सर्वोच्च न्यायालयाने देहविक्री हा वैध व्यवसाय असल्याचे मान्य करीत, पोलिसांनी सज्ञान आणि परस्पर संमतीने देहविक्री करणाऱ्या महिलांची अडवणूक किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये, असा आदेश दिला. देहविक्री करणाऱ्या महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सहा मार्गदर्शक तत्त्वेही माननीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केली आहेत. मला न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करायचे नाही. माझा मुद्दा हा आहे की खरोखरच सर्वच स्त्रिया आनंदाने, राजीखुशीने, आपण होऊन हा व्यवसाय निवडतात का?
जसे इतर अनेक व्यवसाय आपल्या मर्जीने निवडले जातात, तसाच हा व्यवसाय निवडला जातो का? इतरही काही व्यवसाय असतील की, स्त्रिया पोटाची खळगी भरण्यासाठी मजबुरीने करत असतील परंतु; इतर व्यवसायाप्रमाणेच या व्यवसायाकडे व ते करत असलेल्या महिलांकडे समाज सन्मानाने पाहतो का? त्यांच्या मुलाबाळांना सन्मानाची वागणूक मिळते का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. पण मुख्य मुद्दा हा आहे की, समाजात मान्यता असलेले व सन्मानजनक वागणूक दिली जाणारे इतर अनेक व्यवसाय असताना स्त्रिया या व्यवसायात का पडतात? आपल्या मर्जीने हा व्यवसाय निवडणाऱ्या स्त्रिया असतीलही. परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. वास्तविक पाहता या व्यवसायात पडणाऱ्या अधिकतर महिला अशा असतात ज्यांचे लैंगिक शोषण झालेले असते. हे एक कटू सत्य आहे.
माणसाच्या इतर गरजांप्रमाणे शारीरिक सुख मिळणे ही गरजेचे आहे. शिक्षणाच्या नावाखाली किंवा मुलींना स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने विवाहकडे दुर्लक्ष केले जाते. मुलींना शिक्षण देऊ नये असे नाही परंतु; तिशी ओलांडेपर्यंत विवाहाचा विचारच करू नये, असा नियम तर नाही ना. विवाहानंतरही शिक्षण घेता येते. या काळात मुली कोणाच्या प्रेमात तरी पडतात किंवा लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या भावनांशी व शरीराशी खेळले तरी जाते. अनेक महाविद्यालयीन मुलींची फसवणूक झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून आपण वाचत असतो. यातून अलीकडे कुमारी मातेचा गंभीर प्रश्न रौद्ररूप धारण करत चालला आहे.
एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडून घर सोडून पळून गेलेल्या अनेक मुलींचा नंतर पत्ता सापडत नाही. कुठे जातात या मुली? खरोखरच कुठेतरी आपल्या जोडीदारासह सुखी जीवन जगत असतात का? असे असेल तर ठीक आहे. पण अशा मुली बोटावर मोजण्या इतक्याच असतात. कित्येक मुलींची फसवणूक करून त्यांची कुंटनखाण्यामध्ये विक्री केली जाते. आई-वडिलांच्या मर्जीचा विचार न करता पळून गेल्याने, परत आई-वडिलांना तोंड दाखवण्याची इच्छा नसते. नातेवाईक शेजारीपाजारी सगळीकडे बदनामी झालेली असते. त्यामुळे घराकडे परतण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. दुसरीकडे ज्याच्यावर विश्वास ठेऊन घर सोडलं, जन्मदात्या आईबापाला सोडलं, त्यांनीही हात झटकलेले असतात. त्यांना वाममार्गाला लावून बेपत्ता झालेले असतात. ’घर का ना घाट का’ अशी त्यांची अवस्था झालेली असते. अशा परिस्थितीत नशिबाला दोष देत, कन्हत पिचत पडलेल्या असतात. अलिकडेच आलेला चित्रपट ’गंगूबाई’मध्ये शरीरविक्रीसाठी महिलांना कशाप्रकारे आणले जाते याचे हृदयद्रावक चित्रण केलेले आहे.
अनेक विधवा, घटस्फोटित व सोडून दिलेल्या निराधार स्त्रियांच्या बाबतीतही असेच घडत असते. विधवा, निराधार तसेच घटस्फोटित महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले जातात. विधवा व निराधार महिलांची आश्रमामध्ये राहण्याची सोय केली जाते. परंतु अनेक वेळा या ठिकाणीही त्यांचे शारीरिक शोषण झाल्याच्या बातम्या कानावर येतात. घरातही अनेक वेळा जवळचे नातेवाईक त्यांच्या निराधारपणाचा गैरफायदा घेत असतात. जवळील नातेवाईकांकडूनच त्यांचा लैंगिक छळ झालेला पाहावयास मिळतो. अशा विधवा निराधार घटस्फोटित महिलांच्या सर्व समस्या सोडवण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे त्यांचा पुनर्विवाह! या अशा प्रकारच्या सर्व महिलांचे सर्व प्रश्न या मार्गाने सुटू शकतात. पुनर्विवाह झाला तर त्यांच्या सर्व समस्या चुटकीसरशी सुटतील. स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी इस्लाम मध्ये जे मार्गदर्शन केले गेले आहे, ते असे की, कोणीही विवाह योग्य असलेली स्त्री किंवा पुरूष जोडीदाराशिवाय राहता कामा नये. स्त्री असो की पुरुष विवाहयोग्य वय होताच, त्याचा विवाह केला जावा. विधवा, घटस्फोटित व निराधार महिलांच्या विवाहाला प्राधान्य दिले जावे. विवाहाद्वारे त्यांचे पुनर्वसन केले जावे. पैगंबर मुहम्मद ( स.) यांनी स्वतः या तत्त्वांचा अंगीकार केला आणि पहिला विवाह एका विधवा स्त्रीशी केला. सुमारे पंचवीस वर्षे त्यांच्याबरोबर सुखी संसार केला. एवढेच नव्हे तर पहिल्या पत्नीच्या हयातीत त्यांनी दुसरा विवाहसुद्धा केला नाही.
खऱ्या अर्थाने महिलांच्या समस्या सोडवावयाच्या असतील तर योग्य वेळी विवाह करणे, विधवा घटस्फोटित व निराधार महिलांचे पुनर्विवाहाद्वारे पुनर्वसन करणे तसेच विवाह सोपा आणि कमी खर्चाचा करणे हेच खरे उपाय आहेत.
- सय्यद जाकेर अली, परभणी
9028065881
Post a Comment