या जगात विविध धर्म संस्कृती आणि सभ्यतांमध्ये नेहमी एकमेकांविरुद्ध संघर्ष चालत असतो. या संघर्षातूनच विविध संस्कृतींची, सभ्यतांची निर्मिती होते, तर विविध सभ्यता नष्ट होत असतात. गतवैभव परत मिळवण्यासाठी मानवी समूह नेहमी प्रयत्नशील असतात. गतवैभव म्हणजे स्वप्न असते. स्वप्न पाहणे हे चांगले असले तरी गतकाळचे स्वप्न साकार करण्यातच अडकून राहणे संस्कृती सभ्यतांच्या विनाशाचे मूळ कारण ठरते. कालचक्र हे सदासर्वदा फिरत असते. त्या चक्राला थांबवता येत नाही. या काळच्या या चक्रात कधी जगातील सर्व सभ्यता एकामागून एक खाली-वर होत असतात. हे चक्र थांबत नाही किंवा एकदा या चक्रातून खाली गेलेली सभ्यता वर आणण्यासाठी अनेकदा विनाशाची वाट धरली जाते आणि असे करताना आपण आपल्या भविष्याचा ऱ्हास करत आहोत याचे भान राहत नाही. याचे मूळ कारण एक सभ्यतेच्या जागी दुसरी सभ्यता नेहमी प्रगतीशील विचारांवर जगात नवनवीन विचारधारा, मानवी कल्याणासाठी नवे उपक्रम, विकासाची नवी क्षितिजे शोधून काढण्याऐवजी मागील संस्कृतीला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न केले जात असतात. काळाचे चक्र यासाठी उलट दिशेने फिरवण्याचे प्रयत्न केले जात असतात. मानवी इतिहासात कोणत्याही सभ्यतेने गतवैभव आणि गतकाळ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्यांनी ते उद्दिष्ट गाठले असेल असे उदाहरण नाही. गतवैभव परत आणण्यापेक्षा आपण मानवी इतिहासाच्या ज्या प्रगतीशील वळणावर आहोत त्या वळणावरून भविष्याकडे वाटचाल करून आपल्या सभ्यतेचा पुनर्जन्म करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मानवी सभ्यता ज्या वळणावर पोहोचली आहे, त्या टप्प्यातून पुढे जाण्यासाठी नवीन ज्ञान-विज्ञानाचा शोध करावा लागतो. मागच्या संस्कृती त्या वळणावर पोहोचण्याकरिता मानवी कल्याणासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक विचारांचे काय व किती योगदान आहे, मानवजाती त्या त्या सभ्यतेच्या केंद्रस्थानी आहेत की नाही यावर नव्या सभ्यतेचा जन्म होतो. जुन्या सभ्यतेचे पुनरुज्जीवन शक्य होत असते. ज्या सभ्यतांमध्ये धर्माला केंद्रस्थानी ठेवण्यात आले असेल त्या धर्माच्या शिकवणी मानवी कल्याणासाठी आहेत की मानवजातीला गुलाम बनवण्यासाठी आहेत यावर त्या सभ्यता-संस्कृतीचा विकास किंवा विनाश अवलंबून असतो. केवळ धार्मिक परंपरा, उपासना पद्धतीच जर कोणत्या धर्माचा गाभा असेल तर त्या धर्माचा मानवी विकासात कोणताच वाटा नसतो आणि ज्या धर्मसंस्कृतीवर आधारित सभ्यतांच्या शिकवणीत मानवी कल्याणाचा समावेश नसेल त्या धार्मिक संस्कृती धर्मस्थळापुरते मर्यादित राहतात. मानवी समूह जीवनात त्यांना स्थान नसते. कारण त्यांच्याकडे सकारात्मक विचारधारा नसून नकारात्मक योजना असतात. ज्या मागे काही वर्चस्ववादी धार्मिक परंपरांचे हितसंबंध असतात. सभ्यतांचा इतिहास म्हणजे मानवजातीच्या संवेदनांचा इतिहास, मानवजातीचा विनाश नव्हे. हा इतिहास विविध धार्मिक-सांस्कृतिक सभ्यतांनी विकसित केला आहे. गतकाळाला किंवा गतवैभवाला प्राप्त करण्यासाठी कोणत्याच सभ्यतेला आजवर यश मिळालेले नाही. शेवटी सभ्यता म्हणजे सांस्कृतिक परवपरांचा एक प्रकारे मानवी संच असतो. जर मानवतेला वगळून सबप्यता रुजविण्याचे प्रयत्न केले तर कधी यशस्वी ठरत नाहीत.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment