क्रिकेटर बाबर आज़म आणि त्याची चुलत बहिण यांच्या लग्नाविषयीची चर्चा सध्या सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर हा लेख नक्की वाचा
विध संस्कृतीत विविध नात्यांशी लग्न वैध आहेत. उदा. कर्नाटकी ब्राह्मणांत सख्या बहिणीच्या मुलीशी मामा लग्न करू शकतो, मारवाडी समाजात मामे बहिणीशी लग्न अवैध आहे तर तेच इतर समाजात वैध आहे. आईच्या भावाच्या मुलीशी लग्न चालते पण वडिलांच्या भावाच्या मुलीशी लग्न चालत नाही, असं आई वडिलांत, पर्यायाने स्त्री पुरूषांत भेदभाव केला जातो.
लाखो वर्षांपूर्वी प्रथम मानव प्रेषित आदम यांच्या काळात मानवी सभ्यता अगदी प्राथमिक अवस्थेत होती. इतर पशु व मानव प्राण्यात फार कमी अंतर होते. भाषा व लज्जारक्षण हा मुख्य फरक होता. त्यामुळे फार जास्त लांबलचक धार्मिक नियम नव्हते, ते शक्यही नव्हते. त्यामुळे पती-पत्नी म्हणून सोबत राहण्याकरिता सुरूवातीला फक्त जुळे मुलगा- मुलगी हेच भाऊ बहिणी गणले जात होते. एक दोन पीढी नंतर लगेच हा नियम बदलला. या बदलाचा उल्लेख ॠग्वेदाच्या दहाव्या खंडातील यम यमीच्या संवादातही आढळतो. भारतात काही समुदायांत संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने मुला मुलींनी घरातच अनैतिक संबंध ठेऊ नये म्हणून चुलत भाऊ बहिणींनाही बहिण भाऊ ठरवून त्यांचे लग्न अवैध ठरविले. पण सर्वात शेवटी अंतिम प्रेषितांनी विभक्त कुटुंब पद्धतीचीच परंपरा अधिक पसंत केली. म्हणून आता तो नियम राहिलेला नाहिये. अंतिम प्रेषितांनी आदम यांच्यापासून बदलत जाणाऱ्या धार्मिक नियमांना अंतिम रूप दिलेले आहे.
सखी बहीण, आई, सावत्र आई, मामी, मावशी, काकी, आत्या, सून, वहीनी, मुलगी, नात, चुलती, भाशी, मेव्हणी, ईवाईची पत्नी व इतर सर्व अशा नात्यांशी लग्न अवैध आहे. तसेच पत्नीच्याही या सर्व नात्यातील मुलींशी लग्न हराम आहे. ‘साली आधी घरवाली’ असं म्हणणंदेखील हराम आहे, आचरण तर दूरची गोष्ट आहे. ज्या नात्यांशी लग्न हराम आहे, त्यांना ‘महेरम’ म्हटलं जातं. याविषयी क़ुरआनात खालीलप्रमाणे उल्लेख आला आहे.
तुमच्यासाठी निषिद्ध केल्या गेल्या आहेत तुमच्या माता, कन्या, बहिणी, आत्या, मावश्या, पुतण्या, भाच्या आणि तुमच्या दूध बहिणी व तुमच्या पत्नीच्या माता, आणि तुमच्या पत्नींच्या मुली ज्यांचे पालनपोषण तुमच्या पालकत्वाखाली झाले आहे. - ज्या पत्नींशी तुमचे शरीर-संबंध झाले असेल त्यांच्या मुली, परंतु एरव्ही जर (केवळ विवाह झाला असेल आणि) त्या पत्नींशी समागम झाला नसेल तर (त्यांना घटस्फोट देऊन त्यांच्या मुलींशी विवाह करून घेण्यात) तुमच्यावर कोणताही गुन्हा नाही. आणि तुमच्या त्या मुलांच्या पत्नीदेखील (निषिद्ध आहेत) (जी मुले) तुमच्या वीर्यापासून जन्मली आहेत. आणि हे देखील तुमच्यासाठी निषिद्ध केले गेले आहे की तुम्ही दोन बहिणींना (मेव्हणीला) विवाह बंधनात एकत्र आणावे, परंतु पूर्वी जे काही घडले ते घडले, अल्लाह क्षमा करणारा आणि परम कृपाळू आहे. - क़ुरआन (4:23)
हे लक्षात राहू द्या की, फक्त भारतातील काही जाती समुदायांचा अपवाद वगळला तर जगभरातील धर्मसमुदायात लग्नाविषयी उपरोक्त नाती वगळता सर्व नात्यांच्या मुलींशी लग्न केलं जात असते. पण याविषयी प्रश्न फक्त मुसलमानांनाच विचारला जातो.
चुलत बहिणीशी लग्न कराच, असा काही आग्रह नाही, तर परवानगी दिलेली आहे. पण इतर परस्त्रीशी जसं थोडं अंतर राखून तुम्ही वागता, तसंच त्यांच्याशी वागण्याचा आदेश आहे. जेणेकरून भाऊ-बहिणीच्या नात्याच्या नावावर कुणी फायदा उचलू शकू नये, घरात अनैतिकता नांदू नये.
स्वतः प्रेषितांनी कोणत्याही चुलत बहिणीशी लग्न केलेलं नाहिये. एवढंच नव्हे तर फक्त एक अपवाद वगळला तर त्यांच्या इतर सर्व पत्नी या इतर टोळ्यांतील होत्या. फक्त सहा पत्न्याच अरब होत्या तर इतर पाच पत्न्या अरबेतर होत्या. त्यापैकी दोन पत्न्या तर इस्त्रायली टोळीतील होत्या. त्यामुळे विविध संस्कृतीतील समविचारी मुलींशी लग्न करण्याची प्रेषितांची परंपरा आहे. पण इस्लाम हा कोणत्या एका देशापुरता, एका युगापुरता मर्यादित नसल्याने याच्या नियमावलीची एक व्याप्ती मोठी आहे, लवचिक आहे. नात्यातील मुलीशी लग्न हे आरोग्यदृष्ट्या संततीसाठी हानीकारक ‘ठरू शकते’ असं काही तज्ञ मानतात, त्यात तथ्य आहे. पण उदाहरणच द्यायचं झाल्यास वांग्याची भाजीही एखाद्याला हानीकारक ठरू शकते. मग वांगे हराम का नाही केले? असाही प्रश्न कुणी विचारू शकतो. कोणतीही हानी न होता अशी कोट्यवधी लग्ने झालेली असल्याचीही उदाहरणे उपलब्ध आहेत. म्हणून हानीकारक ठरू शकते अन् शंभर टक्के ठरतेच यात फरक आहे. शेवटी लक्षात ठेवा की, याची परवानगी आहे, आदेश नाहिये.
क़ुरआनामध्ये अल्लाहनं कोणकोणत्या नात्यांत लग्न करा, असं म्हटलेलं नसून कोणकोणत्या नात्यांमध्ये लग्न करू नका, हे म्हटलं आहे, ज्याला वैज्ञानिक आधार आहे. इतर नात्यांत लग्न करायचं की नाही, हे लग्न करणाऱ्या मुला मुलीच्या इच्छेवर, सद्सद् विवेकबुद्धीवर अवलंबून आहे. दोघेही रीस्क घ्यायला तयार असतील तर कुणीही त्यांना अडवू शकत नाही. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. म्हणून कायद्यानेही त्यावर बंदी आणली नाही.
- नौशाद उस्मान,
औरंगाबाद
Post a Comment