Halloween Costume ideas 2015

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने...


भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ सबंध देशाचे नागरिक या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणून साजरा करत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने देदीप्यमान प्रगती केली, हे तथ्य कुणी नाकारू शकत नाही. ज्या लोकांनी स्वातंत्र्यापूर्वीचा काळ पाहिला, अनुभवला, ज्या कष्टांना सामोरे गेले, यातना सोसल्या त्यांना स्वातंत्र्याचे खरे मोल कळत आहे. ज्या लोकांनी स्वातंत्र भारतात आणि तेही स्वातंत्र्यानंतरच्या ३-४ दशकांनंतर जन्म घेतला त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळणार नाही. असेच लोक आपल्या इच्छा-आकांक्षांची, ऐश-इशरतची पूर्तता झाली नाही, अनेकानेक तक्रारी शासनापुढे मांडत असतात, पण ज्यांना जीवनावश्यक साधनांची कमतरता होती, कोणती सोय नव्हती, लहानसहान अपेक्षा ज्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळात पूर्ण झाल्या नाहीत अशा लोकांनी आपल्याला स्वातंत्र्याने काय दिले अशा वल्गना करू नये.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साहजिकच ज्या काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली, यातना सहन केल्या, इंग्रजांच्या अत्याचारांना बळी पडले, तुरुंगवास भोगला, त्याचेच सरकार स्वातंत्र्यानंतर स्थापित झाले आणि जवळपास ७० वर्षे देशावर राज्य केले. अधूनमधून इतर पक्षांच्या आघाड्यांची सरकारेही आली, पण त्यांना देश चालविण्याचा, सत्ता कशी राबवावी याचा अनुभव नव्हता, म्हणून त्यांनी जास्त काही कामगिरी केली नाही. सध्या भाजपच्या नेतृत्वात देशाचा कारभार चालत आहे. तसे पाहता या पक्षातील नेते स्वातंत्र्य संग्रामात याकरिता सहभागी झाले नसावेत की त्यांनी एक तर १९४७ अगोदर ४-५ वर्षे जन्म घेतला असावा आणि बहुतांश असे लोक आहेत जे १९४७ नंतर जन्माला आलेत. म्हणून त्यांना स्वातंत्र्य तेवढे महत्त्वाचे नसेल. जसे त्यांच्या अगोदरच्या पिढ्यांना होते किंवा आहे. काँग्रेस पक्षाची एक विचारधारा होती. सध्या जे लोक सत्ताधारी आहेत त्यांच्या पक्षाची स्वतःची विचारधारा आहे आणि साहजिकच काँग्रेसच्या सत्तेत आणि सध्याच्या सत्तेत काही बदल असतील ते बदल नागरिकांना पटतात की नाही हा वेगळा प्रश्न आहे. पण काँग्रेसच्या विचारांचे सरकार भाजपनेही चालवावे असे म्हणणे नव्हे असा विचार करणे आणि आग्रह धरणे चुकीचे आहे.

स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? हा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा आहे. खरे पाहता स्वातंत्र्य हा जगातील प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. पण हा अधिकार माणसाकडून हिरावून घेण्याचे प्रयत्न पूर्वापार प्रत्येक जातीसमूहाकडून, संस्कृती-सभ्यतेकडून, राष्ट्राकडून, राजकीय आर्थिक विचारधारा विकसित करणाऱ्यांकडून होत असतात. जसा मानवजातीचा या भूतलावर जुना तसाच इतिहास मानवांना, राष्ट्रांना, संस्कृती-सभ्यतांना गुलाम बनवून त्यांच्यावर राज्य गाजवण्याचाही इतिहास तेवढाच जुना आहे. आणि स्वातंत्र्य व गुलामी यातील हा लढा जसा निरंतर चालत आलेला आहे, तसाच तो निरंतर चालू राहणार आहे. दुष्टवृत्ती आणि नेकवृत्तीचा हा चक्र सदैव चालत राहतो, यालाच काळाचे चक्र म्हणतात. या चक्रापासून कोणत्याही मानवाची, समूहाची, राष्ट्राची, संस्कृतीची सुटका होणार नाही. हे तथ्य समजून घेतले तरच आपल्याला स्वातंत्र्याची खरी किंमत काय ते समजू शकेल.

