Halloween Costume ideas 2015

चांगले चारित्र्य हेच मुस्लिमांना तारू शकते


चांगल्या चारित्र्याशिवाय मुस्लिमांची कल्पनाच करता येत नाही. जगात 1 लाख 24 हजार प्रेषितांना पाठविण्याचा उद्देशच हा होता की, लोकांचे चारित्र्य चांगले व्हावे. जगामध्ये शांती रहावी, लोकांनी एकमेकांशी सद्भावनेने वागावे, त्यांच्यात दया, करूणा आणि विश्वासाचे वातावरण रहावे, लोकांना त्रास होऊ नये, कोणी कोणावर अत्याचार करू नये, प्रत्येकाला प्रत्येकाचे अधिकार विनासायास मिळावेत, जगामध्ये सदाचारी लोकांची संख्या जास्त असावी. थोडक्यात जागतिक मानवकल्याण ही ईश्वरीय इच्छा असल्याचा बोध आपल्याला प्रत्येक ईशग्रंथातून मिळतो. परंतु आपण पाहतो की, जगामध्ये नेमकी या उलट स्थिती आहे. लोक एकमेकांचे शत्रू झालेले आहेत. एकमेकांना संपविण्यासाठी चाकू-सुऱ्यापासून ते अणुबॉम्बचा वापर करत आहेत. जगात दुराचाऱ्यांची संख्या जास्त आहे सदाचाऱ्यांची संख्या कमी आहे व दिवसेंदिवस ती अधिक कमी होत आहे. 

प्रेषित पूर्व काळामध्ये जेव्हा समाजामध्ये अनाचार माजत होता, वाईट चारित्र्याच्या लोकांची संख्या जास्त होत होती, तेव्हा ईश्वर प्रेषित पाठवून समाजसुधारणेचे कार्य त्यांच्याकडून घेत असे. परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नंतर प्रेषित पाठविण्याची ईश्वरीय पद्धत बंद झाली; आता समाजसुधारणेची जबाबदारी ईश्वराने त्यांच्या वारसांवर टाकलेली आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी मुस्लिमांमध्ये चांगल्या चारित्र्यांच्या लोकांची संख्या जास्त असणे गरजेचे आहे.  या पार्श्वभूमीवर सध्याच्या मुस्लिम समाजाच्या चारित्र्याचा वेध घेणे काळाची गरज आहे. म्हणून हा लेखन प्रपंच. 

भारतीय मुस्लिमांमध्ये स्वतःला प्रेषितांचे वारस म्हणवून घेण्यामध्ये गर्व करणाऱ्यांची संख्या कमी नाही मात्र प्रेषितांच्या  शिकवणीनुसार आचरण करणाऱ्याची संख्या अतिशय कमी आहे. भौतिक शिक्षण आणि पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे बहुसंख्य मुस्लिम समाज इस्लामच्या मुलभूत शिकवणीपासून दूर गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या चारित्र्याचा ऱ्हास झालेला असून त्यांच्यात इस्लामी चारित्र्याच्या खुणा अभावानेच आढळून येतात. 

भारतीय मुस्लिमांना कायम संकटात टाकून ज्या मुस्लिम लीगने इस्लामच्या नावाखाली, 1947 साली जो वेगळा पाकिस्तान तोडून घेतला आणि ज्याला आदर्श इस्लामी राष्ट्र बनविण्याचा प्रण केला, त्या मुस्लिम लीगच्या नेत्या व कार्यकर्त्यांचे चारित्र्य कसे होते, याचे वर्णन फारच उद्बोधक असे आहे. मौलाना अबुल आला मौदूदी लिहितात, ’’जे कालपर्यंत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते, त्यांच्यापेक्षा जास्त मुस्लिमांचा कैवार घेणारा दूसरा कोणीच दिसत नव्हता, जे आजही स्वतःला फार मोठे ’मुजाहिदे मिल्लत’ (मुस्लिमांच्या हितासाठी प्रयत्नरत असणारे) समजतात, त्यांच्यातील बहुसंख्य लोक आपल्याला असे दिसून येतील की पाकिस्तान बनल्यानंतर त्याच्या नावेमध्ये हे लोक प्रत्येक बाजूने छिद्र हेच लोक पाडत आहेत. हे भ्रष्टाचारी, हे विश्वासघातकी, लोकांचे माल हडपणारे, हे सरकारी खर्चावर आपल्या नातेवाईक आणि मित्रांचे फायदे करून देणारे, हे कर्तव्यापासून दूर जाणारे, हे शिस्तीपासून लांब राहणारे, हे गरीबांसाठीच्या सार्वजनिक फंडावर ऐश करणाऱ्यांचे एक वादळ आजच्या शासकीय व्यवस्थेच्या प्रत्येक ठिकाणी आलेले आहे आणि ज्यात मोठ्या प्रमाणावर खालच्या कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत एवढेच नव्हे तर मंत्र्यापर्यंतचे लोक सहभागी आहेत, हे काय देशाला मजबूत करणाऱ्या गोष्टी आहेत? 

हे दुकाने आणि कारखान्यांचे अवैध वाटप, ज्यामुळे देशाच्या उद्योग आणि व्यापाराचा एक मोठा हिस्सा अअनुभवी आणि नालायक  लोकांच्या हातात गेलेला आहे. ही काय देशाला शक्तीशाली करणारी गोष्ट आहे? आणि ही  जनतेची सरकारला कर अदा करण्यामध्ये केली जाणारी कुचराई अशी गोष्ट आहे का की ज्यामुळे देश मजबूत होतो? देशातील लोकांची नैतिक पातळी इतकी वाईट झालेली आहे की, भारतातून आलेल्या मुहाजीरांची प्रेतं जेव्हा वाघा आणि लाहोरच्या दरम्यान पडून सडत होती आणि शिबीरामध्येही मृत्यूचे तांडव सुरू होते, त्यावेळेस 12 ते 13 लाख मुस्लिम लोकसंख्या असलेल्या लाहोर शहरांमधून काही हजार नव्हे तर काही शेकडा लोकही असे मिळाले नाहीत जे मृत मुस्लिमांना सन्मानाने दफन करण्याची तसदी घेतील. अशी अनेक उदाहरणं आम्हाला माहीत आहेत की, जेथे एखादा मुहाजीर मरण पावला तेव्हा त्याची नमाजे जनाजा अदा करण्यासाठी पैसे देऊन लोकांना बोलवावे लागले. एवढेच नव्हे तर परिस्थिती एवढी बिकट होती की, भारत-पाक सीमेजवळील पाकिस्तानच्या एखाद्या गावामध्ये सरकारतर्फे मुहाजीरांना जमीन दिली गेली तेव्हा स्थानिक मुस्लिमांनी सीमेपलीकडून शिखांना बोलावून त्यांच्यावर हल्ले करविले जेणेकरून ते पळून जातील आणि त्यांना मिळालेली जमीन यांच्या ताब्यात येईल. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा भारतातून आलेल्या महिला/ मुली या स्थानिक पाकिस्तान्यांच्या अत्याचारांपासून सुरक्षित राहू शकल्या नाहीत. विशेष म्हणजे हे लाजीरवाणी कृत्ये करणारी माणसेफक्त अभ्यस्त गुंड नव्हते. एवढ्या नैतिक ऱ्हासानंतर आपण कशी आशा करू शकतो की एखाद्या अंतर्गत किंवा बाहेरच्या संकट काळामध्ये आपण एकत्रितपणे मजबूतीने उभे राहू? आणि हे नैतिक स्खलन झालेले लोक देशाच्या उन्नतीमध्ये आणल्या गेलेल्या योजनांना यशस्वी होऊ देतील.’’ (संदर्भ : तहरीके आजादी ए हिंद और मुसलमान, पान क्र. 320-321. सन 1947)

मुस्लिमांच्या वाईट चारित्र्याचे दूसरे उदाहरण मौलाना मौदूदी यांच्याच शब्दात खालीलप्रमाणे सादर आहे -

’’ मुसलमानांच्या एका मोठ्या आणि लोकप्रिय नेत्याला अशी तक्रार करतांना ऐकलं गेलं की, मुंबई आणि कलकत्ता येथील श्रीमंत मुसलमान अँग्लो इंडियन वेश्यांकडे का जातात? खरं तर मुस्लिम वेश्या ह्या त्यांच्या कृपेसाठी जास्त पात्र आहेत.’’ (संदर्भ : साप्ताहिक तर्जुमानुल कुरआन, फेब्रुवारी 1941).

मौलाना मौदूदी पुढे म्हणतात, ’’येणेप्रमाणे मुस्लिम हा शब्द किती खालच्या पातळीवर या लोकांनी आणून ठेवला आणि कोण-कोणत्या अवगुणांसाठी तो वापरला जात आहे? मुसलमान आणि व्याभिचारी? मुसलमान आणि चोर? मुसलमान आणि दारूड्या? मुसलमान आणि नशेडी? मुसलमान आणि भ्रष्टाचारी? मुसलमान जर हे सर्व कृत्य करून मुसलमान राहत असतील तर त्यांच्यात आणि बिगर मुस्लिमांमध्ये काय फरक राहणार? मग मुस्लिमांच्या वेगळ्या अस्तित्वाची गरजच काय? इस्लाम तर नावच त्या आंदोलनाचे आहे ज्याने जगाला सगळ्या वाईट गोष्टींपासून मुक्त करण्याचे प्रयत्न केले. या आंदोलनाने अशा चारित्र्यवान मुस्लिमांना वेचून व संगठित करून एक जमात बनवली होती ज्यांचे चारित्र्य उच्च दर्जाचे होते.  जे चांगल्या चारित्र्याचे ध्वजवाहक होते. मुस्लिमांच्या या आंदोलनाने आपल्यातील वाईट वृत्तीच्या लोकांचे हात कापणे, दगडाने ठेचून मारणे, सार्वजनिक ठिकाणी फटके मारून वाईट प्रवृत्तीच्या माणसाची पाठ सोलून काढणे एवढेच नव्हे तर गुन्हेगारांना सार्वजनिकरित्या फाशीवर लटकवण्यासारख्या कडक शिक्षा लागू केल्या होत्या. मुस्लिमांची ही जमात तर जगातून व्याभीचार नष्ट करण्यासाठी उठली होती. म्हणून त्यांची अपेक्षा होती की त्यांच्यामध्ये कोणी व्याभिचारी नसावा. त्यांचे काम दारूबंदी करणे होते म्हणून त्यांच्यात कोणी दारू पिणारा नसावा, जे चोरी आणि डाक्यासारखे गुन्हे मिटविण्यासाठी उठले होते स्वतः त्यांच्यामध्ये कोणी चोर आणि डाकू नसावा.’’ (संदर्भ : साप्ताहिक तर्जुमानुल कुरआन, नोव्हेंबर 1939)

वरील उदात्त उद्देशांना बहुसंख्य मुस्लिम हे साफ विसरून गेलेले आहेत. कठोर शरई शिक्षांना जगात ’’रानटी शिक्षा’’ म्हणून हिनविल्या जात असतांनासुद्धा त्या शिक्षा कशा उपकारक आहेत? हे जगाला समजून सांगण्याची पात्रता सुद्धा बहुतेक मुस्लिम हरवून बसले आहेत. प्रत्येक ठिकाणी बोटावर मोजता येतील असे मुस्लिम लोक इस्लामी चारित्र्याचे मिळून येतात. अनेकांना तर स्वतःला इस्लामी चारित्र्याचे म्हणून घेण्यामध्येच कमीपणा वाटतो.म्हणून तर ते स्वतःची ओळख लपविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. इथपर्यंत अधोगती आपण साध्य केलेली आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या मुस्लिमांच्या नैतिक परिस्थितीचे आकलन केल्यावर आता आपण वर्तमान काळातील मुस्लिमांच्या चारित्र्यांचे अवलोकन करूया. 

आज प्रगतीच्या नावाखाली  बहुतेक मुस्लिमांनी फाटक्या जीन्स आणि टी-शर्ट पासून ते केक कापून/ मेनबत्या विझवून जन्मदिवस साजरा करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. त्यात त्यांना वाईट काहीच वाटत नाही. आता बहुसंख्य मुस्लिमांना बँकेकडून व्याज घेतांना वाईट वाटत नाही, अश्लील टिकटॉक व्हिडीओ बनविताना वाईट वाटत नाही, ईदच्या दिवशी नमाज अदा केल्यानंतर सरळ थिएटरमध्ये जावून सलमान खानचा तदन् फालतू चित्रपट पाहतांना वाईट वाटत नाही, टीव्हीमध्ये अश्लील सिरीयल पाहतांना वाईट वाटत नाही, तंबाखूपासून ते दारू किंबहुना ड्रग्ज वापरतांना वाईट वाटत नाही, तरूणींना बुरखा न घालता समाजात वावरतांना वाईट वाटत नाही, लग्नापूर्वी प्रेमसंंबंध स्थापन करण्यामध्ये वाईट वाटत नाही, कुरआनपासून दूर गेल्याचे त्यांना वाईट वाटत नाही, भौतिक शिक्षण सुद्धा नीटपणे घेण्याची त्यांना गरज वाटत नाही, नमाजसाठी जाणे त्यांच्या जीवावर येते, मोबाईलमध्ये त्यांचा जीव गुंतून असतो, अभ्यासामध्ये मन रमत नाही. एकंदरित मुस्लिम समाजाच्या बहुसंख्य लोकांच्या चारित्र्यामध्ये त्या सर्व वाईट गोष्टींचा समावेश झालेला आहे ज्या इस्लामला मान्य नाहीत, अशा लोकांसंबंधी मौलाना मौदूदी भाकीत करताना म्हणतात की, ’’ एक कौम दुसरी कौम की नक्काली उस वक्त करती है जब वो अपनी जिल्लत और कमतरी तस्लीम कर लेती है. ये गुलामी की बदतरीन किस्म है. अपनी शिकस्त खुला हुआ एलान है. और इसका आखरी नतीजा ये है के नक्काल्ली करने वाली कौम की तहेजीब फना हो जाती है. ( दीनीयात पेज नं. 118)’’

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटले आहे, वाईट गोष्टी ज्या ठिकाणी पहाल तर तीन गोष्टीपैंकी एक गोष्ट करा-   1. जर शक्ती असेल तर त्या नष्ट करा. 2. जर शक्ती नसेल तर त्यावर टिका करा. 3. ते ही करणे शक्य नसेल तर किमान मनामध्ये त्याबद्दल घृणा निर्माण करा आणि हा ईमान (इस्लामी श्रद्धा) चा सर्वात खालचा दर्जा आहे. चारित्र्याची ही कसोटी जरी गृहित धरली तर पहिल्या, दुसऱ्या तर सोडा तिसऱ्या दर्जातही बहुसंख्य मुस्लिम बसत नाही. किंबहुना वाईट गोष्टींच्या प्रचार आणि प्रसारामध्ये बहुसंख्य मुस्लिम रात्रंदिवस व्यस्त असल्याचे गल्लीतील उन्हाड टोळक्यापासून ते बॉलीवुडच्या उन्हाड मुस्लिम अभिनेत्यापर्यंत समानता दिसून येते. स्वातंत्र्याच्या वेळेस मुस्लिमांच्या चारित्र्याचा जो ऱ्हास झाला होता व ज्याचे वर्णन मौलाना मौदूदी यांच्या लेखनीतून आपण वाचले आज 74 वर्षानंतरही मुस्लिमांच्या चारत्र्याची तीच अवस्था आहे. किंबहुना त्यात आणखीन ऱ्हास झाला आहे. हे असेच सुरू राहिले तर आणखीन 74 वर्षानंतरही हीच परिस्थिती राहील यात शंका नाही. मुस्लिमांनी कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांच्या जीवनचारित्र्यापासून काहीच बोध घेतला तरच यात फरक पडेल.  

कुरआन हा जरी अज्ञानी आणि रानटी प्रवृत्तीच्या अरब कबिल्यांतील एका आदर्श चारित्र्याच्या व्यक्तीवर अवतरित झाला असला तरी त्याच्या अवतरणाने उख्खड प्रवृत्तीचे अरब लोक कसे जगाचे इमाम बनले, याचा इतिहास सुद्धा बहुसंख्य मुस्लिमांना माहित नाही. त्यांच्या जीवनांमध्ये कुरआनने कशी किमया घडवून आणली हे जाणून घेण्याची बहुसंख्य मुस्लिमांना गरज वाटत नाही. सर्वात दुर्दैवी गोष्ट अशी की ज्या प्रेषित मुहम्मद सल्ल.चे व्यंगचित्र काढल्यामुळे मुस्लिम तरूण मरण्या आणि मारण्यासाठी एका पायावर तयार असतात त्यांना प्रेषितांचे चरित्र गंभीरपणे वाचण्याची गरज वाटत नाही. इस्लाम हा इतर धर्मांसारखा फक्त काही रितीरिवाजांपुरता मर्यादित नसून ती एक परिपूर्ण जीवन पद्धती आहे हे यांच्या गावीच नाही. इस्लामला फक्त इबादतींपुरता सीमित करून संतुष्ट राहण्यामध्ये एका मोठ्या समाजगटाचा सहभाग होता आणि आहे. त्यांनासुद्धा संपूर्ण इस्लाम लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज वाटत नाही, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. 

जगातील सर्वोत्कृष्ट नेतृत्व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिले होते. याबाबतीत प्रसिद्ध अमेरिकी लेखक मायकल एच. हार्टपासून ते सानेगुरूजीपर्यंत सर्वच बुद्धीजीवींचे एकमत का आहे? हे तपासून पाहण्याची सुद्धा गरज बहुसंख्य मुस्लिमांना वाटत नाही. ही खरी शोकांतिका आहे.

अशा परिस्थितीत असणाऱ्या लोकांसाठी कुरआनमध्ये खालील चेतावनी देण्यात आलेली आहे. ’’वस्तुस्थिती अशी  आहे की ज्या लोकांनी दावते हक (इस्लाम/ सत्य)  स्वीकारण्यास नकार दिला आहे त्यांच्यासाठी त्यांच्या कुटिलतांनाच सुंदर बनवून टाकण्यात आलेले आहे आणि ते सरळ मार्गापासून रोखले गेलेले आहेत. मग ज्याला अल्लाह पथभ्रष्टतेत राहू देतो त्याला कोणी मार्ग दाखविणारा नाही’’ (संदर्भ : कुरआन : सुरे अर्रअद आयत नं. 33) 

बहुसंख्य मुस्लिमांनी इस्लामी चारित्र्याचा त्याग केल्यामुळे जगात अन्याय आणि अत्याचारापासून अश्लीलता आणि अनाचारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. याला बिगर मुस्लिमांपेक्षा मुस्लिम जास्त जबाबदार आहेत. अशा परिस्थितीबाबत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’’जेव्हा जगात बेहयाई (निर्लज्जपणा) वाढेल तेव्हा ईश्वर असे साथीचे रोग अवतरित करेल ज्यांचे नाव सुद्धा तुमच्या वाडवडिलांनी ऐकलेले नसेल.’’ (इब्ने माजा हदीस नं. 4019). 

आज आपण नेमक्या याच परिस्थितीतून जात आहोत. या परिस्थितीतून जगाला काढण्याची जबाबदारी प्रेषितांचे वारस म्हणून मुस्लिमांची आहे.  

सरशार हूं तामीरे नशेमन के जुनूं से

सय्याद का डर है ना बिजली का खतर है

पुरख्वार है राहें मेरी इसकी मुझको खबर है

बस अज्मे सफर, अज्मे सफर, अज्मे सफर है

खरे पाहता सध्या मुस्लिमांना या शेरमध्ये म्हटल्याप्रमाणे बेभान होऊन काम करण्याची गरज कोरोनामुळे निर्माण झालेली आहे आणि ही गरज भागविण्यासाठी मुस्लिमांना स्वतःमध्ये इस्लामी चारित्र्याची निर्मिती करण्याचे आव्हान पेलण्यासाठी तात्काळ तयार होण्याची गरज आहे. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’ ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना इस्लामी चारित्र्याप्रमाणे वागण्याची व आपला प्रिय देश आणि मानवता यांना नैतिक दिशा देण्याची समज, धैर्य, धाडस आणि शक्ती दे.’’ आमीन.

-एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget