Halloween Costume ideas 2015
June 2019

ह. अब्बास (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘इमानाची (श्रद्धेची) गोडी चाखली त्या माणसाने, जो अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून,  इस्लामला आपला जीवनधर्म मानून आणि मुहम्मद (स.) यांना आपला प्रेषित स्विकारून आनंदित झाला.’’ (हदीस - बुखारी व मुस्लीम)

भावार्थ- सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या भक्ती-उपासनेत आणि आज्ञापालनात स्वत:ला सुपूर्द करून आणि इस्लामी शरियत (शास्त्र-नियम) चे पालन व अनुसरण करून, स्वत:ला प्रेषित ह.  मुहम्मद (स.) याच्या मार्गदर्शनाच्या हवाली करून पूर्णत: संतुष्ठ आहे, त्याचा फैसला आहे की मला अन्य कोणाची उपासना आणि आज्ञापालन करायचे नाही. कोणत्याही परिस्थितीत  इस्लाम जीवनधर्मावर चालायचे आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या खेरीज दुसऱ्या कोणत्याही मानसाच्या मार्गदर्शनाखाली जीवन व्यतीत करायचे नाही. ज्या माणसाची अशी व्यवस्था   होईल तेव्हा समजून घ्या की त्याने ईमानची गोडी चाखली. माननिय उमर (रजी.) यांचे निवेदन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘तुम्ही अल्लाहला, त्याच्या  फरिश्त्यांना, त्याने पाठविलेल्या ग्रंथांना, अल्लाहच्या प्रेषितांना आणि आखिरतला (मरणोत्तर जीवनाला) सत्य जाणा आणि सत्य माना आणि या गोष्टीस ही मान्य करा की, जगात जे  काही घडते, ते ईश्वरातर्फे घडत असते. मग ते चांगले असो की वाईट असो.’’ (हदीस - मुस्लिम)

भावार्थ- इमान (श्रद्धा) चा शाब्दिक अर्थ एखाद्यावर भरवसा करणे, मन:पुर्वक विश्वास राखणे आणि त्याचे म्हणणे खरे मानणे. ‘इमान’चा मूळ आत्मा हाच भरवसा व विश्वास आहे.   इमानचे वेगवेगळे संदर्भ व त्याचे स्पष्टीकरण -
१) ‘ईमानबिल्लाह’ अर्थातच अल्लाहवर ईमान राखणे म्हणजे त्याला सृष्टीनिर्माता, रचनाकार व समस्त सृष्टीचा व्यवस्था राखणारा मानणे. मन:पुर्वक हे मान्य केले जावे की या सर्व  बाबीमध्ये अल्लाहचा कोणीही सहभागी नाही. आणि हे मानले जावे की सर्व प्रकारच्या व्यंगदोष, उणीवापासून अल्लाह मुक्त आहे, पवित्र आहे. तो सद्गुणांचा स्वामी आणि चांगुलपणाचा  मूल स्रोत आहे.
२) ‘प्रेषितांवर’ इमान राखणे म्हणजे, समस्त प्रेषितांना सच्चे, खरे मानणे. समस्त प्रेषितांनी किंचितही उणे अधीक न करता, ईश्वराचे आदेश व मार्गदर्शन लोकापर्यंत पोहोचविले. प्रेषित  शृंखलेची अंतीम कडी प्रेषित मुहम्मद (स.) होत. आता प्रलयकाळापर्यंतील मानवांना मुक्ती केवळ प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मार्गाचे अनुसरण केल्यानेच लाभेल.
३) फरिश्त्यांवर इमान राखणे म्हणजे त्यांचे अस्तित्व मान्य करणे, ते अल्लाहची अवज्ञा करीत नाहीत. सदा सर्वदा अल्लाहच्या उपासनेत व आज्ञापालनात ते मग्न असतात.
४) ग्रंथावर इमान राखणे म्हणजे अल्लाहने प्रेषितांद्वारे वेळोवेळी जे मार्गदर्शक ग्रंथ अवतरिले, त्या सर्व ग्रंथांना सत्य मानावे. त्या ईशग्रंथात अंतीम मार्गदर्शक ग्रंथ ‘पवित्र कुरआन’ आहे.  पूर्वीच्या जनसमुहांनी आपल्या काळातील ईशग्रंथामध्ये फेरबदल करून, त्याचे मूळ स्वरूप बिघडविले. अंतीम ग्रंथ कुरआन कसल्याही व्यंग-दोषापासून मुक्त आहे. तो सर्व प्रकारच्या   बिघाडापासून सुरक्षित आहे. या कुरआनाखेरीज जगात असा कोणताही ग्रंथ नाही. ज्याद्वारे ईश्वराप्रत पोहोचले जाऊ शकते.
५) आखीरतवर इमान म्हणजे, अंतीम न्यायनिवाड्यासंबंधी मान्य करणे. त्या दिवशी मानवाच्या संपूर्ण जीवनाचा हिशेब घेतला जाईल. ज्याचे आचरण ईश्वराच्या नजरेत पसंत ठरेल तो  बक्षिसपात्र ठरेल (जन्नतवासी), ज्याची कर्मे नापसंत तो शिक्षापात्र (नरकवासी) ठरेल. ही शिक्षा अमर्याद असेल आणि बक्षिसही अमर्याद असेल.
६) भाग्यावर इमान राखणे म्हणजे, जगात जे काही होत आहे ते ईश्वराच्या आदेशाने होत आहे. अल्लाहच्या कृतज्ञशील दासांवर जी आपत्ती कोसळते, ज्या अडचणींना त्यांना तोंड   द्यावे लागते, ही सर्व परिस्थिती अल्लाहच्या हुकुमौने आणि आधीपासूनच निर्धारित केलेल्या विधीनियमानुसार येत असते.

(१२८) जर१५७ एखाद्या स्त्रीला आपल्या पतीकडून वाईट वागणूक अथवा उपेक्षेचे भय असेल तर यामध्ये काहीही हरकत नाही की पतीपत्नी (काही हक्काच्या कमी अधिक प्रमाणावर)   परस्पर तडजोड करतील. तडजोड अधिकचांगली आहे.१५८ मने संकुचितपणाकडे शीघ्रतेने वळतात१५९ परंतु जर तुम्ही उपकारी वृत्तीने आणि अल्लाहचे भय बाळगून वागाल तर खात्री  बाळगा की अल्लाह तुमच्या या कार्यपद्धतीपासून अनभिज्ञ राहणार नाही.१६०
(१२९) पत्नींच्या दरम्यान पुरेपूर न्याय राखणे तुम्हाला शक्य नाही. तुम्ही इच्छिले तरी त्याला तुम्ही समर्थ ठरू शकत नाही. (म्हणून अल्लाहच्या आदेशाचा हेतू साध्य करण्यासाठी हे  पुरेसे आहे की) एका पत्नीकडे इतके झुकू नका की दुसरी अधांतरी राहील.
१६१ जर तुम्ही आपली वागणूक नीटनेटकी ठेवलीत आणि अल्लाहचे भय बाळगत राहिला तर अल्लाह  क्षमाशील आणि कृपा करणारा आहे.१६२
(१३०) परंतु पती-पत्नींनी एकदुसऱ्यापासून फारकत घेतलीच तर अल्लाह आपल्या विशाल सामथ्र्याने प्रत्येकाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापासून मुक्त करील. अल्लाहचे औदार्य  अतिविशाल आहे व तो बुद्धिमान व द्रष्टा आहे.
(१३१) आकाशांत आणि पृथ्वीत जे काही आहे सर्व अल्लाहचेच आहे. तुमच्यापूर्वी ज्यांना आम्ही ग्रंथ दिला होता त्यांनादेखील हाच आदेश  दिला होता आणि आता  तुम्हालादेखील हाच  आदेश देत आहोत की अल्लाहचे भय बाळगून काम करीत राहा परंतु जर तुम्ही मानत नसाल तर मानू नका. आकाश आणि पृथ्वीतील सर्व वस्तूंचा मालक अल्लाहच आहे व तो  निरपेक्ष आहे, सर्व स्तुतीला पात्र.
(१३२) होय अल्लाहच मालक आहे त्या सर्व वस्तूंचा ज्या आकाशांत आणि पृथ्वीत आहेत आणि कार्यसिद्धीकरिता केवळ तोच पुरेसा आहे.
(१३३) जर अल्लाहने इच्छिले तर तो तुम्हाला बाजूस सारून तुमच्या जागी इतरांना आणील, आणि यावर त्याचे सर्वस्वी प्रभुत्व आहे.



१५७) येथून मूळ प्रश्नाचे उत्तर आरंभ होत आहे. या उत्तराला समजण्यासाठी आवश्यक आहे की पहिल्या प्रश्नाला चांगल्या प्रकारे जाणून घेतले पाहिजे. अज्ञानताकाळात एक व्यक्ती  अनेक पत्नीं करण्यास मोकळा होता आणि त्या पत्नींसाठी काहीही हक्क निश्चित नव्हते. या सूरहची (सूरेनिसा) प्रारंभिक आयती जेव्हा अवतरित झाल्या तेव्हा या स्वातंत्र्यावर (अनेक  पत्नी करणे) दोन प्रकारचे प्रतिबंध लावण्यात आले. एक म्हणजे पत्नीं संख्या जास्तीतजास्त चारपर्यंत सीमित करण्यात आली, दुसरा प्रतिबंध म्हणजे एकापेक्षा जास्त पत्नी केल्यास  न्याय (समानतेचा व्यवहार) ही अट घातली गेली. आता प्रश्न निर्माण झाला की एखाद्याची पत्नी वांझ आहे किंवा एखाद्या मोठ्या आजाराने पीडित आहे, तसेच लैंगिक संबंध ठेवण्यास  ती योग्य नाही, अशा स्थितीत पतीने दुसरी पत्नी केली तर काय त्याने दोघींशी एकसमान लगाव ठेवावा? एकसमान प्रेम ठेवावे? शरीरसंबंधातसुद्धा समानता ठेवावी? त्याने असे केले  नाही तर तो अत्याचार ठरेल? काय दुसरा विवाह करण्यासाठी त्याने पहिल्या पत्नीला सोडून द्यावे? तसेच पहिली पत्नी विलग होऊ इच्छित नाही. परंतु पतीने तिला तलाक देऊ नये  म्हणून आपले काही हक्क तिने सोडून द्यावेत. काय असे करणे न्यायाविरुद्ध तर होणार नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे या आयतींत देण्यात आली आहेत.
१५८) म्हणजे तलाक आणि विलग होण्यापासून चांगले आहे की या प्रकारे आपापसात तडजोड करून एक स्त्री त्याच पतीजवळ राहावी ज्याच्या समवेत तिने आयुष्याचा एक भाग व्यतीत केला आहे.
१५९) स्त्रीकडून संकुचितपणा म्हणजे ती आपल्या मनात आपल्या पतीविषयीच्या उदासीनतेच्या कारणांना स्वत: अनुभवते आणि तिला वाटते की एका आवडत्या पत्नीबरोबर जसा वागतो  तसे त्याने आपल्याशी वागावे. पुरुषाची संकुचित वृत्ती म्हणजे जी पत्नी मनातून उतरल्यानंतरसुद्धा त्याच्याच जवळ राहू इच्छिते, तिला जास्त प्रमाणात त्याने दाबून ठेवावे आणि  तिच्या हक्कांना असह्य होईल इतके कमी कमी करीत जावे.
१६०) येथे अल्लाहने पुन्हा पुरुषाच्या उदारतेला उत्प्रेरित केले आहे. जसा अल्लाहचा सामान्यत: हा शिरस्ता आहे. त्याने पुरुषाला प्रेरणा दिली आहे की पत्नीशी लगाव जरी नसला तरी  उपकाराची नीती स्वीकारली जावी आणि त्या अल्लाहच्या कोपाची भीती बाळगावी जो मनुष्याच्या उणिवांना जाणूनसुद्धा तिकडे दुर्लक्ष करतो. अन्यथा अशा माणसांकडून अल्लाहने आपले  लक्ष काढून घेतले तर माणूस जगात असहाय होईल.
१६१) म्हणजे मनुष्य एकूण परिस्थितीत आणि योग्यतेत दोन किंवा दोनपेक्षा जास्त पत्नींमध्ये समानेतचा व्यवहार करू शकत नाही. एक रूपवती आहे तर दुसरी कुरुप, एक युवती  आहे तर दुसरी प्रौढ, एक नेहमीचीच आजारी तर दुसरी स्वस्थ आहे. तसेच एक भांडकुदळ तर दुसरी मनमिळावू आणि हसमुख आहे. अशाप्रकारे इतर भेदसुद्धा संभव आहेत ज्यामुळे  एकीच्याकडे स्वाभाविकपणे पतीचे कमी लक्ष आणि दुसरीच्याकडे जास्त झुकाव दिसतो. अशा स्थितीत कायदा ही मागणी करू शकत नाही की प्रेम, लगाव, शारीरिक संबंधांविषयीचे  संपूर्ण व्यवहार दोघांत एकसमानच व्हावेत. कायद्याची मागणी आहे की तुम्ही एखाद्या पत्नीशी लगाव ठेवत नाही आणि तलाकसुद्धा देत नाही आणि आपल्या इच्छेने किंवा तिच्या   इच्छेने पत्नी म्हणून ठेवत असाल तर तिच्याशी कमीतकमी एका सीमेपर्यंत संबंध अवश्य ठेवावेत, जेणेकरून पतीशिवाय स्त्रीचे जीणे तिने जगू नये. अशा स्थितीत एकीपेक्षा दुसऱ्या  पत्नीकडे पतीचा झुकाव जास्त असणे स्वाभाविक आहे, परंतु याचा अतिरेक होऊ नये की दुसऱ्या पत्नीने पतीशिवाय स्त्रीसारखे जीवन जगावे. या आयत द्वारा काहींनी हा अर्थ काढला  आहे की कुरआन एकीकडे न्यायोचित पद्धतीने बहुपत्नी विवाहाची अनुमती देतो आणि दुसरीकडे मात्र न्यायाला असंभव दाखवून या अनुमतीला व्यावहारिकतेनुसार व्यर्थ ठरवितो. परंतु  असा अर्थ या आयतचा निघू शकत नाही. जर असे फक्त म्हटले गेले असते, ``तुम्ही पत्नींमध्ये न्याय करू शकत नाही'' तर वरीलप्रमाणे अर्थ काढणे योग्य होते. परंतु त्वरित पुढे  म्हटले गेले आहे, ``म्हणून एकाच पत्नीकडे आपला झुकाव ठेवू नका.'' या वाक्याने वरील अर्थ काढण्यास काहीही वाव ठेवलेला नाही जो खिस्तीजन (युरोपियन) त्यांचे अनुकरण करणारे या आयतने काढण्याचा प्रयत्न करतात.
१६२) म्हणजे जोवर शक्य आहे तुम्ही हेतुत: अत्याचार करू नका आणि न्यायनिष्ठेने आपले कार्य करा. स्वाभाविक अशक्यतेमुळे तुमच्याकडून थोड्याफार उणिवा न्यायांबाबत राहिल्या तर अल्लाह माफ करणारा आहे.

मराठवाडाच्या बीड जिल्ह्यातील बातमीनुसार एक व्हिडिओ वायरल झाला होता त्यात बोअरवेलच्या खोल ड्रिलिंगमुळे पाण्याऐवजी लाव्हा उसळण्यास सुरूवात झाली. तो कोणत्याही  प्रयत्नाने विझला नाही व पाहतापाहता संपूर्ण बोअरवेल मशीन वाहनासह जळून कोळसा झाली. जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी उत्तर दिले की ही आग हाय पावर केबल वायर तुटल्याने  लागली, कोणी म्हणाले हा व्हिडिओ कुण्या दुसऱ्या देशाचा आहे, तरी या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणे कठीण आहे, कारण पॉवर केबल तुटल्याने जर आग लागली तर ती बोअरवेलच्या  खोल खड्ड्यात कशी गेली? मुद्दा आगीचा तपास करणे नाही, कारण अशी उदाहरणे मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये आधीपासून घडत आहेत. १० दिवसांपूर्वीच नांदेडच्या काकांडी गावात  बोअरवेलच्या जुन्या खड्ड्यातून निघणाऱ्या आगीने सर्वांना घाबरवले आहे.
घटना काही का असेना, घटना आणि तिच्या वस्तुस्थितीशी वाद नाही, पण या घटनांनी प्रशासनावर या प्रश्नाचा टोला हाणला गेला की बोअरवेलचे लांबलचक, अतिखोल खड्डे प्रशासनाच्या अधिकृत नियमानुसार आहेत काय? जर आहेत तर प्रशासनाकडे खड्यांच्या परवानगीचे काय मापदंड आहेत? कोणत्या मापदंडानुसार बीडचा एक शेतकरी आपल्या शेतात  ४८ बोर खणून आजूबाजूच्या मोठ्या क्षेत्राच्या पाण्याचा थेंबन् थेंब वाळवून ठेवतो? प्रशासनाकडे बोअरवेलच्या खणनपूर्व वैज्ञानिक परीक्षण, अर्जाचा नमुना अवगत आहे का? आमच्या  नद्या कोरड्या का पडत आहेत? डॅम कबड्डीचे मैदान का बनत आहेत? इत्यादी इत्यादी...
मराठवाड्याचे दुष्काळ देशभरातील इतर भागासाठी अलार्मिंग स्थिती निर्माण करतोय. नोंद घेण्यायोग्य तर ही बाब आहे की अशी स्थिती जिथे निर्माण होऊ लागली तो प्रदेश दक्षिण  भागात मोठा पाणीसाठा पुरवणाऱ्या गोदावरी व तिच्या उपनद्यांचे उगमस्थान आहे व त्याद्वारे ४०टक्क्यांहून अधिक भाग व्यापला जातो. नांदेड, गोदावरी किनारपट्टीवर वसलेले एक मोठे  शहर. गोदावरीच्या पाण्याने या शहराला इतके सुखसमृद्ध केले की कधीकाळी नांदेडकरांना पाण्याची टंचाई काय असते हेसुद्धा माहीत नव्हते, परंतु आज गोदावरी नदीला चिकटूनसुद्धा  नांदेड शहरावर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे, तर बीड आणि लातूरचे पाणीच नव्हे तर ओलावासुद्धा हिरावला गेला आहे. कारणमीमांसापूर्वी काही अचंबित करणारी तथ्ये जाणून घेऊ या.
मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या धरतीवर दुष्काळी परिस्थिती पाहाता सर्वसामान्यपणे याला निसर्गाचा कोप किंवा बदल मानला जातो, पण वास्तविकता अशी की महाराष्ट्र देशातील चार  मोठ्या नद्याचे माहेरघर आहे. इजिप्त जर नाइल नदीची भेट आहे तर महाराष्ट्र कृष्णाची. गोदावरी, नर्मदा, तापी आणि कृष्णा यांचे खोऱ्यांद्वारे ९२ टक्के महाराष्ट्रला ओलावा पुरविला  जातो व त्यांचा अनुक्रमे ४८.६, ४, ८० आणि २६ टक्के भाग महाराष्ट्राला लाभला आहे. 'नॅशनल रिसर्च ऑफ लार्ज डॅम'च्या ताज्या अहवालानुसार (२०१८) भारताच्या एकूण मोठ्या डॅम्सपैकी ४१.२९टक्के संख्या महाराष्ट्रात आहे. थोडक्यात म्हणजे महाराष्ट्र राज्य नैसर्गिकरित्या विविध देणग्यांनी समृद्ध आहे. प्रश्न हा आहे की एवढा प्रगल्भ निसर्ग लाभलेल्या  महाराष्ट्रची भेगा फुठलेली जमीन आग आणि लावा का ओकायला लागली?
थोडक्यात उत्तर म्हणजे- ‘‘खुष्की व समुद्रावर उपद्रव माजले आहेत, लोकांच्या आपल्या हातांच्या कमाईने जेणेकरून चव चाखवावी त्यांना त्यांच्या काही कृत्यांची, कदाचित ते परावृत्त   होतील.’’ (पवित्र कुरआन-३०:४१) आणखी काही सविस्तर मुद्दे आपण पाहू या.
१) दारू - दुर्दैवाने गोदावरीचे बहुमूल्य पाणी, नासिक जिल्ह्यातील दारू माफिया (वाइनरिस) यांच्या कबजात जात आहे. नाशिक भारतात ‘वाइन कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते. १९९६  पासून आंतरराष्ट्रीय व स्थानिक तज्ज्ञांनुसार प्रभावीपणे व सातत्याने होणाऱ्या दारूच्या व्यापारामुळे आज नाशिकला ‘वाइन कैपिटल’ बनवून टाकले. नाशिकच्या २ लाख हेक्टर जमिनीवर  पसरलेल्या द्राक्ष बागा डॅमच्या ९०टक्के पाण्यावर अवलंबून आहेत. ‘वॉटर फूट प्रिंट नेटवर्क’नुसार द्राक्ष पिकाचे सरासरी वॉटर फूट प्रिंट ६१० लीटर पाणी प्रति किलोग्रॅम द्राक्षे एवढे आहे  आणि दारूचे ८७० लीटर पाणी प्रति लीटर दारू एवढ आहे. इथल्या बळकट दारू लॉबी अपस्ट्रीम डॅमच्या माध्यमातून गोदावरीच्या पाण्याला अडवण्याचा प्रयत्नात मोठ्या प्रमाणात यशस्वी  झालेली आहे. ही सर्व कामे जबरदस्त राजकीय हस्तक्षेपातून अमलात आणली जातात. परिणामी औरंगाबाद येथील मोठे धरण जायकवाडी जे कधी काळी काठोकाठ भरलेले असायचे व  आजूबाजूच्या जिल्ह्यांना पाणीमय जीवदान देत होते ते आता अर्धे भरण्यासही पंचाईत होत आहे. बिड जिल्ह्यातील माजलगाव येथील डॅम जे जायकवाडीचा अतिरिक्त साठा साठविण्यासाठी (जायकवाडी-स्टेज
२) च्या रूपाने तयार करण्यात आले, आता कसेबसे पाणी सामावून घेते. दुसरीकडे अवस्था अशी आहे की प्रशासन व दारूचे व्यापारी यावर आनंदित आहेत की दारूच्या  उत्पन्नाने  फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ऐतिहासिक नाव नोंदविले. महाराष्ट्रातील गत सरकारने आपल्या उद्योग खात्यातील एम.आय.डीसी.ला ‘वाइन पार्क’च्या जलद उभारणीसाठी नोटल   एजेंसी प्रदान केली ज्याचे मादक परिणाम समोर येऊ लागले आहेत. आज भारतातील ९५ वाइनरिजपैकी ७७ महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत आहे. फक्त मागील २ वर्षात ३० दारूच्या  इंडस्ट्री इथे निर्माण झाल्या. दारू व्यापारी सरकारी खजिन्यात दरवर्षी आपल्या उत्पन्नाचा २० ते २५ टक्के भाग अदा करतात. उत्पन्नाच्या या ढिगाऱ्याचा विरोध करणे या राजकारण्यांसाठी शक्य होणार नाही, ज्यांना जनतेच्या स्वास्थ्य आणि देशाच्या प्रगतीपेक्षा महसूल व सरकारी खजिन्याची जास्त चिंता वाटते.
'इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्स अ‍ॅण्ड क्वालिटेटिव्ह अ‍ॅनालिसिस'च्या एका अहवालानुसार अल्कोहल आणि दारूच्या होणाऱ्या उत्पन्नाच्या १ रुपयाच्या बदल्यात प्रशासनाला हेल्थ केअर  खर्च व प्रॉडक्टिव्हिटीच्या नुकसानीच्या स्वरुपात २ रुपयांचा फटका बसतो. नाशिकच्या परिसरात द्राक्षाच्या डौलदार बागा पाहून जरी तात्पुरता आनंद लाभत असला तरी खूप कमी  लोकांना तथ्य माहीत आहे की या हिरव्यागार बागांमधे मद्यघुट्टीच्या बिया तर मद्यमस्तीची पिके घेतली जातात, हे कटू सत्य.

२) साखर – दुष्काळी परिस्थितीच्या कारणांमध्ये हे मधुर नाव जरी अचंभित करणारे असले तरी सत्य असे आहे की साखरेचे अंबार दुष्काळी परिस्थितीचा 'पांढरपोश आरोपी' आहे. एक  किलोग्रॅम साखर बनविण्याच्या प्रक्रियेत २५१५ लीटर पाणी लागते, हे एवढेच पाणी आहे ज्याचा १०वा भाग पाणी मिळविण्यासाठी पिंपळगावचे ८५ वर्षीय वृद्ध अनेक गंगा, दुर्गा, ४५ डिग्री  सेल्सियस तापत्या उन्हात, थरथरणाऱ्या पायांनी कित्येक किलोमीटर चालतात आणि १५ फूट विहिरीत उतरून थेंब थेंब जमा करतात, शेवटी यांची एवढी कसरत त्यांना एवढेच पाणी  उपलब्ध करून देते ज्यातून १०० ग्रा. साखर तयार केली जाते.
१९५ कारखाने व १०७२ लाख क्विंटल उत्पन्न घेऊन महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर येतो, परिणामी महाराष्ट्राच्या २ हजारांहून जास्त धरणांचा ७१.५ टक्के भाग  ऊसाची शेते पिऊन जातात. आरोग्यदायक पिकांच्या व दैनंदिन मानवी व इतर प्राणिमात्रांच्या मूलभूत गरजांसाठी एवढेच क्षुल्लक पाणी शिल्लक राहाते जेवढे साखर कारखानदारांच्या  मेहेरबानीने शिल्लक राहून गेले. राज्याच्या सहकारी कारखान्यांवर राजकारण्यांचे वर्चस्व कायम आहे. साखरेच्या उत्पन्नाला सुविधा देऊन, वितरणाची व्याप्ती वाढवून जनतेत गोड  आसक्ती टिकून ठेवणे, शेतकऱ्यांना इतर उपयोगी पिके न घेऊ देता ऊसाच्या लागवडीमागे अडकवून ठेवणे आणि राजकीय तडजोडी करून नदी, तलावांतील ७२टक्के पाण्यावर कबजा जमविणे राज्याच्या साखरमाफियांचा जुना डाव आहे. ज्याने या क्षेत्राच्या मोठ्या विभागाला दुष्काळी आगीत ओतले आहे. ‘इंडियन इंस्टीट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च लखनौ’च्या  अहवालानुसार महाराष्ट्र देशभरात ऊसासाठी सर्वात जास्त पाणी वापर करणारे राज्य आहे. ऊसाचे पीक मोठमोठ्या तलावांना पिऊन टाकणारे असे विचित्र पीक आहे की ज्याची क्षुल्लक  प्रमाणापेक्षा जास्त गरज न आपल्या शरीराला आहे न समाजाला.
आपल्या पूर्वजांना याची जराशीही कल्पना नव्हती की आमची येणारी पिढी चहा नामक पेयामध्ये दररोज हजारो टन साखर घोळून पोटामध्ये टाकून घेईल, त्यांच्यासाठी तर गोडीचे काही  वार्षिक चटकारे पुरेसे होते जे ते लोक ईद, सन साजरे करताना मिष्टान्नाचा आस्वाद घेण्याच्या गोड आठवणींनी हर्षोल्ल्हासित व्हायचे, हा त्यांचा वर्षभराचा पूर्णत: स्वास्थ्यदायक कोटा  असायचा. आम्ही या पॅटर्नला उलटून पालटून टाकले व स्वत:वरच नव्हे तर असंख्य विवश लोकांवरसुद्धा अत्याचाराचे कारण बनले गेलो. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे की  अनैसर्गिक खादाडपणामुळे अनेक दु:खीताना नरकयातना भोगाव्या लागत आहेत, डौलदार शेते उजाड मैदाने बनून गेली, मूलभूत गरज असलेले खाद्य जसे डाळी व इतर अन्नधान्य या  चीभेच्या चटकाऱ्या (साखर) च्या तुलनेत तीन पटीने महाग झाले. जमिनीखालील पाण्याची पातळी हजारो फूट खाली गेली, परिणामी झाडे सुकत गेली, जनावरे मरत गेली व जमिनी  नापीक होऊ लागल्या. साखरेचा सर्वात जास्त उपयोग सॉफ्ट ड्रिंक्स आणि चहामध्ये होतो. 'दि इंडिपेंडेंट' (लंडन) मध्ये प्रकाशित युनिवर्सिटी ऑफ लीड्सच्या अहवालानुसार चहा आणि  साखरेची विरोधात्मक जोडी जास्तीची ठरते. गोड चहा पिणाऱ्या ६४ जणांवर केलेल्या संशोधनानुसार काहीच दिवसानंतर त्यांना साधा चहा जास्त आवडायला लागला. मुद्दा आश्चर्यात  टाकणारा आहे, पण जर का आपण सॉफ्ट ड्रिंकचा वापर टाळला आणि बहुतेक देशांसारखे आपणही चहामधील साखरेचे प्रमाण अत्यल्प केले तर या नद्या-तलावांचे अर्धे पाणी आपण  वाचवून त्याच्या हक्कदारपर्यंत पोहोचवू शकतो.
(क्रमश:)

सोलापूर
जमाअत-ए-इस्लामी हिंद स्थानिक शाखेतर्फे दिनांक १८ जून २०१९ सकाळी ९:३० वाजता व्ही एम मेडिकल कॉलेज येथे ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात  अहमदनगरचे डॉ. रफिक सय्यद पारनेरकर यांनी कार्यक्रमाची गरज यावर आपले विचार मांडले. त्यांनी ‘तौहिद’ म्हणजे काय याचे सोप्या भाषेत वर्णन केले. तसेच ते म्हणाले की हा  कार्यक्रम मुस्लिम आणि मुस्लिमेतर यांच्यामध्ये जी दरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न आहे. डॉ. अनिस यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. आलेल्या सर्व डॉक्टरांना इस्लामी  पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शेवटी सर्वांनी शिरखुरमा घेऊन एकमेकांना अभिष्टचिंतन देऊन निरोप घेतला.

ठाणे (मंजूर पठाण)-
आपापसात गैरसमज निर्माण होण्यामागे सर्वांत मोठे कारण म्हणजे आपला एकमेकांशी संपर्क संपलेला असून आपसात दुरावा निर्माण झाला आहे. मोहल्ल्यांनासुद्धा वेगवेगळे रंग देण्यात  आलेले आहेत. वेळप्रसंगी आपण कुठे भेटलो तर आपण समानतेवर न बोलता असमानतेवर वार्ता करून मनातील दरी वाढविण्याची कामे करतो. आपापसात प्रेम व सद्भावना  वाढविण्यासाठी एकमेकांशी आदानप्रदान व सुसंवाद असणे खूप गरजेचे आहे, असे प्रतिपादन औरंगाबादचे अ‍ॅड. फैज सय्यद यांनी केले. येथील एन.के.टी. महाविद्यालयात रविवार १६  जून २०१९ रोजी जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुढे बोलताना अ‍ॅड. फैज सय्यद म्हणाले की कुठल्याही धर्माला  जाणून घेण्यासाठी त्याच्या अनुयायींना न पाहता त्या धर्मातील धर्मग्रंथ वाचणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला त्या धर्माची खरी ओळख करून घेता येईल.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला जमाअतचे ठाण्याचे अध्यक्ष साबिर बेग यांनी कार्यक्रमाचे स्वरूप व उद्दिष्ये विषद केली. त्यानंतर भाडुप जमाअतचे अध्यक्ष शाकिर शेख यांनी आपल्या उत्तम  शैलीत जमाअत-ए-इस्लामी हिंदचा परिचय करून दिला. यानंतर जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष विश्वनाथ कामत यांनी सर्वप्रथम जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या सदर कार्यक्रमाबाबत आभार व्यक्त करून सांगितले की कुठलाही धर्म हा वाईट कृत्य करणयास शिकवत नाही. प्रत्येक धर्मात अनेक समानता आढळतात. माणसाने एकमेकांशी प्रेम व सद्भावनेने वागावे,  प्रत्येक धर्म याचीच शिकवण देतो. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी व देशातील शांती व एकात्मता टिकून राहण्यासाठी उर्दू भाषेत प्रार्थनाही केली.
औरंगाबाद येथून आलेले वाजिद अली खान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रमजानचे महत्त्व पटवून देताना सांगितले की या महिन्यात कुरआनचे अवतरण झाले. या महिन्यात  संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी व प्रांतांमध्ये वेगवेगळ्या वेळेत अकरा ते बावीस तास तसेच सात वर्षांपासून सत्तर वर्षांपर्यंतच्या लोकांनी उपाशी आणि तहानलेले राहून रोजे धारण  केले. ते पुढे म्हणाले की कुरआन ही थेअरी असून प्रेषित मुहम्मद (स.) याचे जीवन प्रॅक्टिकल आहे. इस्लाम धर्माला समजण्यासाठी कुरआन पठण करणे गरजेचे आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मुंब्रा जमाअतचे अध्यक्ष सैफ आसरे यांनी केले. या कार्यक्रमात अनेक जातीधर्माचे लोक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी  जमाअतच्या स्थानिक शाखेकडून शिरखुर्मा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

बार्शिटाकळी-
‘ईद मिलन’सारख्या कार्यक्रमाने समाजात बंधुभाव, सहकार्य आणि विश्वास वाढीस लागतो. यामुळे अशा प्रकारचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्ह्यातील  तालुका बार्शिटाकळीचे तहसीलदार गजानन हामंद यांनी स्थानिक जमाअत-एइस्लामी हिंद या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ईद मिलन कार्यक्रमात केले. या  कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
शुक्रवार १४ जून २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता दयावान हॉल खोलेश्वर रोड बार्शिटाकळी येथे स्थानिक जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रफीक सय्यद पारनेरकर होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गजानन हामंद यांच्यासह ठाणेदार तिरुपती राणे, मौलवी अब्दुल सलाम (अध्यक्ष, जमिअते उलेमा बार्शिटाकळी) आणि चंद्रकांत वाघमारे तसेच  नगरसेवक संतोष राऊत, दत्ता साबळे, पत्रकार गजानन वाघमारे, शेख इमाम, आतिफ पठाण इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रफीक सय्यद यांनी रमजान काय असतो, रोजा कशासाठी ठेवतात, ईद का साजरी केली जाते? यासारख्या अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. या वेळी जमअततर्पेâ   अनेक मान्यवरांना इस्लामी साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहम्मद इरफान (अध्यक्ष, जमाअत- ए-इस्लामी हिंद, बार्शिटाकळी) यांनी केले तर  सूत्रसंचालन जुल्करनैन सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ. मुदस्सीर खान, मनज्जीर अली खान, अब्दुल समद, हुसैन खान, शाकिर हारुनी, जावेद अथहर,  असलम भाई, ताहेर भाई, जाकीर भाई, मुईज मामू, नसरुल्लाह खान, नदीम भाई, मुदस्सीर अली इत्यादींनी परिश्रम घेतले.

सहा जून २०१९ रोजी ‘यूएन इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल’ (इसीओएसओसी) मधील मतदानाच्या वेळी भारताने पहिल्यांदाच इस्रायलच्या बाजूने मतदान केले. हे मतदान शाहेद  (‘साक्षीदार’) नावाच्या एका पॅलेस्टिनी एनजीओला संयुक्त राष्ट्रांच्या (युनायटेड नेशन्सन) ‘इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल’मध्ये सल्लागाराचा दर्जा देण्याबाबत इस्रायलने घेतलेल्या  हरकतीबाबतच्या निर्णयासाठी होते. यावेळी यूएनसारख्या अनेक आघाड्यांवर काम करणाऱ्या आस्थापनांमध्ये इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्नाबाबत भारत आजवर ज्या प्रकारे मतदान करत  आला आहे त्यापासून पूर्ण फारकत घेतल्याचे दिसून आले. या वेळी भारताने शाहेदला निरीक्षकाचा दर्जा नाकारण्यासाठी इस्रायलने दिलेल्या प्रस्तावाच्या बाजूने निर्णय दिला. भारताची ही  कृती निश्चितच अभूतपूर्व आणि ऐतिहासिक होती. हे भारताने पॅलेस्टाईनच्या बाबतीत इस्रायलची बाजू घेतल्याचे आणि हे मतदान म्हणजे भारताची द्विराष्ट्रीय संकल्पनेवरील अनेक  दशकांची भूमिका हळूहळू मवाळ करत जाण्याचा हा पहिला संकेत आहे. या मतदानाकडे भारतीय राजनयाच्या बाजूने महत्त्वाचा संकेत म्हणून पाहिले पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे  ‘इसीओएसओसी’चा विशिष्ट संदर्भ आणि ६ जूनच्या मतदानाचा राजनैतिक आशय या दोन्ही गोष्टी नीट लक्षात घेतल्या पाहिजेत. ‘इसीओएसओसी’ची एक समिती आहे जी व्यापक यूएन  समूहाच्या कार्यामध्ये निरीक्षकाचा दर्जा मिळावा म्हणून वेगवेगळ्या एनजीओंनी केलेल्या अर्जांचे परीक्षण करते आणि अर्जदाराचे जनादेश, शासनप्रणाली आणि वित्तीय राजवट यासारख्या अनेक निकषांच्या आधारे ‘इसीओएसओसी’ने सर्वसाधारण, विशेष किंवा रोस्टर दर्जा द्यावा अशी शिफारस करते. इस्रायलने अशी टीका केली की पॅलेस्टिनी एनजीओने  महत्त्वाची माहिती सादर केली नाही, ज्यामध्ये त्यांचे कट्टरतावादी संघटना ‘हमास’शी असलेल्या संबंधांचा समावेश होता, आणि म्हणून एनजीओचे समितीने आणखी परीक्षण केले  पाहिजे. एक महत्त्वाची बाब म्हणजे २०१५ मध्ये आणखी एका पॅलेस्टिनी एनजीओच्या सल्लागाराच्या दर्जासाठी केलेल्या अर्जावरील ‘इसीओएसओसी’च्या मतदानाच्या वेळी भारत त्यापासून दूर राहिला होता. तसेच सध्याच्या परिस्थितीप्रमाणे त्यावेळीही इस्रायलच्या प्रतिनिधीने पॅलेस्टिनी ‘रीटर्न सेंटर’ नावाच्या त्या एनजीओवर कट्टरतावादी संघटना ‘हमास’शी  जवळचे संबंध असल्याचा आरोप केला होता. अर्थात त्या वेळी भारत मतदानापासून केवळ दूर राहिला होता, ६ जूनच्या मतदानाप्रमाणे इस्रायली प्रस्तावाला पाठिंबा दिला नव्हता. मात्र  त्या वेळी भारताचे दूर राहाणे अधिक लक्षणीय होते कारण त्या वेळी सल्लागार समितीमधील १९ सदस्यांपैकी १२ जणांनी या पॅलेस्टिन संस्थेला सल्लागार दर्जा देण्याच्या प्रस्तावाच्या  बाजूने मत दिले होते. (त्या वेळी फक्त इस्रायल, अमेरिका आणि उरुग्वे यांनीच पॅलेस्टिनी एनजीओच्या विरोधात मतदान केले होते). त्याउलट २०१९मध्ये शाहेद या संस्थेला सल्लागार  दर्जा नाकारण्याच्या निर्णयाला अनेक देशांनी पाठिंबा दिला (२८ नाकारण्याच्या बाजूने १५ विरोधात) आणि त्यात ब्राझिल, फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, अमेरिका यासारखे महत्त्वाचे देश  सामील होते. दुसरे म्हणजे मोदी सरकारच्या मागच्या पाच वर्षांमध्ये भारताने यूएनजीए, यूएनएचआरसी आणि यूनेस्को या ठिकाणी इस्रायलच्या विरोधातील मतदानांपासून दूर राहून  इस्रायल आणि पॅलेस्टाईनशी संबंधित समस्यांच्या बाबतीत मतदानाचा पूर्वीचा पायंडा अगोदरच मोडला आहे. उदाहरणार्थ गाझामधील हिंसेशी संबंधित एका ठरावावर यूएनएचआरसी येथे  झालेल्या मतदानापासून भारत दूर राहिला होता. त्या वेळीही आतासारखेच आपल्या पारंपरिक भूमिकेपासून भारताचे हे विचलन म्हणजे एक लक्षणीय कृती ठरते. पंतप्रधान मोदी आणि  नेतान्याहू यांच्यातील अधिक मजबूत वैयक्तिक नात्याचेच हे द्योतक असल्याचेही सिद्ध होते. २१ डिसेंबर २०१७ रोजी भारताने इस्रायलच्या विरोधात मतदान केले होते. नेतान्याहूंच्या  नवी दिल्ली येथील भेटीनंतर काही आठवड्यांनंतरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेम ही इस्रायलची राजधानी असल्याची जी एकतर्फी घोषणा केली होती ती आंतरराष्ट्रीय  कायदा आणि यूएन सिक्युरिटी कौन्सिलच्या पूर्वीच्या ठरावांच्या विरोधात आहे हे लक्षात घेऊन भारताने त्याच्या विरोधातील यूएनजीए च्या मतदानाला पाठिंबा दिला होता. पुन्हा ६  डिसेंबर २०१८ रोजी भारताने ‘संबंधित युनायटेड नेशन्स ठरावांच्या आधारावर मध्यपूर्वेमध्ये त्वरित, सर्वांगीण, न्याय्य आणि शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी’च्या ठरावावर  इस्रायलच्या भूमिकेच्या विरोधात मतदान केले होते. त्या ठरावामध्ये इस्रायलने १९६७पासून पूर्व जेरुसलेमसहित अरब भूभागावर केलेल्या कब्जाचा निषेध करण्यात आला होता. यानंतर  अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आणण्यात आलेल्या ठरावावरील मतदानाच्या वेळी दूर राहून भारताने आपला मतदानाच्या बाबतीतला पवित्रा गुंतागुंतीचा असल्याचेच दाखवून दिले होते. मात्र  मोदी सरकारचे धोरण हे पूर्णपणे इस्रायलच्या बाजूचे राहिले आहे. इस्रायलसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. मागील वर्षी भारताने इस्रायलकडून एक अब्ज डॉलर इतक्या किमतीचे  शस्त्रे विकत घेतले आहेत. भारताचे अनेक संघर्षमय देशांबरोबर समतोल संबंध आहेत. पॅलेस्टाईन-इस्रायल यांच्याप्रमाणेच आखातात सौदी अरेबिया आणि इराण यांच्याबरोबरही भारताचे  समतोल संबंध आहेत. भारताची तटस्थ भूमिका यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा आहे.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

इस्लाम पुरूषास चार विवाहांपर्यंत मान्यता देतो. इस्लामने बहुपत्नित्वाची अनुमती दिली याचा अर्थ असा नाही की कितीही स्त्रियांशी विवाह करावा. अनेक विवाह करण्यासाठी तशाच  प्रकारच्या अटीदेखील घातलेल्या आहेत. इस्लाम ज्या काळात आणि ज्या प्रदेशात अवतरित झाला त्या वेळेच्या परिस्थितीचा विचार करूनच मान्यता दिली. इस्लामच्या पुनरोद्धारावेळी  स्त्रियांचे प्रमाण मुबलक होते. आज जसे जागतिक पातळीवर स्त्री-पुरूषांच्या प्रमाणात स्त्रीचे प्रमाण कमी आणि पुरूषांचे अधिक आहे, तसे प्राचीन काळी मुस्लिमांमध्ये स्त्रियांचे प्रमाण  पुरूषांच्या प्रमाणापेक्षा जास्त होते. म्हणून बहुपत्नित्वाला मान्यता देण्यात आली. स्त्रियांचे प्रमाण अधिक असण्यासही काही बाबी कारणीभूत होत्या. उदा. युद्धे, लढाया, पुरूषांचे स्थलांतर  या कारणांनी पुरूषांची संख्या लढाईत मारले जाऊन कमी होते. पुरूषांचे प्रमाण कमी झाल्याने स्त्रियांना एकटीला जीवन व्यतीत करावे लागेल या कारणास्तव बहुपत्नित्वास मान्यता  आहे. त्या काळात आजच्यासारख्या वैद्यकीय सुविधा विकसित व सुधारित नव्हत्या. त्यामुळे स्त्रियांच्यात आजारपण अधिक होते. इस्लामचा स्त्री-पुरूषांच्या शारीरिक संबंधाला   विवाहाच्या माध्यमातून मान्यता देऊन त्यांच्याकडून आपला वंश वाढविण्यास मान्यता आहे. म्हणजेच विवाह हे यापासून वंश वाढविण्याचेदेखील माध्यम आहे. जर पत्नी वांझोटी असेल  किंवा सतत आजारी असेल तरीदेखील बहुपत्नीवास मान्यता आहे (केवळ चार). काही वेळा विवाहप्रसंगी पती-पत्नी यांच्यात जरी समेट प्रेम असले तरी  पुन्हा एकमेकांत न  पटल्यासारखे होते. कारण दोघांच्या स्वभावात तफावत असल्यास अनंत अडचणी निर्माण होतात आणि जिच्याशी पटत नाही ती एकमेव पत्नी असल्यास वैवाहिक जीवन आनंदी जगता  येत नाही. तसेच त्या काळात विवाह जुळविण्यासाठी बरोबरीची तोलामोलाची स्थळे यांचा अभाव असायचा. माता- पित्यास आपल्या मुलीसाठी उत्तमोत्तम व धनदांडगा पती मिळावा असे वाटायचे. तसा पती मिळविण्यासाठी प्रयत्न केले जायचे. परिणामी दोन्ही परिवार सारख्या प्रमाणात नसायचे व चांगल्या स्थळांचा अभाव निर्माण व्हायचा. यामुळे बहुपत्नित्वाने  चांगले स्थळ मिळवण्याची शक्यता निर्माण झाली. युद्धामुळे अनेक पुरूष (सैन्य) मारले जायचे. तेव्हा त्यांच्या बायका विधवा व्हायच्या, तर मुली अनाथ व्हायच्या. प्रत्येकाला दर्जेदार  स्थळ हवे असल्याने अशा अनाथ व विधवा मुली-स्त्रियांची अवहेलना व्हायची व त्यांच्यावर एकलकोंडी जीवन जगण्याची वेळ यायची. याचेही प्रमाण बहुपत्नीत्वामुळे कमी करण्यासाठी हा  उपाय असे.
इस्लामने स्त्रीचा सन्मान करताना विधवा पुनर्विवाहास मान्यता दिली. आज आपण जो इतिहास अभ्यासक्रमात शिकतो त्यामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा भारतावर इंग्रजांची सत्ता  असताना गव्हर्नर लॉर्ड डलहौसी याने इ.स.1856 ला केला. यासाठी विशेष प्रयत्न ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केले होते. याच दरम्यान म्हणजे इ.स. 1869 ला क्रांतीज्योती महात्मा  ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला होता. पण वास्तविक पाहता संपूर्ण जगाताचा इतिहास अभ्यासताना इ.स. 1856 च्या पूर्वी (1250 वर्षापूर्वी  अंदाजे) इस्लाममध्ये जगातील पहिला विधवा पुनर्विवाह झाला व तो ही पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केला. तेव्हा त्यांचे वय 25 वर्षे होते व त्यांच्या पत्नी (मक्का येथील) हजरत खदिजा  यांचे वय 40 वर्षे होते व त्या पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी विवाह करण्यापूर्वी दोन वेळा विधवा झाल्या होत्या.
अनेकेश्वरत्व जोपासणे इस्लामने निषिद्ध केले आहे. कारण एकेश्वरत्व हे इस्लामची मूळ धारणा असून तो निर्विकार, निराकार आहे. त्याची छाया, चित्र, मास, मूर्ती असे काहीही अस्तित्वात नाही. म्हणजेच मूर्तीपूजा त्याज्य आहे. पतीपत्नीने कसे जीवन व्यतीत करावे यासाठीही इस्लामने फार मोठे तत्वज्ञान सांगितले आहे. एकमेकांचा आदर करीत असताना  जर पत्नी आपल्या पतीचा अनादर (अपमान) करीत असेल तर तिला समजावून सांगा. याप्रसंगी हलक्या साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करा.
’’ज्या पत्नीकडून अवज्ञा होण्याचे तुम्हाला भय असेल, त्यांनी उपदेश करा (समजावून सांगा- सामनीती) आणि बिछान्यात त्यांच्यापासून दूर राहा (भेदनिती), मग जर त्या तुमच्या  आज्ञा पाळायला लागल्या तर मात्र जुलूम (दंडनिती) करण्यासाठी निमित्त (कारण) शोधू नका’’

