Halloween Costume ideas 2015

'ब्लॅक फंगस'च्या आजाराने महाराष्ट्रासह देशाची चिंता आणखीच गडद!


ब्लॅक फंगसचा कहर पाहाता औषधींचा व इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसत आहे. यामुळे काळा बाजार सुध्दा होत आहे. यावर लागणारी औषधे व ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन ताबडतोब उपलब्ध करावी. म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस)चा कहर पाहाता सर्वांनीच सावध रहाने गरजेचे आहे. करोना महामारीची पहिली लाट संपत नाहीच तर दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात महाभयंकर थैमान निर्माण केले. यात आतापर्यंत २ लाख ९७ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

सध्याच्या परिस्थितीत दुसऱ्या लाटेचा कहर थोडाफार मंदावत आहे. तोच सरकारच्या माहीतीनुसार देशातील २३ राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये ब्लॅक फंगसचे केसेस सामोर आले आहे. यात  १० राज्ये जास्तच प्रभावित आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेशात म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस)ने कहर निर्माण केल्याचे दिसून येते. हा अत्यंत चिंतेचा आणि गंभीर विषय आहे.

भारतातील ब्लॅक फंगसच्या मृत्यूच्या टक्केवारीमध्ये एकट्या महाराष्ट्रात ७० टक्के मृत्यूचे प्रमाण म्हणजे चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत देशभरात ब्लॅक फंगसचे ८८४८ पेक्षा जास्त केसेस आल्याचे सरकारी माध्यमातून  सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे ब्लॅक फंगसमुळे देशभरात २२० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. देशात अहमदाबादमध्ये करोनाने बरा झालेल्या १३ वर्षीच्या मुलाला ब्लॅक फंगस झाल्याची घटना मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे ही पहिलीच घटना आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर ब्लॅक फंगसच्या २००० पेक्षा जास्त केसेस आढळून आल्या व ९० लोकांचे प्राण गेले. त्यामुळे देशातील ९ राज्यात म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस)ला महामारी घोषित करण्यात आली आहे. ब्लॅक फंगस हा आजार करोना महामारीच्या काळात जगात कुठेही आढळून आला नाही. परंतु भारतात या आजाराने थैमान माजवील्याचे दिसून येते. यापाठोपाठ व्हॉइट फंगसने सुध्दा भारतात प्रवेश केल्याचे दिसून येते आणि पुढे चालून तिसरी लाट आपल्या डोक्यावर आहेच.

त्याचपाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक,गुजरातसह समुद्र किनारी राज्यांना चांगलाच तडाखा दिला. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी, वित्तीय हानी झाल्याचे दिसून येते आणि आता "यास" हे चक्रीवादळ तौक्ते ची पुनरावृत्ती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रासह संपूर्ण भारत अत्यंत कठीण परिस्थितीत असल्याचे दिसून येते.

अशा परीस्थितीत करोना महामारी आणि त्यापासून निर्माण होणारे नवनवीन आजार यापासून प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहाण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन सरकारने व डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. करोना काळात बीपी, शुगर किंवा इतर आजार असलेल्यांनी सतर्क रहाण्याची गरज आहे. देशातील प्रत्येकांनी मास्क घालुनच घराच्या बाहेर निघाले पाहिजे. कारण करोना महामारी नवनवीन आजारांना जन्म देतांना दिसत आहे. त्यामुळे घराच्या बाहेर निघताना लहान-मोठ्यांनी मास्क बांधूनच बाहेर निघावे.

करोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सर्व यंत्रणा सुसज्जीत केली आहे. परंतु ब्लॅक फंगसने महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवीली आहे. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती विविध कारणांमुळे कमी झाली आहे, तसेच ज्या रूग्णांच्या रक्तात आयर्न म्हणजेच फेरेटिनचे प्रमाण जास्त आहे, अशा रूग्णांना म्युकरमायकोसिसचा (ब्लॅक फंगस)चा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे सर्वांनीच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. असेही सांगण्यात येते की ऑक्सिजनचा तुटवडा असतांना कदाचित  जुने ऑक्सिजन सिलेंडर रूग्णांना लावण्यात आले असल्याने त्यांनाही ब्लॅक फंगसचा आजार होऊ शकतो असेही मत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. ऑक्सिजन सिलेंडर बनविण्यासाठी "डिस्टिल्ड वॉटर"चा वापर करण्यात येतो; परंतु कदाचित साध्या पाण्याचा वापर केलेल्या  ऑक्सिजन सिलेंडरचा वापर रूग्णांवर केला असेल तर ब्लॅक फंगस हा आजार होऊ शकतो असे अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या प्रकृतीची काळजी स्वत:च घेतली तर आपण येणाऱ्या नवनवीन आजारांवर मात करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला प्रकृती खराब वाटत असेल तर डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

करोना महामारी नंतर भारतात ब्लॅक फंगस आणि व्हॉइट फंगसने प्रवेश केला आहे. याला रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारांनी यावर लागणारी औषधे मुख्यत्वेकरून "एम्फोटेरेसिन बी" हे इंजेक्शन उत्पादन वाढवीण्यावर जोर दिला पाहिजे. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत सहा हजारच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. हे इंजेक्शन एका रूग्नांला २०-२० इंजेक्शन द्यावी लागतात. त्यामुळे खाजगी रुग्णालय असो वा सरकारी रुग्णालय असो ही इंजेक्शन रूग्नांणा मोफत देण्याची सुविधा सरकारने ताबडतोब केली पाहिजे. कारण लॉकडाउनमुळे, महागाईमुळे व महामारीमुळे ८० टक्के लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बीकट हलाखीची झाली आहे.

मास्कच्या बाबतीत सांगायचे झाले तर एका सर्वेक्षण अहवालाच्या माहितीनुसार अर्धा भारत मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच देशातील ५० टक्के लोक आताही मास्क वापरत नसल्याची गंभीर बाब सामोर आली आहे हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आजची भयावह परिस्थिती पहाता सर्वांनीच काळजीपूर्वक मास्क बांधूनच घराच्या बाहेर निघावे. कारण करोना महामारीच्या काळात कोण गेले.. .कोण राहिले... हे कोणालाच कळले नाही. अनेक कुटुंब करोना महामारीने उद्ध्वस्त केली, आपुलकीची भावना धुळीस मिळवली, आप्तापासून तर नातेवाईकांपर्यंत सर्वांना या महामारीने दुर लोटले. मृत्युनंतरचे क्रियाकर्म संपूर्ण संपुष्टात आणण्याचे काम या महामारीने केले. म्हणजेच मानवजातीची संपूर्ण सुख-शांती हीरावण्याचे काम करोना महामारीने केले.

अशी कल्पना कोणीच केली नव्हती की शांतीचा दुत मानल्या जाणाऱ्या भारतात प्रेतांचा ढीग लागेल. २०२१ ने महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला करोना महामारीने मृत्यूच्या खाईत लोटले व सर्वांना दु:खी केले. करोना महामारीचा मृत्यूचा कहर संपतच नाही तर ब्लॅक फंगसने महाराष्ट्रासह देशाच्या २३ राज्यात प्रवेश केला. यात महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावीत आहे. म्हणजेच मृत्यूचे थैमान सुरूच आहे. याला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वय साधून लोकांचे प्राण वाचवले पाहिजे. दु:खाची बाब म्हणजे आताही व्हॅक्सीन, रेमडेसीव्हीर, ऑक्सिजन, ॲम्फोटेरिसिन-बी यावर मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू असल्याचे दिसून येते याला ताबडतोब रोखले पाहिजे. त्याचप्रमाणे या कठीण घडीला राजकीय पुढाऱ्यांनी एका-मेकांचे उखाड-पाखड करने बंद करून देशाच्या जनते प्राण कसे वाचविता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

ब्लॅक फंगसने उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲम्फोटेरिसिन-बी या औषधांच्या उत्पादनासाठी आणखी पाच कंपण्यांना परवाने देण्यात आले आहे. यावरून स्पष्ट होते की "ब्लॅक फंगस" महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आपले पाय पसरू शकतो याला नाकारता येत नाही. ब्लॅक फंगसला महामारी घोषित केली आहे व यावर वापरल्या जाणारे ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे रूग्णांना ८ ते २५ हजार रुपये दराने हे इंजेक्शन घ्यावे लागत आहे व काळाबाजार होत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब या इंजेक्शनची व्यवस्था केली पाहिजे व लोकांचे प्राण वाचवीले पाहिजे. अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण परीस्थिती अत्यंत गंभीर व बिकट आहे. करोना महामारी व ब्लॅक फंगस पासून सावध रहाण्यासाठी मास्कचा वापर, गर्दिचे ठिकाण टाळने,सोशल डिस्टगसिंग व वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget