तुम्ही निगराणीखाली आहात
रस्त्या-रस्त्यावर, ऑफिसेसमध्ये, दुकानांमध्ये-मॉल्समध्ये, बसस्थानकांवर, रेल्वे स्थानकांवर किंवा विमानतळांवर छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. काही वेळेला ते ‘यु आर अंडर सर्व्हेलन्स` असं उघडपणे सांगतही असतात. सरकारी-खाजगी कार्यालयांमध्ये-कॉलेजा-विद्यापीठांमध्ये-कंपन्या-फॅक्टऱ्यांमध्ये येता-जाता आता बायोमेट्रिक यंत्रात बोटांचा ठसा उमटवावा लागतो. या गोष्टी वरवर साध्या आणि दैनंदिन गोष्टींमध्ये सूसुत्रता आणणाऱ्या आहेत असं वाटतं. बऱ्याच अंशी ते खरंही आहे. पण तुमच्यावर सतत नजर आहे, तुम्ही कुठे आहात, काय करता आहात, किती वाजता आला-गेला, काय लिहित आहात हे नोंदवलं जातंय अशी एके काळी केवळ फिक्शनमध्ये आढळणारी गोष्ट आता प्रत्यक्षात सगळीकडे दिसत आहे. आजच्या समाजाचं हे रूप सत्तेचं विश्लेषण करताना मिशेल फुकोनं आधीच सांगितलं होतं. सत्ता-विशेषतः हुकूमशाही-भांडवलशाही सत्ता प्रत्येक नागरिकावर सतत दरक्षणी नजर ठेऊन असते. आपण ते आता स्वीकारत चाललो आहोत. कारण लोकशाहीवरचे आपले विश्वास आपणच घालवून हे संकट स्वीकारायला सज्ज झालो आहोत.
या दृश्य वास्तवापलीकडे जे तंत्रज्ञानानं वास्तव निर्माण केलेलं आहे ते अधिक भयानक आहे. व्यावसायिक कंपन्या, सरकारी संस्था यांच्याकडे सर्वसामान्य नागरिकांची माहिती ज्या प्रमाणावर साठवली जाते त्याप्रमाणात माहितीच्या आधारे सुपरपॉवर बनताहेत. एक मोबाईल फोनधारक म्हणजेच एक क्रयवस्तू झालेला आहे. त्याला त्याच्यासाठी एक बबल करून त्याच्यातच बंदिस्त केल्यामुळे त्याच्या विचाराबाहेरचं जग तर बेदखल होतंच, पण तो स्वतः मात्र नकळत विचाराबाहेरच्या मता-प्रचाराचा वाहक होतो. ते त्याला कळतही नाही. यालाच डिजिटल हुकूमशाही असं म्हटलं गेलं आहे. आधारकार्डाचे उपयोग आणि आवश्यकता हा विषय निराळा आहे पण त्यातली त्या व्यक्तीची माहिती- त्याचा वैचारिक कल, त्याची जात, धर्मविषयक मतं, त्याचे आजार, त्याचे नातेवाईक-आप्त, तो कुठे राहातो, काय वाचतो, पाहातो, कुठे काय जेवतो, किती पैसे कमावतो आणि खर्च करतो, किती पैसे करात भरतो ही सगळी माहिती यंत्रणेतल्या वापरकर्त्याच्या सोयीप्रमाणे त्याला सहज उपलब्ध असतेच. म्हणजे त्याच्यावर अंकूश ठेवायलाही ती वापरली जाऊ शकते. मध्यंतरी स्पायवेअर वापरून पाळत ठेवली गेल्याच्या, संगणकांमध्ये माहिती घुसवून मग गुन्हेगारीचे आरोप ठेवले गेल्याच्या किती बातम्या आल्या. ते कशासाठी विकत घेतलं याचं स्पष्टीकरण सरकारनं नीट दिलेलं नाहीच. हे प्रकार जगभर वाढत आहेत. आता यात मेटाव्हर्सची भर पडली आहे. मेटाव्हर्समध्ये आभासी चष्मा लावून गेल्यावर एका स्त्रीवर इंग्लंडमध्ये आभासी बलात्कार झाल्याची घटना नुकतीच समोर आली. मूलतत्त्ववादी संघटना याचा किती गैरवापर करतील याचा विचारच करवत नाही.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि विवेक
ज्ञानप्रसाराच्या काळात विज्ञानच श्रेष्ठ होऊन बसलं. बुद्धी, विवेक आणि तर्कानं(च) जग जाणता येतं असं म्हटलं गेलं. तंत्र विकसित होऊ लागली. ज्ञानाची पुनर्व्याख्या झाली. नीतीशास्त्रीय कल्पनांचं महत्त्व कमी होत गेलं. ‘ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञान श्रेष्ठ, विश्वात मानव श्रेष्ठ, तोच विश्वाचा अधिपती` हा विचार बळावला. सृष्टीत जे-जे काही आहे, प्राणी-पशू-हवा-पाणी-खनिजं, ते-ते सगळं आपल्या उपभोगासाठीच आहे अशी आक्रमक मग्रुरी यातून आली. कारण विवेक, बुद्धी आणि तर्क असलेला मानवच मालक मानला गेला. नंतर पुढच्या दोन शतकात ही मग्रुरी उजागरच झाली होती. त्यातही उतरंड होती. युरोपीय मानव ग्रेट. बाकी पौर्वात्य ज्ञान असेल किंवा मेसापोटेमिया, इजिप्त आणि आफ्रिकेतल्या टोळ्याचं जे ज्ञान असेल ते त्यांच्या लेखी बिनमहत्त्वाचं होतं. बेमुर्वतखोरपणानं असंही म्हटलं गेलं, की ‘हे सगळं चार-दोन ओळीत मावेल किंवा फार तर अख्ख्या पौर्वात्त्य संस्कृतीचं एकत्रित ज्ञान युरोपातल्या एखाद्या प्रचंड ग्रंथालयातल्या एका कपाटातल्या एका शेल्फवर फार तर मावेल.` ही खरंतर साम्राज्यशाहीची अरेरावी होती. पौर्वात्त्य ज्ञानाविषयीचं औद्धत्त्य होतं. साम्राज्यशाहीचं समर्थन करण्यातला माज होता.
विज्ञान हे तंत्रज्ञानाचं साधन मात्र बनून राहिलं. त्याची परिणती पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपण पाहिली. संहारक शस्त्रं, ज्यातून खंडांतर करून बॉम्ब टाकून परत येता येईल अशी वेगवान बॉम्बर विमानं, युद्धनौका, विषारी तोफा यातून संहारासाठीचं तंत्रज्ञान वापरलं गेलं. नकाशाशास्त्रातली प्रगती, भूगोलाचा अभ्यास याचा वापर नवनवे प्रदेश जिंकण्यासाठी केला गेला. त्यातून युरोपात वाढलेली लोकसंख्या जिरू शकली, युरोपातल्या गरिबीवर उत्तर शोधता आलं. साम्राज्यवादाच्या मुळाशी मरिनर्स कंपास या यंत्राचा शोध आहे. नकाशाशास्त्राचा शोध आहे. छपाईचा शोध आहे. या तंत्रज्ञानानं साम्राज्यविस्ताराची नशा वाढवत नेली. हिटलरसाठी फेबर कंपनीनं झायक्लोन-बी नावाचं केमिकल मोठ्या प्रमाणावर तयार केलं. ते फवारलं आणि त्यातून तात्काळ ज्यूंना मारण्याची तजवीज केली. हीसुद्धा तंत्रज्ञानाची किमया होती हे आपल्याला विसरता येणार नाही. आजच्या काळात झायक्लोन-बीची गरज नाही ते काम ओटीटीवरची अव्याहत चालणारी चॅनल्स, चार-चार लेन्सचे कॅमेरा फोन्स आणि खिशाला परवडणारा डेटापॅक एवढ्या विषात भागतंय.
विवेकाच्या कौतुकाच्या नादात, तत्त्वज्ञानाचं महत्त्व कमी करून नफाकेंद्री, लढाईकेंद्री राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठीचं तंत्रज्ञान निर्माण झालं. ज्ञानप्रसारानंतर आलेल्या विज्ञानाची जागा पहिल्या महायुद्धापर्यंत तंत्रज्ञानानं घेतली. यालाच टेक्नॉलॉजिकल रॅशनॅलिटी असं म्हटलं गेलं. विवेकाचं रुपांतर पिग्मी रुपात केलं गेलं. जो वड म्हणून वाढू शकत होता त्याचं या टेक्नॉलॉजिकल रॅशनॅलिटीनं विषारी झुडुपात रुपांतर केलं.
तंत्रज्ञानाला सपाटीकरण पाहिजे असतं. जगभर जागतिकीकरणाच्या सोयीसाठी एकच भाषा असणं आवश्यक ठरतं. व्यापार, उद्योग, नफ्यासाठी ते सोयीचं असतं. म्हणून हजारो भाषा संपवण्याचं पद्धतशीर कारस्थान यातून रचलं जातं. सुरुवातीला अंक इंग्रजीत शिकण्याचा आग्रह धरला जातो. मग स्थानिक भाषेत इंग्रजी शब्द वापरात वाढवत नेण्याच्या पद्धती अंमलात येतात. तशा जाहिराती लिहिल्या जातात. अख्ख्या वाक्यात एखाद-दुसराच स्थानिक शब्द वापरण्याची सवय लावली जाते. मग जगण्याची शैलीपण तशीच होऊन जाते. भाषेचं हे क्रिओलायझेशन-हळूहळू ती भाषा नष्ट करत नेतं. स्वैपाकघरातले, शेतीतले, ग्रामीण संस्कृतीतले स्थानिक भाषेतले शब्द कमी-कमी होत जातात. संवादातले स्थानिक भाषांमधले शब्द कमी होत जातात. संवादाचा अवकाशही कमी कमी होत जातो. कारण भोगलोलुप व्यक्तिवादी समाजात टीव्ही-इलेक्ट्रॉनिक माध्यमं-चंगळीचे विविध मार्ग यांमुळे त्याचा संकोच होत गेलेलाच असतो. यात आज, सत्य-असत्य, न्याय-अन्याय, वाटा चुकीच्या लोकांकडे जाईल की समान वाटपाचा आग्रह करावा हा मूल्यविवेक ओळखणं गरजेचं आहे.
हे सगळं दुःस्वप्नकारक चित्र मी मांडत आहे असं वाटेल. पण आजचा काळ आणि त्यातले पेच समजून घेण्यासाठी ते ओळखणंही गरजेचं आहे कारण अंतिमतः तळातला माणूस त्यानं भरडला जाणार आहे. भांडवली बाजार यंत्रणा, सांस्कृतिक राष्ट्रवाद, तंत्रज्ञानाचं प्रस्थ यांमुळे निर्माण झालेल्या विषमतेच्या, दुजेपणाच्या खाईत सामान्य माणूस वंचित, वर्जित आणि विकल होत चाललेला आहे.
विद्रोहाची गरज
यासाठी आपल्याला विद्रोह करावा लागेल. प्रस्थापित किंवा प्रतिष्ठापना केल्या गेलेल्या असत्याला सत्यानं ललकारणं, आव्हान देणं, प्रश्न विचारणं म्हणजे विद्रोह. असा विद्रोह ज्ञानेश्वरांनी केला होता, तुकोबांनी, बसवेश्वरांनी, जनाबाईंनी, कोपर्निकसनं, गॅलिलिओनं आणि अनेकांनी केला होता. सॉक्रेटिसनं केलेला विद्रोह आणि त्याच्या संघर्षाचं आज अगत्यानं स्मरण करावं असा काळ आलेला आहे. ज्ञानदेवांनी देशी लोकांच्या भाषेत लिहिणं हे एक बंडच होतं. आणि मराठीची थोरवी मांडतांना ते अभिमानानं म्हटले होते,
दावूं वेल्हाळ देशी नवी। जे साहित्यांत बोजावी।
अमृतातें चुकी ठेवी। गोंडसपणे ।। ११-९
तरुणांना प्रश्न विचारायला शिकवतो, रुढी प्रथा कशा चुकीच्या आहेत ते सांगतो आणि विवेक आणि तर्काच्या बाता मारत असतो असा ठपका ठेऊन सॉक्रेटिसला विषाचा पेला देऊन मारलं होतं. संत बसवेश्वरांनी परंपरेशी संघर्ष करीत नवी परंपरा निर्माण करतांना तिला ऊर्जा दिली. सामाजिक किंवा लिंगभात्मक भेदभावांना, रुढी-प्रथांना-अंधश्रद्धांना त्यांनी थारा दिला नाही.
विद्रोहाचं नातं सत्याशी असतं. सत्तेद्वारे जेव्हा असत्याची प्रतिष्ठापना होते, ते प्रस्थापित होतं, त्यावेळी सत्य त्याला आव्हान देतं. असत्य हे दमनासाठी वापरलं जाणारं विखारी साधन आहे. सत्यानं असत्याला ललकारणं, आव्हान देणं म्हणजे विद्रोह.
अविनाश मिश्र या तरुण हिंदी कवीनं विद्रोहाविषयी अगदी थोडक्या ओळींमध्ये जे मांडलं आहे ते पटण्यासारखं आहे. त्याच्या ओळींचा मराठी तर्जुमा असा आहेः
या दुनियेत माणसाला जर
विद्रोहाशिवायच जगता आलं असतं
तर शक्य आहे हे साक्षात वर्तमान
आणखी सार्थ आणि सुंदर होऊ शकलं असतं
विद्रोह या संकल्पनेचा जन्मच
मुळात दमनाच्या पीडेतून झाला असावा.
अविवेकाचा प्रादुर्भाव
विवेकाची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आपल्याला विद्रोहाची कास धरावी लागते. गेल्या ऑगस्टमध्ये एजाज़ अहमद यांचं एक व्याख्यान झालं होतं. त्यात त्यांनी आजच्या काळाचं सार्थपणे वर्णन करतांना म्हटलं होतं, "विवेकी भाषा आणि अविवेकी भाषा यातली सीमारेषा पुसून गेली आहे. सत्य भाषा आणि असत्य भाषा यातली रेषा पुसली आहे. कोण बोलतो यावर सत्य ठरतं. गेल्या २०० वर्षात तराजूचा काटा विवेकाच्या विरुद्ध आणि अविवेकाच्या बाजूनं प्रथमच ढळला आहे. राजकारण, धर्म, मास मीडिया अशा सर्वच क्षेत्रात...आधुनिक समाजाला असलेल्या ३-४ मोठ्या धोक्यांमध्ये मीडियाचा समावेश होतो. वास्तव, सत्य यावर आधारलेली मानके मोडली आहेत. सरकार, मिडिया, वकील, पोलीस हे उदाहरणार्थ मुस्लिमांचे कसे चित्र रेखाटतात, पहा. डोळ्यांना दिसतं त्याहून विपरीत समज सत्ताधारी निर्माण करतात आणि उदारमतवादी लोकशाहीच्या संस्था ते विनातक्रार स्वीकारतात, हे अनाकलनीय आहे. सर्वत्र दैनंदिन क्रौर्याचं साम्राज्य पसरलं आहे."
अविवेकाचा प्रादुर्भाव आता केवळ उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांपुरताच सीमित राहिलेला नसून तो इतर जातींमधल्या वर्गापर्यंतही पोहोचलेला आहे. या बहुजन जातीतलेही आता अविवेकाचे समर्थक झाल्याचे दिसते. प्रगतीशील म्हणवले जाणारे वेगवेगळे समूह चिरफाळलेले आहेत. कम्युनिस्ट, समाजवादी, दलित या सगळ्यांच्या अस्मिता टोकदार झाल्यानं जोतिबा फुल्यांच्या कल्पनेतला एकमय लोक कसा निर्माण होणार? त्यामुळे गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली असून त्या मूलतत्त्ववाद्यांनी लावलेले सापळे, दाखवलेली आमिषं आणि विषारी प्रचारांनी भरवलेली डोकी कारणीभूत आहे. हे मूलतत्त्ववाद्याचं, जमातवाद्याचं यश आहे. जमातवाद्यांनी आता त्यांना जी अपकृत्यं करवून घ्यायची आहेत, जो अनाचार करायचा आहे, त्यासाठीचं माध्यम म्हणून त्यांनी बहुजनांमधलेल्यांनाच चलाखीनं कामाला लावलं आहे.
घराघरात, नात्यांमध्ये, सोबत्यांमध्ये दऱ्या निर्माण झाल्या आहेत. कुटुंबांच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये सर्वंकषवादातली विषारी मेख समजणारे आणि ती बोलून दाखवायचा प्रयत्न करणारे एकटे पडत आहेत, हद्दपार केले जात आहेत. ह्या प्रकारचा विचार करणारे कवी, लेखक, रंगकर्मी, चित्रपटलेखक बाजूला फेकले जात आहेत. आणि द्वेष पसरवणारे सिनेमे बनवणारे राजाश्रय, पुरस्कार मिळवून बसले आहेत.
बहुजनांच्या सशक्त संस्कृतीचा विकल्प
अश्या परिस्थितीत काय करायचं? महात्मा जोतिबा फुले यांच्यापासून वि. रा. शिंदे., डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कॉ. शरद पाटलांपर्यंत अनेकांनी आपल्याला यावरचा उतारा सुचवलेला आहे आणि तो आजही प्रस्तुत आहे. जोतिबा फुले म्हणतात त्याप्रमाणे शूद्रातिशूद्र, स्त्री आणि आदिवासी अशा सर्व समुदायांचं अब्राह्मणी तत्वज्ञानाने प्रबोधन करणे हाच त्यावरचा इलाज आहे. हे करतांना त्यात एक अशा धर्मनिरपेक्षतेची आपल्याला आवश्यकता आहे जी वर्गविरोधी तर असेलच, पण ती भारतीय संदर्भात मुख्यतः जातविरोधी आणि स्त्रियांच्या हक्काचा हिरीरीनं विचार करणारीही असेल. म. जोतिबा फुलेंच्या आयुष्यभराच्या कामाचा जो मोठा प्रकल्प होता तो प्रस्थापित, शोषक, असहिष्णू आणि अन्याय्य अशा संस्कृतीला बहुजनांच्या समांतर आणि सशक्त संस्कृतीनं विकल्प देणं. जोतिबा फुलेंनी इथल्या समाजातल्या हिणाचं, अन्यायाचं मर्म ओळखलं होतं. सगळ्या प्रश्नांचा समग्रतेनं विचार करून त्यांनी या प्रस्थापित संस्कृतीला पर्याय उभा करण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी ते संघर्ष करीत राहिले. अब्राह्मणी प्रबोधनातून अब्राह्मणी संघर्ष उभा करणं, त्यासाठी व्यापक चळवळ उभी करणं या त्यांच्या विलक्षण विचाराची आणि त्यातून ते जे 'एकमय नेशन'ची कल्पना मांडतात ती आजच्या काळात पुन्हा निष्ठेनं अनुसरण्याची अत्यंत गरज आहे. सध्याच्या जमातवादाला, मूलतत्त्ववादाशी भिडण्यासाठी त्याची आवश्यकता आहे.
सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर जोतिबांनी आपला रोख निश्चित केलेला होता आणि या दोन्ही गोष्टींत त्यांना आमूल परिवर्तन अपेक्षित होतं. सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, सामाजिक अधिकार मिळावेत यांसाठी ते निव्वळ मागणी करत नव्हते तर तो त्यांचा आग्रह होता. ही डिमांडेड दॅट. एकोणिसाव्या शतकात स्थिरावलेल्या ब्राह्मणी संस्कृतीच्या वसाहतवादाला घालवण्याचे त्यांचे प्रयत्न होते. कारण समाजाची संस्कृती एकजिनसी, एकरंगी नसते हे ते जाणत होते. म्हणूनच बहुलतावादाला, समतेला, बंधुतेला ते प्रक्षेपित करीत राहिले. त्यांचं आकलन समग्रतेनं असल्यानं त्यांची बंधुतेची कल्पनाही विश्वबंधुत्वाची होती. ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी ।। धरावे पोटाशी ।। बंधूपरी ।। असे ते सर्वांना बंधुभावाने कवटाळू पाहात होते.
Post a Comment