वरील आयातीच्या अर्थातून हे लक्षात येते की पत्नीला सजा करण्याचा अधिकार तिच्या नवऱ्यास दिलेला आहे. तो ही फक्त जर पत्नी पतीचा अपमान करत असेल तर. परंतु तिला अगोदर समजावून सांगा, तिच्यापासून दूर राहा (बिछान्यात). तरीही तिच्या वर्तनात फरक पडत नसेल तर तिला ’किरकोळ मारहाण’ (तोंडावर मारू नका) करा. पत्नीच्या कितीही  मोठ्या पराकोटीच्या अवज्ञेसाठी किरकोळच मारहाण करणे, ही मर्यादा आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणे, विनाकारण मारझोड करणे, छोट्या अवज्ञेसाठी मोठी शिक्षा करणे अथवा  पराकोटीच्या अवज्ञेवर किरकोळ मारहाणीची मर्यादा ओलांडणे हा एक प्रकारचा जुलूम, अत्याचार ठरेल. स्त्रियांवर अन्याय-अत्याचारास सक्त मनाई आहे. इतर बहुतेक धर्म आणि राष्ट्रांत  पुरूषाला स्त्रीवर प्राधान्य दिल्याचे भासवले आहे. याच्याच आधारावर पुरूषांनी स्त्रियांना आपली दासी मानून तिला तुच्छ समजले. तिचा अपमान केला, तिला आर्थिक, सांस्कृतिक,   सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य दिले नाही.इस्लामने तर स्त्रीचा सन्मान केला आहे आणि काही धार्मिक मर्यादेत राहून इच्छिल त्या क्षेत्रात कार्य करण्यास अनुमती दिली आहे.
काही मर्यादांमध्ये स्त्रियांसाठी दागिन्यांच्या संदर्भात इस्लामने जाहीर केले आहे, ’’स्त्रियांनी आपल्याकडील दागिने शरीरावर परपुरूषांना दिसतील असे परिधान करू नयेत. ’’ इस्लाम  शिकवण देतो, ’’ वायफळ खर्च करू नका, वायफळ खर्च करणारे सैतानाचे बंधु होत आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे.’’
इस्लामने अहंकार व घमेंड असणाऱ्यांचा धिक्कार केला आहे. दागिने परिधान करून अथवा दागिन्यांची साठवण करून व्यक्तीमध्ये दिखाऊपणा निर्माण होतो, त्याला त्याचा संपत्तीचा  गर्व वाटतो व अहंकारी व्यक्तीला नरकाचा मार्ग खुला केला आहे. इस्लाम धर्म नातेवाईकांच्या हक्काबरोबरच आपल्या शेजाऱ्यांच्या हक्काबद्दलही जाणीव निर्माण करतो. आपण जर पोटभर जेवण करीत असू आणि आपला शेजारी भुकेने तरसतोय, अन्नअन्न करतोय, त्याला उपाशी न ठेवता त्याच्या जेवणाची काळजी शेजाऱ्याने घ्यावी. म्हणजेच आपण पोटभर  खायचे व शेजाऱ्याने उपाशीपोटी झोपायचे,हे इस्लामविरूद्ध आहे. एखादा शेजारी पुरूष संपूर्ण शरीरावर लाखो रूपयांचे दागिने घालून मिरवत असेल तर आपल्या उपाशी शेजाऱ्याकडे कधीच  लक्ष देणार नाही आणि शेजाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तो कधीही पुढाकार घेणार नाही. तसेच शेजारधर्म निभावण्यासाठी सर्वात पुढे स्त्रीच असू शकते. कारण स्त्रीच आपला शेजारी  कसा आहे, त्याचे वर्तन कसे आहे, त्याच्या घरातील सदस्य काय करतात, त्याची मुले कोणत्या वर्गात आहेत, त्याची आर्थिक परिस्त्तिी कशी आहे? अशा बाबींची माहिती आपल्या  शेजारच्या परिवारातील स्त्रीशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी वागू शकते व जवळीक निर्माण करू शकते.
कर्ज घेऊन इस्लामने मर्यादेपेक्षा अधिक दागीने वापरणे, खरेदी करणे तसेच साठवून ठेवणे याला मज्जाव केला आहे. म्हणून इस्लामने दागिने वापरणे हे अनिवार्य केले नाही. जसे हिंदू  धर्मामध्ये लग्नसमारंभात वराकडून वधूला मंगळसूत्राबरोबर काही दागिने विवाहितेची निशाणी, सौभाग्याचं लेणं म्हणून दिली जातात व त्यातील काही दागिने तिला वापरावेच लागतात.  कारण ते दागिने तिचे स्त्रिधन असते व ते धर्म नियमांनुसार वापरावे लागतात. तशी इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांनी दागिने वापरण्यास अनिवार्यता दर्शविलेली नाही. स्त्री तिच्या व  नवऱ्याच्या आर्थिक कुवतीनुसार साज-शृंगार आपल्या नवऱ्यासाठीच करू शकते. परपुरूषांसमोर दागिने व शृंगार यांचे प्रदर्शन करणे पाप आहे. स्त्री व तिचा नवरा यांची आर्थिक कुवत  जशी असेल तशी ती दागिने खरेदी करू शकते. मात्र वर्षाच्या शेवटी (रमजान ईद) च्या वेळी एकूण दागिन्यांवर त्यांना 2.5 टक्के जकात अदा करावीच लागते. दागिन्याच्या हव्यासापोटी  कोणाचे कर्ज काढून ते घेऊ नयेत. (इस्लाममध्ये व्याज देणे-घेणे निषिद्ध आहे.) मात्र स्त्रीचा स्वभावगुण असल्याकारणाने ती दागिन्यांची अपेक्षा करते. मात्र इस्लाममध्ये मंगळसूत्र वगैरे  दागिने वापरण्यास धर्माचा आधार दिलेला नाही. पण भारतातील काही भागातील (उदा. महाराष्ट्र) स्त्रिया मंगळसूत्र वगैरे दागिने वापरण्यात धर्माचा आधार नसताना ती बाब धार्मिक आहे  (अज्ञानामुळे) भासवतात व गळ्यात विवाहानंतर लच्छा, बोरमाळ (दागिन्यांचा प्रकार) तसेच इतर दागिने वापरणे अनिवार्य भासवतात. पण वास्तविक पाहता धर्माची अनुमती फक्त  आणि फक्त शृंगारासाठीच दागिने वापरण्यास आहे. महाराष्ट्रात अनेक मुस्लिम बांधव इस्लामचे अनुयाची तर आहेत पण त्यांनी इस्लामच्या उपासनेबरोबर इस्लाम जीवनपद्धती  आचरणात आणली नाही. इतर धर्मियांप्रमाणे त्यांच्या जीवनपद्धतीचा शिरकाव त्यांच्यात झाला याला बहुतांशी स्त्री जबाबदार आहे.
इस्लाममध्ये ईश्वराची आराधना प्रत्येकाला अनिवार्य आहे. मग ती स्त्री असेल अथवा पुरूष. स्त्रीयांनादेखील इस्लामच्या ईमान (श्रद्धा) राखणे, नमाज, जकात, रोजा, हज हे करावेच  लागते. स्त्रीने स्वतःची (समाजाबरोबर) कितीही प्रगती केली असली तरी प्रगतीच्या महालात वावरताना धर्मक्षेत्रातही कार्य करावे. धर्माने केलेल्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत.  दिवसभरातील पाचवेळा नमाज अदा केलीच पाहिजे, याला अजिबात सूट नाही. कोणतीही स्त्री नमाजपासून दूर राहू शकत नाही. गरोदर स्त्री  (जिला गर्भातील अर्भकामुळे जमिनीकडे  वाकात येत नाही.) नमाज इशाऱ्याने अदा करू शकते. म्हणजे ईश्वराची आराधना केली पाहिजे. पुरूषांपेक्षा स्त्रीया नक्कीच अधिक धार्मिक असतात, हेही तितकेच खरे आहे. याचा दाखला  म्हणजे जेव्हा इस्लाम धर्म प्रगटला तेव्हा इस्लामची तत्वप्रणाली निश्चित झाली व त्या तत्वाच्या व्यापकतेमुळे इस्लाम स्वीकारायला मोठ्या प्रमाणात आघाड्या वाढल्या. तत्पूर्वी जेव्हा  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी इस्लामची घोषणा केली. तेव्हा तात्काळ सर्वप्रथम माननीय खदिजा (रजि.) यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. अशा प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर  सर्वप्रथम श्रद्धा बाळगण्याचा सन्मान स्त्रीला प्राप्त झाला.

इस्लाम हा अखिल मानवाच्या कल्याणासाठी परमेश्वराने दिलेली एक अनुपम भेट आहे. इस्लाम अखिल मानव जातीसाठी एकमेव ईश्वरी धर्म आहे. हा नुसता धर्मच नसून एक परिपूर्ण  ईश्वरी जीवनव्यवस्था आहे. एक अशी व्यवस्था जी मानवाच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाविषयी तसेच अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, सामाजिक व्यवस्था व  न्यायव्यवस्था इत्यादी सर्वच बाबीबद्दल सखोल चर्चा आणि परिपूर्ण मार्गदर्शन करणारी एकमेव संतुलित आणि आदर्शव्यवस्था आहे.
इस्लाम हा शब्द अरबी आहे. याचा अर्थ शांती, पावित्र्य आणि संपूर्ण जीवन ईश्वरी नियमानुसार जगणे म्हणजेच इस्लाम होय. आणि जो संपूर्ण ईश्वरी नियमानुसार जीवन जगतो तो  मुस्लिम आहे. मुस्लिम होण्यासाठी अनिवार्य आहे की, 1) माणसाने आपल्या अंतःकरणाने अल्लाहाच्या अस्तित्वाला एक मानने. 2) अल्लाहाच्या प्रेषितांवर म्हणजेच आदरणीय  आदमअलैह सलाम पासून ते अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर (सल्ल.) पर्यंत ही प्रेषितांची शृंखला होती त्याला मान्य करणे. आणि अल्लाहाच्या अंतिम प्रेषितावर जी परिपूर्ण ईश्वरी  जीवनव्यवस्था अवतरित झाली होती त्याला मान्य करणे.

इस्लामचे मुलभूत पंचतत्व :- इस्लाम ही एक संपूर्ण जीवनव्यवस्था असल्याकारणाने साहजिकच या जीवनातील प्रत्येक कर्म इस्लामच्या दृष्टीने इबादत (सत्कर्म, उपासना, प्रार्थना)  ठरते. उपासनेचे काही प्रकार असे आहेत जे सर्वांना बंधनकारक व अनिवार्य आहेत. ते मूलतः पाच आहेत. ज्यांना इस्लामचे आधारस्तंभ म्हटले जाते. हेच पाच स्तंभ ईश समर्पित 
जीवनाची रूपरेखा निर्धारित करतात.

1) इमान (श्रद्धा) :- हे मान्य करणे ही की सृष्टी आपोआप अस्तित्वात आलेली नाही आणि असेही नाही की या सृष्टीचे अनेकानेक स्वामी, निर्माते व शासक असावेत. या संपूर्ण  विश्वाचा स्वामी, निर्माता, शासक, नियंत्रक, सामर्थ्यवान, प्रभूत्वशाली एकमेव एकच अल्लाह (ईश्वर) आहे. अर्थात इमानने अभिप्रेत आहे की, साक्ष देणे की, अल्लाह (ईश्वर) शिवाय  कोणीही नाही आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे दास व अंतिम प्रेषित आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांना अंतिम प्रेषित म्हणून मान्य करण्याचा अर्थ हा आहे की, जीवनाच्या प्रत्येक  क्षेत्रात ईश्वरांने जी परिपूर्ण आणि अंतिम जीवनव्यवस्था अंतिम प्रेषितावरती अवतरित केली. तयला मान्य करून त्यानुसार संपूर्ण जीवनात त्याचे अनुसरण करावे.

2) नमाज (प्रार्थना) : प्रत्येक मुस्लिमावर एक अनिवार्य कर्तव्य म्हणून दिवसातून पाच वेळा सामुहिक नमाज अदा करणे बंधनकारक आहे. नमाजच्या माध्यमाने प्रत्येक व्यक्तीचा  अल्लाहशी थेट संपर्क प्रस्थापित होतो. नमाजमध्ये अल्लाह समोर नतमस्तक होताना माणसांतील गर्विष्ठपणा संपुष्ठात येतो. नमाजमुळे संपूर्ण समाजात समता प्रस्थापित होते. नमाज  माणसाच्या चारित्र्य संपन्नतेच्या उच्चतम शिखरावर पोहचविते. नमाज माणसाचे अंतः करण शुद्ध करते व त्याला दुराचार व निर्लज्जतेपासून परावृत्त करते.

3) रोजा (उपवास) - रोजा प्रत्येक मुस्लिमावर रमजान महिन्याचे रोजे अनिवार्य आहेत. याचा उल्लेख कुरआनमध्ये असा करण्यात आला आहे. ’’या अय्युहल्लजीना आमनु कुतिबा  अलैकुमस् सियामु कमा कुतिबा अलल-लजीना निकबलिकुम लाअल्लक्कुम तत्तकून. (सुरे अलबकरा : आयत क्र. 183.)

अर्थ : हे श्रद्धावंतांनों! तुम्हावर उपवास त्याच प्रमाणे अनिवार्य करण्यात आले आहेत, ज्या प्रमाणे तुमच्या पूर्वीच्या उम्मतींच्या अनुयायांवरती अनिवार्य केले गेले होते. जेणेकरून  तुम्हामध्ये तकवा (संयम, ईशपरायणता, चारित्र्यसंपन्नता) निर्माण व्हावा.
रोजा केवळ पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे. प्रेषित मुहम्मद (स.) म्हटले ’’ जो रोजा ठेवूनही खोटे बोलणे वागणे सोडत नाही. त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काहीच गरज नाही.’’ पवित्र कुरआनने इशपरायणता हाच रोजांचा खरा उद्देश आहे. असा उल्लेख केला आहे. जो वरील आयातींमध्ये दर्शवितो, ’’तकव्याचा अर्थच आहे  ईशपराणता, ईश-भीरूता, आचार-विचारांची शुद्धता चारित्र्य संपन्नता. ज्याचा परिपूर्णपणे संपूर्ण जीवनावरती परिणाम असावा.

4) जकात : प्रत्येक धनसंपन्न मुस्लिामासाठी त्याच्या पवित्र कमाईतून संपत्तीच्या 2.5 प्रतिशत वर्षा अखेरच्या हिशोबांती ठरवून दिलेली रक्कम होय. जकात ही श्रीमंत लोकांच्या  संपत्तीवरती ज्याचे प्रमाण 52.5 तोळे चांदी (595 ग्रॅम) व 7 तोळे सोने (70 ग्रॅम) यांच्या किमती बरोबरच्या व त्या अतिरिक्त रक्कमेवर सुद्धा 100 रू. वर 2.5 पैसे म्हणजेच 2.5  प्रतिशत यानुसार श्रीमंत लोकांचा संपत्तीवरचा गरीबांचा काढलेला वाटा होय. जकात नियोजन सामुहिकरित्या व्हावे असे निर्देश आहेत. जकातचा उपयोग समाजातील दीन-दुबळ्यांसाठी,  प्रवासी, गुलामांना व कैद्यांना मुक्त करण्यासाठी, सदाचाराच्या संवर्धनासाठी व दृष्टकृत्यांच्या निर्मुलनासाठी, इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी व ईशमार्गात केला जावा, असे संकेत पवित्र  कुरआनात आहेत.

5) हज :- आर्थिक व शारीरिक ऐपत असणाऱ्या प्रत्येक मुस्लिमावर आयुष्यात एकदा हज अनिवार्य आहे. हजमध्ये मक्का येथील पवित्र काबागृहाची प्रदक्षिणा (तवाफ) व हजच्या  इतर  विधिंचा समावेश होतो. जगाच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण (तमाम) मुस्लिम बांधव हजसाठी एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र येतात. सर्वांचा एकच पोशाख - एहरामच्या दोन पांढऱ्या  शुभ्र चादरी ! विश्वबंधूत्व व समतेचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारा आगळा वेगळा, डोळे दिपवून टाकणारा असा हा महान सोहळा ! इस्लामची वरील पाचही अनिवार्य कर्तव्ये पुरूष व स्त्रिया  दोघांना सारखेच लागू आहेत. हे येथे विषद करणे महत्त्वाचे आहे. सुरूवातीपासूनच इस्लामने स्त्रियांनाही मानाचे स्थान दिले आहे. ईमान, नमाज, रोजे, जकात, हज इत्यादी स्त्रियांसाठी 
बंधनकारक आहे.
जीवनाचा उद्देश :-
अल्लाहने या सृष्टीत व्यर्थ अशी कोणतीही वस्तू निर्माण केली नाही, मग ती कितीही क्षुल्लक का असेना. मग या सृष्टीतील सर्वात महान असलेल्या मानवाची निर्मिती का व्यर्थ असेल?  कदापि नव्हे! हे जीवन प्रत्येक माणसासाठी परीक्षा आहे. साधन-सामुग्री देवून पात्रता देवून, आचार-विचारांचे स्वातंत्र्य देवून, सन्मार्ग व वाम मार्ग स्पष्ट करून येथे प्रत्येकाची वेगवेगळ्या  स्वरूपात परीक्षा घेतली जात आहे. की कोण स्वेच्छेने ईश सन्मार्गाची निवड करतो कोण वाममार्गाची निवड करतो हे जीवन खरे तर ईश अज्ञांचे अनुपालन करण्यासाठी आहे.  अल्लाहशी कृतज्ञ राहण्यासाठी आहे, कृतघ्नतेसाठी नव्हे.

प्रत्येक व्यक्ती उत्तरदायी :-
सद्य जीवन नाशिवंत असून प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. तद्वतच या संपूर्ण सृष्टिचाही एक ठराविक वेळी अंत होईल. तत्पश्चात समस्त मानवजातीला पुन्हा जीवंत केले जाईल.  न्याय-निवाडा होईल. प्रत्येकाला त्याने केलेल्या कर्मांचा जाब द्यावा लागेल. ज्यांनी ईशसंदेशाचा स्वीकार करून त्यानुसार कर्म केले, त्यांना पुरस्कृत केले जाईल व ज्यांनी ईश-संदेश  धुडकावून वाममार्ग अंगीकारला, अन्याय-अत्याचार केला व केवळ चंगळवादी जीवन जगले त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल. मृत्यू पश्चातचे हे जीवन अविनाशी, निरंतर, आनंत व  शाश्वत असेल.

पवित्र कुरआनातील या सर्वांगीण मार्गदर्शनानुसार प्रेषित मुहम्मदांनी (स.) एक आदर्श राष्ट्र निर्माण केले. कुरआन : अल्लाहने पवित्र कुरआनला दिव्य प्रकरटनाद्वारे (वह्य) प्रेषित मुहम्मदांवर (सल्ल.) अवतरित केले. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) अशिक्षित होते. त्यांना ना लिहिता येत होत न वाचता येत होते. त्यांच्या अनुयायांनी पवित्र कुरआनला मुखोदत करून व  लिपीबद्ध करून सुरक्षित ठेवले हे कार्य प्रेषितांच्या देखरेखीत त्यांच्या हयातीतच पूर्ण झाले. ज्या पवित्र कुरआनच्या आधारे प्रेषित मुहमम्मद (सल्ल.) यांनी एक आदर्श राष्ट्र उभे केले. तो  कुरआन आजही अगदी त्याच मूळ स्वरूपात, तंतोतंत जसाच्यातसा उपलब्ध आहे. त्यात यत्कींचितही हेराफेरी झाली नाही. आणि हा पवित्र संदेश अखिल मानवजातीसाठी मार्गदर्शक  आहे. जगातल्या बहुतेक भाषेमध्ये त्याची भाषांतरे उपलब्ध आहेत.

हदीस : प्रेषित मुहम्मद सल्ल. उपदेशांना हदीस म्हणून संबोधले जाते. मोठी सतर्कता व सावधगिरी बाळगून त्यांच्या अनुयायांनी हदीसचे संकलन केले. कुरआन हा ईशग्रंथ असून हदीस  हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. इस्लामच्या दृष्टीकोनातून सदाचार म्हणजे केवळ नमाज, रोजा, जकात व हज यात्राच नव्हे. तर जीवनातील प्रत्येक पवित्र कार्य हे सदाचार होय. अल्लाह  जवळ प्रार्थना आहे की, तो आम्हा सर्वांना व अखिल मानवजातीला त्याच्या नियमावरती पूर्णपणे सत्यावरती आधारित जीवन जगण्याची सद्बुद्धी देवो व पारलौकीक (मरणोत्तर) जीवनातील यश प्राप्ती होवो. आमीन! सुम्मा आमीन!

- शेख मु. जुबैर अहमद, लातूर

अर्थसंकल्पात वंचितांसाठी कोट्यवधी : मतपेरणीच्या बजटची चर्चा


वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची घोषणा करताच हे बजट निवडणुकीचे बजट सादर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. पहिल्यांदाच  धनगर समाजासाठी 1 हजार कोटी व ओबींसीसाठी 600 कोटी रूपयांची भरीव तरतूद करत असल्याची घोषणा झाल्याने ’वंचित’ंची आठवण निवडणुकीच्या तोंडावर झाल्याच्या प्रतिक्रिया  पहावयास मिळाल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजप-सेनेला घवघवीत यश मिळाले असले तरी विधानसभेला ते मिळण्याची शक्यता नाही. राज्यात वंचित  बहुजन आघाडीने उघडलेले खाते व त्यांना मिळालेला दलित, मुस्लिम, ओबीसी, धनगर या समाज घटकांचा प्रतिसाद पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची  शक्यता आहे. म्हणूनच या वंचित घटकांना गोंजारण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून मतपेरणीचे हे बजट असल्याचे बोलले जात आहे. युती सरकाच्या  पाच वर्षाच्या कालावधीत आरक्षणासाठी सर्वच समाजानी शासनाचे उंबरठे झिजविले मात्र कोणाच्या हातीच काही लागले नाही. त्यातल्या त्यात मुस्लिम आणि धनगर समाजाच्या मोर्चाची कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत हे समाज वंचित बहुजन आघाडीच्या मागे मोठ्या प्रमाणात गेले. त्यामुळे त्यांची ताकद व त्यांच्यात झालेले परिवर्तन  पाहून राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांना त्यांना गोंजारल्याशिवाय पर्यायच उरला नाही. हा रोष कमी करण्यासाठी धनगर समाजासाठी 1 हजार कोटी व अल्संख्यांकासाठी अत्यल्प 100 कोटीची  रूपंयाची तरतूद सरकारडून अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच ओबीसींचे कल्याण समोर ठेवून इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळास 200 कोटी रूपये देण्यात येत  आहेत. संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेतील मानधन दरमहा 600 वरून एक हजार रूपये करून वृद्धांना आपलेसे करण्यासाठी शासनाची धडपड दिसली आहे. तर बारा  बलुतेदारांना 100 कोटीची घोषणा करून शासनाने त्यांचेही लक्ष वेधले आहे. शासनाची नियत खरेच देणारी आहे, असे समजून या अर्थसंकल्पाचे स्वागत करून अंमलबजावणीची वाट  पाहणे, एवढेच हातात आहे.

- बशीर शेख

छावण्या प्रत्येकाच्या झाल्या आहेत. प्रत्येक छावणीचा रंग पक्का ठरलाय. गडद प्रतिके भक्कम झाली आहेत. छावणीतल्या गुलामीलाच स्वातंत्र्य समजून प्रत्येक छावणीतला समुह  आनंदित आहे. या आंधळ्या आनंदात दुसऱ्या प्रत्येक छावणीविषयी द्वेष, तिरस्कार आणि घृणा भरलेली आहे. गाववाडी, गल्ल्या शहरे, सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्था, मीडियाचे  चॅनेल्स, वर्तमानपत्रांची वर्तमानपत्रे, वॉटस्अ‍ॅप ग्रुप्स, एफबीपेजेस् सगळ्यांच रूपांतर छावण्यात झालय...
छावण्या युद्धापूर्वीच्या... युद्धानंतर... युद्ध सदृश्य! यातूनच दुरावलेपणा.. एकमेकांपासून तोहून घेण्याची वृत्ती, एकूणच अलिप्तता आणि आपलेच सगळेच खरे. असा अमानवी दृष्टीकोण  दृढ होतोय. प्रत्येक माणूस, हरेक व्यक्ती छावणी होतोय... भौतिक सुधारणांच्या पातळीवर सुखाच्या संकल्पना बदलत राहिल्या. सुखाच्या शोधात, प्रगतीच्या अनेक वाटांनी माणसाने  निसर्गाशी दुरावा केला. अपवाद म्हणून जो निसर्गप्रेम आहे त्यातही आपली छावणी पक्की कशी करता येईल याच विचारानी माणूस पछाडला. आधुनिक तंत्रज्ञान युगात संवादाच्या  साधनांचा भडीमार होत असताना माणूस विसंवादी होत राहिलाय. येणारा काळ शांततेचा आहे. शांतता युद्धपूर्व... युद्ध आतल्या आत धुमसत सुरू आहे. जातीचा तोरा, धर्माची मिजास,  प्रतिकांची बांधणी, यासाठी सत्तापिपासूपणाची भूक याच भूकेतून अफवांचे अफिम, पेरले जातेय. आपण कसे सुरक्षित, असुरक्षित या सुख भयाच्या गोष्टींना उधळले जातेय. आपल्याखाली दबून कुठली तरी दुसरी छावणी असावीच. या वरची छावणी वाट्टेल ते मांडायला, मोडायला तयार आहे. प्रत्येकाला कुणीतरी आपल्याखाली आहे याचे समाधान मिळवायचे  आहे. सुखाचा शोध सुडकौर्याने सुरूय... काळ भयाचा आहे. भय-युद्धपूर्व. युद्धाची पद्धत, रीत, शस्त्रे, नियम बदललेत... सगळेच बेधुंद, बेभान अनियमित युद्धखोर... या युद्धखोरांच्या अमाप   वाढलेल्या विषारी पिकांवर आता माणूसपणाच्या संवादाची फवारणी प्रत्येक छावणीच्या चांगल्या माणसांनी करायला हवी. स्नेहप्रेमाचा आदिम वारसा सांगत, घृणामुक्त कशा होतील  यासाठी प्रयत्नरत व्हायलाच हवे?
आगीत होरपळून निघणाऱ्या जंगलातला वणवा, ओंजळीभर पाणी शिंपण्याचे धैर्य करायलाच हवे. असले धैर्य कळकळीतून येते. कळकळीला संवेदना जिवंत ठेवावी लागेल. एफबीवर  अगदी कालच धर्मस्थळ विटाळले म्हणून शरीरावर चटके, बेदम माराची शिक्षा खाणारा छोटा मुलगा... अंगभर सर्रकन काटा आला. जीव घाबरला. तसा रोहितच्या वेळीही झाले आणि  अख्लाक मोहसीनच्या वेळी सुद्धा. डॉ. पायल तडवी असोत, डॉ. कफील अहमद. त्या छावणीचा या छावणीसाठी न्याय वेगळा आहे की न्यायच नाही? सांख्यिकी माहिती, आकडेवारीतून  छळवादाचे उदात्तीकरण किती झाले हे सहज पॅरलल मीडियातून समजेल आपल्याला. माहितीचा साठा मेंदूत होतो, तो होईलही पण संवेदना नाही मिळत विकत किंवा फुकट. ती  अंतःशक्ती आहे. तीच हरवतेय म्हणून भरभर ही शब्दमांडणी. तो मुलगा, डॉ. काफिल, पायल यांचा छळ हा कोणत्या छावणीतल्या, कोणत्या छावणीकडून अगदी फुलकोमल  नजाकतींच्या शब्दांनी मिथकांचा चपखल वापर करीत समस्त भारतीय स्त्रीयांची, मानवाची दुःखे मांडणारा लेखक जादूगर गिरीश कर्नाड... कर्नाड गेले.. आणि  लेख माहिती किस्स्यांचा  वर्षाव झाला. या वर्षावात बहुतेक छावणी पक्की! मी कुठल्याच छावणीत नाही असे म्हणणाऱ्यांची छावणी व्हायला हवी. पण शहाणपणाचा किंवा पुन्हा अहंपणाचा वाद संवाद बिघडून टाकेल.
सर्वोच्च सन्मानांनी सन्मानित होताना, अष्टपैलू व्यक्तित्व म्हणून कर्नाड यांचा मोठेपणा वादातीत. आणि मान्य... पण मी ज्या छावण्यांच्याकडे बघतोय त्या सगळ्या छावण्यातून एकाच  वेळी त्यांच्याविषयी द्वेष ही प्रेमही दिसतेय. सांस्कृतिक बांधणीचा हा जबराट घाव रंगकर्मी, नाट्य चळवळ, अशांतून गिरीश कर्नाड हे नाव ठसठशीत. छावण्या असतातच हे कळायच्या  आधीपासूनच माझ्यापर्यंत पोहोचलेले गिरीश आवलेय. प्रीयच! पण प्रीय सफदरचे काय? सफदर हाश्मीची छावणी कोणती मग? असो... आपली छावणी नाहीच.. आपण दरबदर. ऐसे  माहौल में दवा क्या है, दुआ क्या है, जहाँ कातिल ही खुद पूछे की हुआ क्या है?

ये रूत्बा बुलंद मिला जिसको मिल गया
हर मुद्दई के वास्ते दार-ओ-रसन कहां
सोमवार 17 जून, संध्याकाळी समाज माध्यमांवर अनाहुतपणे एक बातमी आली की इजिप्तचे माजी राष्ट्रपती मुहम्मद मुर्सी हे कोर्टामध्ये सुनावणीनंतर कोसळले व त्यातच त्यांचे  निधन झाले. ही बातमी इतक्या वेगाने पसरली की प्रतिक्रियांचा जणू पाऊसच पडायला लागला. यामुळे अनेक लोकांना जे मुहम्मद मुर्सी यांना ओळखत नव्हते आश्चर्याचा धक्का बसला  की कोण हे मुर्सी? ज्यांच्यासाठी एवढ्या प्रतिक्रिया येत आहेत? ते का एवढे लोकप्रिय होते? त्यांच्या निधनाची बातमी जागतिक स्तरावर का ट्रेंड करू लागली? याबद्दल जाणून घेणे  उद्बोधक ठरेल. तर चला पाहूया कोण होते मुहम्मद मुर्सी?
मुहम्मद मुर्सी एक शांत, मनमिळावू व इस्लामी विद्वान होते. ते इस्लामी जगतामध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या लोकप्रियतेला इजिप्तच्या सीमेमध्ये कैद करता येण्यासारखी स्थिती नव्हती. मुहम्मद मुर्सी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1951 रोजी इजिप्तच्या शर्किया नावाच्या गावात झाला. त्यांच्या पत्नीचे नाव नागला अली मोहम्मद आहे. त्यांना पाच मुलं  आहेत. त्यांनी काहिरा विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले होते आणि पीएच.डी. कॅलिफोर्निया विद्यापीठातून केली होती. पीएच.डी. झाल्यानंतर त्याच विद्यापीठात  त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. नासाशीही ते संलग्न होते. 1985 साली ते मायदेशी परतले आणि शर्किया शहरातील एका विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यानंतर  त्यांनी राजकारणात प्रवेश केला व 2000 ते 2005 पर्यंत इजिप्तच्या संसदेमध्ये इस्लामी ब्रदरहूड या पक्षाचे प्रतिनिधीत्व केले. 2011 मध्ये त्यांच्या नेतृत्वात फ्रिडम अ‍ॅन्ड जस्टीस  पार्टीची स्थापना झाली. जून 2012 मध्ये 51 टक्के मतं घेऊन ते इजिप्तचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी आपला मूळ पक्ष, मुस्लिम ब्रदरहूड आणि त्याची राजकीय  शाखा जस्टीस पार्टी या दोन्ही पक्षांचा राजीनामा दिला. या मागे त्यांचा उद्देश्य हा होता की, जनतेला दाखवून द्यावे की राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचा संबंध आता कुठल्या  पक्षाशी नाही तर राष्ट्राशी आहे. 30 जून 2012 रोजी त्यांचा शपथविधी झाला. इजिप्तच्या इतिहासात ही पहिली घटना होती की, लोकांनी निवडलेला राष्ट्रपती सत्तारूढ झाला होता.

इस्लामप्रिय शासक
जब साजे सलासल बजते थे
हम अपने लहू में सजते थे
वो रीत अभी तक बाकी है
ये रस्म अभी तक जारी है
मुहम्मद मुर्सी हे इस्लामी शरिया पद्धतीने देशाचा कारभार करू इच्छित होते. ही बाब त्यांनी कधीही लपवून ठेवली नाही. उलट संयुक्त राष्ट्राच्या आम सभेमध्ये आपल्या भाषणातून  त्यांनी आपल्या या भूमिकेचा स्पष्ट उच्चार केला. त्याच दिवशी ते अमेरिका आणि इजराईलच्या नजरेत आले. इजराईलच्या अत्याचाराने पीडित गाजामधील पॅलेस्टिनीयन नागरिकांशी ते  उघड सहानुभूती ठेऊन होते. गाजामध्ये लोकातून निवडून आलेल्या मात्र इजराईल व अमेरिकेच्या लेखी आतंकवादी असलेल्या हमास या पॅलेस्टिनीयन संघटनेशी त्यांची जवळीक होती.  हीच बाब इजराईलला स्वस्त बसू देत नव्हती. सत्तेत आल्या-आल्या त्यांनी इजिप्तची सीमा पॅलिस्टीनी नागरिकांसाठी खुली केली होती. ज्यामुळे पॅलिस्टीनी नागरिक विजा आणि  पासपोर्ट शिवाय इजिप्तमध्ये येवून औषधी आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन जात होते. त्यामुळे इजराईलने गाजाची केलेली कोंडी निष्प्रभ ठरण्याची भीती निर्माण झाली. त्यांच्या  नेतृत्वाखाली इजिप्त आणि पॅलेस्टीन दोन्ही दृढ होत असल्याचे पाहून इजराईल कमालीचा नाराज झाला. जेमतेम एक वर्षाचा कालावधी उलटला नाही तोच इजराईल, अमेरिका आणि  सऊदी अरब यांनी इजिप्तचे लष्कर प्रमुख अब्दुल फतेह अल सीसी याच्या नेतृत्वाखाली मुर्सी विरोधकांना रसद पुरविण्यास सुरूवात केली आणि देशात अशांततेचे वातावरण निर्माण  केले. 30 जून 2013 रोजी त्यांच्या शासनाला एक वर्ष पूर्ण होत असतांना त्याच दिवशी उठाव करून त्यांना पदच्युत करण्यात आले व 3 जुलै 2013 रोजी सैन्याने सत्ता काबीज केली  आणि मुहम्मद मुर्सी आणि त्यांच्या साथीदारांना तुरूंगात डांबण्यात आले. 50 पेक्षा जास्त मुस्लिम ब्रदरहुडच्या नेत्यांच्या कत्तली करण्यात आल्या. मुहम्मद मुर्सींना सहानुभूती मिळेल  या भीतीने जामेअ अजहर (काहिरा विद्यापीठा) ला सैन्याने ताब्यात घेतले आणि विद्यापीठाच्या प्रमुख मुफ्तीकडून जबरदस्तीने नवीन सत्ताधाऱ्यांच्या समर्थनार्थ फतवाही घेण्यात  आला. मुहम्मद मुर्सीसह 12 प्रथम पंक्तीच्या इक्वानी नेत्यांवर जवळ-जवळ अर्धा डझन खटले दाखल करण्यात आले. हमासशी संबंध ठेवण्याच्या आरोपाखाली व त्यांच्या मदतीने  इजिप्तमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 21 एप्रिल 2012 ला राष्ट्रप्रमुखांच्या निवासस्थानासमोर दंगा फैलावणाऱ्या मदत करण्याच्या  आरोपाखाली 20 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय, तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न आणि इतर आरोपाखाली त्यांच्यावर खटल्यांची श्रृंखला सुरू करण्यात आली.
12 जून 2015 ला इजिप्तच्या सर्वोच्च न्यायालयाने मुर्सी यांना खालच्या न्यायालयाने दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. जरी मृत्यूदंड झाला असला तरी त्याची अमलबजावणी करण्याचे धाडस राष्ट्रपती अब्दुल फतेह अलसिसी याला करता आले नाही. त्यांना फाशी दिल्यास जनतेचा कधीही न शमणारा रोष सुरू होईल, या भितीने मुहम्मद मुर्सी  यांना लागणारी औषधे बंद करण्यात आली. ज्यामुळे त्यांची प्रकृती औषधाअभावी दिवसेंदिवस खालावत गेली आणि 17 जूनला सुनावणीनंतर ते कोसळले ते पुन्हा उठलेच नाहीत.  येणेप्रमाणे मुर्सी यांची शासनमान्य हत्या करण्यात आली. मुहम्मद मुर्सी यांनी तुरूंगामध्ये कुरआनची प्रत मागितली होती. त्यांना ती सुद्धा उपलब्ध करून दिली गेली नाही. ते स्वतः हाफिज-ए-कुरआन होते. त्यामुळे दिवसभर ते कुरआनचे पठण करत आपला कालकोठडीतला वेळ घालवत होते. त्यांना फक्त कुरआनच्या प्रतीला स्पर्श करण्याची इच्छा होती ती सुद्धा  राष्ट्रपती सीसी यांनी पूर्ण होऊ दिली नाही. कुरआनला स्पर्श न करताच त्यांचे निधन झाले. निधनानंतर पत्नी, चार मुलं, दोन भाऊ आणि एक मौलवीला अंत्यविधीसाठी उपस्थित  राहण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या पत्नीला मुर्सी यांचा चेहरा पाहण्याची सुद्धा परवानगी नाकारण्यात आली. यावरून सरकार किती घाबरलेले होते याचा अंदाज वाचकांना होईल.

इक्वानुल मुस्लिमीन अर्थात मुस्लिम ब्रदरहुड
दो आलम से करती है बेगाना दिल को
अजब चीज है लज्जत-ए-आशनाई
शहादत है मतलूब-ओ-मक्सूद-ए-मोमीन न माल-
ए-गनीमत ना किश्वर कुशाई
इक्वानुलू मुस्लिमीन ही एक सुन्नी मुस्लिमांची जगातील सर्वात मोठी संघटना आहे, जिची स्थापना पेशाने शिक्षक असलेल्या हसन अल बन्ना यांनी मार्च 1928 साली इजिप्तमध्ये केली  होती. सुरूवातील या संघटनेचे स्वरूप सामाजिक होते. गरीबांची मदत करणे, त्यांना स्वास्थ सुविधा पुरविणे, स्वस्त धान्याची दुकाने चालविणे, माफक दरात उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्या  शाळा- महाविद्यालय चालविणे, रक्तपेढ्या सुरू करणे, रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे, माफक दरात इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे व ही सर्व कामे जी सरकारने  करायला हवीत ती इक्वाननी केली. ही सर्व सेवा करत असतांना इक्वाननी इस्लामी नैतिकतेची कास कधीही सोडली नाही. त्यामुळे इजिप्तच नव्हे तर खाडीच्या इतर अरब देशांमध्ये  सुद्धा मुस्लिम ब्रदरहुडची लोकप्रियता पाहता-पाहता वाढली.
मुस्लिम ब्रदरहुडचे संपूर्ण नाव ’ए सोसायटी ऑफ इस्लामिक ब्रदर्स’ असून, अरबी भाषेमध्ये याला ’अल-इक्वानुल - मुस्लिमीन’ म्हटले जाते. इजिप्तच्या इस्माईलिया शहरात मार्च 1928  मध्ये या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेचे मुख्यालय काहिरामध्ये असून मध्यपूर्वेच्या जवळ-जवळ सर्वच देशांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. सुरूवातीच्या काळात वैयक्तिक व  सामुहिक जीवनामध्ये इस्लामी नैतिकतेचे पालन करणे एवढाच मर्यादित उद्देश संघटनेचा होता. मात्र अल्पावधीतच मिळालेल्या लोकप्रियतेतूनच जनतेच्या दबावामुळे संघटनेने राजकीय  स्वरूपधारण केले व इजिप्तची सत्ता हातात घेऊन शुद्ध इस्लामी तत्वांवर लोक कल्याणकारी शासन उपलब्ध करून देण्याचा प्रण केला. हा तो काळ होता ज्या काळात इजिप्तवर  ब्रिटिशांची सत्ता होती. इक्वानचा ब्रिटिश आणि ज्यू लोकांना असलेला विरोध पाहता ब्रिटिश सरकारने इक्वानला प्रतिबंधित केले. मात्र प्रत्यक्षात या संघटनेचा स्वातंत्र्य लढा सुरूच  राहिला. परिणामी, 1952 साली इंग्रजांना हा देश सोडावा लागला व देशाची सुत्रे गमाल अब्दुल नासर यांच्या हातात आली, तेव्हा इक्वानचा शरिया कायदा लागू करण्याचा दबाव  सरकारवर वाढला. तेव्हा चिडून नासर यांनी फेब्रुवारी 1949 मध्ये गुप्तचरांमार्फत इक्वानचे संस्थापक हसन अल बन्ना यांची हत्या घडवून आणली. त्यानंतर 1954 मध्ये इक्वानी  कार्यकर्त्यांकडून राष्ट्रपती नासर यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पुन्हा इक्वानवर प्रतिबंध लादण्यात आले व हजारो कार्यकर्त्यांची धरपकड झाली. तेव्हा इक्वानला भूमिगत  व्हावे लागले. मात्र त्यांच्याच समर्थनाने अन्वर सादात यांनी 1970 साली राष्ट्रपती पद मिळविले. सातत्याने इस्लामी मुल्यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच इक्वान आणि सादात यांच्यात  वितुष्ट निर्माण झाले. सादात नंतर होस्नी मुबारक सत्तेत आले ते 2011 पर्यंत सत्तेत राहिले. त्यांनीही अमेरिका आणि इजराईलच्या कलाने तीन दशकांपेक्षा जास्त सत्ता भोगली.  इजराईलच्या हिताचा प्रत्येक निर्णय मुबारक यांनी घेतला. त्यांच्या काळात ही इक्वानवर सातत्याने अत्याचार झाले.
2011 साली इजिप्तच्या ऐतिहासिक तहेरीर चौकात सुरू झालेल्या इक्वानप्रणित मुबारक हटाव आंदोलन, ज्याला अरब स्प्रिंगही म्हटले जाते ने जोर धरला. त्यामुळे होस्नी मुबारक यांना  सत्ता सोडावी लागली व त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मुहम्मद मुर्सी निवडून आले. केवळ शुद्ध इस्लामवर आधारित सत्ता इजिप्तमध्ये टिकल्यास भांडवलशाही लोकशाहीला तो  सशक्त पर्याय असल्याचे सत्य जगाच्या लक्षात येईल, या भितीतून मुर्सी यांची संस्थागत हत्या करण्यात आली. मात्र समाजमाध्यमातून जे वादळ उठले त्यावरून इक्वान ही आजही  जगात लोकप्रिय मुस्लिम संघटना असल्याचे सत्य अधोरेखित झालेले आहे. मुहम्मद मुर्सी यांची गायबान-ए-नमाज-ए-जनाज़ा जगामध्ये इतक्या ठिकाणी अदा करण्यात आली की, त्याची  तुलना 21 व्या शतकात आत्तापावेतो मृत्यू पावलेल्या कुठल्याही व्यक्तीशी करता येणार नाही. यातच सर्वकाही आले.

वसमत
 उपवास शारीरिकदृष्ट्या खूप चांगले असतात. त्यामुळे शरीर सदृढ व निरोगी बनण्यास मदत होते, असे प्रतिपादन डॉ.दिग्रस मॅडम यांनी व्यक्त केले. ते जमाते इस्लामी हिंद महिला शाखा व जीआयओ वसमत यांच्या संयुक्त विद्यमानाने मार्कंडेय समाज मंदिर परिसरात आयोजित ईद मिलन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून रेखा सिताराम म्यानेवार, डॉ. मसारे मॅडम, डॉ. वैशाली दिग्रसे मॅडम, डॉ. खराटे मॅडम,सौ. क्यातमवार मॅडम व इतर महिला मंडळ उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक आएशा पठाण यांनी रमजान व ईद बद्दल मार्गदर्शन करताना सांगितले की, रोजा किंवा रमजान हे फक्त उपाशी राहण्याचे नाव नसून आत्मचरित्र निर्माण करण्यासाठी अनिवार्य करण्यात आले आहे. या दरम्यान जकात, सदका, फित्रा याद्वार समाजातील गरिबांना लाभ देवून गरीबी निर्मुलनाचा प्रयत्न केला जातो. श्रीमती पवार मॅडम म्हणाल्या, ईद मिलनसारख्या कार्यक्रम समाजातील दूरी संपविण्यासाठी आवश्यक आहे. इस्लाम धर्माची शिकवण इतर धर्मीयांना तसेच इतर धर्माबाबत मुस्लीम लोकांना माहिती व्हावी, परस्पर सामंजस्य निर्माण होणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमांद्वारे माहितीचे आदानप्रदान होते. कार्यक्रमाच्या आयोजना नगरसेवक सिताराम ज्ञानेश्‍वर साहेब व दुर्गा देवी मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी जमात-ए-इस्लामी हिंद महिला शाखेच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले.

मानवी संस्कृतीमध्ये नैतिकता, सभ्यता, समजदारपणा, भल्या-बुऱ्याची जाण, सद्सद्विवेकबुध्दी, हे विचार समाविष्ट करीत पूर्वापार जीवनाची वाटचाल होत राहिलेली आहे. मात्र सध्या  अवती-भवती सातत्याने घडणाऱ्या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थिती निर्माण केली आहे. जम्मूमधील कथुआ येथे एका अल्पवयीन  बालिकेवर झालेले अनन्वित अत्याचार, बलात्कार आणि खून प्रकरणात नुकतीच तिघांना जन्मठेपेची तर आणि या आरोपींना वाचवण्यासाठी सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या तिघा पोलिसांना  पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकारातील पीडित बालिका बाकरवाल या भटक्या, गुराखी समाजातील होती. या समाजाला कठुआतून हुसकावून लावण्यासाठी हे  नृशंस कृत्य करण्यात आले, असे पोलिसांनी सप्रमाण सिद्ध केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी सांझीराम एका देवस्थानाचा प्रभारी आहे. अवघ्या आठ वर्षांच्या बालिकेवर- तिचा  हरवलेला घोडा शोधून देण्याचे आमिष दाखवून- देवस्थानातच डांबून ठेवले गेले आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला गेला. बेशुद्धीचे औषध पाजले गेले आणि हालहाल करून मारण्यात  आले. ‘जंगलचा कायदा प्रचलित असल्यासारखेच या प्रकरणातील आरोपी वागले’ असे उद्गार न्यायाधीशांनी काढले, त्याला ही पाश्र्वभूमी आहे. या शिक्षेमुळे त्या अजाण बालिकेला न्याय  मिळाला, असे बिलकूलच म्हणता येणार नाही अथवा हा विषय नजरेआड करता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे या प्रकरणात जे काही घडले आहे ते आज आठवले की या  एकविसाव्या शतकात ‘मुलगी शिकली, प्रगती झाली!’ असे निव्वळ फलक लावण्याचे देखावे करणारा हा समाज महिलांच्या सन्मानाची कशी धुळधाण करतो, तेच स्पष्ट होते. कथुआ येथे  ही घृणास्पद घटना घडली, त्याच सुमारास उत्तर प्रदेशातील उन्नाव; तसेच गुजरातेतील सुरत आदी ठिकाणीही लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या आणि त्यामुळे  देशभरात संतापाची लाट उसळली. असे काही झाले, की राज्यकर्ते कायद्यातील तरतुदी बदलण्याच्या मागे लागतात. याहीवेळी तसेच घडले. मोदी सरकारने अल्पवयीन मुलींवरील  बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा केला. केंद्रीय गृह खात्याने २०१६ नंतर ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्यूरो’चा अहवालच प्रसिद्ध होऊ दिलेला नाही. त्यामुळे गेल्या  तीन वर्षांत अशा अत्याचाराची किती प्रकरणे घडली आणि तेव्हा नेमके काय घडले, याचा तपशील उपलब्ध नाही. मात्र, हा निकाल आला, नेमक्या त्याच सुमारास अलीगड येथे एका  तीन वर्षांच्या बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिचा बळी घेतल्याची घटना उजेडात आली आहे. उत्तर प्रदेशबरोबरच मध्य प्रदेशातही अशा काही घटना घडल्या आहेत. पीडितांना  न्याय मिळेल का याविषयी संदेह वाटल्याने खटलाही जम्मू-काश्मीरबाहेर पंजाबमध्ये (पठाणकोट) वर्ग करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाला द्यावा लागला. प्रत्येक स्तरावर समाजातील  दुभंगरेषा किती ठळक होऊ लागल्या आहेत, याची अस्वस्थ करून सोडणारी जाणीव कठुआ प्रकरणाने करून दिली. जिवाचे भय वाटल्याने पीडित मुलीच्या गरीब आईवडिलांना आणि  दत्तक पालकांना (मुलीचे मामा) कठुआ सोडून दूर कारगिलमध्ये जावे लागले. या प्रकरणाच्या निमित्ताने अल्पवयीन मुलांवरील बलात्काराचा मुद्दाही गांभीर्याने समोर आला. गेल्या पाच   वर्षांमध्ये या प्रकारांमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. एका आकडेवारीनुसार, एकूण बलात्कार पीडितांपैकी जवळपास ४० टक्के अल्पवयीन असतात आणि त्यांतही जवळपास अध्र्या  प्रकरणात १५ वर्षांखालील मुली या पीडित ठरलेल्या आहेत. कथुआतील घटनेला आणखी एक पदर होता आणि तो धार्मिक विद्वेषाचा. या प्रकरणानंतर आरोपींच्या समर्थनार्थ झालेल्या  मेळाव्यात जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन संयुक्त सरकारमधील भारतीय जनता पक्षाचे दोन मंत्री सामील झाले होते. त्याचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर अखेर भाजपला त्यांचे राजीनामे  घ्यावे लागले होते. आता अलीगडमधील अशा घटनेलाही तसाच रंग देण्याचा प्रयत्न होत असून, तो अत्यंत अश्लाघ्य असाच आहे. या साऱ्या पाश्र्वभूमीवर खऱ्याअर्थाने खंबीर भूमिका  घ्यायला हवी ती समाजानेच. वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे, असे  म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. बलात्कारासारखे अमानवीय कृत्य करणारे नराधम राक्षसी वृत्तीचे आहेतच..त्यांना रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहेच. मात्र  कुठल्याही नीती-नियमाची पर्वा न करता बलात्कारासारख्या जधन्य आरोपातील आरोपींच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरणारी झुंडशाही मनोवृत्तीही अत्यंत घातक म्हणावी लागेल.  अत्याचारांचा हा कुरूप आलेख नुसता देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा नाही तर माणसाच्या माणूसपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे याला कुठेतरी आवर घातला   गेला पाहिजे. माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावे लागतील. विकृतीने बेभान झालेला माणूस जर असाच नृशंसतेचा कडेलोट करत राहिला तर मानव समाज  मानवी मूल्यांच्या ऱ्हासाच्या तळाशी जाईल, यात शंका नाही.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

ह. जाबीर (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वोत्कृष्ट वाणी अल्लाहचा ग्रंथ (कुरआन) आणि सर्वोत्कृष्ट चारित्र्य मुहम्मद (स.) यांचे चारित्र्य होय.’’  (हदीस - मुस्लिम)
मा. अनस (रजी.) यांचे निवेदन आहे, मला प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘हे माझ्या प्रिय मुला! जर तू अशाप्रकारे जीवन पार पाडू शकशील की, तुझ्या मनात कोणाचे अनिष्ट चिंतन  नसावे तर असेच जीवन व्यतीत कर. मग फर्माविले, ‘‘आणि हीच माझी पद्धती आहे. (की माझ्या मनात कोणासाठी खोट नाही) आणि ज्याने माझ्या आचरण शैलीशी प्रेम राखले तर  नि:संशय त्याने माझ्याशी प्रेम राखले आणि ज्याने माझ्याशी प्रेम राखले, तो जन्नतमध्ये माझ्या सोबत राहील. (हदीस - मुस्लिम)

प्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे....
मा. अब्दुल्ला यांचे निवेदन आहे की, एक मनुष्य प्रेषित (स.) यांच्याजवळ आला आणि तो प्रेषित (स.) यांना म्हणाला, ‘‘मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘जे  तुम्ही बोलता, त्यावर विचार करा. त्याने तीन वेळा म्हंटले की ईश्वराची शपथ, मी तुमच्याशी प्रेम राखतो. यावर प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तुम्ही आपल्या  बोलण्यात सच्चे असाल तर दारिद्र्य आणि तंगीचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रे जमा करा. जे लोक माझ्याशी प्रेम राखतात, त्याच्या दिशेने गरीबी, भूक, तंगी, पुरापेक्षा जास्त वेगाने  सरसावून येतात. (हदीस - तिर्मिजी)

भावार्थ
एखाद्याशी प्रेम करणे व त्याला प्रिय बनविण्याचा अर्थ काय असतो? हाच की त्याच्या पसंतीस आपली पसंत, आणि त्याच्या नापसंतीस आपली नापसंत ठरवून घेणे. ‘प्रिय’ ज्या  मार्गावरून चालतो त्यास आपला जीवनमार्ग बनवावे. त्याच्या सानिध्यासाठी, प्रसन्नतेसाठी सर्वस्व अर्पण केले जावे. आणि बलिदानासाठी, प्राणार्पण करण्यासाठी सदैव तत्पर असावे.  प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ त्यांचे एक एक पाऊलचिन्ह व प्रत्येक मार्ग चिन्ह जाणून घ्यावे व त्यानुसार चालावे. प्रेषित (स.) यांनी ज्या मार्गात आघात सहन  केले, त्या मार्गात आघात सोसण्याचा दृढ संकल्प केला जावा. ‘गारे हिरा’ ही प्रेषित (स.) यांचा मार्ग आहे आणि ‘बद्र व हुनेन’ देखील त्यांचा मार्ग आहे. सत्य धर्माच्या मार्गावर  चालण्याचा परिणाम स्रfरद्र्य, तंगी, उपासमार, इत्यादि गोष्टीचा मारा होईल. आर्थिक आघात हा सर्वात मोठा आघात आहे. याचा मुकाबला फक्त अल्लाहवर भरवसा आणि अल्लाहशी  प्रेमाने केला जाऊ शकतो. इमानधारक मनुष्य अशा वेळी हा विचार करतो की अल्लाह माझा कार्यसाधक आहे. तो माझा पाठीराखा आहे. मी निराधार नाही, आणि शेवटी मी एक गुलाम  आहे. गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीनुसार चालणे, अशा प्रकारचे विचार करणे प्रत्येक संकटाला सोपे करते. सैतानाच्या प्रत्येक शस्त्राला निष्काम  करून टाकते. प्रेषित (स.) यांनी असे सांगितले की, ‘‘तुमच्यापैकी कोणताही मनुष्य (अपेक्षित दर्जाचा) ईमानधारक होऊ शकत नाही, जो पर्यंत मी त्याच्या नजरेत, त्याचा पिता, त्याचे  पूत्र, आणि सर्व माणसापेक्षा अधिक प्रिय न व्हावे. (हदीस - बुखारी, मुस्लीम)
मनुष्य इतर सर्वांचे प्रेम आणि निकडींना बाजूला सारून केवळ प्रेषित (स.) यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यास तयार होईल, तेव्हा समजून घ्या की तो खऱ्या अर्थाने मोमीन  (ईमानधारक) आहे.

(१२०) तो या लोकांना अभिवचन देतो आणि यांना आशा दाखवितो,१४९ परंतु शैतानाची सर्व अभिवचने फसवणुकीशिवाय दुसरे काहीच नाही.
(१२१) या लोकांचे ठिकाण नरक आहे ज्यातून सुटकेचा कोणताही मार्ग यांना सापडणार नाही.
(१२२) उरले ते लोक ज्यांनी श्रद्धा ठेवली व सत्कृत्ये केली तर त्यांना आम्ही अशा उद्यानात दाखल करू ज्यांच्या खालून कालवे वहात असतील आणि ते तेथे सदासर्वदा राहतील. हे  अल्लाहचे सत्यवचन आहे, आणि अल्लाहपेक्षा आपल्या वचनात अन्य कोण सच्चा असू शकतो?
(१२३) कर्मफळ तर तुमच्या इच्छेवरही अवलंबून नाही व ग्रंथधारकांच्या इच्छेवरदेखील नाही, जो कोणी दुष्कर्म करील त्याचे तो फळ भोगील आणि अल्लाहविरूद्ध त्याला कोणी समर्थक  व सहाय्यक लाभणार नाही
(१२४) आणि जो कोणी सत्कृत्य करील मग तो पुरुष असो अथवा स्त्री जर तो श्रद्धावंत असेल तर असेच लोक स्वर्गामध्ये दाखल होतील आणि त्यांचा हक्क यत्किंचितदेखील हिरावून घेतला जाणार नाही.
(१२५) त्या माणसापेक्षा अन्य कोणाची जीवनपद्धती उत्तम असू शकते ज्याने अल्लाहसमोर मान तुकविली आणि आपली वर्तणूक चांगली राखली आणि एकाग्र होऊन इब्राहीम (अ.) च्या  पद्धतीचे अनुकरण केले, त्या इब्राहीम (अ.) च्या पद्धतीचे ज्याला अल्लाहने आपला मित्र बनविला होता.
(१२६) आकाशांत व पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाहचे आहे१५० आणि प्रत्येक वस्तू अल्लाहने व्यापिली आहे.१५१
(१२७) लोक तुमच्याकडे स्त्रियांसंबंधी आदेश (फतवा) विचारतात१५२ सांगा, अल्लाह तुम्हाला त्यांच्यासंबंधी आदेश देतो आणि त्याचबरोबर त्या आदेशांची आठवण करून देतो जे  पूर्वीपासून तुम्हाला या ग्रंथात ऐकविले जात आहेत,१५३ अर्थात ते आदेश जे त्या अनाथ मुलींसंबंधी आहेत ज्यांचे हक्क तुम्ही अदा करत नाही१५४ आणि ज्यांच्याबरोबर विवाह   करण्यापासून दूर राहता (अथवा लालसेपोटी तुम्ही स्वत: त्यांच्याशी विवाह करू इच्छिता),१५५ आणि ते आदेश जे त्या मुलांविषयी आहेत जे बिचारे काहीच बळ राखत नाहीत,१५६  अल्लाह तुम्हाला आदेश देतो की अनाथांसाठी न्यायावर दृढ राहा आणि जे काही चांगले तुम्ही कराल ते अल्लाहच्या माहितीपासून गुप्त राहणार नाही.





१४९) शैतानाचे सर्व व्यवहार हे आशा आणि वायद्यांवर चालत असते. शैतान मनुष्याला व्यक्तीश: किंवा सामूहिकरित्या एखाद्या चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ इच्छितो तेव्हा मनुष्यापुढे  एक निराधार आशा ठेवतो. कोणाला वैयक्तिक आनंद आणि सफलतेची आशा देतो, कोणाला राष्ट्रीय उत्थानाची अभिलाषा तर कुणाला मानवजातीच्या कल्याणाचा विश्वास तर कोणाला  सत्यापर्यंत पोहचण्याच्या दृढ विश्वासाचे गाजर दाखवितो. कोणाला हा शैतान पटवून देतो की अल्लाहचे अस्तित्व कोठे आहे किंवा परलोक कोठे आहे? तुम्हाला तर मरून मातीच व्हायचे  आहे. शैतान लोकांच्या मनात विश्वास सदृढ करतो की परलोक असला तरी त्याच्या पकडीतून अमुक बाबाच्या कृपादृष्टीने किंवा अमुक अमुकामुळे सुटका होईल. तात्पर्य जो कोणी ज्या  आशेवर आणि खोट्या वचनांवर धोका खातो, त्याच्यासमोर तेच ठेवतो आणि गळाला अटकवतो.
१५०) म्हणजे अल्लाहपुढे स्वत:ला समर्पित करणे आणि उदंडता आणि मनमानीपासून स्वत:ला रोखून धरणे. हाच सर्वांपेक्षा जास्त चांगला मार्ग आहे आणि वास्तविकतेच्या अगदी  अनुकूल आहे. अल्लाह जमीन व आकाशांचा व त्यांच्यातील सर्व वस्तूंचा मालक आहे. म्हणून मनुष्यासाठी सत्यवर्तन तर हे आहे की त्याच्या (अल्लाहच्या) उपासनेसाठी आणि  आज्ञाधारकेसाठी तत्पर व्हावे आणि उदंडता सोडावी.
१५१) म्हणजे मनुष्य अल्लाहपुढे स्वत:ला समर्पित करत नाही तसेच स्वच्छंदता आणि उदंडतेपासून दूर राहात नाही तर असा मनुष्य अल्लाहच्या पकडीतून कधीही सुटू शकत नाही.  अल्लाहचे सामथ्र्य त्याला चोहोकडून घेरून आहे.
१५२) येथे हे स्पष्ट केले गेले नाही की स्त्रियांविषयी लोक कोणता धर्मादेश (फतवा) विचारत होते. परंतु आयत १२८ ते १३० मध्ये जो धर्मादेश दिला आहे, त्यावरून प्रश्नाचे स्वरुप त्वरित कळून येते.
१५३) विचारले गेलेल्या मूळ प्रश्नाचे हे उत्तर नाही तर लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यापूर्वी अल्लाहने त्या आदेशांच्या पालनासाठी पुन्हा जोर दिला आहे जे याच अध्यायाच्या प्रारंभी  अनाथ मुलींच्या बाबतीत मुख्यत: आणि अनाथ मुलांविषयी सामान्यत: देण्यात आले आहेत. यावरून स्पष्ट होते की अल्लाहच्या दृष्टीत अनाथांच्या हक्कांना फार महत्त्व आहे.
१५४) संकेत त्या आयतकडे आहे ज्यात म्हटले गेले आहे, ``जर अनाथांशी अन्याय होण्यापासून भीत आहात, तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील..........'' (कुरआन ४ :३)
१५५) `तर्ग़बुन अन् तन् किह हुन -न' चा हासुद्धा अर्थ होतो, ``तुम्ही त्यांच्याशी विवाह करण्यात रूची ठेवता'' आणि असासुद्धा अर्थ होतो, ``तुम्ही त्यांच्याशी विवाह करण्यास इच्छुक  नाहीत.'' माननीय आएशा (रजि.) याविषयी तपशील देतात, ``ज्यांच्या जबाबदारीमध्ये अशा अनाथ मुलीचे संगोपण होते आणि ज्यांच्याकडे आईवडिलांनी सोडलेली संपत्ती ठेवलेली असे,  ते या मुलींवर अनेक प्रकारचे अत्याचार करीत असत. जर मुलगी श्रीमंत आणि सुंदर असेल तर ते स्वत: तिच्याशी विवाहबद्ध होण्यास इच्छुक असत. महेर आणि उदरनिर्वाह भत्ता न  देता तिच्या संपत्तीपासून व सौंदर्याचा गैर प्रकारे फायदा उठवित. ती मुलगी जर कुरूप असेल तर स्वत:सुद्धा लग्न करीत नसत आणि दुसऱ्यालासुद्धा तिच्याशी लग्न करू देत नसत   जेणेकरून त्या मुलीच्या हक्कांची (संपत्तीची) मागणी दुसऱ्याने कधीही करू नये.
१५६) त्या आदेशांकडे संकेत आहे जे याच सूरहच्या १ ते १० आयतीमध्ये अनाथांच्या हक्कांविषयी दिले आहेत.

डॉ.अलीम शेख यांचा गौरव : रूग्णाने केला अनोखा सत्कार

लातूर (सालार शेख)
माणुसकीचे नाते प्रत्येकाने आपल्या मनात ठेउन गरजवंतांना सहकार्य केले तर नक्कीच मानवकल्याणाचे हित साधता येते. निःस्वार्थपणे केलेल्या सेवेचा मोबदला न मागता ईश्‍वराकडून मिळत असतो. याची प्रचिती 9 जून रोजी लातुरात आली.
    लातूर येथील कव्हा नाका येथे डॉ. अलीम शेख (बीएएमएस) यांचे रोशन क्लिनिक आहे. डॉ. शेख हे प्रत्येक रूग्णास बरा करण्याचे अटोकाट प्रयत्न करतात. अशावेळी रूग्णांकडे पैसे नसले तरी ते उपचार करण्याचे सोडत नाहीत. माणुसकी जपणे त्यांच्यातील अंगभूत गुण. शहराच्या जवळच असलेल्या कव्हा येथील एका रूग्णास त्यांनी वर्षानुवर्षे विनामुल्य वैद्यकीय सेवा दिली. या रूग्णानेही डॉक्टरांचे ऋण फेडले पाहिजे, ही मनोभावना मनात ठेवून पैसे येताच ईद मुबारक म्हणत डॉक्टरच्या अख्या कुटुंबाला भरआहेर व डॉक्टरांना सोन्याची अंगठी केली़
    कव्हा येथील सीताबाई सारगे यांची परिस्थिती जेमतेम होती़ त्यांनी आपल्या संधीवातावरील उपचारासाठी मोठ्या शहरात जाण्याचा सल्ला दिला जात होता़ अशावेळी लातूर शहरातील कव्हा नाका स्थित रोशन क्लिनिकचे डॉ़ अलीम इस्माईल शेख यांनी विनामुल्य एक दोन वेळा नव्हे तर वर्षानुवर्षे उपचार केले़  शेवटी त्या आजारातून बर्‍या झाल्या़ त्यांनी डॉक्टरांची आठवण ठेवली़ सीताबाई यांची जमीन शेततळ्यात गेली होती़ त्याचे पैसे येताच सीताबाईंनी ईदचे औचित्य साधून डॉक्टरांच्या कुटुंबाला भर आहेर करून सोन्याची अंगठी दिली़
    यावेळी रूग्ण सीताबाई सारगे पुढे म्हणाल्या, मला मृत्यूच्या दाडेतून डॉ़ अलीम यांनी बाहेर काढले़  मी गंभीर आजारी असताना बर्‍याच डॉक्टरांकडे गेले़ मात्र त्यांनी माझ्यावर उपचार करण्याऐवजी सोलापूर, हैद्राबाद, मुंबई आदी ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. माझे कुटुंब घाबरून गेले होते़ अशात डॉ़ अलीम शेख यांना दाखविण्याचा सल्ला मिळाला़ आम्ही त्यांच्याकडे गेलो़ त्यावेळेस त्यांनी आजार व त्यासंबंधीची संपूर्ण माहिती घरच्यांना दिली़ डॉ़ अलीम यांच्या उपचारामुळे मी बरे झाले़  आमची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती़ कधी कधी उपचाराला पैसे नसायचे़ डॉ़ अलीम हे स्व:खर्चाने औषधी गोळ्या द्यायचे़ कधी त्यांनी पैशाअभावी उपचार करायचे सोडले नाही़ त्यांच्या सर्व कुटुंंबांनी माझी सेवा केली़ आज आजारपणातून बरे झाले आहे़ माझ्या कुटुंबाने डॉ़ अलीम शेख यांचा सहकुटुंब सत्कार करायचे ठरवले व आज सत्कार करून मला फार आनंद झाल्याचे सीताबाई सारगे म्हणाल्या़ यावेळी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर म्हणाले, निस्वार्थ भावनेने केलेली सेवा सर्वकाळ लक्षात राहते़ डॉ़ शेख यांचा लौकिक मी ऐकून आहे़ आज रूग्णांची डॉक्टरांप्रती असलेले प्रेम पाहून फारच आनंद झाला़     या सत्कार सोहळ्याला नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, नीळकंठ पवार, नेताजी मस्के, सालार शेख, मुलगा गोपाळ सारगे, मुलगी मंगल इर्ले, नदीम शेख, सद्दाम शेख, आबेद पठाण, शोएब शेख, इस्माईल शेखसह परिसरातील नागरिक उपस्थित होते़

आपण ज्या घरात वास्तव्य करतो त्या घराला घरपण स्त्रीच बहाल करते. एखाद्या व्यक्तीची साधी झोपडी आहे, तिला घरपण एक सुशील सुसंस्कृत स्त्री निर्माण करून देते, तर एखाद्या महालरूपी घराला संस्कारहीन स्त्री ’घर’ राहू देत नाही. म्हणून घराचे घरपण निर्माण होते ते स्त्रीमुळे आणि घरपणाचे अस्तित्व संपुष्टात येते तेदेखील स्त्रीमुळेच. पण इस्लाम सांगतो की स्त्रीने घराला घरपण बहाल केलेच पाहिजे आणि ते तिचे कर्तव्य आहे. एखादे घर बाहेरून प्रचंड शोभिवंत असेल, पण आतमध्ये वास्तव्य करणारे जर सैतानी वृत्तीचे असतील तर त्याला घर म्हणता येत नाही. म्हणून घर म्हणजे नेमके काय आणि ते कोणामुळे निर्माण होते याविषयी थोडे पाहू या.
    ”घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
    तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती.”

    या काव्यपंक्तीवरून चार भिंतीचे घर होत नाही तर त्याच घराची माया, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, स्नेह यांचा वावर असायला पाहिजे. पोकळ नाती असून त्याचा काहीही उपयोग नाही. त्या नात्यांमध्ये प्रेमाची उब असायला हवी. ज्या घरात प्रेमाची उब मिळत नाही, वात्सल्याची शितलता सुखावत नाही, नात्यांतील स्नेह जाणवत नाही, जिव्हाळ्यातील गोडवा सुखवत नाही, त्याला घर कसे म्हणायचे? घर भिंती बांधल्याने तयार होत नाही, तर घर त्या घरातील स्त्रिया आणि त्यांच्या नातेवाईकांशी असणार्‍या सद्वर्तनाने तयार होते. कारण पूर्णवेळ घराची देखभाल करणारी मुख्य स्त्री घराच्या संसाराचा कणा असते. जसा माणूस त्याच्या पाठीच्या कण्यावर उभा असतो, तसा संसाराचा कणा स्त्री आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीच्या कण्याचा आजार झाला तर ती व्यक्ती खाली वाकून चालते अगदी, तसेच स्त्री जर दुबळी, अज्ञानी, अशिक्षित असेल तर प्रपंचही तसाच चालतो. म्हणूनच म्हटले आहे, ”शिकलेली आई घराला पुढे नेई.” इस्लामने तर शिक्षण अनिवार्य केले आहे, मग ती मुलगी असो वा मुलगा. कसलाही भेदभाव न करता शिक्षण देणे हे अनिवार्य केले आहे. मुलींसाठी शिक्षण व स्त्रीचा फार मोठा सन्मान इस्लामने हजारो वर्षांपूर्वी केला आहे.  अशा अनेक प्रकारे स्त्रियांचा इस्लामने सन्मान केला.
    स्त्रियांवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराविरूद्ध व स्त्रियांच्या गुलामीविरोधात सर्वप्रथम इस्लामने आवाज उठविला. जगात स्त्रियांना उच्च स्थान देणारा अरबस्थान हा सर्वप्रथम देश ठरला. इस्लामच्या तत्वज्ञानात स्त्री-पुरूष दोघांमध्ये थोडाही फरक केला नाही. पुण्य करणारे सर्वच स्वर्गात जातील त्यात कोणताही भेदभाव होणार नाही किंवा अन्याय होणार नाही, मग ती स्त्री असो वा पुरूष. इस्लामने दानधर्म (जकात)  याला महत्त्व दिले आहे. इस्लाममध्ये जी व्यक्ती आपली विधवा व घटस्फोटित मुलीचा सांभाळ करते ते सर्वात मोठे दान आहे. कारण विधवा व घटस्फोटित स्त्रीला आपल्या पित्याशिवाय कोणीही दूसरा पर्याय नसतो. अशा परिस्थितीत तर त्या विधवा, घटस्फोटित सत्रीचा (मुलीचा) सांभळ केल्यास ते सर्वात मोठे दान (पुण्य) ठरते. घटस्फोटित स्त्री वडिलाशिवाय दुसर्‍या कोणाकडे जाऊच शकत नाही. अशा वेळी तिला आधार देण्यासाठी व तिचा सांभाळ करण्यासाठीच या कार्याला पुण्यकार्य म्हटले आहे.
    ”एखाद्या सद्वर्तनी, सुशील (पतिव्रता) स्त्रीवर व्याभिचाराचा तसेच चारित्रहीनतेचा आरोप करणे म्हणजे माणसाला संपविणार्‍या सात गुन्ह्यांपैकी एक आहे. अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करणार्‍या इसमास कोणत्याही प्रकारची साक्ष गृहीत न धरता 80 फटके मारावेत.” वरील विवेचनावरून हे लक्षात येते की आपल्या स्वार्थासाठी अथवा राग-मत्सरासाठी एखादी व्यक्ती स्त्रीची बदनामी करून आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करील अथवा आपली मनिषा (इच्छा) पूर्ण करण्यासाठी स्त्रीची बदनामी करून आपला स्वार्थ साधेल, अशा प्रकारचे किस्से होऊ शकतात व एखाद्या चारित्र्य संपन्न, सुशील, सुसंस्कृत निरपराधी स्त्रीची अवहेलना, बदनामी, चारित्र्यहीनता होत असेल किंवा एखादी व्यक्ती तसे भासवत असेल तर त्याला त्याने सादर केेलेली कोणतीही साक्ष मान्य न करता 80 फटके (चाबकाने) मारावेत. ही शिक्षा फर्मावत असताना ज्या स्त्रीवर आरोप कला आहे ती स्त्री सद्वर्तनी (पतिव्रता) आहे का, ते पाहणे जरूरीचे आहे. इस्लामने स्त्री व पुरूषाचे कार्यक्षेत्र जरी वेगवेगळे ठेवले असले तरी स्त्रीला कार्य करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. धर्माच्या मर्यादेत राहून कार्य करणे म्हणजे आपले कार्य नीतीमत्तेला धरून असावे, तसेच ते आपल्या चारित्र्यात बाधा आणणार नाही याची काळजी घ्यावी. कारण इस्लामने स्त्रीच्या चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलेे आहे. म्हणून स्त्रियांना कुरआनने शिक्षण अनिवार्य केले आहे. जर एखाद्या स्त्रीने कुरआनचे शिक्षण घेऊन त्यानुसार आचरण केले आणि ती म्हातारी होऊन मरण पावली तर ती स्वर्गात गेल्यानंतर तरूण होईल, असे प्रतिपादन पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आहे. याच्याच उलट जी स्त्री आपल्या मिळालेल्या आयुष्यात (मृत्यू पश्‍चाताच्या जीवनाची परीक्षा) दांभिकपणे वागेल, बदवर्तन करेल, तिला अंतिम महाप्रलयाच्या दिनी (न्यायनिवाड्याच्या दिवशी) शिक्षा होणारच, यात सुतभरदेखील शंका नाही. एवढेच नाही तर अनेक देवांची उपासना करणे हेदेखील नरकयातनेचे आमंत्रण ठरविले आहे. म्हणून इस्लामने (स्त्री-पुरूष) फक्त आणि फक्त इस्लाम धर्मास मानावे, इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मुहम्मद सल्ल. यांना मानावे, तसेच त्यांचे धर्मांचे आणि मानवजातीस योग्य असणारे सर्व विचार सर्व लोकांपर्यंत पोहचवावेत (फक्त मुस्लिम लोकांपर्यंत नाही), असे करणे पुण्यकर्म समजले जाते. याशिवाय इतर देवांची आराधना करणे, अनेकेश्‍वरत्व जोपासने हेदेखील दांभिक कृत्याच्या बरोबरीचे कृत्य आहे. इस्लाम जसा स्त्रीचा सन्मान करतो तसाच तो त्यांना काही मर्यादादेखील घालतो. सर्व बाबतीत इस्लामने स्त्री-पुरूषांना समान दर्जा देऊनसुद्धा दोघांत स्त्रीचे स्थान उच्च समजावले आहे. आणि जो पुरूष स्त्रीशी अत्यंत आदराने वागतो तो उत्तमोत्तम पुरूष होय. जसे पुरूषांना स्त्रियांशी आदराने वागावयास सांगतो, तसेच स्त्रीलाही दुसर्‍या स्त्रीशी सन्मानाने वागण्याची ताकीद केली आहे. मग ती स्त्री कितीही गरीब वा कितीही श्रीमंत असो, तिने इतर स्त्रियांची टिंगल (चेष्टा) करू नये. आपसात बोलताना टोमने मारू नयेत. एकमेकींचा वाईट नावाने उल्लेख करू नये (शिव्या-शाप), तसेच एकमेकीचीं चहाडी-चुगली करू नये, असे वागणार्‍या स्त्रीचा इस्लाम विरोध करतो. इस्लामने स्त्रीला बालपणी पित्याच्या, तारूण्यात पतीच्या व वृद्धापकाळात पुत्राच्या संरक्षणात राहण्यास सांगून त्यांच्यासमोर आपली मते मांडण्यास मुभा दिली, तर त्यास पुरूषांनी स्वातंत्र दिले. तसेच तिला गृहकार्यात मुबलक प्रमाणात अधिकार दिले. सर्वच स्त्रिया कपटी, पापी, दोषी, दुर्गुणी असतात असे नाही. त्याचबरोबर विवाह करताना स्त्रीचे वय पुरूषापेक्षा कमीच असले पाहिजे असाही धर्माचा काही संकेत नाही. याचे उदाहरण म्हणजे पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे पहिल्या विवाहाच्या वेळी वय 25 वर्षे तर त्यांची पत्नी माननीय खदीजा यांचे वय 40 वर्षे होते. या विवाहामध्ये वधू वरापेक्षा तब्बल 15 वर्षांनी मोठी होती. त्या विवाहास गैर समजले नाही. सारांश, सध्या मुस्लिमांमध्ये (फक्त भारतात) वधू वरापेक्षा लहानच असायला पाहिजे असा जो गैरसमज पसरला आहे तो साफ चुकीचा आहे. कारण वय कमी अधिक असले तरी चालते, मात्र ते संबंध विवाहाच्या माध्यमातून मान्य झालेले असावेत.
    विवाहाने दोघांना (पती पत्नींना) काही अधिकार प्राप्त होतात व ते बजावणे हे त्यांचे उत्तरदायित्व आहे. म्हणजेच स्त्री-पुरूषांचे एकमेकांवर अधिकार आहेत. तसेच वैवाहिक संबंधातूनच झालेली संतती इस्लाम वैध समजतो. संततीचे संगोपन करीत असताना त्या संततीत ईशपरायणता आणि परलोकीचे सृष्टीच्या प्रति शुभचिंतक बनून वृद्धींगत व्हावी. मुलाचे पालनपोषण, संगोपन मुलांशी संवाद करा, त्यांना सदाचार शिकवा, मुलांना रागाऊ नका, त्यांना ताकीद आहे की प्राण्यांनादेखील अपशब्द वापरू नका. मुलांच्या खोट्या वागण्या-बोलण्याचे समर्थन करू नका, मुलांना खोटे बोलू देऊ नका, स्वतःही कोणाशी खोटे बोलू नका, मुलांना मारू-झोडू नका, त्यांना शिक्षा करू नका, मुलांवर आरोप करू नका, असे वर्तन आपण आपल्या मुलांशी केले तर ती बिघडणार नाहीत तर चांगलीच घडतील. हे सर्व मुलांना अगदी लहान वयापासून शिकवावे लागते व लहान मुल जास्त काळ आईजवळ असतात, त्यामुळे अप्रत्यक्षपणे ही जबाबदारी पुरूषांपेक्षा अधिक स्त्रियांची आहे. म्हणजे पुरूषांनी काहीही जबाबदारी स्वीकारायची नाही असे नाही.
    सुशील स्त्रीच्या चारित्र्यावर (व्यभिचाराचा) जसा आरोप करायचा नाही याची सूचना इस्लामने केली तसेच स्त्रीने आपले चारित्र्य सांभाळावे. व्याभिचाराचा विचारदेखील मनात यायला नको. व्याभिचार म्हणजे स्त्री-पुरूष यांनी विवाह न करता वैवाहिक जीवन (शारीरिक संबंधासह) जगणे म्हणजेच व्याभिचार होय. व्यभिचार ही अत्यंत वाईट बाब आहे. ती धार्मिकदृष्ट्या पापाची व दुष्कृत्याची गोष्ट आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत या बाबीला समाजाची मान्यता नाही. उलट ही बाब लज्जास्पद आहे. म्हणून इस्लामने समाजाला व्याभिचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लामने विवाह एक धार्मिक विधी जरी समजले असले तरी तो एक करार असून दोघांनी एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते. याची सुरूवात सर्वात अगोदर इस्लामने केली आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget