Halloween Costume ideas 2015

वृक्षारोपण : नियोजन व संरक्षण आवश्यक

 


५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा करण्यात येतो. पर्यावरणाचे संतुलन व पर्यावरण रक्षण या उद्देशाने प्रतिवर्षी अनेक संस्था, तरुण मंडळे, रोटरी, लायन्स, जायंट्स यांसारखे आंतरराष्ट्रीय क्लब वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करतात. अत्यंत उत्साहात गावोगावी झालेल्या या समारंभपूर्वक सोहळ्याची प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी सुद्धा केली जाते. प्रतिवर्षी हजारो, लाखो झाडांचे रोपण करण्यात येते; मात्र गेल्या पाच वर्षातील अनेक वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे सर्वेक्षण केले तर या लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली अथवा टिकली आहेत? याचे उत्तर समाधानकारक मिळत नाही. वृक्षारोपण जरी मोठ्या प्रमाणात होत असले तरी पर्यावरणाच्या दृष्टीने अशा कार्यक्रमांचा परिणाम फार मोठा होतो, असे दिसत नाही. त्याची कारणमीमांसा किंवा वृक्षारोपणाच्या परिणामांची चिकित्सा प्रत्येक पर्यावरणदिनी होणे अगत्याचे आहे.

पर्यावरणदिनी झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी त्याला किमान एक ते दीड वर्ष होईपर्यंत कायम स्वरूपी पाणी मिळेल, अशी व्यवस्था जेथे आहे, अशाच जागी वृक्षारोपण समारंभाचे कार्यक्रम हाती घ्यावेत. पाणथळ जागेत सतत ओलावा असतो तेथे अशा वृक्षांची लागवड करावी. वृक्षारोपण करण्यापूर्वी योग्य नियोजन करावे, असे करताना तेथील पाण्याची उपलब्धता, जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता आणि जमिनीचा प्रकार पाहून वृक्षांची निवड करण्यात यावी, वृक्षारोपण केल्यावर त्याचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

वृक्षांचे संरक्षणाचे दृष्टीने योग्य त्या 'ट्री गार्ड'ची निवड करावी, ते कायम स्वरूपी टिकतील याकडे लक्ष ठेवले पाहिजे, पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाबरोबरच उपलब्ध वृक्षांचे संरक्षण व संगोपन व्हावे याकरिता समाजात जाणीव आणि जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

सिंचन क्षमता वाढविणारे छोटे-छोटे प्रकल्प हाती घेतल्यास वृक्षारोपणास ते पूरक ठरतील. त्यामध्ये नाला अडवून त्यावर प्रत्येक हजार फुटांवर बंधारा (मातीचा) बांधून त्याला सांडवा काढून दिल्यास बंधाऱ्यांची मालिका तयार होऊन पावसाचे पाणी अडवून जमिनीतील पाण्याची खोल गेलेली पातळी बरीच वर येऊ शकते. भूमिगत बंधारा अतिशय कमी खर्चातील प्रकल्प असून त्याची सुद्धा क्षमता पाणी जिरविण्याची मोठी आहे. वाहत्या नाल्यांमध्ये किंवा नदीमध्ये किंवा खडक अथवा मुरुम लागेपर्यंत एक ते दीड फुट रुंदीचा संपूर्ण (रुंदी) खड्डा घेऊन त्यातील माती बाजूला काढावी व तो चर काळ्या मातीने भरून त्यावर मुरूम टाकावा. काळ्या मातीच्या गुणधर्मामुळे पाणी आपसूक अडवले जाऊन जमिनीत मुरण्याची प्रक्रिया होते. याचा फायदा पुढे उन्हाळ्यामध्ये दिसून येतो. शासनाने पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण एक समारंभ न करता एप्रिल ते मे या कालावधी मध्ये पावसाचे पाणी साठविण्याचे नियोजन करावे,

पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजनाद्वारे जमिनीमधील पाण्याची पातळी वर येण्यास मदत होते. वरील उपक्रम शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविल्यास विधायक कार्य वेळेवर व कमी खर्चात होऊ शकते. गावतळी, शेततळी, भूमिगत बंधारे, साठवण बंधारे, व वृक्षारोपण हे सर्व राबविताना पाण्याच्या नियोजनाबरोबरच वृक्षारोपणाचा विधायक कार्यक्रम एप्रिल ते जून-जुलै अखेर होऊ शकतो, त्यामधून पाण्याची पातळी वाढल्यामुळे शेती उत्पादन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर वृक्षारोपणामुळे पावसाच्या प्रमाणावर अपेक्षित परिणाम होऊन पर्यावरणाचे संतुलन कायम राहण्यास मदत होईल.

-सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

( लेखक भारत सरकारतर्फे ग्राहक संरक्षण विषयक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget