Halloween Costume ideas 2015

मानवाधिकारांची इस्लामी सनद

कर सकते थे जो अपने जमाने की इमामत
वो कोहना दिमाग अपने जमाने के हैं पैरो

कारणे काहीही असोत, एक गोष्ट निश्‍चित आहे की, बहुसंख्य मुस्लिमांनी कुरआन आणि हदीसचा वैज्ञानिक दृष्टीकोणातून अभ्यास केलेला नाही, मात्र सामाजिक शास्त्रांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीकोणातून केलेला आहे. त्यामुळे त्यांना असे वाटते की, इस्लाम हा (अल्लाह क्षमा करो) बुरसटलेल्या विचारांचा जुना धर्म आहे, आधुनिक जगामध्ये त्याचा फारसा उपयोगी नाही. वस्तुस्थिती नेमकी याच्या उलट आहे, मात्र ती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात मुस्लिम कमी पडलेले आहेत. उदाहरणार्थ मानवाधिकारांचाच विषय घ्या ! याला आधुनिक देणगी समजले जाते. खरे पाहता मानवाधिकारची संकल्पना सर्वप्रथम प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी सातव्या शतकातच मांडली. या संदर्भात फारशी चर्चा कधीच केली जात नाही. हा एक दुर्लक्षित विषय आहे म्हणून या आठवड्यात याच विषयावर चर्चा करूयात. 
मानवाधिकार
    आजच्या आधुनिक जगामध्ये मानवाधिकारांना प्रचंड महत्व आलेले आहे. जगाने मानवाधिकारांचे आंतरराष्ट्रीय घोषणापत्र ज्याला युनायटेड डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हटले जाते व ज्या योगे मानवाधिकारांची जपणूक करण्याची सभ्य समाजाने लेखी संमती देऊनही, जीला काडीची किमत दिली जात नाही, नावापुरते का होईना 1976 मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये मंजूर करण्यात आले. मात्र वाचकांना कदाचित आश्‍चर्य वाटेल की मानवाधिकारांची इस्लामी सनद प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दहाव्या हिजरीमध्ये, हज्जतुल विदा (अंतिम हज) जो की सातव्या शतकात संपन्न झाला. तेव्हा दीड दोन लाख मुस्लिमांसमोर जारी केली होती.
    म्हणजे पाहा! मानवाधिकारांचा परिचय आधुनिक जगाला 1976 साली झाला, मात्र मुस्लिम जगाला त्याचा परिचय सातव्या शतकातच झाला होता. मग विचार करा! आधुनिक कोण? 1976 साली ज्यांना मानवाधिकाराची जाणीव झाली ते की, सातव्या शतकात ज्यांना या अधिकारांचे महत्त्व कळाले ते? याचा निर्णय मी वाचकांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडतो.
    अंतिम हजच्या वेळेस म्हणजे फेब्रुवारी 632 मध्ये अराफातच्या मैदानात, जे की मक्का शहरापासून 20 किमी अंतरावर आहे, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी प्रचंड जनसमुदायासमोर जे भाषण दिले होते ते इस्लामी इतिहासामध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांची इस्लामी सनद म्हणून अजराजमर झालेले आहे. त्या भाषणाचा एक-एक शब्द कानामात्र्याच्या फेरफाराशिवाय दीड दोन लाख लोकांनी जगासाठी जपून ठेवलेला अमूल्य असा ठेवा आहे. प्रेषित सल्ल. यांनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचे पुनरूच्चारण हजरत बिलाल रजि., सफवान बिन उमय्या रजि व अन्य शेकडो बुंलंद आवाज मुतकब्बीरां (पुनरूच्चारक) च्या मदतीने केले गेले. कारण त्या काळात ध्वनीक्षेपकाचा शोध लागलेला नव्हता. प्रेषित सल्ल. यांनी आपल्या उंटणीवर स्वार होऊन या मानवाधिकारांच्या जाहीर नाम्यांतील कलमांचे निर्देश दिलेले होते.
    खरे पाहता ते शब्दबद्ध निर्देश आज सुद्धा जसेच्या तसे अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे व ते इतके महत्वाचे आहे की, प्रत्येक मुस्लिमाने ते निर्देश फ्रेम करून आपल्या घरात दर्शनी भागात लावले पाहिजे. त्यातील कलमांचे पुन्हा-पुन्हा वाचन केले पाहिजे. त्यामधील एक-एक शब्द मुखोद्गत केला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत ही सनद नजरेआड होणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे. एवढेच नव्हे तर त्या सनदेतील प्रत्येक अनुच्छेदाचे प्रत्यक मुस्लिमाने पालन केले पाहिजे. जेणकरून सामाजिक सलोखा राखण्यात मदत होईल. मुस्लिम समाज एक आदर्श समाज बनेल व त्यांच्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोणसुद्धा बदलून जाईल. याबाबतीत किमान माझ्या मनामध्ये तरी शंका नाही.
    प्रेषित सल्ल. चे ते ऐतिहासिक भाषण
”अल्लाहशिवाय कोणी ईश्‍वर नाही. तो एकमेव असून त्याचा कोणी भागीदार नाही. अल्लाहनं आपलं वचन पूर्ण केलं. त्यानं आपल्या भक्तास मदत केली आणि एकट्यानं एकत्रित आलेल्या सगळ्या खोट्या शक्तींना पराभूत केलं.”मानवांनो! मी सांगतो ते ऐका, मला नाही वाटत आपण पुन्हा एकत्रित येऊ. मला एक वर्ष लाभेल असेही मला वाटत नाही.
    आजचा हा दिवस, हा महिना, हे ठिकाण पवित्र आहे. तसेच लोकहो! सर्वांचं जीवन (रक्त) आणि मालमत्तेचा आदर करा, ते पवित्र आहेत. लक्षात ठेवा, तुम्हा सर्वांना अल्लाहच्या हुजूरात हजर व्हायचंय. तुमच्या कर्माची मग तिथं विचारपूस होईल. कुणाचं नाहक रक्त सांडू नका. घराघरांचा नाश करू नका. तिथं सर्व कर्मांची झडती द्यावी लागेल.
    अज्ञानकाळात झालेल्या खुनांचा सूड घेणं आता रद्द होतंय. सर्वप्रथम मी आपल्या परिवाराच्या खुनाचा बदला माफ करून टाकतो. हारिसचा मुलगा रबीआच्या खुनाचा सूड घेतला जाणार नाही.
    मानवानों! अल्लाहनं तुम्हाला एकाच पुरूष आणि एकाच स्त्रीपासून जन्म दिलाय. तुमच्या जमाती आणि टोळ्या बनवल्या एकमेकांच्या ओळखीसाठी. पण अल्लाहपाशी तुमच्यापैकी तोच प्रतिष्ठित आहे जो सदाचारी असेल.
    सारे मानव आदमची संतती आहे. आदम यांना चिखलमातीपासून निर्माण केलंय. कुणा अरबास अरबेतरावर प्रभुत्व नाही की अरबेत्तर अरब माणसापेक्षा प्रतिष्ठित नाहीत. तसच काळ्या माणसाला गोर्‍या माणसावर आणि गोर्‍या माणसाला काळ्या माणासवर प्रतिष्ठा नाही. अज्ञानकाळातल्या सगळ्या प्रतिष्ठा मी माझ्या पायाखाली तुडवित आहे. कुरैशच्या लोकांनो ! अल्लाहनं तुमच्या खोट्या अहंकारास नष्ट करून टाकलं. तुमच्या बापजाद्यांच्या पराक्रमांवर घमेंड करण्याला काही अर्थ नाही.
    सावकारी निषिद्ध झाली. व्याजबट्टयाचा व्यवहार निषिद्ध झाला. सर्वप्रथम मी माझे चुलते अब्बास यांचं व्याज रद्दबातल करतो.
    लोकहो! तुमच्या पत्नींचे तुमच्यावर काही अधिकार आहेत, तसचं तुमचे त्यांच्यावर हक्क आहेत. आपल्या पत्नीबाबत अल्लाहचं भय बाळगा. अल्लाहस वचन देऊन तुम्ही त्यांना आपल्या भार्‍या (पत्नी) स्वीकारल्या आहेत. त्यांच्याशी सहानुभूतीनं, नरमाईनं, दयेनं वागा, कठोरपणे नका वागू.
    कुणा स्त्रीनं आपल्या पतीच्या संपत्तीतून त्याच्या अनुमतीशिवाय काही देणं हे वैध नाही. तुमच्या पत्नीवर तुमचा हा अधिकार आहे की त्यांनी अशा कुणा व्यक्तीस घरी बोलवू नये ज्यास तुम्ही पसंत करीत नाही. त्यांनी आपल्या शीलाचं रक्षण करावं. जर त्यांनी तसं केलं नाही तर तुम्ही त्यांना शिक्षा करू शकता; पण सौम्य प्रकारची. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करा.
    पाहा ! माझ्यानंतर तुम्ही परत भरकटू नका. आपसांत रक्त सांडू नका. कुरैशच्या लोकांनो! तुमच्या मनांवर या जगाचं ओझं घेऊन तुम्ही अल्लाहसमक्ष उभं राहावं आणि दुसर्‍यांनी सत्कर्म घेऊन यावं असं होऊ नये. तसं झालं तर मी तुमच्या काही कामी येणार नाही.
    कोणी विश्‍वास करून तुमच्याकडे अमानत ठेवली तर विश्‍वासघात करू नका. दिलेलं वचन पाळा, सारे मुस्लिम एकमेकांचे भाऊबंद आहेत. दुसर्‍यानं तुम्हाला काही राजीखुशीनं दिलं तर ते घ्या. त्याच्या मर्जीशिवाय त्याच्या मालाल हात  लावू नका. अन्याय करू नका.
    अल्लाहनं ज्याचे त्याला हक्क दिलेत. आता कोणी कुणाच्या बाबतीत मृत्यूपत्र करू नये.
    ज्याच्या बिछान्यावर बाळानं जन्म घेतला असेल ते बाळ त्याचंच. ज्यानं व्यभिचार केला त्यास दगडानं ठेचून मृत्यूदंड दिला जाईल. त्यांचा हिशेब अल्लाहपाशी होईल.
    कोणी आपलं कुळ बदलू नये. दुसर्‍यास आपला पिता मानू नये. कोणी असं केल्यास त्याचा अल्लाह धिक्कार करील.
    कर्ज घेतल्यास ते परत करा. कोणी भेटवस्तू दिल्यास तुम्हीही द्या.
    मी तुमच्या दरम्यान एक वस्तू सोडून जातोय. तिला घट्ट धरल्यास तुम्ही कधी मार्गभ्रष्ट होणार नाही. ती ’कुरआन’ आहे! धर्माच्या बाबतीत अतिरेक करू नका. तुमच्या पूर्वीच्या लोकांचा यामुळेच विनाश झाला.
    लोकहो ! ऐका. आकाश आणि पृथ्वीची निर्मिती झाली, त्याचवेळी आता काळ लोटून आलाय. अल्लाहनं ज्या वेळी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्या वेळी वर्षाचे बारा महिने ठरवले आहेत. यात चार महिने आदरणीय आहेत. हा (इस्लाम) धर्म कायमस्वरूपी आहे. लक्षात ठेवा. माझ्यानंतर नाकारणारे होऊ नका. एकमेकांच रक्त सांडू नका. सैतान आता निराश झालाय. प्रार्थना करणारे (नमाज अदा करणारे) त्याची पूजा करणार नाहीत; पण तो तुम्हाला एकमेकांविरूद्ध उभं करील.
    प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी परत विचारलं, ” हा कोणता महिना?” लोकांनी उत्तर दिलं, ” हा आदरणीय महिना.”
    प्रेषित म्हणाले, ”हा महानतम हजयात्रेचा दिवस आहे. तुमचं रक्त, तुमची मालमत्ता, तुमची अब्रू, हा दिवस, हा महिना आणि या शहरासमान पवित्र आहेत.”
    प्रेषितांनी त्या लोकांना विचारलं,” मी तुम्हाला अल्लाहचा संदेश पोचता केला?”
    सगळे लोक एका सुरात म्हणाले, ”होय, अल्लाहचे प्रेषित !
    त्यावर प्रेषित (स.) म्हणाले, अल्लाह! मी तुझा संदेश पोचता केला, माझं कार्य पूर्ण केलं. तू साक्षी आहेस. आणि मग म्हणाले, जे आज इथं हजर आहेत त्यांनी हा संदेश जे इथं हजर नाहीत त्यांना पोचवावा. जे इथं आहेत, कदाचित त्यांच्यापेक्षा जे इथं नाहीत ते हा संदेश चांगल्या रीतीनं ओळखतील आणि लक्षात ठेवतील.
    तुमचे जे गुलाम, सेवक आहेत त्यांच्याशी चांगलं वागा. तुम्ही खाता तेच त्यांना द्या. तुम्ही घालता तसेच कपडे त्यांना द्या. त्यांनी चूक केल्यास माफ करा. मी अल्लाहचा संदेश पोचवला. अल्लाह! तू साक्षी आहेत.
    ऐका! तुमच्यावर जर एखाद्या काळ्या ऍबिसीनियन (निग्रो) गुलामाला जरी प्रमुख नेमलं गेलं तर त्याचं पालन करा. जर तो अल्लाहच्या ग्रंथानुसार निर्णय घेत असेल तर !
    मानवानो! आपल्या विधात्याची उपासना करा. पाच वेळा नमाज अदा करा. महिनाभर रोजे ठेवा. आपल्या संपत्तीतून जकात अदा करा, खुश दिलानं. आपल्या अल्लाहच्या घराची हजयात्रा करा. आपल्या प्रमुखाचं पालन करा. तुम्ही स्वर्गात प्रवेश कराल. आणि पाहा! एकानं केलेल्या अपराधापायी दुसर्‍याला जबाबदार धरलं जाणार नाही. बापानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलाला की मुलानं केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा त्याच्या बापाला दिली जाणार नाही.
    लोकहो! माझ्याविषयी तुम्हाला विचारलं जाईल (अल्लाहपाशी) तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल?
    लोक म्हणाले, तुम्ही अल्लाहचा धर्म आम्हास पोचता केला याची आम्ही साक्ष देऊ. आपण प्रेषित्वाची जबाबदारी पार पाडली, आमचं भलं केलं.
    लोकांचं हे बोलणं ऐकून प्रेषितांनी आपलं बोट आकाशाकडे उंच केलं आणि तीन वेळा उच्चारलं, ”अल्लाह! तू साक्षी आहेस. अल्लाह ! तू साक्षी आहेस. अल्लाह ! तू साक्षी आहेस.” (संदर्भ ः प्रेषित मुहम्मद (स.) नवयुगाचे प्रणेते पेज नं. 407, लेखक सय्यद इफ्तेखार अहमद).

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget