Halloween Costume ideas 2015

प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांचे वैवाहिक जीवन

कुरआन ज्या अरबी समुदायासाठी अवतरित करण्यात आला तो समुदाय इतका उख्खड  आणि क्रूर होता की, कोणी राजा सुद्धा त्यांच्यावर शासन करण्यास इच्छुक नव्हता. अशा या रानटी प्रवृत्तीच्या लोकांसमोर केवळ सुभाषितवजा सल्ला देऊन चांगले वागा! चांगले वागा! म्हणून उपयोगी ठरणारे नव्हते. तर अशा असंस्कृत समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष नातेसंबंध स्थापन करणे गरजेचे होते. म्हणून प्रेषित सल्ल. यांना हे विवाह करावे लागले. अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय कारणासाठी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनीच असे विवाह केले होते असे नव्हे तर जगात त्या काळात तशी रीतच होती.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या वैवाहिक जीवनावर नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर जो जागतिक स्तरावर गदारोळ उडाला त्यामुळे प्रसार आणि समाज माध्यमांचे अवकाश अक्षर: ढवळून निघाले. अशा परिस्थितीत त्यांचे वैवाहिक जीवन कसे होते या संबंधी माहिती घेणे उद्बोधक ठरेल. त्यानिमित्ताने मराठी भाषिक वाचकांना हे ही कळेल की, अरबी लोकांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या आयुष्याच्या सर्वच पैलूंचे दस्ताऐवजीकरण (डाक्युमेंटेशन) केलेले असून त्यात त्यांच्या वैवाहिक जीवनाचाही समावेश आहे.

या संबंधात माध्यमांमधून ज्या उलट-सूलट चर्चा सुरू आहेत त्या अर्धवट किंवा चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यांच्या हयातीतच टिका करण्यात आली होती, जगात सर्वाधिक बदनामीकारक पुस्तके त्यांच्याच विरूद्ध लिहिण्यात आलेली आहेत. त्यांच्या अचंभित करणाऱ्या विजयामुळे चिडून लोक त्यांची बदनामी करत होते. कोणी त्यांना जादूगर म्हणत होता तर कोणी वेडा. मक्का शहरामध्ये 13 वर्षे कष्ट करूनही शे-दोनशे समर्थक सुद्धा गोळा न करू शकलेल्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी पुढच्या दहा वर्षात अवघा अरबस्थान आपल्या कवेत कसा घेतला? याचेच त्यांच्या विरोधकांना आश्चर्य वाटत असे. तत्कालीन प्रस्थापित मूर्तीपूजक, अग्नीपूजक आणि ज्यू लोकांनी प्रेषित सल्ल. यांच्या यशस्वी जीवनाकडे पाहून त्यातून निर्माण झालेल्या आसुयेमुळे त्यांना बदनाम करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती. प्रेषित सल्ल. यांचे वैवाहिक जीवन तर त्यांच्या निशाण्यावर अव्वलस्थानी होते. प्रेषित सल्ल. यांचे जीवन एक आदर्श जीवन होते. त्या जीवनातून प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाचे मार्गदर्शन व्हावे म्हणून त्या जीवनाचे दस्तऐवजीकरण करून जपून ठेवण्यात आलेले आहे. 

पहिला विवाह

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा पहिला विवाह वयाच्या 25 व्या वर्षी हजरत खतिजा रजि. यांच्या सोबत झाला. त्यावेळेस हजरत खतिजा रजि. यांचे वय 40 वर्षे होते व त्या दोन वेळेस विधवा झालेल्या होत्या. हे लग्न तेव्हाच नव्हे तर आज 21 व्या शतकातही क्रांतीकारक ठरू शकेल असेच आहे. कारण ऐन पंचेविशतील अविवाहित तरूण दोन वेळा विधवा झालेल्या व आपल्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या महिलेशी विवाह करतो, ही गोष्ट त्यावेळेसही साधारण नव्हती आणि आजही साधारण नाही. दूसरी गोष्ट म्हणजे हजरत खतिजा रजि. जीवंत असेपर्यंत प्रेषित सल्ल. यांनी दूसरा विवाह केलेला नव्हता. त्यांना त्यांच्यापासून चार मुली- 1. हजरत जैनब रजि, 2. रूकैय्या रजि., 3. उम्मे कुलसूम रजि. 4. फातिमा रजि. झाल्या. 

दूसरा विवाह 

हजरत खतिजा रजि. यांच्या मृत्यूपरांत प्रेषितत्वाच्या दहाव्या वर्षी शव्वाल महिन्यामध्ये त्यांनी हजरत सौदा रजि. यांच्याशी विवाह केला. त्यापण विधवा होत्या. त्यांचे पती सुक्रान बिन उमरू यांचा नैसर्गिक मृत्यू झालेला होता. 

तिसरा विवाह 

प्रेषितत्वाच्या अकराव्या वर्षी शव्वाल महिन्यातच त्यांनी हजरत आएशा यांच्या बरोबर विवाह केला. त्या हजरत अबुबकर रजि. यांच्या कन्या होत. लग्नाच्या वेळेस त्यांचे वय किती होते. याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. एक विचार प्रवाह असा आहे की, लग्नाच्या वेळेस त्यांचे वय 6 वर्ष होते आणि रूख्सती (सासुरवाडीला जाणे) 9 वर्षे झाल्यावर झाली. तर दूसरा विचार प्रवाह असा आहे की त्यांच्या रूख्सतीच्या वेळेचे वय 19 वर्षे होते. यांच्याच वयाच्या मुद्यावरून अनेक टिकाकारांनी ज्यात नुपूर शर्माही सामील आहे टिका केलेली आहे. वास्तविक पाहता  त्यांचे वय 9 वर्षे जरी गृहित धरले तरी हिजाज (आताचा सऊदी अरेबिया) हा अतिशय उष्ण कटिबंधीय प्रदेश असून, नवव्या वर्षी मुली आजही वयात येतात. त्यामुळे 1400 वर्षापूर्वी हे लग्न बालविवाह होता म्हणून टिका करण्यात काही हाशिल नाही. बालविवाह हा काही अपवाद नाही. आज 21 व्या शतकातही आपल्या अवतीभोवती शेकडो बालविवाह होतात. तेव्हा इतिहासामध्ये झालेल्या महापुरूषांच्या बालविवाहावर विकृत टिप्पणी करणे स्वस्थ मानसिकतेचे लक्षण खचितच नाही. 

कारण प्रेषित सल्ल. यांचे जीवन हे जागतिक नितीमत्तेचे सर्वोच्च मापदंड असल्याचे प्रशस्तीपत्र स्व: कुरआनने दिलेले आहे. या संदर्भात कुरआन म्हणतो की,’’आणि :संशय तुम्ही नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात. ’’ (सुरे अलकलम : 68 : आयत नं.4). त्यामुळे आता दुसऱ्या कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्यांचा विश्वास कुरआनवर नाही अशा नुपूर शर्मा आणि इतर लोक या संबंधी कितीही आलोचना करोत, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचेवरील आमचे प्रेम तुसभरही कमी होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 

चौथा विवाह

प्रेषित सल्ल. यांनी 3 हिजरीमध्ये हजरत हफ्सा बिन्ते उमर बिन खत्ताब रजि. या मातब्बर सरदाराच्या मुलीबरोबर केला. त्याही विधवा होत्या. त्यांचे पूर्व पती खनीस बिन हजाफा सहमी रजि. हे बदर आणि ओहदच्या युद्धा दरम्यान नैसर्गिकरित्या मृत्यू पावले होते. 

पाचवा विवाह

प्रेषित सल्ल. यांनी चौथ्या हिजरीमध्ये हजरत जैनब बिन खजिमा रजि. यांच्याबरोबर पाचवा विवाह केला. त्या बनू हिलाल कबिल्याशी संबंधित होत्या. ह्या ही विधवा होत्या. त्यांचे पती अब्दुल्लाह बिन हजश रजि. हे ओहदच्या युद्धामध्ये शहीद झालेले होते. त्या फक्त 8 महिने प्रेषित सल्ल. यांच्या विवाह बंधनात राहिल्या. त्यानंतर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांचे पती अब्दुल्लाह बिन हजश रजि. शहीद झाल्यामुळे त्या निराधार झाल्या होत्या व आजारीही राहत होत्या. त्यांना सन्मानाने आश्रय देण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हा विवाह केला होता. 

सहावा विवाह

प्रेषित सल्ल. यांनी सन 4 हिजरीमध्ये उम्मे सलमा हिंद बिन्ते अबि उमैय्या रजि. यांच्याशी विवाह केला. ह्या सुद्धा विधवा होत्या. त्यांचे पती अबु सलमा रजि. यांचाही 4 हिजरीमध्येच नैसर्गिक मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर त्या निराधार झाल्या होत्या. त्यांना सन्मान आणि आधार देण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हा विवाह केला होता. 

सातवा विवाह

हजरत जैनब बिन्ते हजश बिन रियाब रजि. ह्या कबिला बनू असदशी संंबंधित होत्या. यांचे लग्न हजरत जैद बिन हारिस रजि. यांच्याबरोबर झाले होते. ते लहानपणापासूनच प्रेषित सल्ल. यांच्यासोबत राहत असल्यामुळे लोक त्यांना प्रेषित सल्ल. यांचा मुलगा समजत होते. विवाहानंतर पती-पत्नींमध्ये तीव्र मतभेद झाल्यामुळे हजरत जैद रजि यांनी हजरत जैनब रजि. यांना घटस्फोट दिला होता. त्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी ईश्वरीय आदेशावरून हजरत जैनब यांच्याशी लग्न केले. प्रेषित सल्ल. यांचे हे लग्न 4 हिजरीमध्ये झाले होते. या संदर्भातही मोठा वाद झाला होता. कारण अरबी समाजामध्ये त्यावेळेस मुलगा दत्तक घेण्याची परंपरा होती. ईश्वराला ही परंपरा मान्य नव्हती म्हणून ती तोडण्यासाठी ईश्वरीय आदेशाने हे लग्न झाले होते. याचा मोठा इतिहास आहे. या संबंधाची कारणमिमांसा ही किचकट स्वरूपाची आहे. ज्यांना या संबंधी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी कुरआनच्या सुरा क्रमांक 37 च्या आयत क्र. 33 संबंधिच्या तफसीर (स्पष्टीकरण) चे अवलोकन करावे.

आठवा विवाह

हजरत ज्युवेरिया बिन्ते हारिस रजि. यांचा संबंध अलमस्तलक या मातब्बर अरबी घराण्याशी होता. युद्धात त्यांना कैदी बनवून आणले गेले होते आणि त्या हजरत साबत बिन कैस बिन शमास रजि. यांच्या वाट्यात आल्या होत्या. त्यांनी एका ठराविक रकमेच्या मोबदल्यात ज्युवेरिया यांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे सोपविले होते. उच्च कुळातील एका कैदी महिलेला स्वतंत्र करून सन्मानाने जीवन जगण्याची संधी द्यावी म्हणून प्रेषित सल्ल. यांनी हे लग्न केले होते. हे लग्न 5 किंवा 6 हिजरीच्या शाबान महिन्यात झाले होते. 

नववा विवाह

उम्मे हबीबा रमल्ला बिन्ते अबि सुफियान रजि. या मक्का शहराच्या अत्यंत उच्चकुलीन सुफियान घराण्याच्या कन्या होत. त्यांचे लग्न अब्दुल्लाह बिन हजश यांच्याबरोबर झाले होते. त्यांनी आपल्या पतीसोबत हबश येथे हिजरतही केली होती. मात्र हबश येथे गेल्यानंतर त्यांच्या पतीने इस्लाम धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्माची दिक्षा घेतली होती आणि त्याच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. मात्र उम्मे हबीबा रजि. यांनी धर्मांतर केलेले नव्हते.    उम्मे हबीबा ह्या विधवा होत्या. प्रेषित सल्ल. यांनी त्यांना आश्रय देण्यासाठी म्हणून हा विवाह केला. 

दहावा विवाह

हजरत सफिया बिन अख्तब रजि. यांचा संबंध बनी इसराईल या प्रसिद्ध कुळाशी होता आणि खैबरच्या युद्धात युद्ध बंदी म्हणून त्या कैद केल्या गेल्या होत्या. त्यांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्वतंत्र करून त्यांच्याशी विवाह केला. हा विवाह 7 हिजरी नंतर झाला. 

अकरावा विवाह

हजरत मैमुना बिन्ते हारिस रजि. यांच्याशी प्रेषित सल्ल. यांनी सातव्या हिजरीमध्येच लग्न केले. त्या सुद्धा घटस्फोटित होत्या.

 या विवाहांचे विश्लेषण

येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. यांचे अकरा विवाह झाल्याबद्दल इतिहासकारांचे एकमत आहे. या ठिकाणी वाचकांना एक प्रश्न पडणे साहजिक आहे की, कुरआनमध्ये चार विवाहांची परवानगी असतांना प्रेषित सल्ल. यांनी अकरा विवाह कसे केले? या संदर्भात स्पष्टीकरण असे की, मुस्लिम पुरूषांना चार विवाहांची परवानगी नव्हे तरतूद आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये अपवाद म्हणून ते चार लग्न करू शकतात. प्रेषित सल्ल. यांंची स्थिती मात्र सामान्य मुुस्लिम पुरूषांपेक्षा वेगळी होती, त्यांच्या जीवनाचे मिशन वेगळे होते. ते मिशन पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना अकरा विवाहाची परवानगी देण्यात आली होती. या संदर्भात अधिक विवेचन खालीलप्रमाणे -

हजरत खतिजा रजि. आणि हजरत जैनब रजि. या दोन पत्नींचा मृत्यू प्रेषित सल्ल. यांच्या हयातीत झाला व शेवटपर्यंत 9 पत्नी हयात होत्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे 25 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्या पुढील तारूण्याची 30 वर्षे त्यांनी फक्त एका पत्नीसोबत म्हणजे हजरत खतिजा रजि. यांच्यासोबत घालविले. ज्या की, त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी ज्येष्ठ होत्या. अशा परिस्थितीमध्ये असे कसे गृहित धरता येईल की, तारूण्य संपल्यावर उतारवयाला लागल्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी जी लग्ने केली ती (ईश्वर क्षमा करो) लैंगिक सुखासाठी केली होती. त्यातही हजरत आएशा रजि. या एकट्या कुमारिका होत्या. ही गोष्टही लक्षात घेण्याजोगी आहे. प्रेषित सल्ल. यांनी वेगवेगळ्या मातब्बर घराण्यांशी व शूरवीरांशी नातेसंबंध जोडण्यासाठी, शहीदांच्या पत्नींना आश्रय आणि सन्मान देण्यासाठी म्हणून बाकीचे विवाह केले. हजरत आएशा रजि. यांचे वडिल हे मक्का शहरातील प्रतिष्ठित कापड व्यापारी होते तर हजरत उमर बिन खत्ताब रजि. हे मक्का शहरातील अत्यंत धाडसी आणि शूर लढवय्ये होते. या दोघा सरदारांच्या मुलींशी लग्न करून प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित केले. अरबी समाजामध्ये जावयाला अतिशय सन्मानाच्या नजरेने पाहण्याचा प्रघात होता. जावई म्हणजे त्यांचा जीव का प्राण होता. हेच कारण होते ज्यामुळे की, प्रेषित सल्ल. यांनी मातब्बर घराण्यांशी जावाई म्हणून संबंध स्थापन केले नाही तर आपल्या मुलीसुद्धा मातब्बर सरदारांना देऊन त्यांच्याशी नातेसंबंध दृढ केले. उदा. हजरत उस्मान रजि. या श्रीमंत परंतू दानशूर सरदाराशी एका नंतर एक दोन मुली हजरत रुकैय्या रजि. आणि त्यांच्या मृत्यूनंतर हजरत कुलसुम रजि. यांचा विवाह केला. या सर्व लग्नांचे उद्देश स्व:ला राजकीय दृष्ट्या मजबूत करण्यासाठी किंवा स्व:ची राजेशाही स्थापन करण्याचा नव्हता तर ईश्वराने त्यांची इस्लामचा पैगंबर म्हणून जी निवड केली होती ती निवड सार्थ ठरविण्यासाठी व पृथ्वीवर इस्लामचा संदेश सार्वजनिक करण्यासाठी तसेच या संदेशावर आधारित एक राज्य स्थापन करण्यासाठी व त्याद्वारे प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी जे ईश्वरीय मिशन त्यांना देण्यात आले होते ते मिशन पूर्ण करण्याचा मार्ग सुलभ व्हावा, यासाठी स्व:ची आणि स्व:च्या मुलींची लग्ने त्यांनी विशिष्ट अशा मातब्बर घराण्यांमध्ये केली होती आणि त्याचा परिणामही झाला. हजरत उम्मे सलमा रजि. यांच्याबरोबर लग्न होताच त्यांचा कबिला ज्यात अबु जहेल व खालीद बिन वलिद सारख्या मातब्बरांचा समावेश होता प्रेषित सल्ल. यांच्या समर्थनात आला. 

खालीद बिन वलिद एक श्रेष्ठ यौद्धे होते. इतके श्रेष्ठ की ओहदच्या युद्धामध्ये ज्याचे नेतृत्व दस्तुरखुद्द प्रेषित मुहम्मद सल्ल. करत होते, मध्ये त्यांनी मुस्लिम सैन्याचा अंश: पराभव केला होता. तसे हे खालिद बिन वलिद प्रेषित सल्ल. यांच्या विषयी फक्त नम्रच झाले नाहीत तर त्यांनी प्रेषित सल्ल. यांच्या हातावर विनाअट इस्लामचा स्वीकार केला आणि भविष्यात अनेक लढायांमध्ये नेतृत्व करून इस्लामचा झेंडा समुद्रापार नेला. हजरत जवेरिया रजि. ह्या जेव्हा प्रेषित सल्ल. यांच्या पत्नी झाल्या तेव्हा सहाबा रजि. यांनी त्यांच्या कबिल्याच्या शंभर घराण्यांना जे की युद्ध कैदी म्हणून आणले गेले होते, केवळ प्रेषित सल्ल. यांचे सासरवाडीचे लोक आहेत म्हणून स्वतंत्र करून टाकले. याचा सकारात्मक परिणाम निश्चितच इस्लामच्या प्रसारामध्ये झाला. ती सर्व घराणी भविष्यात प्रेषित सल्ल. यांच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. कुरआन ज्या अरबी समुदायासाठी अवतरित करण्यात आला तो समुदाय इतका उख्खड  आणि क्रूर होता की, कोणी राजा सुद्धा त्यांच्यावर शासन करण्यास इच्छुक नव्हता. अशा या रानटी प्रवृत्तीच्या लोकांसमोर केवळ सुभाषितवजा सल्ला देऊन चांगले वागा! चांगले वागा! म्हणून उपयोगी ठरणारे नव्हते. तर अशा असंस्कृत समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष नातेसंबंध स्थापन करणे गरजेचे होते. म्हणून प्रेषित सल्ल. यांना हे विवाह करावे लागले. अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय कारणासाठी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनीच असे विवाह केले होते असे नव्हे तर जगात त्या काळात तशी रीतच होती. अगदी आपल्या जवळचेच उदाहरण घ्यायचे म्हटल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण घेता येईल. महाराजांचेही एकूण 8 विवाह उच्च घराण्यातील मुलींशी झाले होते. ज्यात सईबाई -निंबाळकर घराणे यांच्याशी लग्न बालपणीच (1640) झाले. सगुणाबाई - शिरके घराणे (1641), सोयराबाई - मोहिते घराणे (1650), पुतळाबाई-पालकर घराणे (1653), लक्ष्मीबाई-विचारे घराणे (1656), सकवारबाई-गायकवाड घराणे (1657), काशिबाई- जाधव घराणे (1657) आणि गुणवंतबाई- इंगळे घराणे (1657) यांच्याबरोबर झाले होते. येणेप्रमाणे इतिहासामधील महापुरूषांच्या लग्नांचे विषय 21 व्या शतकात आजच्या परिस्थितीमध्ये उकरून काढून त्यावर उलट-सूलट चर्चा करत बसणे म्हणजे राष्ट्रीय वेळेचा अपव्यय आहे दूसरे काहीही नाही. म्हणून वाचकांनी अशा विषयांकडे दुर्लक्ष करून देशाच्या विकासाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करावे. 

- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget