पवित्र कुरआनात अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना उद्देशून असे म्हटले आहे की “दिवसाच्या तेजाची आणि शांत अंधार पसरत असलेल्या रात्रीची शपथ, तुझ्या विधात्याने तुला अधांतरी सोडलेले नाही. तुमच्यासाठी पहिल्या परिस्थितीपेक्षा नंतरची स्थिती चांगलीच असणार आहे.” याचा अर्थ असा की रात्र आणि िदवस एकामागोमाग परतत असतात. त्याचप्रमाणे माणसाची स्थितीदेखील बदलत असते. बदल हा सृष्टीचा नियम आहे. एकच परिस्थिती कधीच राहात नसते. जर हे नियम निसर्गाला लावून दिले नसते आणि फक्त दिवसच दिवस किंवा नेहमीच रात्र असती तर कालचक्रदेखील स्थिरावले असते. स्थिरता म्हणजे ज्यात जीवन नसते. बदल होत राहाणे हे जीवन आहे. या जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात. ते येत राहाणार, कारण हाच जीवंत असल्याचा पुरावा आहे.
माणसाने या बदलांना घाबरून जाण्याचे कारण नाही. उलट एकच परिस्थिती असती तर विचलित अवस्था निर्माण होते. रात्रंदिवसाचे हे कालचक्र सबंध मानवजातीमध्ये फिरत असते. आज जे लोक श्रीमंत आहेत, ते काल गरीब होते. आज जे गरीब आहेत, जर सृष्टीच्या नियमात बदल झाला नसता तर हे सदैव गरीबच राहातील. हा अल्लाहचा न्याय नाही. श्रीमंती आणि वंचितावस्था माणसामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये बदलत असते. कठीण प्रसंग जसे येतात तसे ते निघूनही जातात, कारण त्यांनासुद्धा बदलांचा नियम लागू आहे. पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो की “तुमच्यावर कोसळणारी अनिष्ठ आपदा हे पूर्वीपासूनच नोंदवून ठेवलेली घटना आहे. त्यानुसारच मानवजातीला आपत्तींना सामोरे जावे लागते.”
प्रेषितांना संबोधून याच अध्यायात अल्लाहने पुढे सांगिलते आहे की “तुम्ही अनाथ असताना तुम्हाला आश्रय दिला. तुम्हाला स्वावलंबी केले. एकाच परिस्थितीशी तोंड द्यावे लागत नाही, जसे तुम्ही गरीब होता तेव्हा तुम्हाला त्याने श्रीमंत केले. तसेच तुम्हीदेखील गरजूंची काळजी घ्या. कुणी मागिलत्यास झिडकारू नका. तुमच्या विधात्याने जी तुम्हाला देणगी दिली ती जाहीर करा.”
अनाथांची मालमत्ता हडप करू नका
समाजामध्ये आणि आपसात नातेसंबंधांमध्ये सर्वांत असहाय घटक म्हणजे ‘अनाथ’. पवित्र कुरआनने त्यांची दखल घेत म्हटले आहे की “अनाथांची मालमत्ता त्यांच्या हवाली करा. त्यांच्या चांगल्या वस्तूंची (संपत्ती इ.) अदलाबदल आपल्या वाईट वस्तूंशी करू नका. हा मोठा अपराध आहे. जे लोक अन्यायी मार्गाने अनाथांची मालमत्ता हडप करतात ते खऱ्या अर्थाने आपले पोट आगीने भरतात.” (पवित्र कुरआन- ४:२,१०) अनाथ असहाय असतात म्हणून कुणीही त्यांची फसवणूक करू नये. तुम्ही इतरांच्या डोळ्यांत धूळफेक करू शकता, पण अल्लाहच्या नजरेतून तुम्ही वाचणार नाही. त्याच्या तावडीतून तुम्ही सुटणार नाही. माणसाला अल्लाहने दिलेल्या देणगीने माणसाने संतुष्ट राहावे. त्याच्याकडे कुणी अनाथ मुले-मुली असतील तर त्यांचा आणि त्यांच्या मालमत्तेचा सांभाळ करावा. असे असू शकते की ज्या अनाथांचा सांभाळ त्याला करावा लागत आले त्यांना तर मालमत्ता लाभलेली असावी आणि स्वतः सांभाळ करणाऱ्याकडे कुठली मालमत्ता नसेल, असलीच तर ती निकृष्ट दर्जाची असेल अथवा कमी असेल. अशा स्थितीत त्या अनाथांशी न्याय्य व्यवहार करणे अवघड असेल तर अल्लाहने ताकीद दिलेली आहे की अनाथांच्या मालमत्तेजवळ फिरकू सुद्धा नका. अल्लाह कुणाला कुणा दुसऱ्यापेक्षा अधिक दिले असेल तर त्याची अभिलाषा बाळगू नये. पुरुष व स्त्रिया जे काही कमवतात त्यावर त्यांचा स्वतःचा अधिकार आहे. पुरुष आणि स्त्रियांना काही इतर पुरुष व स्त्रियांपेक्षा कमी मिळाले असेल तर त्यामागे अल्लाहची काही योजना असेल; जगातील इतर वैभव देखील. जसे धन, इभ्रत, सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि मानमरातब. या जगात सर्वांना सारखे मिळत नसते. कुणाला धन देतो, कुणाला बुद्धिमत्ता तर कुणास इतर काही वैभव. ज्या जे दिले गेले त्याचे समाधान मानावे लागेल.
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment