जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी त्याला किमान एक ते दीड वर्ष होईपर्यंत कायम स्वरूपी पाणी मिळेल, हे पाहिले पाहिजे. पाण्याची अशी व्यवस्था जेथे आहे, अशाच जागी वृक्षारोपण समारंभाचे कार्यक्रम हाती घ्यावेत. पाणथळ जागेत सतत ओलावा असतो तेथे अशा वृक्षांची लागवड करावी. वृक्षारोपण करण्यापूर्वी योग्य नियोजन करावे, असे करताना तेथील पाण्याची उपलब्धता, जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता आणि जमिनीचा प्रकार पाहून वृक्षांची निवड करण्यात यावी, वृक्षारोपण केल्यावर त्याचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
वृक्षांचे संरक्षणाचे दृष्टीने योग्य त्या 'ट्री गार्ड'ची निवड करावी, ते कायम स्वरूपी टिकतील याकडे लक्ष ठेवले पाहिजे, पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाबरोबरच उपलब्ध वृक्षांचे संरक्षण व संगोपन व्हावे याकरिता समाजात जाणीव आणि जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यासाठी कसे पुढे येतील हे आवर्जून पाहिले पाहिजे.
सिंचन क्षमता वाढविणारे छोटे-छोटे प्रकल्प हाती घेतल्यास वृक्षारोपणास ते पूरक ठरतील. त्यामध्ये नाला अडवून त्यावर प्रत्येक हजार फुटांवर बंधारा (मातीचा) बांधून त्याला सांडवा काढून दिल्यास बंधाऱ्यांची मालिका तयार होऊन पावसाचे पाणी अडवून जमिनीतील पाण्याची खोल गेलेली पातळी बरीच वर येऊ शकते. भूमिगत बंधारा अतिशय कमी खर्चातील प्रकल्प असून त्याची सुद्धा क्षमता पाणी जिरविण्याची मोठी आहे. वाहत्या नाल्यांमध्ये किंवा नदीमध्ये किंवा खडक अथवा मुरुम लागेपर्यंत एक ते दीड फुट रुंदीचा संपूर्ण (रुंदी) खड्डा घेऊन त्यातील माती बाजूला काढावी व तो चर काळ्या मातीने भरून त्यावर मुरूम टाकावा. काळ्या मातीच्या गुणधर्मामुळे पाणी आपसूक अडवले जाऊन जमिनीत मुरण्याची प्रक्रिया होते. याचा फायदा पुढे उन्हाळ्यामध्ये दिसून येतो. शासनाने पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण एक समारंभ न करता एप्रिल ते मे या कालावधी मध्ये पावसाचे पाणी साठविण्याचे नियोजन करावे,
पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजनाद्वारे जमिनीमधील पाण्याची पातळी वर येण्यास मदत होते. वरील उपक्रम शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविल्यास विधायक कार्य वेळेवर व कमी खर्चात होऊ शकते. गावतळी, शेततळी, भूमिगत बंधारे, साठवण बंधारे, व वृक्षारोपण हे सर्व राबविताना पाण्याच्या नियोजनाबरोबरच वृक्षारोपणाचा विधायक कार्यक्रम एप्रिल ते जून-जुलै अखेर होऊ शकतो, त्यामधून पाण्याची पातळी वाढल्यामुळे शेती उत्पादन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर वृक्षारोपणामुळे पावसाच्या प्रमाणावर अपेक्षित परिणाम होऊन पर्यावरणाचे संतुलन कायम राहण्यास मदत होईल. झाडें लावा झाडे जगवा ही स्लोगन केवळ प्रसिद्धी करीता न वापरता ती वास्तवात कशी येईल, हे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यासाठीं गांभीर्याने कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- सुनीलकुमार सरनाईक
भ्रमणध्वनी : ९४२०३१६३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)
Post a Comment