जाफरनगरच्या जामा मशिद येथे जमाअत ए इस्लामी हिंद नागपूरचा उपक्रम
नागपूर (डॉ. राशिद शेख)
मस्जिदित येऊन आम्हाला उत्साही वाटत आहे, आमच्या अनेक गैरसमजूती व भिती दूर झाली आहे, आता वाटेल तेव्हा मशिदितील थंड पाण्याने आम्ही आमची तृष्णा भागवू शकतो, विश्वास आहे की येथे कुणासोबतही चुकीचा व्यवहार करण्यात येणार नाही. द्वेषाच्या वातावरणात मस्जिद परिचय हा चांगला उपक्रम आहे, यामुळे बंधुभाव, सौहार्द आणि सद्भावनेला चालना मिळेल. आम्हाला हे जाणून आश्चर्य झाले की येथे देशात बंधुभाव, शांती व विकासाकरिता अल्लाहकडे ‘दुआ’ (प्रार्थना) केली जाते. अशा प्रकारचे कार्यक्रम शाळा व्यवस्थापनासोबत युवक व विविध समुदायांसाठी मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जावे. अजान, नमाज ही अमर उपासना असल्याचे विचार विविध संप्रदायातील बांधवांनी मस्जिद परिचय कार्यक्रमात व्यक्त केले.
जमाअत ए इस्लामी हिंद नागपूरच्यावतीने जाफरनगर मस्जिद कमेटीच्या संयुक्त विद्यामाने जाफरनगरच्या जामा मशिद येथे रविवारी (ता. 5 जून रोजी) मशिद परिचय कार्यक्रम घेण्यात आला.
उपस्थितांच्या परिचयानंतर मस्जिद परिचय कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मस्जिदचे ‘मुअज्जन’ (अजान देणारे) ख्वाजा रफिउदीन सुहैल यांनी अजान दिली. मौलाना साद नदवी आणि संदेश विभागचे सचिव डॉ. नुरुल अमिन यांनी ‘नमाज’शी संबंधित अजान, वजु, नमाज, दुआ यांचे अर्थ समजावून सांगीतले. उपस्थितांना मस्जिदीच्या विविध स्थानांची माहिती देण्यात आली. यावेळी माहिती देतांना, प्रत्येक नमाजसाठी अजान आवश्यक असते, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले जात आहे, सकाळची अजान लाउडस्पिकरवर दिली जात नाही आहे. नमाज ‘किब्ला’ (पश्चिमेकडे) चेहरा करून पढली जाते. ही दिशा ‘खाना ए काबा’ (पवित्र काबाची दिशा) आहे जे संपूर्ण विश्वाचे केंद्र आहे. नमाज पढतांना कुठलाही भेदभाव केला जात नाही. जो सर्वात आधी येतो त्याचे ते स्थान असते. तसेच इस्लाममध्ये कुठलाही ऊच निचतेचा भेदभाव नाही. मस्जिदमधील ‘मिंब’ (मौलवीकरिता बसण्यासाठी असलेली उंच जागा) विषयी माहिती देतांना सांगण्यात आले की, शुक्रवारच्या नमाजमध्ये येथे उभे राहून ‘इमाम’ (नमाज पठविणारे मौलवी) प्रवचनात धार्मिक आधारावर संस्कारमय जीवन जगण्याची कला व प्रेषित मुहम्मद (स.अ.व.) यांच्या जीवनावर आधारित बाबी सांगतात. मस्जिद परिचय कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या सत्रात, अजान कशासाठी, मशिदीत महिलांना प्रवेश, नमाज पठण करतांना कसे कपडे परिधान करावे आदी प्रश्नांचे तर्कसंगत उत्तरे देण्यात आली. यावेळी हेदेखील सांगण्यात आले की ‘तब्लीगी जमात’चे सदस्य कशाप्रकारे चार-पाच च्या संख्येत परिसरात जाऊन स्थानिकांना तसेच इस्लामच्या शिकवणीपासून दूर होत चाललेल्या मुस्लिमांना नमाजचे महत्त्व सांगून मस्जिदीत येण्यास सांगतात. व्यापाऱ्यांना वस्तू विक्री करतांना योग्य प्रकारे नियमानुसार मोजून द्यावी, चोरी करू नये, खोटे बोलू नये, मद्यप्राशन करू नये आदी बाबीही समजावून सांगण्यात येतात. मस्जिद परिचय उपक्रमात अजान, वजू, नमाज आणि दुआ चे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले.
यावेळी मिलिंद झोडे, विजय पोहनकर, लक्ष्मण ठामरे, राजू इंगोले, नरेश इंगोले, साहेबराव क्षीरसागर, चिन्मय मुखर्जी, रिंकू, संजय प्रजापती, आनंद डेकाटे, आलोक प्रकाश चौबे, सुनील खोब्रागडे, राजकुमार रावत, विलास शेगांवरकर, शिवशंकर ताकतोडे, शैलेश पांडे, सुनील किरानाचे संचालक तसेच गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे मारोती आणि अनिल केंद्रे आदिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन कार्यक्रमाला यशस्वी केले. गुलाबाचे फूल देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.
मस्जिद कमेटीचे अध्यक्ष मीर अहमद हुसैन यांनी सांगीतले की, त्यांचे वडील मोहीयुद्दीन अहमद यांनी आजोबा मीर जाफर हुसैन यांच्या नावावर 1962 मध्ये 2600 चौरस फूटाचे सहा प्लॉट (एकूण 15,600 चौफु) खरेदी केले होते. मस्जिदेचे पहिले अस्थाई बांधकाम 1968 मध्ये झाले. 1976 मध्ये याचे पक्के बांधकाम करण्यात आले. 2005 मध्ये याचे नवनिर्माण करण्यात आले. 1982 मध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात मशिद कमेटीची नोंदणी झाली व मला (मीर अहमद हुसैन) पहिला अध्यक्ष जाहिर करण्यात आले. याचे व्यवस्थापन आपल्या परिवाराकडे आहे. मस्जिदित प्रत्येक आवश्यक सुविधांचा समावेश आहे. मस्जिदीत मुले आणि मुलींसाठी वेगवेगळे वर्ग चालतात. यात त्यांना अरबी, उर्दु आणि धार्मिक बाबी शिकविल्या जातात. विवाहित महिलांनाही सासरी चांगले जीवन जगण्याच्या बाबी सांगीतल्या जातात. येणाऱ्या जमातच्या व्यक्तींकरिता येथे निवास व भोजनाची व्यवस्था आहे. कुठल्याही प्रवाश्याला येथे थांबण्याची परवानगी तेव्हाच देण्यात येते जेव्हा त्याच्याजवळ आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्र असतात. येथे सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आले आहेत. येथे हाफीज रहमतुल्लाह व हाफिज अशफाक असे दोन (इमाम) मौलवी आहेत. तसेच गुलाम व रसूल हे दोन मुअज्जन (अजान देणारे) आहेत. काही दिवसांपूर्वी परिसरात नाल्याचे पाणी पेयजलापूर्ती करणाऱ्या पाईपलाइनमध्ये गेल्याने नागरिकांनी पेयजलाची समस्या झाली होती, तेव्हा मशिदीच्यावतीने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मस्जिद परिचयाचा कार्यक्रम प्रत्येक शहर, गाव, वाडी-तांड्यावर घेण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून मुस्लिमेत्तर बांधवामधील मस्जिदीबद्दलचे गैरसमज दूर होतील. कुरआन आणि हदीसमध्ये असलेल्या संदेशांबद्दल सर्वांना माहिती देणे आवश्यक आहे. कारण आजकाल उठसूट काही तथाकथित समाजकंटक धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. अशांना उत्तर चांगले काम करून दिले जावे, असा सूर उमटला.
Post a Comment