अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) अलिफ, लाऽऽम, रा. ही त्या ग्रंथाची वचने आहेत जी आपला उद्देश अगदी स्पष्टपणे व्यक्त करतात.
(२) आम्ही याला अवतरले आहे कुरआन१ बनवून अरबी भाषेत जेणेकरून तुम्हा (अरबवासींना ते) चांगल्या प्रकारे समजू शकावे.२
(३) हे पैगंबर (स.)! आम्ही या कुरआनला तुमच्याकडे दिव्य प्रकटन करून उत्तम शैलीमध्ये घटना व हकीकती तुम्हास सांगत आहोत अन्यथा याच्यापूर्वी (या गोष्टीपासून) तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ होता.३
(४) हे त्यावेळचे वर्णन आहे जेव्हा यूसुफ (अ.) ने आपल्या वडिलांना सांगितले, ‘‘हे पिता, मी स्वप्न पाहिले आहे की अकरा तारे आहेत व सूर्य आणि चंद्र आहे आणि ते माझ्यापुढे नतमस्तक होत आहेत.’’
(५) उत्त्तरात त्याच्या पित्याने सांगितले, ‘‘बाळा, आपले हे स्वप्न आपल्या भावांना सांगू नकोस अन्यथा ते त्रास देत राहतील.४ वस्तुस्थिती अशी आहे की शैतान माणसाचा उघड शत्रू आहे.
(६) आणि असेच घडेल (जसे तू स्वप्नांत पाहिले आहेस की) तुझा पालनकर्ता तुझी (आपल्या कार्यासाठी) निवड करील५
१) `कुरआन' चा वास्तविक अर्थ होतो `वाचणे'. अरबीत क्रियापदाला जेव्हा नामाच्या रूपात वापरले जाते त्याने अर्थ निघतो की यात क्रिया पूर्णत्वास पोहचली आहे. म्हणून या ग्रंथाचे नाव `कुरआन' ठेवण्याचा अर्थ आहे की हा ग्रंथ सामान्य आणि असामान्य अशा सर्वांसाठी वाचण्याचा ग्रंथ आहे. तसेच अत्याधिक वाचला जाणारा हा ग्रंथ आहे.
२) याचा अर्थ असा होत नाही की हा ग्रंथ मुख्यता अरबांसाठी अवतरित झाला आहे. तर याचा अर्थ असा होतो, ``हे अरबांनो! तुम्हाला इराणी आणि युनानी भाषेत हा ग्रंथ दिला जात नाही तर हा ग्रंथ तुमच्याच भाषेतील आहे. तुम्ही मग अशी कशी कारणे सांगता की आम्हाला काहीच कळत नाही. तसेच या ग्रंथातील प्रभावशाली पैलू जो ही ईशवाणी आहे याचे प्रमाण आहे तेसुद्धा तुम्हाला कसे कळू नये?
३) मक्का येथील विद्रोही लोकांपैकी काहींनी पैगंबर मुहम्मद (स.) यांची परीक्षा घेण्यासाठी व आपले भ्रम काढून टाकण्यासाठी यहुदी लोकांच्या सांगण्यावरून पैगंबर मुहम्मद (स.) यांना एक प्रश्न विचारला. तो म्हणजे बनीइस्राईल इजिप्त्मध्ये कोणत्या कारणाने पोहचले? त्याच्या उत्तरांत बनीइस्राईलींच्या इतिहासाचा अध्याय पुढे ठेवण्याअगोदर प्रस्तावनेच्या रूपात हे वाक्य आले, ``हे मुहम्मद! तुम्ही त्या घटनांपासून अनभिज्ञ होता वास्तविकपणे आम्ही तुम्हाला वहीद्वारा त्याची खबर देत आहोत.'' प्रत्यक्ष रूपात या वाक्यात संबोधन पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आहे. परंतु खरेतर संबोधन त्या विरोधकांशी आहे ज्यांना विश्वास नव्हता की पैगंबर मुहम्मद (स.) यांना दिव्य प्रकटनाद्वारा ज्ञान प्राप्त् होते.
४) पैगंबर यूसुफ (अ.) यांचे दहा भाऊ दुसऱ्या आर्इंचे होते. सर्वात लहान भाऊ त्यांचा सख्खा भाऊ होता. येथे त्याच दहा सावत्र भावांचा उल्लेख आहे. पैगंबर याकूब (अ.) यांना माहीत होते की हे सावत्रभाऊ यूसुफ (अ.) यांच्याशी ईर्षेने वागतात. ते दहा भाऊ चारित्र्यानेसुद्धा अनुचित होते. एखाद्या वेळी आपला स्वार्थ साधण्यासाठी ते काहीही करणारे होते. म्हणून बापाने आपल्या सदाचारी पुत्राला (यूसुफ) या दहा भावांशी सावध राहाण्यास सांगितले होते. स्वप्नाचा स्पष्ट अर्थ म्हणजे सूर्यापासून तात्पर्य पैगंबर याकूब (अ.) चंद्रापासून तात्पर्य त्यांची पत्नी (पैगंबर यूसुफ (अ.) यांची सावत्र आई) आणि अकरा ताऱ्यांपासून तात्पर्य अकरा भाऊ आहेत.
५) म्हणजे पैगंबरत्व बहाल करण्यात येईल.
Post a Comment