राजा असूनही राजमहालातल्या प्रशस्त राजविलासात सुखनैव न राहता महारवाडा आणि मांगवाडा हे आपलं कार्यक्षेत्र मानून गोरगरिबांना, दीनदुबळ्यांना पोटाशी धरणारा एकमेव राजा इतिहासाला ठाऊक आहे तो म्हणजे राजर्षि शाहूराजा.राजा नावाचा माणूस म्हणून त्यांनी आपली हयात आणि राजसत्ता माणूस घडविण्यासाठी खर्ची घातली.राजर्षी असलेल्या या अवलीयाने महाराष्ट्रातील सामाजिक दैन्य घालविण्यासाठी जीवाचे रान केले.
२ एप्रिल १८९४ रोजी अवघ्या २० व्या वर्षी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली, आणि फक्त २८वर्षे राज्य केले.या २८ वर्षात हा शाहूराजा केवळ कोल्हापूरचा राजा राहिला नाही,तर तो अखिल महाराष्ट्राचा अनभिषिक्त सम्राट झाला.बहुजन समाजाच्या विशेषत: दीनदलित जनतेला तो आपला तारणहार वाटला.
विद्येविना मती गेली....मतीविना गती गेली....गतीविना वित्त गेले...वित्ताविना शूद्र खचले...इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले...!
महात्मा जोतीराव फुले यांच्या सारख्या द्रष्ट्या महापुरुषांने बहुजन समाजातील दैन्यावस्थेचे केलेले हे निदान मोठे मार्मिक व अचूक होते. शाहू महाराज गादीवर आले त्यावेळी बहुसंख्य प्रजा महात्मा फुले यांनी वर्णन केल्याप्रमाणे कमालीची खचून गेली होती. हे शाहू महाराजांनी पुरेपूर ओळखून त्यांच्या विकासासाठी आपली राजसत्ता वापरण्याचे ठरविले.त्यांच्या विकासाच्या वाटा खुल्या केल्या.
प्रथम त्यांनी खेड्यापाड्यात,वाड्यावस्त्यांमध्ये प्रचंड दैन्यावस्थेत जीवन कंठणाऱ्या बहुजन समाजाला प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.पुढे माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या आकांक्षा देखील पुऱ्या करण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी त्यांनी अठरापगड जातींचे लोक हाताशी धरून व उत्तेजन देऊन निरनिराळ्या जातींच्या व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृहांची स्थापना केली. शाहू महाराजांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर शहर हे ' वसतीगृहाची जननी ' म्हणून आजही ओळखले जाते.
अज्ञान, अंधश्रद्धा, आणि अस्पृश्यता या तीन व्याधी मुळातून उपटून काढल्याशिवाय आपल्या प्रजेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत, हे ओळखून शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शैक्षणिक कार्याचा धुमधडाका सुरू केला. देवस्थानच्या इनाम जमिनींचे उत्पन्न वहिवाटदार बळकावून गब्बर होत आहेत,हे शाहू महाराजांच्या लक्षात आले होते. त्यांनी हा पैसा गोरगरीब जनतेच्या शिक्षणासाठी खर्च करायचे ठरविले.
शाहू महाराजांना जातीभेद बिलकूल मान्य नव्हता.अनेक जातीची मुले आपापली जात विसरून एकत्र गुण्यागोविंदाने शिक्षण घेतांना दिसावीत, हे त्यांचे स्वप्न होते.मात्र एका विशिष्ट परीस्थितीत त्यांना नाईलाजाने जातवार वसतीगृहे काढावी लागली.याबद्दल सांगलीचे अभ्यंकर वकील शाहू महाराजांना म्हणाले," महाराज, तुम्ही जात पाहून स्काॅलरशिप देता, जातवार वसतीगृहे निर्माण करून जाती जातींमध्ये वेगळेपण राखता,हे काही बरे नव्हे ! वास्तविक लायकी पाहून संधी दिली पाहिजे...!"
महाराजांनी शांतपणे ऐकून घेतले,तात्काळ उत्तर न देता अभ्यंकर वकीलांना सोनतळीला घोड्यांच्या थट्टीकडे नेले.ती वेळ घोड्यांना चंदीचारा देण्याची होती. महाराजांनी थट्टीतील नोकरांना चंदीचारा आणायला सांगितले आणि सर्व चंदी (हरबरे) व चारा एका मोठ्या जाजमावर टाकायला सांगितले, चंदीचारा टाकल्याबरोबर सर्व घोडी धाऊन आली,दांडगी, सशक्त व तल्लख होती ती पुढे आली व सर्व हरभरे त्यांनीच फस्त केले. लंगडी,अशक्त व रोगी घोडी होती, ती मागेच राहिली. त्यांना पुढे येता येईना, त्यामुळे त्यांना चंदीचारा काही मिळालाच नाही; हे दृश्य अभ्यंकर वकीलांना दाखवून शाहू महाराज म्हणाले," हे पाहिलेत अभ्यंकर, जी हुशार, सशक्त आणि लायक त्यांनीच हरभरे फस्त केले, ज्यांना खरोखरच आवश्यकता होती,ती घोडे मागेच राहिली, म्हणून त्यांना तोबऱ्यातून चारावे लागते, तसे चारले नाही तर त्यांना काहीच मिळणार नाही. मग तूम्हीच सांगा अभ्यंकर, मागे पडलेल्या समाजाला पुढे आणण्यासाठी जादा सवलती नकोत का द्यायला?".
अभ्यंकर क्षणभर विचारमग्न झाले व म्हणाले," महाराज,तुमचे बरोबर आहे."
कालप्रवाहास जबरदस्त धक्का देऊन नवमहाराष्ट्र घडविणाऱ्या महापुरूषांमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे कार्य गौरवास्पद आहे.त्यांचे मानवतावादी धोरण पाहून कुर्मी क्षत्रिय अधिवेशनात त्यांना 'राजर्षी' ही पदवी देण्यात आली.(Raja=King, Rishi=Learned holy man= RAJARSHI) राजाचा थोरपणा आणि ऋषीची ऋजुता शाहू महाराजांच्या ठिकाणी प्रकर्षाने आढळून येते. यामुळेच या थोर ऋषितुल्य राजाने सर्वसामान्य माणसाच्या विकासाचे स्वप्न आपल्या उरी धरून ते सत्य करून दाखवले. शाहू महाराजांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून उभ्या महाराष्ट्राला ज्ञानाच्या प्रकाशाने न्हाऊ घातले. करवीर नगरीमध्ये राजर्षी शाहू नावाचा ज्ञानाचा सूर्य उदयास आला आणि हळूहळू अज्ञानाचा अंधकार नष्ट होऊ लागला. अर्थात राजर्षी शाहू महाराजांच्या या प्रचंड शैक्षणिक कार्याने त्यांचे नाव भारताच्या इतिहासात चिरंतन राहिले.ऋषीची ऋजुता मनी बाळगून राजाच्या शौर्याने समाज क्रांती घडवून आणणारे राजर्षी शाहू महाराज आधुनिक महाराष्ट्राचे खरेखुरे शिल्पकार होते. माणसावर केवळ माणूस म्हणून प्रेम करणारे, दुःखीतांच्या दर्शनाने मेणबत्तीसारखे पाघळणारे, दीनदलितांवरील अन्याय अत्याचार पाहून पेटून उठणारे वंचितांची विवंचना न्याहाळून घायाळ होणारे ,समाजाच्या तळागाळातील माणसाला आपल्या तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे राजर्षी शाहू महाराज समाजाला कलाटणी देणारे महापुरुष ठरले.
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
( लेखक भारत सरकारतर्फे ग्राहक संरक्षण विषयक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Post a Comment