प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की या जगात जे काही प्रेषित पूर्वी होऊन गेले आहेत त्यांच्या शिकवणीत असे म्हटले आहे की ‘‘जर तुम्हाला लाज वाटत नसेल तर मग तुम्ही वाटेल ते करा.’’
(अबु उकबा, अम्रो अन्सारी, बुखारी)
याचा अर्थ असा की ज्या माणसाला कोणतेही कृत्य करताना लाज वाटत नसेल तर तो काहीही करू शकतो. कुकर्म करताना ज्या माणसाला लाज वाटत असेल तर तो असे कृत्य करणार नाही.
दुसऱ्या एके ठिकाणी प्रेषित (स.) म्हणाले की, जेव्हा अल्लाह एखाद्या माणसाला नष्ट करू इच्छितो तेव्हा तो त्याच्याकडून लाज-लज्जा हिरावून घेतो. आणि ज्या माणसाकडून हे काढून घेतले ते तर अशा माणसाला कुणी पसंत करत नाही. इतर लोक त्याची घृणा करतात. आणि जेव्हा तो माणूस या दशेला पोहोचतो तेव्हा अल्लाह त्याच्याकडून प्रामाणिकता हिरावून घेतो. तेव्हा तो इतरांशी प्रामाणिक राहत नाही. छल-कपट करतो. जेव्हा अशी व्यक्ती या दशेपर्यंत पोहोचते तेव्हा अल्लाह त्याच्याकडून दयाभावना हिरावून घेतो. अशा अवस्थेत तो भ्रष्टाचार आणि अनैतिकतेत गुरफटून जातो. या दशेपर्यंत पोहोचल्यावर अल्लाह त्याच्याकडून श्रद्धा हिरावून घेतो. आणि या अवस्थेत तो सैतानासारखा होऊन जातो.
प्रेषित (स.) म्हणतात, ‘‘लाज माणसाला भलाईकडे नेते. ज्या माणसामध्ये हे दोन गुण असतात त्याला अल्लाह पसंत करतो.’’
त्यांच्या अनुयायींनी विचारले, ‘ते दोन गुण कोणते?’
प्रेषित (स.) म्हणाले, ‘‘शालीनता आणि लज्जा.’’
अनुयायींनी पुन्हा विचारले, ‘ह्या गोष्टी आधीपासूनच आहेत की आताच आहेत.’
प्रेषित (स.) यांनी उत्तर दिले, ‘‘हे पूर्वीपासूनच आहेत.’’
प्रेषित (स.) यांनी आणखी एके ठिकाणी असे म्हटले आहे, ‘‘अल्लाहशी अशा प्रकारे लज्जा बाळगा जसे तुम्ही घरातल्या वडीलधारी माणसांसमोर लज्जा बाळगता. अल्लाहपासून लाजण्याचा अर्थ असा की आपल्या डोक्यामध्ये आणि पोटात वाईट आणि निषिद्ध गोष्टी जाऊ देऊ नका. आणि सदैव मृत्यू आणि परीक्षेची आठवण ठेवत राहा.’’
एक अनुयायी प्रेषित (स.) यांच्याकडे ज्ञानाच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आले आणि त्यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, ‘आपण मला कोणत्या गोष्टीचे आचरण करण्याची शिकवण देता?’
प्रेषित (स.) यांनी उत्तर दिले, ‘‘नेकी करा. वाईटांपासून अलिप्त राहा आणि लोकांना तुमच्यमधील कोणत्या गोष्टी आवडतील ते पाहा आणि त्यानुसारच कार्य करत राहा. लोकांना तुमच्या काही गोष्टी आवडल्या नसतील तर त्या सोडून द्या.’’
प्रेषित मुहम्मद (स.) नेहमी अशी प्रार्थना करत होते की ‘‘हे अल्लाह, आमच्यामध्ये आपली इतकी भीती निर्माण कर जी आपत्तीपासून आम्हाला वाचवील आणि अशा प्रकारे आचरण करण्याची आम्हास क्षमता प्रदान कर जी तुझ्यावर प्रेम करण्यापर्यंत आम्हाला पोहोचविण्यात आमची मदत करील.’’
(संदर्भ- ह. अब्दुल्लाह बिन उमर (र.))
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment