Halloween Costume ideas 2015

माणूसपणा साधावा हीच दुवा

सत्ताधिशांनी डाव जिंकला. ’जिंकला’यासाठी की हार, पराभव, अपयशावर आता ’विश्‍लेषणांच्या बखरी’ लिहिल्या-बोलल्या जाताहेत. सामान्याला केवळ जैसे थे काळ काळा आहे, म्हणून जगण्याच्या आशादायी उजेड जपत सामान्यांची ससेहोलपटी धडपड सुरूच आहे, ती राहील हमेशा.
    सरळ साध्या रस्त्यावरच्या घामेजल्या माणसाचा चेहरा मात्र संध्याकाळच्या खाण्यापिण्याची, चुल पेटण्याची आशा करणाराच भेटला. रोजा खोलने की दावत कुठे आहे? किंवा कुणापर्यंत ईदसाठीचा बाजार नकळत पोहचवता येईल अशा बातांनीच माझ्याभोवतीचे आवाज ठळक होत आहेत. राजकीय जाणीवा, शैक्षणिक महत्व आणि सामाजिक समजेच्या कमतरतेमुळे धर्मसमुह मानसिकतेचा चांगुलपणा सर्वसामान्य मुस्लिम मिरवताना दिसतोय. उद्याच्या कसल्याच चांगल्यावाईट गोष्टीची पर्वा न करता आला दिवस ढकलण्याची डीफॉल्टेड मनोवृत्ती किमान मुस्लिम धर्मवृत्ती कॉमन आहे.
    ’धर्म’ म्हणून गडद अधोरेखित करणार्‍या बर्‍याच उजव्या डाव्या चळवळींनी जमेल तशा उपयोगीता मुल्यावर साध्या मुस्लिम समुहाचे महत्त्व मापले आहे. इबादत ते बरकतचा सहज प्रवास करणार्‍या श्रीमंत मुसलमानाच्या जगण्याचे वेगळेपण काही वाटत नाही. केवळ ’धर्म’ म्हणून लोकसमुदायाला परिघाबाहेर ठेवायचे हाच सातत्याचा उपक्रम फायदेशीर पडला सर्वांच्या. त्यातल्या खालच्या तळातल्या, धर्म अनुयायी, सहिष्णू, समाजाच्या सर्व क्षेत्रात राबत्या मुस्लिम माणसाला मात्र वंचित उपेक्षित म्हणूनही दुर्लक्षित करण्याचा अट्टहास सगळीकडे समसमान सुरूय.
    स्वत: ’रोजा’ असतानाही उन्हात ’सरबत’ किंवा फळांचा गाडा ढकलणारा, ठेल्याटपरीवर काम करणारा, विटा वाहणारा, ट्रक-गाड्या चालवित, हमाली करणारा, इतर सर्वांनाच सेवेच्या भावाने मदतीला येणारा मुस्लिम ’धर्म’ किंवा ’नागरिक’ ’वंचित’ म्हणून अधोरेखित केला जात नाही. सरळ अशांचा अनुल्लेखाने सलग मारा करून सतत इकडून तिकडूनही मुस्लिम म्हणजे आम्ही म्हणतो तसेच हा कट्टरहट्ट प्रभावशाली ठरतोय. त्याच्याविषयी बोलणार्‍या लिहिणार्‍याची ताकद खूप कमी आणि तोकडी पडत आहे. मांडणीच्या वैचारिक पातळीवर आपल्या स्वत:च्या मोठेपणाचा बॅकलॉग भरू पाहणार्‍या सगळ्याच विचारवंतांनी सरसकट मुस्लिम ही संज्ञा एककल्ली देशव्यापी वापरली आहे. प्रादेशिक प्रश्‍न, लोक-गावगाड्याशी त्याच संध्याकाळात जगणं, इथल्या एकूण जाणीवांशी त्याची सरळमिसळ आणि पुन्हा माणूस किंवा नागरिक म्हणून जगण्याची धडपड. यावरच नव्याने मांडा-भांडायला हवे. घामेजलेल्या शर्टवर अत्तराचे थेंब आले. त्याग संयमाच्या शिकवणीने चेहरा नुरानी झाला. फुललेल्या बाजारपेठा आणि रिकामे खिसे किंवा मुठ्ठीभर स्वप्नांच्या दुनियेतला हा तवंगरबादशहा.
    याच्या जगण्याला सगळ्यांनीच ठेचलय. एकीकडे शोकसभेसारखं वातावरण का पसरलय. लोकसभेच्या निकालानंतर त्याला त्याचे प्रश्‍न किंवा उत्तर नाही कळतंय. राबणार्‍याला येणारी ईद अधिक गोड व्हावी, एवढीच किमान अपेक्षाय. घरातल्यांच्या चेहर्‍यावरचा ईदीचा आनंद लख्खपणे सुखकर असावा. गावगाड्यातल्या मित्रांनी शिरखुरमा - बिर्याणीचा आनंदे आस्वाद घ्यावा. त्याला गळामिठी ईद मुबारक म्हणत बाबरीपूर्व माणुसकीचा रंग काळजापर्यंत पोहचावा एवढीच कळकळ. पण सगळ्या अठवळ कल्लोळात साध्वी साक्षीने हायजॅक केलेल्या मेंदू आणि गल्लीतील निकालानंतर आलेले कुत्सित हास्य यांने तो दुखावतोय हे ही खरं. अशा सगळ्या रोजमर्रा घटनांचा कोलाहल मांडतानाच मला मात्र डॉ. पायलची संघीजातीय कुचेष्टेतून घडलेली स्वहत्या त्रास देतेय. त्याहीपेक्षा अधिक या शोषितांच्या बाजूने उभा राहणारा कुठल्याही विचारधारेच्या माणसाच मोठेपण जाणवतंय. पण मोहसिनच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होताना चळवळ्यांच्या आधाराची धुसर आशा ही करवत नाही. का नाही उभा राहत कोणती? चिकित्सेच्या पातळीवर येऊन तोडण्याची भाषा वाईटच... पण जोडण्यासाठीची सामान्याची धडपड मुस्लिम म्हणून एकतर्फी अपवाद काही चांगले घडते. नजिबचा तर आता विषयच नको! स्पेसिफाईड उदोउदोच्या गोंधळात माझ्या दुवेचा आवाज मी मिसळू देणार नाही. ईदची दुवा.. माणूसपणाचा दुवा सांधणारीच आहे, ती तशीच असेल. मोहसिन किंवा अगदी परवा गोरक्षकांच्या झुंडीने तुडवल्या गेलेल्याच्या घरात ईद असेल, दुवा होईल.
पण त्याच दुवेतले अश्रू खरे असतील.
’तुमने देखे नहीं हँसते हुए आँसू लेकिन
हमने रोते हुए ओठों पे हंसी देखी है”

- साहिल शेख
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget