प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे, ‘अल्लाह पवित्र असून तो पावित्र्य पसंत करतो. अल्लाहने श्रद्धावंतांनाही तेच उपदेश दिले आहेत जे त्याने पैगंबरांना दिले होते. अल्लाह म्हणतो की हे पैगंबर (स.) पवित्र वस्तुंचे सेवन करा आणि नेक कर्म करा. हे श्रद्ध लोकहो, जर तुम्ही अल्लाहची आराधना करत असाल तर आम्ही तुम्हाला जी पवित्र उपजीविका दिली आहे त्याचे सेवन करा आणि अल्लाहचे आभार माना.’ नंतर प्रेषितांनी सांगितले, ‘एक माणूस दूरचा प्रवास करतो आणि घाबरलेल्या अवस्थेत आकाशाकडे हात पसरवून म्हणतो, हे माझ्या विधाता! पण त्याची उपजीविका अपवित्र असते. त्याचे पिणे हराम असते. त्याने घातलेले कपडे हराम कमाईचे असतात. अशा अवस्थेत त्याची मागणी कशी मान्य होईल?’ (ह. अबू हुरैरा (र.), तिर्मिजी)
प्रेषित (स.) म्हणतात, ‘अल्लाह पिवत्र असून पावित्र्यालाच पसंत करतो. स्वच्छ असून स्वच्छेतेला पसंत करतो. उदार मनाचा असून उदारतेलाच पसंत करतो.’ (ह. सअद बिन अबी वक्कास)
एखादा व्यक्ती पवित्र कमाईतून हज अदा करण्यासाठी निघतो आणि म्हणतो की मी हजर आहे माझ्या विधात्या! तेव्हा आकाशातून प्रतिसाद मिळतो, तुम्ही जे खर्च करता ते वैध आहे. तुम्ही ज्यावर बसून प्रवास करता ती वैध आहे तेव्हा तुमचा हज स्वीकारला जाईल. आणि जर एखादी व्यक्ती वाममार्गाने कमवलेल्या पैशातून हजचा प्रवास करत असेल तर आकाशातून त्याला म्हटले जाते की तुमची कमाई वैध नाही, तुम्ही जे खर्च करता ते वैध नाही आणि म्हणून तुमचा हज स्वीकारला जाणार नाही. (तिबरानी)
प्रेषित (स.) म्हणतात, जर कुणी वावमार्गाने कमवून त्यातून खर्च करीत असेल तर त्यामध्ये बरकत होत नाही. दान करीत असेल तर ते स्वीकारले जात नाही. जर अशी धनदौलत त्याने आपल्या मागे सोडली तर ती त्याला नरकाकडे नेणारी असेल. अल्लाह दुष्टतेचा बिमोड दुष्टतेने करत नसून दुष्टतेस भलाईनं संपवतो. (ह. अब्दुल्लाह इब्ने मसऊद (र.)
प्रेषित (स.) म्हणतात, तीन दुआ (प्रार्थना) अशा आहेत ज्या स्वीकारल्या जातील. (१) अत्याचारपीडिताची दुआ, प्रवाशाची दुआ आणि आपल्या मुलांसाठी त्याच्या पित्याची दुआ. (२) रंजलेगांजलेल्यांची दुआ, ज्यांच्याकडे जगण्याची साधने नसतील, त्यांनी जर शपथ घेतली तर आल्लाह त्यांची दुआ स्वीकार करतो. (३) अकाशाकडे हात पसरवून जी दुआ मागितली जाते ती दुआ स्वीकारली जाते.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment