Halloween Costume ideas 2015

शेतकर्‍यांची मुलं बनली चोर जबाबदार कोण?

अत्याधिक श्रीमंती आणि अत्याधिक गरीबी या दोन्ही अवस्थांमध्ये माणसं गुन्हेगारीकडे वळत असल्याचे इतिहासामध्ये अनेक दाखले आहेत. सततची नापिकी, अपुरा पाऊस, सरकारी अनास्था इत्यादी कारणांमुळे देशामधील विशेषतः महाराष्ट्रामधील शेतकरी अतिशय दयनीय अवस्थेत जगत आहेत. महाराष्ट्राच्या संसाधनांचे विशेषतः पाण्याच्या वितरणाचे विषम वाटप मागील सरकारांनी केल्यामुळे महाराष्ट्राचा पश्‍चिम भाग सुजलाम सुफलाम तर मराठवाडा आणि विदर्भ हा कायम दुष्काळग्रस्त असतो. या पापामध्ये सामील मागील व वर्तमान काळातील शासन आणि प्रशासनातील लोक, त्यांची असंवेदनशील वृत्ती आणि भ्रष्टाचार कारणीभूत आहेत. हजारो शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्यानंतरसुद्धा कुठल्याही पक्षाला या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहण्याची संवेदना झालेली नाही, हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव. केवळ वरवरचे उपाय करून, काही पॅकेज जाहीर करून, वीजबिल माफ करून शेतकर्‍यांचे हित केल्याचे समाधान शासनात बसलेले लोक करून घेतात. मात्र यामुळे बळीराजाची परिस्थिती काही बदलत नाही. आता तर त्यांची तरूण पीढि गुन्हेगारीकडे वळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे. खालील बातमी वाचून कुठल्याही सहृदय माणसाच्या हृदयामध्ये कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही.
    ”दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने गुन्हा केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या तिघांनी दिली दिली आहे. अमोल विक्रम मोरे (20), समाधान त्रिंबक दौंड (23, दोघे रा. गणेशनगर, येरवडा), संदीप राजेंद्र मोरे (28, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे तिघांना मोठी आर्थिक अडचण भासू लागली. त्यांना शेतात पाईपलाईन टाकायची होती. यासाठी तिघांनी मिळून पाईपने भरलेला टेम्पो चोरण्याचे ठरवले. संदीप मोरे सध्या शेलपिंपळगाव येथे शिक्रापूर रोडवर राहतो. त्याच्या घरासमोर अनेक वाहने थांबतात. 6 जून रोजी तिघांनी मिळून फिनोलेक्स पाईपने भरलेला टेम्पो हेरला. टेम्पोवर भास्कर श्रीपतराव लांडगे हे चालक होते. तिन्ही आरोपींनी रात्री पावणेबाराच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर टेम्पो अडवला. आम्ही फायनान्सचे लोक आहोत. तुमच्या गाडीचा हप्ता थकलेला आहे, असे सांगून दोघांनी भास्कर यांना त्यांच्या दुचाकीवर नेले. तर तिसर्‍या आरोपीने पाइपने भरलेला टेम्पो थेट उस्मानाबादला गावाकडे नेला. टेम्पो चालक भास्कर यांना इतर दोघांनी काही वेळानंतर दिघी येथे सोडून दिले. त्यांच्याकडून मोबाईल फोन देखील हिसकावून नेण्यात आला होता. याबाबत भास्कर यांनी चाकण पोलिस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    चाकण पोलिसांसह पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. वरिष्ठ निरीक्षक तांगडे यांना या गुन्ह्यातील संशयितांची माहिती खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानुसार येरवडा बीडी चाळ भागात सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पाइपने भरलेला टेम्पो त्यांच्या मूळ गावी येरमाळा व वाशी येथे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा व दळवेवाडी येथे जाऊन टाटा टेम्पो व त्यामधील नऊशे फिनोलेक्स पाईप असा एकूण 11 लाख 29 हजार 512 रुपयांचा ऐवज जप्त केला. चोरलेल्या पाईपपैकी काही पाईप आरोपी त्यांच्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी वापरणार होते. तर राहिलेले पाईप आणि टेम्पो विकणार असल्याचेही तपासात उघड झाले आहे.” (संदर्भ ः म.टा.ऑनलाईन 11 जून 2019).
    वास्तविक पाहता शेतकर्‍यांची ही मुलं अट्टल चोर असती तर त्यांनी टेम्पोसहीत त्यातील फिनोलेक्स पाईप चोरीचा माल घेणार्‍यांना विकला असता. त्यांनी तसे न करता त्यातील पाईप शेतामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न यशस्वी जरी झाला असता तरी त्यांनी अचानक पाईपलाईन केल्यामुळे त्यांची चोरी उघडी पडलीच असती. अशी ही दुर्दैवी परिस्थिती आहे. वास्तविक पाहता शेतकर्‍यांच्या या तिन्ही मुलांना पोलिसांनी सहानुभूती दाखवायला हवी. तसेच सरकारनी यांच्यावरचा खटला बिनशर्त मागे घेऊन आपण आणि आपल्या पूर्वाश्रमीच्या सरकारांनी केलेल्या गुन्ह्याचे प्रायश्‍चीत घ्यायला हवे.

- मीना नलवार
9822936603

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget