Halloween Costume ideas 2015

बहुपत्नीत्व

इस्लाम पुरूषास चार विवाहांपर्यंत मान्यता देतो. इस्लामने बहुपत्नित्वाची अनुमती दिली याचा अर्थ असा नाही की कितीही स्त्रियांशी विवाह करावा. अनेक विवाह करण्यासाठी तशाच  प्रकारच्या अटीदेखील घातलेल्या आहेत. इस्लाम ज्या काळात आणि ज्या प्रदेशात अवतरित झाला त्या वेळेच्या परिस्थितीचा विचार करूनच मान्यता दिली. इस्लामच्या पुनरोद्धारावेळी  स्त्रियांचे प्रमाण मुबलक होते. आज जसे जागतिक पातळीवर स्त्री-पुरूषांच्या प्रमाणात स्त्रीचे प्रमाण कमी आणि पुरूषांचे अधिक आहे, तसे प्राचीन काळी मुस्लिमांमध्ये स्त्रियांचे प्रमाण  पुरूषांच्या प्रमाणापेक्षा जास्त होते. म्हणून बहुपत्नित्वाला मान्यता देण्यात आली. स्त्रियांचे प्रमाण अधिक असण्यासही काही बाबी कारणीभूत होत्या. उदा. युद्धे, लढाया, पुरूषांचे स्थलांतर  या कारणांनी पुरूषांची संख्या लढाईत मारले जाऊन कमी होते. पुरूषांचे प्रमाण कमी झाल्याने स्त्रियांना एकटीला जीवन व्यतीत करावे लागेल या कारणास्तव बहुपत्नित्वास मान्यता  आहे. त्या काळात आजच्यासारख्या वैद्यकीय सुविधा विकसित व सुधारित नव्हत्या. त्यामुळे स्त्रियांच्यात आजारपण अधिक होते. इस्लामचा स्त्री-पुरूषांच्या शारीरिक संबंधाला   विवाहाच्या माध्यमातून मान्यता देऊन त्यांच्याकडून आपला वंश वाढविण्यास मान्यता आहे. म्हणजेच विवाह हे यापासून वंश वाढविण्याचेदेखील माध्यम आहे. जर पत्नी वांझोटी असेल  किंवा सतत आजारी असेल तरीदेखील बहुपत्नीवास मान्यता आहे (केवळ चार). काही वेळा विवाहप्रसंगी पती-पत्नी यांच्यात जरी समेट प्रेम असले तरी  पुन्हा एकमेकांत न  पटल्यासारखे होते. कारण दोघांच्या स्वभावात तफावत असल्यास अनंत अडचणी निर्माण होतात आणि जिच्याशी पटत नाही ती एकमेव पत्नी असल्यास वैवाहिक जीवन आनंदी जगता  येत नाही. तसेच त्या काळात विवाह जुळविण्यासाठी बरोबरीची तोलामोलाची स्थळे यांचा अभाव असायचा. माता- पित्यास आपल्या मुलीसाठी उत्तमोत्तम व धनदांडगा पती मिळावा असे वाटायचे. तसा पती मिळविण्यासाठी प्रयत्न केले जायचे. परिणामी दोन्ही परिवार सारख्या प्रमाणात नसायचे व चांगल्या स्थळांचा अभाव निर्माण व्हायचा. यामुळे बहुपत्नित्वाने  चांगले स्थळ मिळवण्याची शक्यता निर्माण झाली. युद्धामुळे अनेक पुरूष (सैन्य) मारले जायचे. तेव्हा त्यांच्या बायका विधवा व्हायच्या, तर मुली अनाथ व्हायच्या. प्रत्येकाला दर्जेदार  स्थळ हवे असल्याने अशा अनाथ व विधवा मुली-स्त्रियांची अवहेलना व्हायची व त्यांच्यावर एकलकोंडी जीवन जगण्याची वेळ यायची. याचेही प्रमाण बहुपत्नीत्वामुळे कमी करण्यासाठी हा  उपाय असे.
इस्लामने स्त्रीचा सन्मान करताना विधवा पुनर्विवाहास मान्यता दिली. आज आपण जो इतिहास अभ्यासक्रमात शिकतो त्यामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा भारतावर इंग्रजांची सत्ता  असताना गव्हर्नर लॉर्ड डलहौसी याने इ.स.1856 ला केला. यासाठी विशेष प्रयत्न ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केले होते. याच दरम्यान म्हणजे इ.स. 1869 ला क्रांतीज्योती महात्मा  ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला होता. पण वास्तविक पाहता संपूर्ण जगाताचा इतिहास अभ्यासताना इ.स. 1856 च्या पूर्वी (1250 वर्षापूर्वी  अंदाजे) इस्लाममध्ये जगातील पहिला विधवा पुनर्विवाह झाला व तो ही पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केला. तेव्हा त्यांचे वय 25 वर्षे होते व त्यांच्या पत्नी (मक्का येथील) हजरत खदिजा  यांचे वय 40 वर्षे होते व त्या पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी विवाह करण्यापूर्वी दोन वेळा विधवा झाल्या होत्या.
अनेकेश्वरत्व जोपासणे इस्लामने निषिद्ध केले आहे. कारण एकेश्वरत्व हे इस्लामची मूळ धारणा असून तो निर्विकार, निराकार आहे. त्याची छाया, चित्र, मास, मूर्ती असे काहीही अस्तित्वात नाही. म्हणजेच मूर्तीपूजा त्याज्य आहे. पतीपत्नीने कसे जीवन व्यतीत करावे यासाठीही इस्लामने फार मोठे तत्वज्ञान सांगितले आहे. एकमेकांचा आदर करीत असताना  जर पत्नी आपल्या पतीचा अनादर (अपमान) करीत असेल तर तिला समजावून सांगा. याप्रसंगी हलक्या साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करा.
’’ज्या पत्नीकडून अवज्ञा होण्याचे तुम्हाला भय असेल, त्यांनी उपदेश करा (समजावून सांगा- सामनीती) आणि बिछान्यात त्यांच्यापासून दूर राहा (भेदनिती), मग जर त्या तुमच्या  आज्ञा पाळायला लागल्या तर मात्र जुलूम (दंडनिती) करण्यासाठी निमित्त (कारण) शोधू नका’’

वरील आयातीच्या अर्थातून हे लक्षात येते की पत्नीला सजा करण्याचा अधिकार तिच्या नवऱ्यास दिलेला आहे. तो ही फक्त जर पत्नी पतीचा अपमान करत असेल तर. परंतु तिला अगोदर समजावून सांगा, तिच्यापासून दूर राहा (बिछान्यात). तरीही तिच्या वर्तनात फरक पडत नसेल तर तिला ’किरकोळ मारहाण’ (तोंडावर मारू नका) करा. पत्नीच्या कितीही  मोठ्या पराकोटीच्या अवज्ञेसाठी किरकोळच मारहाण करणे, ही मर्यादा आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणे, विनाकारण मारझोड करणे, छोट्या अवज्ञेसाठी मोठी शिक्षा करणे अथवा  पराकोटीच्या अवज्ञेवर किरकोळ मारहाणीची मर्यादा ओलांडणे हा एक प्रकारचा जुलूम, अत्याचार ठरेल. स्त्रियांवर अन्याय-अत्याचारास सक्त मनाई आहे. इतर बहुतेक धर्म आणि राष्ट्रांत  पुरूषाला स्त्रीवर प्राधान्य दिल्याचे भासवले आहे. याच्याच आधारावर पुरूषांनी स्त्रियांना आपली दासी मानून तिला तुच्छ समजले. तिचा अपमान केला, तिला आर्थिक, सांस्कृतिक,   सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य दिले नाही.इस्लामने तर स्त्रीचा सन्मान केला आहे आणि काही धार्मिक मर्यादेत राहून इच्छिल त्या क्षेत्रात कार्य करण्यास अनुमती दिली आहे.
काही मर्यादांमध्ये स्त्रियांसाठी दागिन्यांच्या संदर्भात इस्लामने जाहीर केले आहे, ’’स्त्रियांनी आपल्याकडील दागिने शरीरावर परपुरूषांना दिसतील असे परिधान करू नयेत. ’’ इस्लाम  शिकवण देतो, ’’ वायफळ खर्च करू नका, वायफळ खर्च करणारे सैतानाचे बंधु होत आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे.’’
इस्लामने अहंकार व घमेंड असणाऱ्यांचा धिक्कार केला आहे. दागिने परिधान करून अथवा दागिन्यांची साठवण करून व्यक्तीमध्ये दिखाऊपणा निर्माण होतो, त्याला त्याचा संपत्तीचा  गर्व वाटतो व अहंकारी व्यक्तीला नरकाचा मार्ग खुला केला आहे. इस्लाम धर्म नातेवाईकांच्या हक्काबरोबरच आपल्या शेजाऱ्यांच्या हक्काबद्दलही जाणीव निर्माण करतो. आपण जर पोटभर जेवण करीत असू आणि आपला शेजारी भुकेने तरसतोय, अन्नअन्न करतोय, त्याला उपाशी न ठेवता त्याच्या जेवणाची काळजी शेजाऱ्याने घ्यावी. म्हणजेच आपण पोटभर  खायचे व शेजाऱ्याने उपाशीपोटी झोपायचे,हे इस्लामविरूद्ध आहे. एखादा शेजारी पुरूष संपूर्ण शरीरावर लाखो रूपयांचे दागिने घालून मिरवत असेल तर आपल्या उपाशी शेजाऱ्याकडे कधीच  लक्ष देणार नाही आणि शेजाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तो कधीही पुढाकार घेणार नाही. तसेच शेजारधर्म निभावण्यासाठी सर्वात पुढे स्त्रीच असू शकते. कारण स्त्रीच आपला शेजारी  कसा आहे, त्याचे वर्तन कसे आहे, त्याच्या घरातील सदस्य काय करतात, त्याची मुले कोणत्या वर्गात आहेत, त्याची आर्थिक परिस्त्तिी कशी आहे? अशा बाबींची माहिती आपल्या  शेजारच्या परिवारातील स्त्रीशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी वागू शकते व जवळीक निर्माण करू शकते.
कर्ज घेऊन इस्लामने मर्यादेपेक्षा अधिक दागीने वापरणे, खरेदी करणे तसेच साठवून ठेवणे याला मज्जाव केला आहे. म्हणून इस्लामने दागिने वापरणे हे अनिवार्य केले नाही. जसे हिंदू  धर्मामध्ये लग्नसमारंभात वराकडून वधूला मंगळसूत्राबरोबर काही दागिने विवाहितेची निशाणी, सौभाग्याचं लेणं म्हणून दिली जातात व त्यातील काही दागिने तिला वापरावेच लागतात.  कारण ते दागिने तिचे स्त्रिधन असते व ते धर्म नियमांनुसार वापरावे लागतात. तशी इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांनी दागिने वापरण्यास अनिवार्यता दर्शविलेली नाही. स्त्री तिच्या व  नवऱ्याच्या आर्थिक कुवतीनुसार साज-शृंगार आपल्या नवऱ्यासाठीच करू शकते. परपुरूषांसमोर दागिने व शृंगार यांचे प्रदर्शन करणे पाप आहे. स्त्री व तिचा नवरा यांची आर्थिक कुवत  जशी असेल तशी ती दागिने खरेदी करू शकते. मात्र वर्षाच्या शेवटी (रमजान ईद) च्या वेळी एकूण दागिन्यांवर त्यांना 2.5 टक्के जकात अदा करावीच लागते. दागिन्याच्या हव्यासापोटी  कोणाचे कर्ज काढून ते घेऊ नयेत. (इस्लाममध्ये व्याज देणे-घेणे निषिद्ध आहे.) मात्र स्त्रीचा स्वभावगुण असल्याकारणाने ती दागिन्यांची अपेक्षा करते. मात्र इस्लाममध्ये मंगळसूत्र वगैरे  दागिने वापरण्यास धर्माचा आधार दिलेला नाही. पण भारतातील काही भागातील (उदा. महाराष्ट्र) स्त्रिया मंगळसूत्र वगैरे दागिने वापरण्यात धर्माचा आधार नसताना ती बाब धार्मिक आहे  (अज्ञानामुळे) भासवतात व गळ्यात विवाहानंतर लच्छा, बोरमाळ (दागिन्यांचा प्रकार) तसेच इतर दागिने वापरणे अनिवार्य भासवतात. पण वास्तविक पाहता धर्माची अनुमती फक्त  आणि फक्त शृंगारासाठीच दागिने वापरण्यास आहे. महाराष्ट्रात अनेक मुस्लिम बांधव इस्लामचे अनुयाची तर आहेत पण त्यांनी इस्लामच्या उपासनेबरोबर इस्लाम जीवनपद्धती  आचरणात आणली नाही. इतर धर्मियांप्रमाणे त्यांच्या जीवनपद्धतीचा शिरकाव त्यांच्यात झाला याला बहुतांशी स्त्री जबाबदार आहे.
इस्लाममध्ये ईश्वराची आराधना प्रत्येकाला अनिवार्य आहे. मग ती स्त्री असेल अथवा पुरूष. स्त्रीयांनादेखील इस्लामच्या ईमान (श्रद्धा) राखणे, नमाज, जकात, रोजा, हज हे करावेच  लागते. स्त्रीने स्वतःची (समाजाबरोबर) कितीही प्रगती केली असली तरी प्रगतीच्या महालात वावरताना धर्मक्षेत्रातही कार्य करावे. धर्माने केलेल्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत.  दिवसभरातील पाचवेळा नमाज अदा केलीच पाहिजे, याला अजिबात सूट नाही. कोणतीही स्त्री नमाजपासून दूर राहू शकत नाही. गरोदर स्त्री  (जिला गर्भातील अर्भकामुळे जमिनीकडे  वाकात येत नाही.) नमाज इशाऱ्याने अदा करू शकते. म्हणजे ईश्वराची आराधना केली पाहिजे. पुरूषांपेक्षा स्त्रीया नक्कीच अधिक धार्मिक असतात, हेही तितकेच खरे आहे. याचा दाखला  म्हणजे जेव्हा इस्लाम धर्म प्रगटला तेव्हा इस्लामची तत्वप्रणाली निश्चित झाली व त्या तत्वाच्या व्यापकतेमुळे इस्लाम स्वीकारायला मोठ्या प्रमाणात आघाड्या वाढल्या. तत्पूर्वी जेव्हा  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी इस्लामची घोषणा केली. तेव्हा तात्काळ सर्वप्रथम माननीय खदिजा (रजि.) यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. अशा प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर  सर्वप्रथम श्रद्धा बाळगण्याचा सन्मान स्त्रीला प्राप्त झाला.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget