करतात. ज्ञान अशी शक्ती आहे ज्यापासून माणसाचे व्यक्तिमत्त्व विस्तृत लोते. तो आपल्या स्वतःच्या अस्तित्वात बंदिस्त राहात नाही. आपल्या अवतीभवती असणाऱ्या लोकांना परिचित असतो. त्यांच्यावर चांगले संस्कार करतो. एका लोकाभिमुख समाजाच्या गरजा काय आहेत हे त्याच्या लक्षात येते. मग त्या पूर्ण करण्यासाठी तो आपल्या ज्ञानाचा उपयोग करतो. असे करत असताना तो खऱ्या अर्थाने मानवी समाजाची उन्नती करत असतो. ज्ञानाच्या बाबतीत जे वंचित असती, त्यांना शिकण्यासाठी लागणाऱ्या साधनसुविधांची पूर्तता करतो. तो स्वतः हे सर्व करत असताना इतरांच्या शिक्षण-प्रशिक्षणाची काळजी घेत असतो. याच ज्ञानाच्या आधारे तो आकाशाकडे पाहातो आणि इतर निर्मितींबाबत विचारविनिमय करतो आणि एक वेळ अशी येते जेव्हा तो धरतीवरून आकाशात झेपावतो आणि इतर ग्रहांविषयी माहिती गोळा करतो, ज्यांचा प्रभाव आपल्या धरतीवर पडत आहे. प्रतिभासंपन्न ज्ञानी लोकांचे हे सारे कार्य ईश्वराची उपासनाच असते. पवित्र कुरआनची सुरुवातच ज्ञान संपादनाने झालेली आहे. अल्लाह म्हणतो, “आपल्या विधात्याच्या नावाने वाचा, ज्याने माणसाला लेखणी व इतर साहित्याद्‌वारे असे ज्ञान दिले जे यापूर्वी कधी दिले गेले नव्हते.” (पवित्र कुरआन)

प्रेषितांनी सांगितले आहे की जो माणूस ज्ञान संपादनासाठी घराबाहेर पडतो, अल्लाह त्याच्यासाठी स्वर्गाचा मार्ग सुकर करतो. शिक्षण प्राप्त करण्यासाठी प्रवास करणे, घर सोडून जगात त्याचा शोध घेण्यासाठी जाणे, वाचन - लेखन करणे, एकमेकांशी विचारविनिमय करणे या सर्व बाबी पुण्याकार्यात गणल्या जातात. ज्ञानी लोकांविषयी पवित्र कुरआनात अल्लाह असे म्हणतो की जे लोक उभ्याने, बसून, कुशीवर टेकून अल्लाहची आठवण करतात, आकाश व पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी विचारविनिमय करतात ते धन्यतेस पात्र आहेत. ते नरकाच्या शिक्षेपासून मुक्त होतात. (पवित्र कुरआन-३)

- सय्यद इफ्तिखार अहमद


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget