भारतात प्रादेशिक भाषांचा एकूण व्यवहार फार मोठा नसतो. मराठी भाषेचंही आपलं साहित्यिक व्यवहाराचं जे जग आहे. तेही लहानसं आहे. तिथले बहुतेक व्यवहार ओळखी-पाळखींवर चाललेले असतात. मोठ्या कळीच्या प्रश्नांवर सहसा इथं मौन पाळलं जातं. १९९२, २००२, २००७ सारख्या घटना घडतात. त्यावर फारसे तरंग मराठी साहित्यात उमटत नाहीत. तिकडं हिंदी जगतात याच विषयावरच्या कवितांचे मलयश्री हाशमी दोन खंड प्रकाशित करतात. मिया कवितेचं आंदोलन होतं. असमी-बंगाली भाषेतले कवी-कलावंत-चित्रपट-नाट्य कलावंत त्यावर आपापल्या माध्यमातून अभिव्यक्त होतात. 'कागज़ नहीं दिखाएंगे' अशी घोषणा त्यांच्या व्यक्त होण्यातून दिसते. मराठीत थंडगार शांतता असते. लेखकांच्या तीन-चार पिढ्या एकाचवेळी मराठीत असतांना फारसे आवाज न उठता मौन अबाधित राहातं. मुक्तिबोध म्हणतात तसं,
सब चुप, साहित्यिक चुप और कविजन निर्वाक्
चिंतक, शिल्पकार और नर्तक चुप हैं
याच कवितेत मुक्तिबोध मध्यम वर्गाचं-- जो तथाकथित बौद्धिक वर्ग आहे त्याचं वर्णन क्रीतदास असं करतात. क्रीतदास म्हणजे विकला गेलेला गुलाम. जो ७० वर्षांतल्या कल्याणकारी राज्यातल्या फायद्यांची फळं चाखून स्थिरस्थावर होऊन आता वर डोळे लावून खालच्या वर्गातल्या लोकांचा द्वेष करीत आणि सर्वंकषवादी सत्तेचा आंधळा, विखारी विद्वेष पसरवण्यात अतिशय सक्रीय आहे. यांना ब्राह्मणेतरांतील वर्ग आणि दलितांमधीलदेखील काही वर्ग सामील आहेत. यांच्याच खांद्यावर बंदुका ठेऊन प्रस्थापित व्यवस्थेला त्यांची दुष्कृत्यं करवून घेता येत असतात.
त्याचबरोबर जे कोणी सत्तेशी सलगी करत राहिलेले विद्वान, विचारवंत, कवी, समीक्षक अशा लोकांनाच उद्देशून बहुधा मुक्तिबोधांनी लिहून ठेवलेलं आहेः
अब तक क्या किया, जीवन क्या जिया,
ज़्यादा लिया और दिया बहुत-बहुत कम
मर गया देश, अरे, जीवित रह गए तुम।"
बैंड के लोगों के चेहरे मिलते हैं मेरे देखे हुओं से
लगता है उनमें कई प्रतिष्ठित पत्रकार इसी नगर के !!
बड़े- बड़े नाम अरे, कैसे शामिल हो गए !!
उनके पीछे चल रहा संगीन नोकों का चमकता जंगल,
चेहरे वे मेरे जाने बूझे से लगते
उनके चित्र समाचार पत्रों में छपे थे, उनके लेख देखे थे,
यहाँ तक कि कविताएँ पढ़ी थीं भई वाह !
उनमें कई प्रकांड आलोचक, विचारक, जगमगाते कविगण
मंत्री भी, उद्योगपति और विद्वान
यहाँ तक कि शहर का हत्यारा
डोमाजी उस्ताद।
(मुक्तिबोध रचनावली-२, पृ. ३२८-३०)
अशा प्रकारचे मौन पाळत राहाणारे आणि पाळतखोर सत्तेला भिऊन असणारे जे लोक आहेत ते वास्तवाला केवळ कॅमेऱ्याच्या निर्ढावलेल्या भिंगासारखे आहेत. वास्तवाचं पृथःकरण न करताच आहे तसं प्रतिबिंबित करणारे आहेत.
मला इथं मला अरुण कोलटकरांची 'क्यामेरा' ही कविता आठवते. त्यात ते कॅमेऱ्याला भिंग घाश्या संबोधत म्हणतात,
तुझ्यात दोन गोष्टी नाहीत। स्मृती।आदल्या चौकटीची। आणि अश्रुग्रंथी।कितीही दुःख पाहिलं तरी तुझं भिंग पाणावत नाही। दुःख पाहून तू द्रवत नाहीस। पण दुसऱ्याच्या डोळ्यातला अश्रू कसा टिपावा । तो न पुसता न खाली पडू देता। हे तुला चांगलं माहीत आहे।
कोलटकरांची ही कविता वेगळ्या व्यथेची आणि वेदनेची कविता असली तरी ती प्रतिमांच्या सृष्टीतले आपण कॅमेऱ्यासारखे निर्जीव अलिप्त असे झालेल्या बघ्यांनाही लागू होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला फ्रान्समध्ये सैन्यातल्या देफ्रस नावाच्या ज्यू अधिकाऱ्याला न केलेल्याही गुन्ह्यासाठी राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून टाकून, तसा गुप्तपणे खटला चालवून त्याला गुन्हेगार जाहीर केलं गेलं होतं. तिथले लेखक, कवी, शिक्षक, पत्रकार वगैरेंनी एका सूरात त्याचा निषेध केला. सैन्याचा आणि सरकारचा धि:कार केला. न्याय, समता या गोष्टी धर्मनिरपेक्षतेनं सर्वांना मिळायला हव्यात हा त्यांचा आग्रह होता. एमिल झोलानं तेव्हाच ती प्रसिद्ध पुस्तिका लिहिली-ज्यक्यूज़ (मी आरोप करतो की-). या रेट्यामुळे देफ्रसची मुक्तता झाली. कारण तेव्हाचे लेखक डोळस, बोलू शकणारे आणि एकूणेक आवाज ऐकता येतील एवढ्या तीक्ष्ण कानांचे होते. कारण ते मौन बाळगणारे नव्हते. त्याचसाठी मीर तक़ी मीर कवींना उद्देशून जो एक इशारा देतो,
शायर हो, मत चुपके रहो, अब चुप में जानें जाती हैं.
आणि हा इशारा समजून त्याला प्रतिसाद देणारेही काही लोक आहेत. बरेच असे लोक आहेत जे अजुन मुके झालेले नाही. बरेच असे लोक आहेत जे बोलत आहेत. सकारात्मक उन्मेषांची कितीतरी उदाहरणं आहेत जी या परिस्थितीतही हिंमत देत आहेत. महामारीच्या काळात पंजाबमधल्या शीख-स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर उन्हा-पावसात-कडाक्याच्या गारठ्यात जे आंदोलन केलं ते इतिहासातलं इतका काळ लांबलेलं लोकशाही अहिंसक आंदोलनाचं विलक्षण उदाहरण होतं. उत्तर भारतात विद्यार्थांनी बेरोजगारी आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या अव्यवस्थेविरुद्ध जो संघर्ष उभा केला होता तो प्रश्न पडू पाहाणाऱ्यांसाठी उत्साहवर्धक होता. सीएए-एनआरसी विरोधात दिल्लीतल्या शाहीनबागमधला निकराचा लढा भारतभर प्रेरणा देणारा ठरला. असंख्य ठिकाणी शाहीनबाग आंदोलनाला पाठिंबा देणारी त्याच धर्तीची आंदोलनं झालेली दिसून आली. देशभर त्यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या प्रचंड होती जी माध्यमांमधून दिसत नव्हती. अहिंसेनं, ठामपणे, संविधानाला सर्वोपरी मानून हा जो संघर्ष होता तो संवेदनशील नागरीकांच्या आदराला पात्र ठरला होता. त्यानं विवेक, सत्यावरची निष्ठा आणि विद्रोहातलं सौंदर्यही दाखवलं. त्या दरम्यान लोककलेचे, दृककलेचे कितीतरी प्रकार सार्वजनिक पातळीवर राबवले गेले होते. अशी कला आपल्या काळाशी जोडलेली आणि भिडलेली असते. ग्राफिटी, घोषणा, पोस्टर, गाणी आंदोलनाच्या जागी केलेली वैविध्यपूर्ण सजावट, चित्रं, कविता ह्यातून अनेकानेक प्रकारे समाजानं सत्तेला प्रश्न विचारले. पण ते प्रश्न कायम लोकशाहीवादी मार्गांनी विचारले. हजारो लोक एकत्र असताना तिरंगा, राष्ट्रगीत आणि एकत्र पंगतीत जेवणे असे नवेच प्रकार आपण गेल्या दोन वर्षात पहिले. असंख्य तरुणांची अस्वस्थता दिसत नाही, पण ती आहे. कारण विरोधाचा कोणताही स्वर ऐकू-दिसू द्यायचा नाही अशा व्यवस्थेत या तरुणांना भविष्य दिसतंय, जे अनिश्चित, बेभरवशी आहे. ते आपापल्या पातळीवर आणि आपापल्या प्रकारे व्यक्त होत आहेत आणि व्यक्त होत राहाणार आहेत.
समकाळ अतिशय क्रूर आहे. पण तरीही मला एक स्वप्नलोक खुणावत असतो. मी आणि किंवा कोणताही भानावर असलेला कवी हा सत्तेच्या समोरचा अस्वस्थ नागरिक असतो. सतत विरोधातल्या पहिल्या रांगेत असतो. कारण मला दुर्लक्षित राहिलेले, अन्याय झालेले स्त्री पुरुष दिसत असतात. काळ असा आहे की सामान्य नागरिकाचं अस्तित्व प्रश्नांकित झालं आहे. कुणीही कधीही झुंडीनं येईल याचं संकट वाटत राहण्याचा काळ आहे. कशातही तुम्हाला अडकवलं-फसवलं जाईल अशी परिस्थिती आहे. विवेक हरवलेला, नागरीकांच्याच मुळावर उठलेला हा काळ आहे. तो पुस्तकांचा शत्रू आहे, ज्ञानाचा शत्रू आहे. समता, स्वातंत्र्य, इतिहास, सत्य यांचा वैरी आहे. आपण हातोहात लुबाडले गेलो आहोत असं वाटतं. आजची सत्ता वंचितांच्या, वर्जितांच्या, दलितांच्या, बुद्धिवंतांच्या विरुद्ध असलेली सत्ता आहे. तिला भाषा, साहित्य, तत्वज्ञान, कला, परंपरेतलं धवल सौंदर्य यांचं वावडं आहे. त्यामुळे जागं राहणं गरजेचं वाटतं. कारण माणुसकीची पुन्हा पुन्हा स्मरण करून देणं हेच कवीचं आणि कोणत्याही कलावंतांचं आणि भान असलेल्या नागरिकाचं कर्तंव्य असतं. ते आपण केलं पाहिजे. कवी जे बोलू पाहातो ते शांत, दुखऱ्या स्वरात. ते सांगतो की अमानुष हुकूमशहांच्या सावल्या मोठ्या होत होत जिवंतपणाच्या, स्वातंत्र्याच्या, भलेपणाच्या अस्तित्वाला झाकोळून टाकताहेत. सत्य हाच द्रोह मानला जात असेल तर कवी आणखीनच ठामपणे सत्य की जय म्हणणार आहे. त्याच्या स्वरात आपले सगळे लोक, आपला देश वाचवण्याची काळजी आहे. कविता लिहिणं हे सत्याचा उच्चार करणंच आहे.
अखेरीला माझे मित्र उदय प्रकाश यांची एक लहानशी कविता वाचतो आणि माझं हे भाषण संपवतो. आपल्याला आज आपली संस्कृती, आपलं संविधान आणि मानवी सभ्यतेतली मौलिक अशी मूल्यं टिकवायची असतील तर आपल्याला माणूस म्हणून आपण जिवंत आहोत हे सिद्ध करावं लागेल. माणूस म्हणून प्रिय असलेलं स्वातंत्र्य, समता, करूणा, न्याय यांच्यासाठी मौन सोडून बोलावं लागेल. फैज़ म्हणतो तसं ये थोड़ा वक़्त बहुत है। बोल, बोल के लब आज़ाद है तेरे।
उदय प्रकाशसुद्धा आपल्या जिवंतपणाची आठवण करून देण्यासाठी म्हणतातः
आदमी
मरने के बाद
कुछ नहीं सोचता.
आदमी
मरने के बाद
कुछ नहीं बोलता.
कुछ नहीं सोचने
और कुछ नहीं बोलने पर
आदमी
मर जाता है.
हे आपण लक्षात ठेऊ. आणि तसं वागण्याचा कसोशीनं प्रयत्न करू. धन्यवाद.
(समाप्त)
Post a Comment