इस्लामचे दुसरे खलीफा ह. उमर (र.) यांनी एका प्रकरणात एका माणसाने दुसऱ्या माणसाला गुलामन बनवले होते. त्यामध्ये त्या माणसाला म्हणाले होते की, "या माणसाच्या आईनं तर याला स्वतंत्र जन्म दिला होता, तू याला गुलाम करणारा कोण?" तसेच एक फ्रेंच विचारवंत रुसो याने म्हटले आहे की "माणूस स्वतंत्र जन्माला येत असला तरी जागोजागी त्याला साखळदंडात जखडले जात आहे." ह. उमर (र.) यांच्या त्या वक्तव्यानंतर जवळपास हजार वर्षांनी ह्यूम राईट्स डिक्लेरेशनची घोषणा झाली. सांगायचे तात्पर्य असे की माणूस स्वतंत्रपणे जन्म घेतो, म्हणून स्वातंत्र्य त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. यालाच दुसऱ्या शब्दांत वैयक्तिक स्वातंत्र्य असे म्हटले जाते. म्हणजे आपल्या मर्जीतील आचारविचार करण्याचे, अभिव्यक्त होण्याचे, कुणाची जोरजबरदस्ती नसणे, त्याने स्वातंत्र्य अनुभवावेच नव्हे तर त्याचा उपभोग घ्यावा. गुलामीपासून स्वतंत्र राहणे हा त्याचा हक्क नव्हे अधिकारदेखील आहे. समाजाच्या सक्तीची बंधन त्यावर नको आहेत. तो स्वतः कोण आहे याची जाणीव त्याला असावी हा त्याचा अधिकार आहे. त्या जाणीवेनुसारच त्याने समाजाशी इतर नागरिकांशी व्यवहार करावा. त्याने आपल्या खासगी जीवनात स्वतःचा नियम करून त्यानुसार जगण्याचा त्याला अधिकार आहे. अशा प्रकारचे स्वातंत्र्य माणसांना प्रोत्साहित करण्यास मदत करतात. तो आपल्या आत्म्यानुसार प्रत्येक क्षण जगण्याची इच्छा बाळगतो. माणूस एकटा जन्मला असला तरी तो एकटा राहू शकत नाही. तो सामाजिक प्राणी आहे. त्याला आपल्या स्वातंत्र्यासह जगण्यासाठी आपल्या जन्मदात्याच्या कुटुंबाची आवश्यकता असते. त्याबरोबर त्याच्या अवतीभवती इतर माणसं असतात, ते सर्व मिळून एक समाज आकाराला येतो. म्हणजे माणसाला समाजाचीही गरज असते. तो एकटा राहून स्वतंत्रपणे जगू शकत नाही. याचा पुढचा टप्पा म्हणजे त्या समाजाला नियमन करण्यासाठी एका व्यवस्थेची गरज पडते. आणि जो माणूस स्वतंत्र जन्माला आला होता तो आता स्वेच्छेने एका व्यवस्थेखाली जीवन जगतो. व्यवस्था केवळ एका माणसासाठी राबत नसते. ती साऱ्या माणसांसाठी असते. म्हणून व्यवस्थेला काही कायदे-नियम करावे लागतात आणि त्या कायद्यांचे-नियमांचे पालन त्या व्यवस्थेतील सर्व माणसांना करावे लागते. म्हणजे जो माणूस स्वतंत्र जन्माला आला होता, त्यानेच व्यवस्थेची बंधने स्वीकारायची असतात. आणि ही बंधने त्याच्याच स्वातंत्र्याचे रक्षण करतात. म्हणून तो त्याच्या कायद्यांचे-नियमांचे पालन करत असतो. आणि त्याद्वारे निर्माण झालेल्या विचारधारेचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अटी-नियम सर्वांवर लागू असतात.

या चिंतनाचा अर्थ असा निघतो की या जगात परिपूर्ण व निर्विवाद असे काही नसते. हा शब्द फक्त शब्दकोशातच असतो. प्रत्यक्ष या जगाशी त्याचा कोणता संबंध नाही. 'संपूर्ण' इस्लाम धर्मानुसार परलोकात मिळणार आहे. पण माणसाची 'संपूर्ण' प्राप्तीची आकांक्षा त्याला समाधानी बनवत नाही. 'संपूर्ण' मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील असतो आणि इथूनच मग समाजात, देशात, राष्ट्रात कलहाची निर्मिती होते. माणसाने जे काही आपल्या प्रयत्नांनुसार कमवले आहे त्यावर समाधानी न होता इतरांच्या हक्काधिकारांवर ताबा मिळवतो. इतरांच्या सोयीसुविधा, आचारविचार, मालमत्ता यावर ताबा मिळवण्यासाठी तो समाजासमाजांत, माणसामाणसांत तेढ निर्माण करून स्वतःचे अधिकार वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या प्रयत्नांची परिणती लोकांना गुलाम बनवण्यापर्यंत मजल घेते आणि इथपासूनच नागरिकांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहण्याची प्रक्रिया सुरू होते. जगात काही मोजक्या लोकांकडे जी अवाढव्य संपत्ती गोळा झाली यामागे लोकांची हीच मानसिकता लोकांना आर्थिक गुलामीत जखडते आणि नंतर त्यांनी त्यांच्याविरुद्ध आवाज उठवू नये म्हणून राजकीय गुलामी त्यांच्यावर लादली जाते. याचाच अर्थ असा की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याचे जतन जास्त महत्त्वाचे आहे. आपण जर मिळवलेल्या स्वातंत्र्याचे जतन केले नाही तर जगात माणसांना गुलाम बनवण्यास जे इच्छुक आहेत त्यांना मैदान मोकळे होते. म्हणून स्वातंत्र्य आणि त्याचे जतन ही प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक तशीच सामूहिक जबाबदारी आहे. जे लोक माणसांवर गुलामी लादण्याचे प्रयत्न करत असतात, लोकच नव्हे तर समाज, समूह, विशेष विचारधारा बाळगणारे, विशेष संस्कृती इतरांवर लादण्याची मानसिकता अशी असते की ते इतरांपेक्षा जास्त मौल्यवान, प्रतिष्ठित आहेत म्हणून त्यांना हा अधिकार प्राप्त होतो.

सरतेशेवटी सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की स्वातंत्र्यासाठी कोणत्याही देशाच्या नागरिकांना स्वतः वैयक्तिक संघर्ष करावा लागतो. स्वातंत्र्य चळवळ एकट्या माणसाने किंवा काही मोजक्या लोकांनी चालविलेली नसते. जोपर्यंत देशाच्या सर्वच्या सर्व नागरिकांचा स्वातंत्र्य चळवळीत वैयक्तिक सहभाग नसेल तोपर्यंत पारतंत्र्याच्या गुलामीतून कोणताही देश वा राष्ट्र स्वतंत्र होऊ शकत नाही. ज्याने स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला असेल त्यालाच स्वातंत्र्याची खरी किंमत काय ते कळते. जे लोक स्वातंत्र्य चळवळीपासून अलिप्त राहतात ते गुलामीत जगण्यावर समाधानी असतील असे वाटते. आणि म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीचे लक्ष्य पूर्ण झाल्यावर दुसरा टप्पा त्याची रक्षा करणे आहे. या मार्गात अडथळे येतील, यातना सहन कराव्या लागतील, ते सर्व आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी सहन करतो याची जाणीव जर झाली तर मग कोणतेही संकट संकट नसते.

या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 

मो.- ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget