Halloween Costume ideas 2015

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाची नाराजी


महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या शासकीय समित्यांचे नुकतेच गठण करण्यात आले आणि प्रा सदानंद मोरे यांची दुसऱ्यांदा  महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मंडळात सर्वसमावेशक मराठी भाषिकांच्या निवडी करणे अपेक्षित होते मात्र जाणून बुजून मुस्लिम समाजातील साहित्यिकांना डावलल्यावरून मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. समित्यांच्या निवडीवरून साहित्यिक क्षेत्रातून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. 

12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अंदाजे 2 कोटी मुस्लिम समाज आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, जैन, शीख, पारसी , बौद्धधर्मीय अल्पसंख्यांकही आहेत. दोन्ही संस्थाच्या कार्यकाळी मंडळात एकही मुस्लिम, ख्रिस्ती वा जैन धर्मीय सदस्य नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक कार्य मंत्रालया अंतर्गत या नियुक्त्या होतात. महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला फक्त हिंदूधर्मीय संस्कृती आणि साहित्य अभिप्रेत आहे काय? 

महाराष्ट्रातील मराठी भाषेवर फक्त एका धर्म विशेषाचीच मक्तेदारी आहे काय? इतर धर्मीयही साहित्यिक आहेत आणि तेही तितक्याच तन्मयतेने आणि अभिरुचीने मराठी साहित्य निर्मिती करीत आहेत. इतकेच नव्हे तर मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीद्वारे गेल्या 30 वर्षांपासून महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले जाते. विशेष म्हणजे या साहित्य संमेलनांना शासनामार्फत कोणताही निधी दिला जात नाही. मुस्लिम मराठी साहित्यिक पदरमोड करून ही साहित्य संमेलने भरवतात. 

      आज महाराष्ट्रात 1000 च्यावर मुस्लिम मराठी साहित्यिक मराठी साहित्यात मोलाची भर घालत आहेत. मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाने कथा, कविता, कादंबरी, आत्मकथन, गज़ल, बालसाहित्य, नाटक, वैचारिक लेखन अशा विविध ललित प्रकारात आपला ठसा उमटवला आहे. यात प्रामुख्याने खलील मोमीन, डॉ अब्दुल आझम, प्रा फकरुद्दीन बेन्नूर,  डॉ शेख इक्बाल मिन्ने, ए के शेख, फ म शहाजिंदे,डॉ जुल्फि शेख, डॉ अजीज नदाफ, बशीर मुजावर, रफीक सुरज, डॉ अक्रम पठाण, प्रा फातिमा मुजावर, डॉ अलीम वकील, मुबारक शेख, डी के शेख, जावेदपाशा कुरेशी, सरफराज शेख,असिफ अन्सारी, फर्जाना डांगे,साबीर सोलापुरी, इरफान शेख, शफी बोल्डेकर, हशम पटेल, रफीक काझी, कलीम अझीम, आय जी शेख, साहिल कबीर, मुहिब कादरी, हबीब भंडारी, शब्बीर मुलाणी , इक्बाल मुकादम, सय्यद मुजफ्फर या सारख्या साहित्यिकांचा सिंहाचा वाटा आहे.

असे असताना महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या शासकीय समित्यांचे गाठण होत असताना एकाही मुस्लिम साहित्यिकाची आठवण होऊ नये याचे नवल वाटते. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आहे आणि त्यांनाही याचा विसर पडावा ही शोकांतिका आहे. खरेतर ही मंडळे सर्वसमावेशक आणि भौगोलिकदृष्ट्याही समतोल राखणारी असावीत. 

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ याबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त करीत असून अशी मागणी करीत आहे की मुस्लिम मराठी साहित्यिकांपैकी किमान 4 साहित्यिकांचा समावेश या दोन्ही मंडळात करावा आणि समान संधी उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, जैन, आदिवासी साहित्यिकांचाही समावेश व्हावा अशी मागणी मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आणि विख्यात गजलकार डॉ इक्बाल मिन्ने, ए के शेख, प्रा लियाकत अली पटेल, शेख अन्वर जावेद, आसिफ अन्सारी, प्रा डॉ आरिफ शेख,मोहसीन खान, हबीब भंडारी, मोहसीन सय्यद, मोहसीन सय्यद, युनूस आलम सिद्दीकी, शब्बीर मुलाणी, फरजाना डांगे,आमिर इक्बाल, इंतेखाब फराश यांनी केली आहे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget