मानवी जीवनात शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे. ज्या लोकसमुहाने, समाजाने, देशाने शिक्षणाला जेवढे महत्त्व दिले, त्याने तेवढी प्रगती केली. ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले व त्याचा प्रचार प्रसार केला, त्यांनी जगावर आपले वर्चस्व गाजवले. शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा, तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. त्यासाठी कष्ट घेतले. लोकांची बोलणी ऐकली. हालअपेष्टा सहन केल्या. परंतु शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.
जगात एक असेही व्यक्तिमत्व होऊन गेले की, ज्यांनी शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी चक्क कैद्यांना शिक्षक बनविले....
हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु, हे सत्य आहे. त्याचे झाले असे की ई. स. 624 मध्ये मक्का वासियांनी मदिनावर चढाई केली. मात्र बदर येथे झालेल्या ऐतिहासिक अशा विषम युद्धात त्यांना हार पत्करावी लागली. 313 मुस्लिम योध्यांनी हजाराच्यावर म्नकाहच्या लष्कराला हरविले व त्यांचे 70 शिपाई कैद केले.
या सत्तर कैद्यांना मदिना येथे आणले गेले. या कैद्यांपैकी जे कैदी फिदिया देऊ शकत होते त्यांची फिदीया घेऊन सुटका केली गेली. काही कैदी गरीब होते परंतु सुशिक्षित होते. त्यांना लिहिता-वाचता येत होते किंवा एखादी कला अवगत होती. अशा कैद्यांना एक अट घालण्यात आली. ती म्हणजे, मदीना येथील दहा-दहा लोकांना प्रत्येक कैद्याने शिक्षित करावे. आपल्या जवळ असलेली कला त्यांना शिकवावी. त्या कैद्यांनी ही अट मान्य केली. अशाप्रकारे ते कैदी शिक्षक झाले. त्यांनी मदीना येथील दहा-दहा लोकांना शिक्षित केले. त्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. त्या काळात मदिना येथे अत्यल्प लोक शिक्षित होते. प्रेषित (सल्ल.) यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी, मदिना येथे असहाब-ए-सुफ्फा नावाची एक अध्यापन संस्था स्थापन केली. एका अर्थाने हे पहिले विद्यापीठ होते. येथून शिक्षित झालेले लोक संपूर्ण अरब आणि अरबेत्तर क्षेत्रात पसरले व त्यांनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. प्रेषित मुहम्मद ( स.) यांनी प्रत्येक स्त्री-पुरुषावर ज्ञान प्राप्त करणे अनिवार्य ठरवले.
दुर्दैवाने मधल्या काळात मुस्लिम समाजाला प्रेषित (सल्ल.) यांंच्या या शिकवणीचा विसर पडला. विशेषतः भारतामध्ये या समाजाने शिक्षणाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत हा समाज खूप मागे राहिला. परिणामी प्रत्येक क्षेत्रात पछाडला गेला. सुदैवाने आज या समाजामध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण होत आहे.
संकलन -
सय्यद जाकीर अली
परभणी 9028065881
Post a Comment