Halloween Costume ideas 2015

सूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)


(३९) तुम्ही उठणार नाही तर अल्लाह तुम्हाला दु:खदायक शिक्षा देईल,४० आणि तुमच्या जागी दुसऱ्या एखाद्या समूहाला उभे करील४१ आणि तुम्ही अल्लाहचे काहीही वाईट करू शकणार नाही, तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. 

(४०) जर तुम्ही पैगंबराला मदत केली नाही तर काही पर्वा नाही. अल्लाहने त्याला त्याप्रसंगी मदत केली आहे जेव्हा काफिरांनी (अधर्मियांनी) त्याला काढून टाकले होते. जेव्हा तो फक्त दोनपैकी - दुसरा होता, जेव्हा ते दोघे गुहेत होते, तेव्हा तो आपल्या साथीदाराला सांगत होता, ‘‘दु:खी होऊ नकोस. अल्लाह आमच्यासमवेत आहे.’’४२ त्या वेळी अल्लाहने आपल्याकडून त्याच्यावर मन:शांती उतरविली आणि त्याला अशा लष्कराद्वारे मदत केली जे तुम्हाला दिसत नव्हते व काफिरांचे (शत्रू) वचन खाली पाडले व अल्लाहचे वचन तर उच्चच आहे, अल्लाह जबरदस्त आणि द्रष्टा व बुद्धिमान आहे. 

(४१) निघा, मग तुम्ही हलके असा अगर बोजड४३ व संघर्ष करा अल्लाहच्या मार्गात आपल्या जीवित व वित्तानिशी, हे तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही जाणत असाल. 

(४२) हे पैगंबर (स.)! जर फायदा सहज साध्य असता व प्रवास सोपा असता तर ते जरूर तुमच्यामागे चालण्यास तयार झाले असते, परंतु त्यांच्यासाठी हा मार्ग तर अत्यंत बिकट झालेला आहे.४४ आता ते अल्लाहची शपथ घेऊन घेऊन सांगतील की जर आम्ही निघू शकलो असतो तर खचितच तुमच्याबरोबर निघालो असतो, ते स्वत:ला विनाशांत झोकत आहेत. अल्लाह चांगलेच जाणतो की ते लबाड आहेत. 

(४३) हे पैगंबर (स.)! अल्लाह तुम्हाला क्षमा करो. तुम्ही त्यांना परवानगी का दिली? (तुम्ही खुद्द त्यांना परवानगी द्यावयास नको होती) जेणेकरून कोण खरे आहेत हे तुम्हावर उघड झाले असते व खोट्यांनादेखील तुम्ही ओळखले असते.४५ 

(४४) जे लोक अल्लाह व अंतिम दिनावर श्रद्धा ठेवतात ते तर कदापि तुमच्याकडे अशी विनंती करणार नाहीत की त्यांना आपल्या जीवित व वित्तानिशी जिहाद करण्यापासून माफ केले जावे. अल्लाह ईशपरायण लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो. 

(४५) अशी विनवणी तर तेच लोक करतात जे अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रद्धा ठेवत नाहीत, त्यांच्या हृदयांत शंका आहे आणि ते आपल्या शंकेतच द्विधाग्रस्त झाले आहेत.४६ 

(४६) जर खरोखरच त्यांचा निघण्याचा इरादा असता तर त्यासाठी त्यांनी काहीतरी तयारी केली असती, परंतु अल्लाहला त्यांचे उत्थान पसंतच नव्हते,४७ म्हणून त्याने त्यांना आळशी करून टाकले आणि सांगितले गेले की, बसून राहा बसणाऱ्यांच्या बरोबर. 

(४७) जर ते तुमच्याबरोबर निघाले असते तर तुमच्यात वाईटपणा वाढविण्यापलीकडे त्यांनी काहीही केले नसते. त्यांनी तुमच्या दरम्यान उपद्रव माजविण्यासाठी धावपळ केली असती आणि तुमच्या जमातीची स्थिती तर अशी आहे की त्यात अद्याप पुष्कळसे असे लोक उपस्थित आहेत जे त्यांच्या गोष्टी कान लावून ऐकतात, अल्लाह या अत्याचाऱ्यांना चांगलेच जाणतो. 

(४८) यापूर्वीसुद्धा या लोकांनी उपद्रव पसरविण्याचे प्रयत्न केले आहेत आणि तुम्हाला अपयशी बनविण्यासाठी सर्व प्रकारच्या क्ऌप्त्यांची उलाढाल केली आहे, येथपावेतो की त्यांच्या इच्छेविरूद्ध सत्य प्रकट झाले व अल्लाहचे कार्य सिद्धीस गेल्याशिवाय राहिले नाही. 

(४९) त्यांच्यापैकी कोणी असा आहे जो म्हणतो,‘‘मला परवानगी द्या व मला संकटात टावूâ नका.’’४८ ऐकून घ्या! उपद्रवातच तर हे लोक गुरफटले आहेत४९ आणि नरकाने या अधर्मियांना वेढून ठेवले आहे.५०




४०) यानेच हा नियम बनला आहे की जोपर्यंत आम घोषणा (युद्धासंबंधी सेवेसाठी बोलावणे) होत नाही किंवा जोपर्यंत मुस्लिमांच्या एखाद्या वस्तीला किंवा मुस्लिमांच्या गटाला जिहादसाठी आदेश दिला जात नाही तोपर्यंत जिहाद ``फर्ज किफाया'' राहातो. म्हणजे काही लोक त्याला अदा करीत राहिले तर इतर लोकांवरील त्याची अनिवार्यता समाप्त् होते. परंतु जेव्हा मुस्लिमांच्या प्रमुखाकडून मुस्लिमांना जिहादचा आम आदेश दिला गेला किंवा एखाद्या विशेष क्षेत्रातील मुस्लिमांसाठी जिहादचा आदेश दिला तर ज्यांना ज्यांना आदेश दिला त्यांच्यावर जिहाद ``फर्जे ऐन'' (म्हणजे प्रत्येकासाठी अनिवार्य) होते. एखादा व्यक्ती काही अपरिहार्य कारणाशिवाय जिहादसाठी जाऊ शकत नसेल तर त्याच्या ईमानलासुद्धा मान्य केले जात नाही. 

४१) म्हणजे अल्लाहचे काम काही तुमच्यावर आधारित नाही की तुम्ही कराल तर होईल अन्यथा होणार नाही. खरे तर ही अल्लाहची मेहरबानी आणि कृपा आहे की तो तुम्हाला त्याच्या दीन (धर्म) च्या सेवेची सुवर्णसंधी प्राप्त् करून देत आहे. तुम्ही तुमच्या बेअकलीने या संधीला वाया घालवाल तर अल्लाह दुसऱ्या लोकसमुदायांना हे सौभाग्य प्रदान करील आणि तुम्ही निष्फळ बनून राहाल.

४२) हा त्या काळाचा उल्लेख आहे जेव्हा मक्का येथील इस्लामशत्रूंनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हत्येचा निश्चय केला होता. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ठीक त्या रात्रीला जेव्हा त्यांची हत्या करण्याचे निश्चित केले होते, मक्केहून मदीनेला हिजरत केली. मुस्लिमांची मोठी संख्या दोन-दोन, चार-चार करून यापूर्वीच मदीना येथे पोहचली होती. मक्कामध्ये केवळ तेच मुस्लिम राहिले होते जे अगदी विवश होते किंवा जे दांभिक होते व जे भरवशाच्या लायक नव्हते. या स्थितीत जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांना माहीत झाले की त्यांच्या हत्येचा निर्णय झाला आहे तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केवळ आपले एक साथी माननीय अबू बकर (रजि.) यांना बरोबर घेतले. दोघे मक्केहून निघाले तेव्हा त्यांनी विचार केला की आपला पाठलाग अवश्य होईल. म्हणून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मदीनेकडील (उत्तर दिशा) मार्ग सोडून दक्षिण मार्ग स्वीकारला. तेथे तीन दिवस `सौर' नावाच्या गुफेत लपून राहिले. रक्ताचे तहानलेले शत्रू पैगंबर मुहम्मद (स.) यांना चहुबाजूने शोधत फिरत होते. मक्काजवळील पर्वतराईतील कोपरानकोपरा त्यांनी पिंजून काढला. काहीजण पैगंबर मुहम्मद (स.) यांना शोधत शोधत सौर गुफेजवळ तिच्या तोंडाशी येऊन थडकले. त्या वेळी माननीय अबू बकर (रजि.) फार घाबरले होते. त्यांना वाटले की या लोकांपैकी एखाद्याने जरी गुफेत डोकावले तर तो आम्हास पाहील. यावेळी पैगंबर मुहम्मद (स.) अजिबात घाबरले नाहीत. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अबू बकर (रजि.) यांचे सांत्वन करतांना सांगितले, ``दु:खी होऊ नका, अल्लाह आमच्याबरोबर आहे.''

४३) ``हलके आणि बोजड'' हे शब्द व्यापक अर्थ ठेवून आहेत. म्हणजे जेव्हा घराबाहेर निघण्याचा आदेश आला तर तुम्हाला कोणत्याही स्थितीत निघणे आवश्यक आहे. मग इच्छा असो अथवा नसो  किंवा  खुशहाली  असोत  की  तंगीत  असोत, मुबलक  सामान  असो  वा  नसो किंवा अनुकूल परिस्थिती असो की प्रतिकूल परिस्थिती असो, की तरुण किंवा म्हातारे असोत, अशक्त असोत की सशक्त असोत.

४४) म्हणजे हे पाहून की सामना रोमन महाशक्तीशी आहे व मोसम तळपत्या उन्हाळयाचा आहे, तसेच देशात दुष्काळ पडलेला आहे. यामुळे त्यांना तबुकची यात्रा मोठे ओझे वाटू लागली. तसेच उभे पीकसुद्धा कापणीवर आले होते.

४५) काही दांभिकांनी बहाणेबाजी करून पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून सूट मागितली होती. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या मृदू स्वभावामुळे त्यांची बहाणेबाजी ओळखूनसुद्धा त्यांना सूट देऊन टाकली. यास अल्लाहने पसंत केले नाही. यावर अल्लाहने पैगंबर मुहम्मद (स.) यांना सचेत केले की अशी नरमाई उपयोगाची नाही. सूट दिल्यामुळे या दांभिकांना आपल्या कपटीपणावर पडदा टाकण्याची संधी मिळाली. त्यांना सूट दिली नसती आणि हे घरात बसून असते तर त्यांच्या ईमानचा दावा खोटा ठरला असता.

४६) याने माहीत झाले की कुफ्र (द्रोही) आणि इस्लामचा संघर्ष एक कसोटी आहे जी खरे ईमानधारक आणि खोटे ईमानधारक यांना स्पष्ट उघड करते. जो मनुष्य या संघर्षात मनापासून आणि जीवापाड इस्लामचे समर्थन करतो आणि आपली सर्व शक्ती आणि साधनांना इस्लामचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी खर्च करतो, तसेच तो कोणत्याही समर्पणासाठी सतत तयार राहातो, तोच खरा ईमानधारक आहे. या विपरीत जो मनुष्य या संघर्षात इस्लामला साथ देत नाही आणि कुफ्र (ईशद्रोह) चा धोका समोर दिसतानासुद्धा इस्लामच्या प्रभुत्वासाठी आपल्या जीववित्ताचे समर्पण करण्यास घाबरतो, अशा माणसाचा हा व्यवहार या तथ्याला स्पष्ट करतो की त्याच्या मनात ईमान नाही.

४७) म्हणजे अनिच्छेने उठणे अल्लाहला पसंत नव्हते, जेव्हा ते जिहादमध्ये सामील होण्यासाठी इच्छा आणि हेतूने तयार नव्हते आणि त्यांच्या मनात (दीनधर्म) इस्लामी जीवनपद्धतीला प्रतिष्ठा प्राप्त् करून देण्याची जिद्द नव्हती. अशा स्थितीत मुस्लिमांबरोबर अनिच्छेने किंवा अफवा पसरविण्यासाठी खोडकरपणे तत्पर राहात असत. ही गोष्ट हजारो वाईट गोष्टींना जन्म देते. पुढील आयतमध्ये याविषयी स्पष्टीकरण आले आहे.

४८) जे दांभिक बहाणेबाजी करून मागे राहण्याची सूट मागत होते त्यापैकी काहीजण इतके धीट होते की अल्लाहच्या मार्गात मागे राहाण्यासाठी धार्मिक आणि नैतिक पद्धतीने बहाणेबाजी करीत होते. त्यांच्यापैकी एक व्यक्ती जद्द बिन कैसविषयी कथन आहे. त्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जवळ येऊन सांगितले की मी एक सौंदर्यप्रिय मनुष्य आहे व माझ्या समाजातील लोक मला स्त्रीलंपट म्हणून ओळखून आहेत. स्त्रीच्या बाबतीत मला राहावत नाही. रोमन स्त्रियांना पाहून माझ्या हातून अपराध घडण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही मला परीक्षेत टाकू नका आणि या जिहादमध्ये सामील होण्यास मी विवश आहे असे समजावे. 

४९) म्हणजे उपद्रवापासून (फितना) वाचण्याचे नाव घेतात. परंतु वास्तवता कपटाचारी आणि खोटारडे आणि पाखंडीपणाच्या उपद्रवाने ते स्वत: प्रभावित आहेत. हे समजतात की लहान लहान उपद्रवाने अडथळे व भय प्रकट करून हे अल्लाहचे भय बाळगणारे सिद्ध करू लागले आहेत. परंतु कुफ्र (ईशद्रोह) आणि इस्लामच्या निर्णयात्मक संघर्षात इस्लामच्या सहाय्यतेत दूर राहून हेच लोक एका मोठ्या उपद्रवात सापडले आहेत की यापेक्षा जास्त मोठा उपद्रव दुसरा असूच शकत नाही.

५०) म्हणजे अल्लाहचे भय (तकवा) ईशपरायणतेच्या दिखाव्यामुळे ते जहन्नमपासून दूर गेलेले नाहीत तर कपटाचाराच्या या धिक्कारलेल्या वृत्तीने ते नरकाच्या पकडीत आले आहेत.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget