अतिरेकाच्या काळात जोतिबांनी वापरलेल्या साधनांचाही आपल्याला विचार करावा लागेल. फुल्यांनी परंपरेतले अभंग, पोवाडे, जलसे, प्रश्नोत्तरांचे रूपबंध आपल्या खास श्रमिकांच्या भाषेत घडवून स्वभाषेचा जोरकस ठसा उमटवला. त्यांच्या भाषेत संस्कृत-फारशी-गुजराती-हिंदी वाक्यरचना आणि म्हणी येतात. इंग्रजी पद्धतीच्या मराठी वाक्यांत खास गावठी मराठी लयीतले शब्द डोकावतात. लोकसमूहांनुसार त्या त्या लोकांसाठीची बोली ते वापरतांना दिसतात. त्यांनी वापरलेली ठेवणीतली विशेषणं आणि खास शिव्यांचा तर स्वतंत्र अभ्यास होणं आवश्यक आहे. त्यांचं लेखन वाचतांना आपल्याला लक्षात येतं की तत्कालीन जागतिक सांस्कृतिक घडामोडींची अद्यावत माहिती ते ठेवत होते, होमर, शेक्सपिअर आणि मुस्लीम-ख्रिश्चनांचे धर्मग्रंथ, मराठी-हिंदी संतकाव्यं, जैन-इस्लामची तत्त्वज्ञानं, समकालीनांचं साहित्य तसेच इतिहास आणि भारतविद्येचे ग्रंथ यांचं त्यांनी सूक्ष्म वाचन केलेलं होतं. त्यातून आपली धारदार भाषा घडवली होती आणि ती त्यांनी आपल्या कार्यात त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर-लोकहितार्थ आणि शेतकऱ्यांच्या बचावासाठी वापरली. भाषेबद्दल जोतिबा किती जागरूक होते आणि भाषेमागचं राजकारण त्यांनी किती बारकाईनं समजून घेतलं होतं हे कळल्यावर असं वाटतं की ते विसाव्या शतकात असते तर भाषाशुद्धीसारख्या विभेदनवादी प्रकाराची त्यांनी कठोरपणे चिकित्सा केली असती. ब्राह्मण्याची त्यांनी केलेली चिकित्सा ही त्यांना सामाजिक गुलामगिरीविरुद्ध विद्रोह करणारा पहिला क्रांतिकारक विचारवंत ठरवते. ब्राह्मण्याविरुद्ध युद्ध पुकारलेले असतांनाही त्यांचा शत्रूमित्र विवेक ते विसरत नाहीत कारण त्यांना मोठ्या शत्रूचं स्पष्ट आकलन झालेलं होतं. डोंगरी तुरुंगातून टिळक-आगरकरांची सुटका झाल्यावर त्यांचा ते सत्कार करतांना दिसतात तसेच दयानंद सरस्वतींच्या सत्कारप्रसंगी उद्भवलेल्या अरिष्टाला आपल्या फौजेनिशी मदत करायला न्यायमूर्ती रानडेंच्या मदतीलाही धावून जातात.
फुलेंनी एकूण सामाजिक व्यवस्थेचा समग्रतेनं विचार केला होता. भांडवलशाही आणि धर्मव्यवस्था या किती शोषणव्यवस्थांना जन्म देतात हे नेमकं ओळखलं होतं. तत्कालीन सुधारकांपैकी अनेकांनी प्रामाणिक प्रयत्न केले असले तरी त्यांच्या उदारमतवादाचा परीघ ब्राह्मण व उच्चवर्गीयचांपर्यंतच होता. धर्मविषयक त्यांनी वापरलेल्या संज्ञाही (हिंदू, आर्य इ.) ढिसाळ असल्याने त्या विसाव्या शतकातल्या हिंदुत्त्ववाद्यांच्या पथ्यावर पडल्या. हिंदू आणि ख्रिश्चन, हिंदू आणि मुसलमान अशा प्रकारे विचार झाल्यानं त्याचा फायदा केवळ उच्चवर्णीयांना झाला आणि त्यातच त्यांचा मतलबही होता. त्यांनी मांडलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादातच दुहीची बीजं होती. याउलट जोतिबा जे द्वैत मांडतात त्याचा त्यांनी साकल्यानं विचार केलेला दिसतो. अभिजन आणि बहुजन किंवा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा भेद करतांना त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या होणाऱ्या पिळवणूकीला लक्ष्य केलं होतं. त्यांनी ज्यांचा उल्लेख वारंवार केलेला आहे ती नावं म्हणजे शिवाजी, महंमद, येशू ख्रिस्त, बुद्ध, बळी, बृहस्पती. जोतिबांनी निर्माण केलेली ही मिथकं आजही मूलतत्ववाद्यांना अडचणीची वाटतात, त्यावरून आजच्या संघर्षात फुल्यांनी दिलेली दिशा किती महत्त्वाची होती हे लक्षात येईल. प्रस्थापित सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विरोधात ते त्यांच्या कार्यातून, लेखनातून आणि प्रतीकं-मिथकातून नवी जीवनदृष्टीच देत होते. आज आपण भयंकराच्या दारात येऊन उभे राहिलो असतांना ती आपल्याला पुन्हा दिशादर्शक ठरू शकते. मूलतत्त्ववादी विचारांमध्ये स्त्री ही सर्वात शोषित असते. जोतिबांनी समतेचा विचार मांडतांना सर्व वर्ण-वर्गातल्या स्त्रीला सुद्धा विचारात घेतलं होतं. विषमतेला नकार देतांना जोतिबा स्त्री-पुरुष सर्वांचा एक घटक म्हणून विचार करतात. ते समाजाचा एक भाग म्हणून विचार करण्याअगोदर एकेका व्यक्तीला समतेची संधी मिळायला हवी असा आग्रह धरतात. फाशिस्ट, हुकूमशाही व्यवस्थेत नेमकं याउलट असतं. झुंडी आणि समूह म्हणून ओळखी उरलेल्या असतात. आजच्या काळात हाही फरक लक्षात ठेवायला पाहिजे.
जोतिबांनी आपला वैकल्पिक संस्कृती उभारणीचा प्रकल्प मांडला त्या आधुनिक विचारात परंपरेतील सत्वशील तत्त्वं आणि नवतेचा स्वीकार केलेला दिसतो. त्यांच्या या अब्राह्मणी आधुनिकतेचा विचार म्हणूनच आजच्या काळातही तितकाच प्रस्तुत आणि सार्थ आहे. जमातवाद हा जातीय आणि धार्मिक अस्मितेला खतपाणी घालून आपला मतलब साधतो हे त्यांनी जाणलेलं होतं. त्यामुळे आजच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला तोंड देण्यासाठी त्यांनी जे नेमकं सर्वसमावेशक पर्यायी ठोस प्रारूप उपलब्ध करून दिलेलं आहे, त्यावरूनच आपल्याला आपल्या संघर्षाची दिशा ठरवावी लागणार आहे. फक्त त्याच्यासाठी परस्परांतील कलह, जाती-जातीच्या टोकदार अस्मिता, फालतू अहंगंड, विसरून, वेगवेगळ्या दिशेला झालेली तोंडं सामोरी करून खुलेपणा स्वीकारला पाहिजे. प्रगतीशील समूह जाती-जातींच्या अस्मितांनी चिरफाळले गेले आहेत. असहमतीतून सहानुभाव, परिवर्तनशीलता आपण अंगिकारणं गरजेचं आहे. सद्यकालीन मोठे धोके ओळखून कॉ. पानसरेंनी सांगितलेल्या शत्रुमित्र विवेकाचं भान ठेऊन आपल्याला साथीनं उभं राहाणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या काटेकोरपणे एक कार्यक्रम ठरवणं, या नव्या दृष्टीनं त्याची तातडी पटवून देणं करावं लागेल. आता अटीतटीची, कडेलोटाची वेळ आलेली आहे. आता आलेलं संकट सभ्यतेवरचं संकट आहे. ते ओळखलं तरच आपण जागे झालो असं म्हणता येईल. संकट जागतिक आहे. माणूस हा केंद्र धरून केलेल्या विवेकी विचारांनी वर्चस्ववादाला प्रतिवर्चस्ववादी चळवळीचा कार्यक्रम आखूनच मुकाबला करता येणार आहे. त्यासाठी भपकेदार इव्हेन्ट्स, उत्सवी बाजार टाळून लहान लहान आणि सुट्या सुट्या सातत्यपूर्ण कार्यक्रमांची गरज आहे. प्रगतीशील विचारांतल्या अस्मितेच्या मुद्यांवरून चिरफाळलेल्या समूहांनी एकत्र येऊनच हा विचार करावा लागेल. अन्यथा नंतर अस्तित्वाच्या कडेलोटाची वेळ येईल.
मानवी सभ्यतेवरचं अरिष्ट आणि संस्कृतीची लोकशाहीवादी बीजं
जगभरच्या सामाजिक-राजकीय घडामोडी पाहाता आपल्या मानव म्हणून असलेल्या सभ्यतेवरच जमातवादाचं, मूलतत्त्ववादाचं, वंशवादाचं अरिष्ट आलेलं दिसत आहे. तिकडं कृष्णवर्णीय लोकांशी श्वेतवर्णीयांचं वर्तंन अत्यंत अमानुष झालेलं आहे. अलीकडे जॉर्ज फ्लॉईड याला पोलिसांनी त्याच्या गळ्यावर गुडघा दाबून ठार मारलं. त्याचा श्वास कोंडला होता. दहा मिनिटं तो ’आय कान्ट ब्रीद,' असं म्हणत राहिला. अन्यायी, राक्षसी आणि अमानुष व्यवस्था वंचितांना, वर्जितांना विकल बनवू पाहाताहेत. मूक करू पाहाताहेत. संपवू पाहाताहेत. ही मानवी सभ्यता नाही.
संस्कृती ही कधीही एकसाची, एकरंगी अशी व्यवस्था नसते. ती तिच्या पोटातल्या विविध मताचं-रूपांचं-वादविवादांचं, वितंडांचं, असहमतींचं, सुसंवादांचं सरमिसळ झालेलं रूप असतं. अनेक लोक, अनेक मतं, विचार, वंश, भाषा, धर्म अशा अनेक संस्कृती मिळून भारताची सभ्यता निर्माण झालेली आहे. प्राचीन काळात सुमेरिअन, इजिप्शिअन वगैरे ज्या मोठ्या सभ्यता निर्माण झाल्या, त्यात भारताची सभ्यता ही महत्त्वाची आहे. इथं मराठवाड्यात किती धर्म आणि संप्रदाय आणि चळवळी झाल्या. कोणत्याही धर्मात हिंसेला, अत्याचारांना परवानगी दिलेली नाही. भक्ती चळवळ आणि इथला सूफी संप्रदाय हे आपलं सांस्कृतिक संचित आहे, वारसा आहे. आपल्या संस्कृतीच्या समृध्दीत त्यांनी मोलाचा वाटा उचललेला आहे. इथल्या भक्ती चळवळीतूनच उत्तरेतल्या संतकवींनी प्रेरणा घेतली. मंडन-खंडन-वितंडा अशी आपली वादविवादाची परंपरा होती. तित इतरांच्या वेगळ्या विचाराला, टीकेला जागा होती. संस्कृतीतच कलांची, साहित्याची, विचारांची, ज्ञान आणि तत्त्वज्ञानांची, सहमती-असहमतींची आणि विरोधांची असंख्य रूपं निर्माण होत असतांनाच ती संस्कृतीला संपन्न करीत असतात. एकच एक विचार, एकाच पद्धतीचा आहार, एकाच पद्धतीची भाषा, जीवनदृष्टी असं काही संस्कृती स्वीकारत नाही. संस्कृतीतच लोकशाहीची बीजं असतात. कारण याच संस्कृतीत संतांनी, धुरीणांनी, विचारवंतांनी, संतांनी सवाल करण्यासाठीचे पायंडे पाडून ठेवलेले आहेत. सगळे प्रवाह स्वीकारत लोकशाहीची तत्त्वं सामावून घेत बहुलतावादी रूपातच संस्कृतीचं चरित्र घडत असतं. त्याचं सद्यपरिस्थितीत कधीही विस्मरण होऊ न देणं ही आपली जबाबदारी आहे. कर्तव्य आहे. भक्ती आणि सूफी चळवळींनी आपल्याला दिलेला संदेश आणि छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, वि. रा. शिंदे, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनी आपल्याला दिलेली प्रश्न विचारण्याची, चिकित्सा करण्याची, समतेची, करूणेची आणि न्यायाची शिकवण आज कधी नव्हे ती निष्ठेनं अंमलात आणण्याची गरज आहे. कारण तो मानुषतेचा संदेश आहे. कारण तो लोकतंत्राचा पायाभूत विचार आहे.
मित्रहो, समकालाविषयी बोलतांना मी खूपच दुःस्वप्नकारक गोष्टींचे दाखले दिले ते त्यामुळे निराश आणि हतबल होण्यासाठी नव्हे, तर मूळात रोग काय आहे याचं निदान तुमचं तुम्हाला करता यावं म्हणून दिलेले आहेत. लेखकासाठी आजचा काळ अनेक स्वातंत्र्याचे संकोच झाल्याचा काळ आहे. पण लेखकाला अस्वस्थ वाटत राहाणं ही त्याच्या लेखक असण्याची मूळ अटही असते. मुनीर नियाजी नावाचा शायर म्हणतो तसं,
बेचैन बहुत फिरना, घबराये हुए रहना
इक आग़ सी जज़्बों की दहकाये हुए रहना
हे केल्याशिवाय लिहित्या लेखक-कवीला इलाज नसतो. 'जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची । तया भोजनाची रूचि प्राप्त कैची' असं स्वतः प्रत्यक्ष वास्तवाचा उलगडा होऊन अस्वस्थ व्हायचं आणि इतरांनाही अस्वस्थ करीत राहायचं हे लेखकाचं काम असतं. नोबेल पुरस्कार स्वीकारतांना ग्युंटर ग्रास या थोर जर्मन लेखकानं सांगितलं होतं, "भूतकाळात सुखानं राहू द्यायचं नाही हे लेखकपणाच्या (कलावंत असण्याच्या) व्याख्येत अनुस्युत असतं. सतत भूतकाळाविषयी बोलणारे हे लोक बुजलेल्या जखमा उघड्या करतात. बंद दारांतून आत डोकावतात. कपाटांत दडवलेले सांगाडे शोधतात. सगळ्यात वाईट म्हणजे ते विजयी बाजूच्या मतांशी जोडून घ्यायचं नाकारतात. ते विजयांवर प्रश्नचिन्हं उमटवत राहतात." हे लक्षात ठेवायला हवं.
Post a Comment