Halloween Costume ideas 2015

इज़राईलमधील अविश्वसनीय ताज्या घडामोडी


मागच्या महिन्यात 11 दिवस चाललेल्या पॅलेस्टाईन - इज़राईल विषम युद्धानंतर इजराईलमध्ये राष्ट्रीय सरकार स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान राहिलेले बेंजामिन नेतनयाहू यांनी दोन वर्षात चार वेळेस राष्ट्रीय निवडणुका होवूनही बहुमत न मिळाल्यामुळे हमखास यश मिळविणाऱ्या इज़राईली अति राष्ट्रवादाला गोंजारण्यासाठी दयनीय अवस्थेत जगणाऱ्या वेस्टबँक इलाख्यातील पॅलेस्टेनियनवर बळे-बळे युद्ध लादले. मात्र हे युद्ध मुस्लिम देशांच्या अपवादात्मक दिसणाऱ्या एकात्मतेमुळे 11 दिवसात संपवावे लागले. यात अमेरिकेचे अध्यक्ष जो-बायडन यांनी महत्वपूर्ण भूमीका स्वीकारली. निःसंशयपणे त्यांनी इज़राईलचे समर्थन केले. मात्र ते ट्रम्प सारखे आंधळे समर्थन नव्हते. त्यांच्या समर्थनार्थ तारतम्य होते आणि बंद दाराआड झालेल्या चर्चेअंती आता इज़राईलमध्ये एक राष्ट्रीय सरकार सत्तारूढ होवू पाहत आहे. ज्यात चक्क जेरूसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टेनियन मुस्लिम राजकारणीसुद्धा मंत्री पदावर विराजमान होऊ शकेल. 

या संदर्भात तपशील असा की, इजराईलमध्ये  20 टक्क्यांपेक्षा जास्त पॅलिस्टीनी मुस्लिम राहतात. त्यांचे प्रतिनिधीत्व करणारी युनायटेड अरब लिस्टच्या रा’म पक्षाचे प्रमुख डॉ. मन्सूर अब्बास हे आणि त्यांच्या पक्षाचे निर्वाचित सदस्य सरकारमध्ये सामील होऊ शकतील व डॉ. मन्सूर अब्बास हे इजराईल मंत्रिमंडळामध्ये चक्क मंत्री सुद्धा बनू शकतील. 120 सदस्य असलेल्या इजराईलच्या राष्ट्रीय संसदेमध्ये कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी 61 सदस्यांच्या समर्थनाची गरज असते. ते समर्थन हस्तगत न करू शकल्यामुळे आता राष्ट्रीय सरकारचा पर्याय पुढे आलेला आहे. या संदर्भात याच आठवड्यात एका सामंजस्य करारावर देशाच्या राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, मध्यम मार्गी आणि मुस्लिम नेत्यांच्या सह्या झाल्या. 

डॉ. मन्सूर अब्बास (46) व्यवसायाने दंतचिकित्सक असून, हिब्रू विश्व विद्यालयात त्यांचे शिक्षण झालेले आहे. सध्या सुद्धा ते हायफा विश्वविद्यालयातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर अध्ययन करत आहेत. ते इस्लामी आंदोलनाच्या दक्षीण विभागाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या रा’म पक्षांने संसदेमध्ये प्रवेश करण्यासाठी मत घेण्याची जी न्यूनतम सीमा आहे (3.25 टक्के मत) घेऊन त्यांनी इजराईली संसेदत प्रवेश केलेला आहे. त्यांच्या या राजकारणामुळे अनेक पॅलेस्टिनी मुस्लिम सुद्धा त्यांच्यावर सुरूवातीला नाराज होते आणि त्यांच्या राजकीय हालचालींना व्यर्थ समजत होते.  आता ह्या सरकारमध्ये त्यांचा प्रवेश हा त्यांचा चुकीचा निर्णय असल्याचे अनेकांचे मत आहे. कारण देशाचे होऊ घातलेले पंतप्रधान नेफ्टाली बेनेट हे नेतनयाहू पेक्षाही अधिक राष्ट्रवादी असून, पॅलेस्टिनियन लोकांंना एक सेंटीमीटर जमीनीवर सुद्धा राहण्याचा अधिकार नाही, असे त्यांचे मत आहे. जे त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून व्यक्त केलेले आहे. एकेकाळी इजराईली सेनेमध्ये कमांडो राहिलेले नेफ्टाली 49 वर्षाचे असून, इजराईलच्या प्रत्येक सरकारमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत. एकेकाळी त्यांना बेंजामिन नेतनयाहू यांच्या अतिशय जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जात असे. मात्र 2012 साली लिकुड पार्टी सोडल्यानंतर 2013 साली त्यांनी यहूदी होम पार्टी मध्ये प्रवेश केला आणि 2013 मध्ये ते निवडून संसदेत गेले. ते जहाल दक्षिणपंथी असून, वेस्टबँक, पूर्व येरूशलम आणि सीरियाई गोलान टेकड्या या सर्व ज्यू इतिहासाचा भाग असून, त्यावर आमचाच नैसर्गिक हक्क आहे, असे ते मानतात. हे तिन्ही भाग 1967 साली झालेल्या सहा दिवसाच्या युद्धामध्ये इजराईलने जॉर्डन आणि सीरियाच्या ताब्यातून हस्तगत केली होती. 

गाझा ज्या ठिकाणी पॅलेस्टेनियन लोकांची सरकार आणि वस्ती आहे त्याला ते बेकायदेशीर समजतात. शिवाय, पूर्व येरूशलम ज्याला की पॅलेस्टीनियन आपली राजधानी समजतात आणि जिथे पवित्र मस्जिदे अक्सा आहे, या भागात नेतनयाहू यांनी बळजबरीने 140 नवीन वस्त्याची निर्मिती करून त्यात 6 लाखपेक्षा जास्त ज्यू लोकांना निवासस्थान उपलब्ध करून देवून त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात लक्षणीय बदल घडवून आणला आणि या भागात शेकडो वर्षापासून राहणारे पॅलेस्टीनियन मुस्लिम हे अल्पसंख्यांक झाले. पॅलेस्टीनियन लोक या वस्त्या हटवून गाझा सहीत पूर्व येरूशलेम मध्ये स्वतंत्र देश स्थापन करू इच्छितात. पूर्व येरूशलममधील वस्त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कोणी मान्यता देत नाही. नेफ्टाली या भागात आणखीन वेगाने वस्त्या वसविण्याच्या इराद्याचे आहेत. ते एका भूभागात पॅलेस्टीनियन आणि ज्यू द्वि राष्ट्राचे कट्टर विरोधक आहेत. ते पुन्हा- पुन्हा म्हणतात, ’’ जोपर्यंत मी सत्तेत आहे तोपर्यंत एक सेंटीमिटर जमीन सुद्धा कोणत्याही स्वरूपात पॅलेस्टिनियनना मिळू देणार नाही. वेस्ट बँकेमध्ये जिथे पॅलेस्टिनियन मुस्लिमांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी सुद्धा वेगाने ज्यू वस्त्या वसवून तिथे लष्करी संरक्षण देऊन तो भाग इजराईलशी जोडण्याचा त्यांचा इरादा आहे. अशा या विचित्र परिस्थितीमध्ये डॉ. मन्सूर अब्बास हे इजराईली संसदेमध्येच नव्हे तर सरकारमध्ये सामील होणार आहे. त्यांच्या या सामील होण्यामुळे दोन शक्यता वर्तविल्या जाऊ शकतात. एक - जर जो बायडनची ही खेळी असेल तर नेफ्टाली यांना आपले मन्सूबे पूर्ण करण्यासाठी डॉ. मन्सूर अब्बास अडचण ठरू शकतील व नेफ्टाली यांना आपल्या अति राष्ट्रवादी मन्सूब्यांना आवर घालावा लागेल. दोन - जर या मागे स्थानिक राजकारणातील गरज असेल तर डॉ. मन्सूर अब्बास यांना मंत्रिपद देऊनही त्यांना महत्त्वहीन करून नेफ्टाली आपले मन्सूबे पुढे रेटू शकतात. 

काहीही झाले तरी इजराईलच्या राजकारणामध्ये या राजकीय समीकरणामुळे मोठे बदल होतील, एवढे मात्र खरे. 


- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget