Halloween Costume ideas 2015

सहकार्याचे उच्च दर्शन घडविणारी ईद

कोणत्याही समाजातील प्रत्येक व्यक्तीचे जगणे एकमेकांना सहकार्य लाभत नसेल तर जगणे शक्यच होणार नाही. त्यासाठी प्रत्येक माणसाने समाजहितासाठी आपले योगदान देणे  गरजेचे आहे. जसे एका माणसाविषयी हे विचार लागू आहेत, तसेच कोणत्याही समाजासाठी धार्मिक समुदायासाठी देखील हे सूत्र लागू पडते, ज्या देशात, समाजात, शहरात वा  गल्लीमोहल्ल्यात जे जे लोक एकमेकांच्या सहवासात राहातात त्यांनी एकमेकांच्या अडीअडचणी, समस्या सोडविणे, गरजा पूर्ण करणे अनिवार्य ठरते आणि असे करताना जात, धर्म, भाषा, भौगोलिक सीमा अशा कोणत्याही मानवी मर्यादांचे बंधन घालता येत नाही. रमजान मानवाच्या चारित्र्यात वाढ करणारे एक उत्तम प्रशिक्षण आहे. हा महिना मानवाच्या नैतिक  प्रशिक्षणाचा महिना आहे. आज सगळीकडे विविध रूपांमध्ये कुकर्मे मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. संपत्ती आणि लैंगिकतेच्या आकांक्षेची पूर्तता करण्याच्या उद्देशाने माणूस प्रत्येक  प्रकारचे वैध-अवैध कृत्य करण्यास विवश आहे. त्याच्या ऐहिक आकांक्षांच्या उद्देशाचा थांगपत्ताच नाही. व्यक्तीची चारित्र्यिक निर्मिती झाल्यास या नैतिक समस्यांचे कायमस्वरूपी  निराकरण होऊ शकते आणि या चरित्र निर्मितीचा संदेश घेऊन येत असतो रमजानचा महिना. या महिन्यात ईश्वराचा प्रत्येक भक्त ईश्वरी प्रेरणेने, स्वेच्छेने कोणत्याही प्रकारच्या  जबरदस्ती व लालसेविना आपला जास्तीतजास्त वेळ कुरआन पठण,  गरिबांना दानधर्म, सत्कर्म, सद्चिंतन इत्यादींचे आचरण करण्यात मग्न असतो आणि हाच चांगल्या सामाजिक  परिवर्तनाचा पाया आहे. पवित्र कुरआन हा धर्मग्रंथ सर्व मानवजातीकरिता मार्गदर्शक म्हणून अवतरला गेला आहे. यात दानधर्म, एकमेकांचे प्रत्येक बाबीत सहकार्य देण्यासंबंधी जे आदेश  आलेले आहेत त्यात धार्मिक वा इतर कोणतेच निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. जकात देणे हे योगदान प्रत्येक मुस्लिमावर, ज्याचे ठराविक वार्षिक उत्पन्न असेल, अनिवार्य केले गेले  आहे. जकातमधून प्राप्त होणारे धन कोणकोणत्या लोकांच्या हितासाठी खर्च करावे याची सविस्तर माहिती कुरआनमध्ये सांगितली गेली आहे. यात कुठेही असा उल्लेख नाही की जगातचे  धन फक्त मुस्लिम समाजातील लोकांसाठीच खर्च करावे. गरजवंत, प्रवासी, दरिद्री, गुलाम, कैदी कोणत्याही धर्माचे, संस्कृतीचे असोत, त्याच्या हितांसाठी मुस्लिमांनी खर्च करावे असे  कुरआनचे स्पष्ट आदेश आहेत. रमजानचे रोजे मुस्लिमांवर अनिवार्य ठरविताना त्यांच्यात हे ईशभय निर्माण करण्यासाठी, ज्यांचा संबंध समाजाच्या बांधिलकीशी आहे, अनिवार्य केले  गेले आहेत असे म्हटले आहे. जर रमजानचा उद्देश पूर्ण होत नसेल आणि त्याकडे हे लोक (मुस्लिम) दुर्लक्ष करीत असतील तर या महिन्याचा खराखुरा लाभ त्यांना मिळणार नाही.  स्वत:चे जीवन यशस्वी करायचे असेल तर समाजासाठी योगदान आणि लोककल्याणाची कामे करणे अनिवार्य आहे. हाच या रमजान महिन्याचा संदेश दरवर्षी मुस्लिमांना दिला जातो.  रमजानच्या संपूर्ण महिनाभर रोजे करणाऱ्या रोजेदारास अल्लाहकडून विशिष्ट प्रकारचा कृपावर्षावाचे बक्षीस मिळत असते. या आनंदास द्विगुणीत करण्यासाठी रमजानुल मुबारक  संपताच ईद साजरी करण्यात येते. तो आनंदाचा दिवस काही औरच असतो. ईदचा दिवस अत्यंत खुशीचा, प्रसन्नतेचा व उत्साहाचा आहे आणि ईदची नमाज ही खुशीची नमाज आहे.  इस्लाममध्ये आनंद आणि दु:खाची एक स्पष्ट धारण आहे. जसे- अल्लाह कोणत्या गोष्टींमुळे प्रसन्न होतो आणि कोणत्या गोष्टींमुळे अप्रसन्न याचे भान एक सच्चा मुसलमान आपल्या  प्रत्येक कामात ठेवत असतो. एखाद्याची गरज भागविण्यात अथवा गरजवंताची मदत करण्यात जो आनंद मिळतो तो माणसाला अंतर्गत सुख प्रदान करीत असतो. हा आनंद  ज्ञानेंद्रियांच्या अनुभूतीपेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली, स्थायी व फार काळ टिकणारा प्रदान करीत असतो. ईदचा आनंद इस्लामच्या याच सर्वव्यापी चिरप्रसन्नतेच्या निश्चितीचा  (अवधारणेचा) एक भाग आहे. जकात म्हणजे आपल्या संपत्तीतील अडीच टक्के हिस्सा दीन-दुबळ्यांना, वाटसरू, गरजवंत व नातेवाईकांना दान करणे होय. गोरगरिबांना आपल्या  बरोबरीने जी काही खरेदी करता येईल अशा भावनेने जो कोणी जकात अदा करतो त्या व्यक्तीची ईद खऱ्या अर्थाने परमोच्च आनंदाच्या दिशेने प्रवास करते आणि त्यास गंतव्य स्थान प्राप्त होते. ‘ईदुल-फित्र’मध्ये अल्लाहकडून आपल्या दासाला हेच सर्वकाही मिळत असते. त्यामुळेच ईदचा हर्षोल्हास इतर आनंदोत्सवांपेक्षा पूर्णत: वेगळा असतो. ईदच्या दिवशी आपणास  उत्तमता, स्वच्छता, सहिष्णूता आणि आपसातील सहकार्याचे उच्च दर्शन घडते आणि हाच ईदचा खरा अत्यानंद असतो. दुसऱ्यांकरितादेखील आनंदाचे साधन असतो तोच आनंद  अल्लाहला प्रिय असतो. ईद गरीब-श्रीमंत अशा सर्व थरांतील लोक एकत्रितपणे साजरी करतात. एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात आणि वंचितांना मदतीचा हात पुढे करतात. अशा रीतीने समाजातील प्रत्येकाच्या आनंदास नव्हे तर अत्यानंदास पारावार राहत नाही! अल्लाह आम्हा सर्वांना सत्कर्मांचा मार्ग अवलंबिण्याची शक्ती देवो.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget