तंबाखू, बिडी, सिगार, हुक्का, क्रिटेक्स, पान मसाला, खर्रा, चिलम, खैनी, गुटखा, ई-सिगारेट आणि अशा कित्येक प्राणघातक पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सेवन होतो. खूप मोठी विडंबना ही आहे की तंबाखू सारखे विष आपल्याला अगदी स्वस्त, सहजपणे उपलब्ध होतो आणि लहान मुलांपासून ते युवा, वृद्धांपर्यंत सगळेच या घातक व्यसनाचा आहारी असल्याचे दिसून येतात. ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोक तंबाखूच्या अति प्रमाणात व्यसनाधीन झाले आहेत. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीही तंबाखूचे व्यसन करतात. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका कार्यक्रमात जाताना मी पाच वर्षाच्या मुलाला तंबाखूचे सेवन करताना पाहिले, या घटनेने मी स्तब्ध झालो की ऐवळ लहान मुल कसे काय व्यसनाधीन झाले? मी त्या मुलाला हाक देताच तो पळून गेला, जेव्हा मी तेथील लोकांशी ह्या समस्येवर बोललो तेव्हा ते म्हणाले की येथे ही गोष्ट खूप सामान्य आहे, लहान मुले, आई-वडील, म्हातारी मंडळी अधिकांश लोक तंबाखूचे सेवन करतात. निर्व्यसनी लोकांना तंबाखूच्या वासाने सुद्धा चक्कर येते, मळमळ वाटू लागते, मग माहित नाही ही लहान कोवळ्या शरीराची मुलेदेखील ह्या नशेच्या तावडीत कसे अडकतात, ही अतिशय गंभीर बाब आहे.
व्यसनासारखे अनेक समस्या आपल्या समाजात प्रचंड वेगाने वाढत आहेत, परंतु लोकांमध्ये जागरूकताच नाही. आपल्या समाजात दोन प्रकारचा लोकांचा वर्ग आहे ज्या अशा गंभीर समस्या चांगल्याप्रकारे समजतात. पहिला वर्ग त्या लोकांचा जे, समस्यांना ओळखूण, विश्लेषण आणि निष्कर्ष समजून दक्ष नागरीक म्हणून सामाजिक बांधीलकी पाडतात लोकांना जागरूक करतात, समाजाची काळजी करतात, सामाजिक जबाबदारी चांगल्यापणे निभावतात. आणि दुसरा वर्ग, जे या समस्येने ग्रस्त आहेत किंवा समस्येतून गेले आहेत त्यांना अशा समस्यांची जाण असते ते समजून घेतात. या व्यतिरिक्त सर्व लोक अशा समस्यांकडे दुर्लक्ष करतात, स्वतःच्या स्वार्थानुसार जगतात आणि म्हणतात की अशा समस्येशी माझा काय संबंध?. आपले स्वताचे जोपर्यंत नुकसान होत नाही तो पर्यंत आपण जागरूक होत नाही. आपल्या समाजात हे खूप मोठे दुर्दैव आहे की अशा सामाजिक समस्यांना दूर करण्याची धाडसी वृत्ती फारच थोड्या लोकांमध्ये दिसून येते. जेव्हाकी समाजातील अशा सर्व समस्यांना सोडवणे प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असते.
व्यसन करणाऱ्या लोकांद्वारे सिगरेट बिडीचा विषारी धूर जवळपासच्या वातावरणात पसरतो व त्या वातावणातील लोकांना देखील आजारी बनवतो. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये हजारो प्रकारचे जिवघेणे विषारी पदार्थ असतात. त्यात प्रामुख्याने निकोटीन, कार्बन मोनोऑक्साइड, टार असते. निकोटीन शरीरात, हाडे, स्नायूंमध्ये पसरते. कार्बन मोनोऑक्साइड रक्तामध्ये वाहून नेणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. टार हा बेंझोपायरिनयुक्त एक चिकट पदार्थ आहे जो घातक कर्करोगासाठी सहायक म्हणून काम करतो. इतर विषारी पदार्थांमध्ये कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रोज्नॉक्साईड, अमोनिया, वाष्पशील नायट्रोसामाइन, हायड्रोजन सायनाइड, वाष्पशील सल्फर, वाष्पशील हायड्रोकार्बन, अल्कोहोल, अल्डीहाइड्स आणि केटोन्स यांचा समावेश आहे आणि यातील काही संयुगे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्या मुळे देखील कोरोना, क्षयरोग, स्वाइन फ्लू, एन्सेफलाइटिस सारख्या अनेक संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते महत्त्वाची तथ्ये-
तंबाखूमुळे त्याचे अर्धे वापरकर्ते जीव गमावतात. दरवर्षी तंबाखूमुळे 80 लाखांहून अधिक लोक मरतात. यापैकी 70 लाखांहून अधिक मृत्यू हे थेट तंबाखूच्या वापरामुळे होते, सुमारे 10-12 लाख लोक स्वतः धूम्रपान न करणारे पण दुसर्या व्यसनकर्त्याचा धूम्रपानाचा धुराची लागण होत असून मृत्यूमुखी पडतात, याला निष्क्रीय किंवा सेकंड हैंड धूम्रपान म्हणतात. जवळजवळ अर्धी मुले सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या धुराद्वारे प्रदूषित हवेमध्ये श्वास घेतात आणि दरवर्षी या धुरामुळे होणाऱ्या आजारांमुळे 65,000 लोकांचा मृत्यू होतो. जगातील 130 कोटी तंबाखू वापरणाऱ्या पैकी 80 टक्क्यांपेक्षा अधिक लोक निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात राहतात. तंबाखू हा जगातील आतापर्यंतच्या सर्वात मोठा सार्वजनिक आरोग्यास धोक्यापैकी एक आहे.
देशात तंबाखू बद्दल तथ्य-
ग्लोबल एडल्ट टोबैको सर्वे इंडिया-2, 2016-17 नुसार भारतात तंबाखूचे सेवन करणारे सुमारे 27 कोटी लोक (15 वर्षांहून अधिक) आहेत. तंबाखू हा मृत्यू आणि आजार होण्याचे मुख्य कारण आहे आणि यामुळे दरवर्षी देशात सुमारे 13 लाख मृत्यू म्हणजेच दररोज सुमारे 3500 मृत्यू होतात. देशातील कर्करोगाच्या जवळपास अर्धा घटना तंबाखूच्या वापरामुळे होतात. महाराष्ट्रात सध्या 6.0% पुरुष, 1.4% महिला आणि 3.8% सर्व प्रौढ तंबाखूचे सेवन करतात. जागतिक आरोग्य संगठनेच्या म्हणण्यानुसार, 15 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 28.6 टक्के आणि 13 ते 15 वर्षे वयोगटातील सुमारे 15 टक्के मुलांनी 2018 मध्ये भारतात कोणत्या न कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन केले. दररोज 18 वर्षाखालील सुमारे 2500 मुले पहिली सिगारेट ओढतात आणि त्यातील 400 हून अधिक नवीन मुले रोजचे धूम्रपान करणारे होतात आणि त्यापैकी अर्धे शेवटी स्वताचा जीव गमावतात. द टोबॅको एटलसच्या मते, 10 ते 14 वयोगटातील 6,25,000 हून अधिक भारतीय मुले दररोज सिगारेट ओढतात. मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार, 2011 साली तंबाखूच्या सेवनाने होणारे सर्व रोग उपचार आणि मृत्यू यामुळे एकूण 1,04,500 कोटी रुपये खर्च आला, जो भारतासारख्या विकसनशील देशासाठी मोठा ओझा आहे. इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा तंबाखूचा ग्राहक आणि निर्यातदार देश आहे. भारतीय तंबाखूच्या विविधतेमुळे भारत जगातील 100 हून अधिक देशांमध्ये तंबाखूची निर्यात करतो आणि अब्जों रुपये महसूल प्राप्त करतो. तारी आणि असोचॅमच्या अहवालानुसार देशात एकूण तंबाखूचा आर्थिक व्यापार 11,79,498 कोटी रुपये आहे.
तंबाखू संबंधित कायदेशीर प्रतिबंध-
तंबाखूच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने विविध कायदे केले आहेत. राष्ट्रिय तंबाखू नियंत्रण कायदा भारत सरकारने मे 2003 मध्ये सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा या नावाने मंजूर केला. सर्व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींचे प्रचार आणि प्रायोजकत्तेवर बंदी आहे. अठरा वर्षाखालील व्यक्तीस तंबाखू विक्री प्रतिबंधित आहे. सर्व तंबाखूजन्य पदार्थांवर आरोग्य चेतावणीचे लेबल लावणे बंधनकारक आहे. तंबाखूच्या पॅकेटमध्ये परवानगी असलेल्या मर्यादेसह निकोटिन, टार सामग्री आणि निर्दिष्ट चेतावणी तंबाखूच्या पॅकेटवर 85 टक्के भागात दर्शविली जावी. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल 5 वर्षापर्यंत कारावास आणि 10 हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे.
तंबाखू आतापासूनच सोडा-
जगात सर्वाधिक तोंडाचा कर्करोगाचे रुग्ण भारतात आहेत, त्यापैकी 90 टक्के तोंडाचा कर्करोग तंबाखूच्या वापरामुळे होतो. देशात तंबाखूची विविध प्रकारची उत्पादने अतिशय कमी किंमतीत उपलब्ध आहेत. भारतीय लोकांमध्ये, विशेषत ग्रामीण भारतीयांमध्ये असे काही गैरसमज आहेत की तंबाखू हे धूम्रपान बिडी व सिगारेटपेक्षा कमी हानिकारक आहे आणि तंबाखूच्या वापरामुळे चिंता, शारीरिक दुखणें, सूजन, थकवा, पोटविकार आणि अश्या छोट्यामोठ्या आजारावर आराम होतो. डिजिटल, सोशल मीडिया आणि प्रिंटमीडियाच्या माध्यमांद्वारे समाजातून हे गैरसमज दूर करणे फार गरजेचे आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक पातळीवर शासन, प्रशासन, संस्था यांच्यामार्फत अनेक जागरूकता कार्यक्रम, तंबाखूच्या व्यसनमुक्तीसाठी आरोग्य अभियान राबविले जातात.
तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रथम सकारात्मक विचार व दृढ इच्छाशक्ती आवश्यक आहे. कोणालाही व्यसनातून मुक्त होऊन आनंदी आणि निरोगी आयुष्याचा आनंद घेता येईल. आपल्याला फक्त हे सत्य गृहित धरायचे आहे की व्यसन एक वेदनादायक मृत्यू आहे आणि आपल्याला एक सुंदर निरोगी जीवन निवडायचे आहे. आपल्याला कितीही कठोर संघर्ष करावा लागला तरी आपल्याला या नशेवर नियंत्रण मिळवायचे आहे. आपण आपल्या निश्चयावर ठाम व संयम जोपासायला हवे, तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र/आरोग्य केंद्राशी संपर्क साधा किंवा तंबाखूमुक्त सेवा केंद्रावर 1800-11-2356 (टोल फ्री) वर संपर्क साधा किंवा दूरध्वनी क्रमांक 011-22901701 वर मिस कॉल करा त्याशिवाय भारत सरकारच्या नेशनल हेल्थ पोर्टल वेबसाइटच्या क्वीट टोबॅको वर जाऊन स्वतःची नोंद करून घ्या व तंबाखू, धूम्रपान व्यसनमुक्तीच्या सुविधेचा लाभ घ्या. स्वस्थ राहा, अमूल्य जीवन जगा.
-डॉ. प्रितम भी. गेडाम
मोबाइल क्र.- 82374 17041
Post a Comment