(१२०) तो या लोकांना अभिवचन देतो आणि यांना आशा दाखवितो,१४९ परंतु शैतानाची सर्व अभिवचने फसवणुकीशिवाय दुसरे काहीच नाही.
(१२१) या लोकांचे ठिकाण नरक आहे ज्यातून सुटकेचा कोणताही मार्ग यांना सापडणार नाही.
(१२२) उरले ते लोक ज्यांनी श्रद्धा ठेवली व सत्कृत्ये केली तर त्यांना आम्ही अशा उद्यानात दाखल करू ज्यांच्या खालून कालवे वहात असतील आणि ते तेथे सदासर्वदा राहतील. हे अल्लाहचे सत्यवचन आहे, आणि अल्लाहपेक्षा आपल्या वचनात अन्य कोण सच्चा असू शकतो?
(१२३) कर्मफळ तर तुमच्या इच्छेवरही अवलंबून नाही व ग्रंथधारकांच्या इच्छेवरदेखील नाही, जो कोणी दुष्कर्म करील त्याचे तो फळ भोगील आणि अल्लाहविरूद्ध त्याला कोणी समर्थक व सहाय्यक लाभणार नाही
(१२४) आणि जो कोणी सत्कृत्य करील मग तो पुरुष असो अथवा स्त्री जर तो श्रद्धावंत असेल तर असेच लोक स्वर्गामध्ये दाखल होतील आणि त्यांचा हक्क यत्किंचितदेखील हिरावून घेतला जाणार नाही.
(१२५) त्या माणसापेक्षा अन्य कोणाची जीवनपद्धती उत्तम असू शकते ज्याने अल्लाहसमोर मान तुकविली आणि आपली वर्तणूक चांगली राखली आणि एकाग्र होऊन इब्राहीम (अ.) च्या पद्धतीचे अनुकरण केले, त्या इब्राहीम (अ.) च्या पद्धतीचे ज्याला अल्लाहने आपला मित्र बनविला होता.
(१२६) आकाशांत व पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाहचे आहे१५० आणि प्रत्येक वस्तू अल्लाहने व्यापिली आहे.१५१
(१२७) लोक तुमच्याकडे स्त्रियांसंबंधी आदेश (फतवा) विचारतात१५२ सांगा, अल्लाह तुम्हाला त्यांच्यासंबंधी आदेश देतो आणि त्याचबरोबर त्या आदेशांची आठवण करून देतो जे पूर्वीपासून तुम्हाला या ग्रंथात ऐकविले जात आहेत,१५३ अर्थात ते आदेश जे त्या अनाथ मुलींसंबंधी आहेत ज्यांचे हक्क तुम्ही अदा करत नाही१५४ आणि ज्यांच्याबरोबर विवाह करण्यापासून दूर राहता (अथवा लालसेपोटी तुम्ही स्वत: त्यांच्याशी विवाह करू इच्छिता),१५५ आणि ते आदेश जे त्या मुलांविषयी आहेत जे बिचारे काहीच बळ राखत नाहीत,१५६ अल्लाह तुम्हाला आदेश देतो की अनाथांसाठी न्यायावर दृढ राहा आणि जे काही चांगले तुम्ही कराल ते अल्लाहच्या माहितीपासून गुप्त राहणार नाही.
१४९) शैतानाचे सर्व व्यवहार हे आशा आणि वायद्यांवर चालत असते. शैतान मनुष्याला व्यक्तीश: किंवा सामूहिकरित्या एखाद्या चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ इच्छितो तेव्हा मनुष्यापुढे एक निराधार आशा ठेवतो. कोणाला वैयक्तिक आनंद आणि सफलतेची आशा देतो, कोणाला राष्ट्रीय उत्थानाची अभिलाषा तर कुणाला मानवजातीच्या कल्याणाचा विश्वास तर कोणाला सत्यापर्यंत पोहचण्याच्या दृढ विश्वासाचे गाजर दाखवितो. कोणाला हा शैतान पटवून देतो की अल्लाहचे अस्तित्व कोठे आहे किंवा परलोक कोठे आहे? तुम्हाला तर मरून मातीच व्हायचे आहे. शैतान लोकांच्या मनात विश्वास सदृढ करतो की परलोक असला तरी त्याच्या पकडीतून अमुक बाबाच्या कृपादृष्टीने किंवा अमुक अमुकामुळे सुटका होईल. तात्पर्य जो कोणी ज्या आशेवर आणि खोट्या वचनांवर धोका खातो, त्याच्यासमोर तेच ठेवतो आणि गळाला अटकवतो.
१५०) म्हणजे अल्लाहपुढे स्वत:ला समर्पित करणे आणि उदंडता आणि मनमानीपासून स्वत:ला रोखून धरणे. हाच सर्वांपेक्षा जास्त चांगला मार्ग आहे आणि वास्तविकतेच्या अगदी अनुकूल आहे. अल्लाह जमीन व आकाशांचा व त्यांच्यातील सर्व वस्तूंचा मालक आहे. म्हणून मनुष्यासाठी सत्यवर्तन तर हे आहे की त्याच्या (अल्लाहच्या) उपासनेसाठी आणि आज्ञाधारकेसाठी तत्पर व्हावे आणि उदंडता सोडावी.
१५१) म्हणजे मनुष्य अल्लाहपुढे स्वत:ला समर्पित करत नाही तसेच स्वच्छंदता आणि उदंडतेपासून दूर राहात नाही तर असा मनुष्य अल्लाहच्या पकडीतून कधीही सुटू शकत नाही. अल्लाहचे सामथ्र्य त्याला चोहोकडून घेरून आहे.
१५२) येथे हे स्पष्ट केले गेले नाही की स्त्रियांविषयी लोक कोणता धर्मादेश (फतवा) विचारत होते. परंतु आयत १२८ ते १३० मध्ये जो धर्मादेश दिला आहे, त्यावरून प्रश्नाचे स्वरुप त्वरित कळून येते.
१५३) विचारले गेलेल्या मूळ प्रश्नाचे हे उत्तर नाही तर लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यापूर्वी अल्लाहने त्या आदेशांच्या पालनासाठी पुन्हा जोर दिला आहे जे याच अध्यायाच्या प्रारंभी अनाथ मुलींच्या बाबतीत मुख्यत: आणि अनाथ मुलांविषयी सामान्यत: देण्यात आले आहेत. यावरून स्पष्ट होते की अल्लाहच्या दृष्टीत अनाथांच्या हक्कांना फार महत्त्व आहे.
१५४) संकेत त्या आयतकडे आहे ज्यात म्हटले गेले आहे, ``जर अनाथांशी अन्याय होण्यापासून भीत आहात, तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील..........'' (कुरआन ४ :३)
१५५) `तर्ग़बुन अन् तन् किह हुन -न' चा हासुद्धा अर्थ होतो, ``तुम्ही त्यांच्याशी विवाह करण्यात रूची ठेवता'' आणि असासुद्धा अर्थ होतो, ``तुम्ही त्यांच्याशी विवाह करण्यास इच्छुक नाहीत.'' माननीय आएशा (रजि.) याविषयी तपशील देतात, ``ज्यांच्या जबाबदारीमध्ये अशा अनाथ मुलीचे संगोपण होते आणि ज्यांच्याकडे आईवडिलांनी सोडलेली संपत्ती ठेवलेली असे, ते या मुलींवर अनेक प्रकारचे अत्याचार करीत असत. जर मुलगी श्रीमंत आणि सुंदर असेल तर ते स्वत: तिच्याशी विवाहबद्ध होण्यास इच्छुक असत. महेर आणि उदरनिर्वाह भत्ता न देता तिच्या संपत्तीपासून व सौंदर्याचा गैर प्रकारे फायदा उठवित. ती मुलगी जर कुरूप असेल तर स्वत:सुद्धा लग्न करीत नसत आणि दुसऱ्यालासुद्धा तिच्याशी लग्न करू देत नसत जेणेकरून त्या मुलीच्या हक्कांची (संपत्तीची) मागणी दुसऱ्याने कधीही करू नये.
१५६) त्या आदेशांकडे संकेत आहे जे याच सूरहच्या १ ते १० आयतीमध्ये अनाथांच्या हक्कांविषयी दिले आहेत.
Post a Comment