(५०) तुमचे भले झाले तर यांना दु:ख होते व तुम्हांवर एखादे संकट येते तेव्हा हे तोंड फिरवून खूश होऊन परततात व म्हणत जातात की बरे झाले, आम्ही अगोदरच आमचा मामला ठीकठाक केला होता.
(५१) यांना सांगा, ‘‘आम्हाला कदापि काहीही (चांगले-वाईट) पोहचत नाही परंतु ते जे अल्लाहने आमच्यासाठी लिहिले आहे. अल्लाहच आमचा वाली आहे. आणि श्रद्धावंतांनी त्याच्यावरच भिस्त ठेवली पाहिजे.’’५१
(५२) यांना सांगा, ‘‘तुम्ही आमच्या बाबतीत ज्या गोष्टीची वाट पाहात आहात ती याशिवाय अन्य काय आहे की दोन चांगल्या गोष्टींपैकी एक चांगली गोष्ट आहे.५२ आणि आम्ही तुमच्या बाबतीत ज्या गोष्टीची प्रतीक्षा करीत आहोत ती अशी की अल्लाह स्वत:च तुम्हाला शिक्षा करतो की आमच्या हस्ते करवितो? बरे तर आता तुम्हीही वाट पाहा आणि आम्हीदेखील तुमच्याबरोबर प्रतीक्षेत आहोत.’’
(५३) यांना सांगा, ‘‘तुम्ही आपली संपत्ती राजीखुशीने खर्च करा किंवा नाराजीने५३ ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही कारण तुम्ही अवज्ञाकारी (फासिक) लोक आहात.
(५४) यांनी दिलेली संपत्ती स्वीकृत न होण्याचे कारण याशिवाय दुसरे काही नाही की यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा इन्कार (कुफ्र) केला आहे. नमाजकरिता येतात तर मरगळत येतात आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करतात तेही अनिच्छापूर्वक खर्च करतात,
(५५) यांची धनदौलत आणि यांची संतती - विपुलता पाहून फसू नका. अल्लाह तर असे इच्छितो की याच वस्तूद्वारे यांना ऐहिक जीवनातदेखील कोपग्रस्त करावे५४ आणि यांना मृत्यू आला तरी तो सत्याच्या इन्काराच्या स्थितीतच यावा.५५
(५६) ते अल्लाहची शपथ वारंवार घेऊन सांगतात की आम्ही तुमच्यापैकीच आहोत, वास्तविक पाहाता ते मुळीच तुमच्यापैकी नाहीत. खरेतर ते असे लोक आहेत जे तुम्हापासून भयभीत आहेत.
(५७) जर त्यांना एखादे आश्रयस्थान मिळाले अथवा एखादी गुहा किंवा लपून बसण्यासाठी एखादी जागा, तर पळत जाऊन त्यात लपतील.५६
५१) येथे दुनियेचा पुजारी आणि ईश्वराचा भक्त यांच्या मनोवृत्तीतील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. दुनियेचा पुजारी जे काही करतो ते सर्व आपल्या मनाच्या खुशीसाठी करतो. त्याच्या मनाची प्रसन्नता जगातील काही लाभप्राप्तीवर अवलंबून असते. त्याचे हे ध्येय प्राप्त् झाले तर त्याला अत्यानंद होतो आणि ध्येय प्राप्त् झाले नाही तर मृतप्राय होतो. अशा माणसाची भिस्त पूर्णत: भौतिक साधनांवर अवलंबून असते. भौतिक साधनं त्याला अनुकूल राहिली तर त्याला आनंद होतो आणि प्रतिकूल झाली तर हिंमत खचते. याविरुद्ध ईशपरायण मनुष्य (ईश्वराचा भक्त) जगात जे काही करतो ते अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी करतो. या कामात त्याचा भरोसा पूर्णत: अल्लाहवर असतो, भौतिक साधनांवर मुळीच नाही. सत्य मार्गात काम करतांना त्याला संकटांना सामोरे जावे लागले तरी तो संकटाने डळमळत नाही किंवा सफलतेचा त्याच्यावर वर्षाव झाला तरी सफलतेमुळे तो नखरेल होत नाही. असा मनुष्य दोन्ही स्थितींना अल्लाहकडूनच समजतो. या माणसाला सतत चिंता लागून असते की अल्लाहने टाकलेल्या परीक्षेतून सकुशल बाहेर पडावे. याच्या डोळयांपुढे जगातील कोणतेच भौतिक ध्येय नसते ज्यावरून आपल्या सफलतेचा आणि असफलतेचा हिशेब त्याने घ्यावा. त्याच्यासमोर तर एकमात्र उद्देश अल्लाहची प्रसन्नता प्राप्त् करणे असते. या उद्देशापासून जवळ असणे अथवा दूर असण्याची कसोटी जगातील सफलता अथवा असफलतेवर नाही. अल्लाहच्या मार्गात तन, मन, धन अर्पण करण्याचे दायित्व त्याच्यावर आहे. त्या दायित्वाला मनुष्य जगात कुठवर निभावतो यावर त्याच्या उद्देशप्राप्तीचे स्वरुप अवलंबून आहे. हे दायित्व त्याने पूर्ण केले आणि जगात मात्र तो असफल ठरला तरी त्याला पूर्ण विश्वास असतो की ज्या अल्लाहसाठी त्याने आपले तन-मन-धन अर्पण केले, तो मोबदला निश्चितच देणार आहे. भौतिक साधनांपासून तो कदापि आशा करीत नाही की त्यांची अनुकूलता आणि प्रतिकूलता त्याला प्रसन्न किंवा दु:खी करेल. त्याचा पूर्ण भरोसा अल्लाहवर असतो जो या सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता आणि शासनकर्ता स्वामी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तो अल्लाहच्या भरोशावरच साहसाने पुढे काम करत जातो. भौतिकवादी मात्र साहस आणि संकल्पाचे प्रदर्शन अनुकूल परिस्थितीतच करतात. अल्लाह सांगतो की या भौतिकवादी दांभिकांना सांगून टाका की आमचा मामला तुमच्या मामल्याशी मूळताच भिन्न आहे. तुमच्या प्रसन्नतेचे आणि दु:खाचे नियम वेगळे आहेत आणि आमचे तुमच्यापासून वेगळे मापदंड आहेत. तुम्ही संतोष आणि असंतोष वेगळया स्त्रोतापासून घेता आणि यासाठी आमचा स्त्रोत तुमच्याशी पूर्ण भिन्न आहे.
५२) दांभिक त्यांच्या सवयीनुसार यावेळीसुद्धा कुफ्र आणि इस्लामच्या या संघर्षात भाग घेण्याऐवजी अकलेचे कांदे सोलू पाहात होते की या संघर्षाचा कोणता परिणाम निघतो. पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांचे साथीदार जिंकून येतात की रोमन सैन्याशी सामना करताना धारातिर्थी पडतात. याचे उत्तर त्यांना दिले गेले की ज्या दोन परिणामांपैकी एकाचे प्रकट होण्यासाठी तुम्ही वाट पाहात आहात, त्या दोन्ही परिणामांत ईमानधारकासाठी भलाई आहे. ते जर विजयी झाले तर त्यांची भलाई होणे स्पष्ट आहे. युद्धात त्यांना वीरगती प्राप्त् झाली तर तीसुध्दा एक सफलताच आहे. जगाच्या नजरेत ते असफल जरी ठरले तरी ईमानधारकांची सफलता व विफलता यात नाही की त्यांनी एखादा देश जिंकला किंवा नाही, काही राज्य स्थापन केले किंवा नाही. त्यांची कसोटी म्हणजे अल्लाहच्या वचनाला उच्च्तम करण्यासाठी त्यांनी आपले तन-मन-धन अर्पण केले आहे किंवा नाही. हे काम ईमानधारकाने केले तर तो सफल आहे. मग जगाच्या दृष्टिकोनातून त्याच्या प्रयत्नांचा परिणाम शून्य का होईना.
५३) काही दांभिक असे ही होते जे स्वत: ला धोक्यात टाकण्यास तयार नव्हते. हेसुद्धा इच्छित नव्हते की या जिहाद आणि त्याच्या प्रयत्नांपासून अजिबात संबंध न ठेवता मुस्लिमांच्या दृष्टीतून स्वत:ची पत संपवून दांभिकतेला जाहीर करावे. म्हणून ते म्हणत होते की आम्ही सैन्य सेवेपासून या वेळी सूट मागतो परंतु संपत्तीरूपात सहाय्यता करण्यास तयार आहोत.
५४) म्हणजे संपत्तीच्या आणि संततीच्या मोहात पडून जे कपटतापूर्ण वर्तन तुम्ही स्वीकारले आहे, त्यामुळे मुस्लिम समाजात हे अतिअपमानित होऊन राहतील. शासनाची ती सर्व शान, इज्जत आणि नावलौकिक, श्रेष्ठत्व इ. जे आजतागायत त्यांना अरब समाजात प्राप्त् होते; सर्व इस्लामी जीवनव्यवस्थेत मातीमोल होईल. साधारण ते साधारण दास आणि दासपूत्र आणि सामान्य शेतकरी व गुराखी यानी ईमान व निष्ठेचे प्रमाण दिले आणि या नव्या जीवनव्यवस्थेत ते सन्मानित होतील. परंतु खानदानी सरदार व चौधरी लोक आपल्या भौतिक प्रेमापोटी अपमानित बनून राहतील. या स्थितीचे उत्तम उदाहरण ती घटना आहे जी एकदा माननीय उमर (रजि.) यांच्या सभेत घडली होती. कुरैशचे मोठमोठे सरदार ज्यात सुहैल बिन अम्र आणि हारिस बिन हिशामसारखे लोक होते, ते माननीय उमर (रजि.) यांना भेटण्यासाठी गेले. तेथे त्या वेळी अशी स्थिती होती की मुहाजरीन किंवा अन्सारपैकी एखादा साधारण मनुष्य जरी आत आला तर उमर (रजि.) त्यास आपल्याजवळ बोलावून बसवित होते आणि त्या सरदारांना सांगत की यांच्यासाठी जागा खाली करा. थोड्याच वेळात असे घडले की हे सरदार लोक मागे सरकत सरकत सभागृहाच्या मागच्या भागात गेले. बाहेर निघून हारीस बिन हिशाम यांनी साथीदारांना कशी वागणूक मिळाली याविषयी सांगितले. त्यावर सुहैल बिन अम्र यांनी सांगितले, ``यात उमर (रजि.) यांची काही एक चूक नाही. चूक आमची आहे की जेव्हा आम्हाला या जीवनव्यवस्थेचा स्वीकार करण्यास सांगितले गेले तेव्हा आम्ही मात्र तोंड फिरविले आणि हे लोक धावत जावून या व्यवस्थेचा स्वीकार करते झाले.'' नंतर हे दोन्ही सरदार माननीय उमर (रजि.) यांच्याजवळ पुन्हा गेले आणि म्हणाले, `आज आम्ही तुमचा व्यवहार अनुभवला आम्हाला माहीत आहे की आमची चूक आहे. काय आम्हाला याची तूट भरून काढता येईल? माननीय उमर (रजि.) या प्रश्नाचे काहीच उत्तर न देता केवळ रोमन सीमेकडे बोट दाखविले. म्हणजेच आता जिहादच्या मैदानात जीव व वित्तानिशी त्याग करून पाहा, शक्य आहे तुम्हाला ते स्थान प्राप्त् होईल.
५५) म्हणजेच या अपमान आणि अनादरापेक्षा जास्त त्रासदायक त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या मनात पाळलेली दांभिकता आहे. यामुळे त्यांना मरेपर्यंत खऱ्या ईमानचे सौभाग्य प्राप्त् होणार नाही. आपले जग खराब करून घेतल्यानंतर हे आपले परलोकजीवन नष्ट करून अशा स्थितीत जगातून जातील की तिथे त्यांची स्थिती बिकटतर असेल.
५६) मदीनेतील हे मुनाफिक (दांभिक) अधिकतर किंवा सर्वजण धनवान आणि बुजुर्ग मंडळी होती. इब्ने कसीर यांनी `अल् बिदाया वन् निहाया'मध्ये यांची सूची दिली आहे त्यात केवळ एकाच युवक दांभिकाचा उल्लेख सापडतो. यांच्यापैकी निर्धन कोणीच नाही. हे सर्वजण मदीना शहरात आपले व्यापार-उदीम थाटून होते आणि संपत्तीधारक होते. ते भौतिकतेचे पुजारी आणि संधीसाधू व स्वार्थाचे पुजारी होते. इस्लाम जेव्हा मदीना शहरात पोहचला आणि अधिकतर लोकांनी इस्लामी जीवनपद्धतीचा निष्ठापूर्वक स्वीकार केला तेव्हा या दांभिकांनी स्वत:लाही स्थिती त्रासदायक समजून घेतली. एकीकडे त्यांच्या कबिल्यातील अधिकतर लोकांनी इस्लामी जीवनपद्धतीचा केलेला स्वीकार आणि त्यांच्या मुलाबाळांनीसुद्धा इस्लामचा स्वीकार केलेला, अशा स्थितीत ते अनेकेश्वरत्व आणि ईशद्रोहावर अडून बसले असते तर त्यांची सत्ता, सन्मान, प्रसिद्धी सर्व नष्ट झाले असते. मुलेबाळे व पत्नीशी संबंध विच्छेद होतो तसेच त्यांच्या घरात त्यांच्याविरुद्ध विद्रोह झाला असता. दुसरीकडे या जीवनपद्धतीला (दीन) साथ देण्याचा अर्थ म्हणजे साऱ्या अरब आणि आसपासच्या देशांशी शत्रुत्व विकत घेण्यासारखे होते. त्यांच्या मनोकामनांच्या दासत्वामुळे सत्य आणि यथार्थ एक मौल्यवान वस्तू आहे याचे भान त्यांना राहिले नव्हते. या सत्य आणि यथार्थासाठी मनुष्य आपले तन, मन, धन अर्पण करू शकतो, अशाप्रकारे विचार करण्याची क्षमता त्यांच्यात शिल्लक राहिली नव्हती. ते जगातील सर्व मामल्यांवर आणि समस्यांवर केवळ स्वार्थ आणि आपल्या फायद्याच्याच दृष्टीने पाहात असत. म्हणून त्यांना स्वत: च्या हितरक्षणासाठी ईमानचा दावा करावा हेच योग्य वाटले जेणेकरून समाजात आपले सन्मान, सत्ता आणि प्रसिद्धी बाकी राहील. ईमानचा दावा करताना निष्ठापूर्ण ईमान ग्रहण केल्यानंतर ज्या संकटांना तोंड द्यावे लागणार होते, त्यापासून त्यांची सुटका अशा रीतीने होणार होती. त्यांच्या याच मानसिकतेचा आणि विचारसरणीचा येथे उल्लेख करून स्पष्ट केले की वास्तवत: हे लोक (दांभिक) तुमच्याबरोबर नाहीत तर आपत्तींच्या भयाने या लोकांना तुमच्याबरोबर जबरदस्तीने बांधले आहे. स्वत:ची मुस्लिम म्हणून ओळख त्यांनी यासाठी केली की मदीना येथे स्पष्टत: मुस्लिमेतर बनून राहिले तर प्रतिष्ठाहीन बनण्याचा धोका होता आणि त्यामुळे बायकामुलांशीसुद्धा संबंध तुटले असते. मदीना शहराला सोडले तर संपत्तीला आणि व्यापार-उदीम गमवावे लागणार होते. त्यांच्या मनात अनेकेश्वरत्वाशीसुद्धा इतकी निष्ठा नव्हती की त्यासाठी संकटावर संकटे झेलत जावे. या द्विधा मन:स्थितीमुळे ते मजबुरीने मदीना येथे राहात होते आणि मनात नसताना नमाज अदा करत होते. तसेच जकात `दंड' म्हणून भरत होते. सतत जिहाद आणि तन, मन, धन अर्पण करण्याची सततच्या मागणीची `मुसीबत' त्यांच्यावर होती, त्यापासून सुटका मिळविण्यासाठी ते अतिआतुर होते. यासाठी एखादे छिद्र किंवा बीळ दिसले तर ते त्याच्यात घुसण्यासाठी तयार होते जेणेकरून त्यांना शांती मिळेल.
Post a Comment