Halloween Costume ideas 2015

छावणीचा रंग

छावण्या प्रत्येकाच्या झाल्या आहेत. प्रत्येक छावणीचा रंग पक्का ठरलाय. गडद प्रतिके भक्कम झाली आहेत. छावणीतल्या गुलामीलाच स्वातंत्र्य समजून प्रत्येक छावणीतला समुह  आनंदित आहे. या आंधळ्या आनंदात दुसऱ्या प्रत्येक छावणीविषयी द्वेष, तिरस्कार आणि घृणा भरलेली आहे. गाववाडी, गल्ल्या शहरे, सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्था, मीडियाचे  चॅनेल्स, वर्तमानपत्रांची वर्तमानपत्रे, वॉटस्अ‍ॅप ग्रुप्स, एफबीपेजेस् सगळ्यांच रूपांतर छावण्यात झालय...
छावण्या युद्धापूर्वीच्या... युद्धानंतर... युद्ध सदृश्य! यातूनच दुरावलेपणा.. एकमेकांपासून तोहून घेण्याची वृत्ती, एकूणच अलिप्तता आणि आपलेच सगळेच खरे. असा अमानवी दृष्टीकोण  दृढ होतोय. प्रत्येक माणूस, हरेक व्यक्ती छावणी होतोय... भौतिक सुधारणांच्या पातळीवर सुखाच्या संकल्पना बदलत राहिल्या. सुखाच्या शोधात, प्रगतीच्या अनेक वाटांनी माणसाने  निसर्गाशी दुरावा केला. अपवाद म्हणून जो निसर्गप्रेम आहे त्यातही आपली छावणी पक्की कशी करता येईल याच विचारानी माणूस पछाडला. आधुनिक तंत्रज्ञान युगात संवादाच्या  साधनांचा भडीमार होत असताना माणूस विसंवादी होत राहिलाय. येणारा काळ शांततेचा आहे. शांतता युद्धपूर्व... युद्ध आतल्या आत धुमसत सुरू आहे. जातीचा तोरा, धर्माची मिजास,  प्रतिकांची बांधणी, यासाठी सत्तापिपासूपणाची भूक याच भूकेतून अफवांचे अफिम, पेरले जातेय. आपण कसे सुरक्षित, असुरक्षित या सुख भयाच्या गोष्टींना उधळले जातेय. आपल्याखाली दबून कुठली तरी दुसरी छावणी असावीच. या वरची छावणी वाट्टेल ते मांडायला, मोडायला तयार आहे. प्रत्येकाला कुणीतरी आपल्याखाली आहे याचे समाधान मिळवायचे  आहे. सुखाचा शोध सुडकौर्याने सुरूय... काळ भयाचा आहे. भय-युद्धपूर्व. युद्धाची पद्धत, रीत, शस्त्रे, नियम बदललेत... सगळेच बेधुंद, बेभान अनियमित युद्धखोर... या युद्धखोरांच्या अमाप   वाढलेल्या विषारी पिकांवर आता माणूसपणाच्या संवादाची फवारणी प्रत्येक छावणीच्या चांगल्या माणसांनी करायला हवी. स्नेहप्रेमाचा आदिम वारसा सांगत, घृणामुक्त कशा होतील  यासाठी प्रयत्नरत व्हायलाच हवे?
आगीत होरपळून निघणाऱ्या जंगलातला वणवा, ओंजळीभर पाणी शिंपण्याचे धैर्य करायलाच हवे. असले धैर्य कळकळीतून येते. कळकळीला संवेदना जिवंत ठेवावी लागेल. एफबीवर  अगदी कालच धर्मस्थळ विटाळले म्हणून शरीरावर चटके, बेदम माराची शिक्षा खाणारा छोटा मुलगा... अंगभर सर्रकन काटा आला. जीव घाबरला. तसा रोहितच्या वेळीही झाले आणि  अख्लाक मोहसीनच्या वेळी सुद्धा. डॉ. पायल तडवी असोत, डॉ. कफील अहमद. त्या छावणीचा या छावणीसाठी न्याय वेगळा आहे की न्यायच नाही? सांख्यिकी माहिती, आकडेवारीतून  छळवादाचे उदात्तीकरण किती झाले हे सहज पॅरलल मीडियातून समजेल आपल्याला. माहितीचा साठा मेंदूत होतो, तो होईलही पण संवेदना नाही मिळत विकत किंवा फुकट. ती  अंतःशक्ती आहे. तीच हरवतेय म्हणून भरभर ही शब्दमांडणी. तो मुलगा, डॉ. काफिल, पायल यांचा छळ हा कोणत्या छावणीतल्या, कोणत्या छावणीकडून अगदी फुलकोमल  नजाकतींच्या शब्दांनी मिथकांचा चपखल वापर करीत समस्त भारतीय स्त्रीयांची, मानवाची दुःखे मांडणारा लेखक जादूगर गिरीश कर्नाड... कर्नाड गेले.. आणि  लेख माहिती किस्स्यांचा  वर्षाव झाला. या वर्षावात बहुतेक छावणी पक्की! मी कुठल्याच छावणीत नाही असे म्हणणाऱ्यांची छावणी व्हायला हवी. पण शहाणपणाचा किंवा पुन्हा अहंपणाचा वाद संवाद बिघडून टाकेल.
सर्वोच्च सन्मानांनी सन्मानित होताना, अष्टपैलू व्यक्तित्व म्हणून कर्नाड यांचा मोठेपणा वादातीत. आणि मान्य... पण मी ज्या छावण्यांच्याकडे बघतोय त्या सगळ्या छावण्यातून एकाच  वेळी त्यांच्याविषयी द्वेष ही प्रेमही दिसतेय. सांस्कृतिक बांधणीचा हा जबराट घाव रंगकर्मी, नाट्य चळवळ, अशांतून गिरीश कर्नाड हे नाव ठसठशीत. छावण्या असतातच हे कळायच्या  आधीपासूनच माझ्यापर्यंत पोहोचलेले गिरीश आवलेय. प्रीयच! पण प्रीय सफदरचे काय? सफदर हाश्मीची छावणी कोणती मग? असो... आपली छावणी नाहीच.. आपण दरबदर. ऐसे  माहौल में दवा क्या है, दुआ क्या है, जहाँ कातिल ही खुद पूछे की हुआ क्या है?

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget