Halloween Costume ideas 2015

नृशंसतेचा कडेलोट

मानवी संस्कृतीमध्ये नैतिकता, सभ्यता, समजदारपणा, भल्या-बुऱ्याची जाण, सद्सद्विवेकबुध्दी, हे विचार समाविष्ट करीत पूर्वापार जीवनाची वाटचाल होत राहिलेली आहे. मात्र सध्या  अवती-भवती सातत्याने घडणाऱ्या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थिती निर्माण केली आहे. जम्मूमधील कथुआ येथे एका अल्पवयीन  बालिकेवर झालेले अनन्वित अत्याचार, बलात्कार आणि खून प्रकरणात नुकतीच तिघांना जन्मठेपेची तर आणि या आरोपींना वाचवण्यासाठी सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या तिघा पोलिसांना  पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकारातील पीडित बालिका बाकरवाल या भटक्या, गुराखी समाजातील होती. या समाजाला कठुआतून हुसकावून लावण्यासाठी हे  नृशंस कृत्य करण्यात आले, असे पोलिसांनी सप्रमाण सिद्ध केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी सांझीराम एका देवस्थानाचा प्रभारी आहे. अवघ्या आठ वर्षांच्या बालिकेवर- तिचा  हरवलेला घोडा शोधून देण्याचे आमिष दाखवून- देवस्थानातच डांबून ठेवले गेले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला गेला. बेशुद्धीचे औषध पाजले गेले आणि हालहाल करून मारण्यात  आले. ‘जंगलचा कायदा प्रचलित असल्यासारखेच या प्रकरणातील आरोपी वागले’ असे उद्गार न्यायाधीशांनी काढले, त्याला ही पाश्र्वभूमी आहे. या शिक्षेमुळे त्या अजाण बालिकेला न्याय  मिळाला, असे बिलकूलच म्हणता येणार नाही अथवा हा विषय नजरेआड करता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे या प्रकरणात जे काही घडले आहे ते आज आठवले की या  एकविसाव्या शतकात ‘मुलगी शिकली, प्रगती झाली!’ असे निव्वळ फलक लावण्याचे देखावे करणारा हा समाज महिलांच्या सन्मानाची कशी धुळधाण करतो, तेच स्पष्ट होते. कथुआ येथे  ही घृणास्पद घटना घडली, त्याच सुमारास उत्तर प्रदेशातील उन्नाव; तसेच गुजरातेतील सुरत आदी ठिकाणीही लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या आणि त्यामुळे  देशभरात संतापाची लाट उसळली. असे काही झाले, की राज्यकर्ते कायद्यातील तरतुदी बदलण्याच्या मागे लागतात. याहीवेळी तसेच घडले. मोदी सरकारने अल्पवयीन मुलींवरील  बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा केला. केंद्रीय गृह खात्याने २०१६ नंतर ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्यूरो’चा अहवालच प्रसिद्ध होऊ दिलेला नाही. त्यामुळे गेल्या  तीन वर्षांत अशा अत्याचाराची किती प्रकरणे घडली आणि तेव्हा नेमके काय घडले, याचा तपशील उपलब्ध नाही. मात्र, हा निकाल आला, नेमक्या त्याच सुमारास अलीगड येथे एका  तीन वर्षांच्या बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिचा बळी घेतल्याची घटना उजेडात आली आहे. उत्तर प्रदेशबरोबरच मध्य प्रदेशातही अशा काही घटना घडल्या आहेत. पीडितांना  न्याय मिळेल का याविषयी संदेह वाटल्याने खटलाही जम्मू-काश्मीरबाहेर पंजाबमध्ये (पठाणकोट) वर्ग करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाला द्यावा लागला. प्रत्येक स्तरावर समाजातील  दुभंगरेषा किती ठळक होऊ लागल्या आहेत, याची अस्वस्थ करून सोडणारी जाणीव कठुआ प्रकरणाने करून दिली. जिवाचे भय वाटल्याने पीडित मुलीच्या गरीब आईवडिलांना आणि  दत्तक पालकांना (मुलीचे मामा) कठुआ सोडून दूर कारगिलमध्ये जावे लागले. या प्रकरणाच्या निमित्ताने अल्पवयीन मुलांवरील बलात्काराचा मुद्दाही गांभीर्याने समोर आला. गेल्या पाच   वर्षांमध्ये या प्रकारांमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. एका आकडेवारीनुसार, एकूण बलात्कार पीडितांपैकी जवळपास ४० टक्के अल्पवयीन असतात आणि त्यांतही जवळपास अध्र्या  प्रकरणात १५ वर्षांखालील मुली या पीडित ठरलेल्या आहेत. कथुआतील घटनेला आणखी एक पदर होता आणि तो धार्मिक विद्वेषाचा. या प्रकरणानंतर आरोपींच्या समर्थनार्थ झालेल्या  मेळाव्यात जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन संयुक्त सरकारमधील भारतीय जनता पक्षाचे दोन मंत्री सामील झाले होते. त्याचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर अखेर भाजपला त्यांचे राजीनामे  घ्यावे लागले होते. आता अलीगडमधील अशा घटनेलाही तसाच रंग देण्याचा प्रयत्न होत असून, तो अत्यंत अश्लाघ्य असाच आहे. या साऱ्या पाश्र्वभूमीवर खऱ्याअर्थाने खंबीर भूमिका  घ्यायला हवी ती समाजानेच. वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे, असे  म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. बलात्कारासारखे अमानवीय कृत्य करणारे नराधम राक्षसी वृत्तीचे आहेतच..त्यांना रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहेच. मात्र  कुठल्याही नीती-नियमाची पर्वा न करता बलात्कारासारख्या जधन्य आरोपातील आरोपींच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरणारी झुंडशाही मनोवृत्तीही अत्यंत घातक म्हणावी लागेल.  अत्याचारांचा हा कुरूप आलेख नुसता देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा नाही तर माणसाच्या माणूसपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला   गेला पाहिजे. माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावे लागतील. विकृतीने बेभान झालेला माणूस जर असाच नृशंसतेचा कडेलोट करत राहिला तर मानव समाज  मानवी मूल्यांच्या ऱ्हासाच्या तळाशी जाईल, यात शंका नाही.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget