Halloween Costume ideas 2015

थांबलेला श्वास आणि स्वप्नांची राख

America burning
अमेरिकेने दोन स्वप्ने पाहिली होती. एक अमेरिकेतील अ भांडवलशाही घेऊन उदयाला येणाऱ्या नव्या जगाने पाहिले आणि दुसरे डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांनी पाहिले. पहिले स्वप्न, ‘अमेरिकन ड्रीम’हा अमेरिकेचा खरा आत्मा. लोकशाही, मानवी हक्क, स्वातंत्र्य, समानसंधी आणि समता ही मुल्ये या स्वप्नाचा पाया आहेत. कष्ट करा, संधी मिळवा, यशाकडे चला आणि संपन्न व्हा हा या स्वप्नाचा मंत्र आहे. हे स्वप्न उराशी बाळगताना तुम्ही कोण, कुठले, तुमचे नाव, गाव यातील काहीही आड येणार नाही असे म्हटले गेले. भारतीय सुवर्ण भूमीचा शोध घेत स्पेनचा मध्ये अमेरिकेत पोहोचला. ही नवी भूमी आपल्या साम्राज्याच्या आधिपत्याखाली घेण्यास स्पेनने सुरुवात केली. स्पेन हात पाय पसरता असताना पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि एकूण 13 युरोपिय देश अमेरिकेत साम्राज्य विस्तारासाठी आले. त्यांनी अझटेक आणि इंका या स्थानिकांच्या समृद्ध संस्कृती संपवल्या. त्यावेळी 80 लाख स्थानिक रहिवाशांचे शिरकाण करण्यात आले. पण या  संस्कृतींमध्ये युरोपिय येण्यापूर्वीही गुलामगिरीची प्रथा होती. इतर जिंकलेल्या टोळ्यांमधील लोकांना गुलाम केले जाई.  स्पॅनिश राजवटीने 1512 मध्ये गुलामगिरीच्या प्रथेवर बंदी घातली. पण इतर  राजवटी पसरू लागल्या तशी गुलामगीरीही. ऑगस्ट 1619 मध्ये प्रथम 20 आफ्रिकी गुलाम डच लोकांनी व्हर्जिनिया प्रांतातील जेम्सटाऊन येथे आणले आणि ब्रिटिशांना विकले. बघता बघता गुलामांचा व्यापार फोफावू लागला. या गुलामांना अत्यंत अमानुष रीतीने साखळदंडांनी बांधून, अनेकदा कुटुंबापासून तोडून किंवा कुटुंबासहित जहाजांमधून आणले जाई. जहाजांमध्ये स्त्रिया, मुले एकीकडे, पुरुष दुसरीकडे ठेवले जात. अनेकजण प्रवासात मरत. स्त्रियांवर जहाजात बलात्कार केले जात. 1641 मध्ये मॅसॅच्युसेटस ही पहिली वसाहत जिने आनुवंशिक गुलामगिरीचा कायदा केला आणि अनेकांनी त्याचे अनुकरण केले. म्हणजे गुलामाची मुले बाळे गुलामच. आपल्याकडील जन्माधिष्ठित जातिव्यवस्थेचे हे वेगळे रूप. बघता-बघता गुलामांची संख्या वाढूलागली आणि मालकांची अमानुषताही वाढू लागली. गुलामांच्या घामावर संपत्ती उभी राहू लागली.
अमेरिकी स्वप्नाची खरी बांधणी 1774 मध्ये सुरू झाली. 4 जुलै 1776 मध्ये अमेरिकेतील 13 वसाहतींनी स्वातंत्र्य जाहीर केले. स्वत: 200 गुलामांचे मालक असणाऱ्या थॉमस जेफरसन यांनी मानवी हक्क आणि व्यतिस्वातंत्र्य देणारा अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला. अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धात हजारो काळ्या गुलामांनी गोऱ्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून बलिदान केले. 1787 मध्ये अमेरिकेची घटना तयार झाली जिने स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांचा उद्घोष केला पण गुलामगिरी चालू ठेवली.1750 मध्ये उत्तर अमेरिकेतील अनेक राज्यांनी मात्र गुलामगिरी रद्द करण्याचे कायदे करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे दक्षिणेतील राज्यांध्ये ती अधिकाधिकरुजू लागली. 1807 मध्ये अध्यक्ष थॉमस जेफरसन यांच्या आग्रहामुळे गुलामांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंदी आणण्यात आली. पण यामुळे देशातील गुलामांचा व्यापार वाढला. 1840 ते 60 काळात मात्र,विशेषत: उत्तरेत, गुलामगिरीविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. 1852 मध्ये हॅरियट स्टोवे यांच्या गुलामाला भोगाव्या लागणाऱ्या अत्याचारांवर असलेल्या ‘अंकल टॉम्स केबिन’ या कादंबरीने हे जनमत आणखीन घडविले.
अमेरिका एक नवे जग म्हणून उदयाला येत होती. हे नवे जग हात पसरून जगभरातील सर्वांना बोलावत होते. 1849 मध्ये कॅलीफोर्नियामध्ये सोने सापडले आणि ‘गोल्डरश’ सुरू झाला. पटकन यश मिळवण्याचे ‘कॅलीफोर्नियन ड्रीम’ सुरू होऊन ते पसरू लागले.1861 मध्ये अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष झाले. याच वेळी दक्षिणेकडील 11 राज्यांनी अमेरिकी संघराज्यातून बाहेर पडून संघराज्याविरुद्ध युद्ध पुकारले. या राज्यांचा प्रथमपासून गुलामगिरीला पाठिंबा होता. संघराज्य गुलामगिरी नष्ट करू इच्छित होते. लिंकन यांनी यादवी युद्धाचे आव्हान पेलून अमेरिकेला एक केले आणि गुलामगिरी नष्ट केली. गौर वर्ण श्रेष्ठत्व मानणाऱ्यांना हे पचणे शक्य नव्हते. शेवटी त्यांचा खून झाला. 1893 मध्ये इतिहासकार फ्रेडरिक टर्नर यांनी ‘फ्रन्टियर थिसिस’ मांडला. यात त्यांनी मांडले की 1880 पर्यंत अमेरिकेचा इतिहास, म्हणजे अमेरिकेची सीमारेषा, हा युरोपिय अंगाने पुढे जात गेला. गुलामगिरी हे त्याचे अंग होते. ही अमेरिकी सीमारेषा, पाश्चात्य संस्कृती आणि एक ओसाड भूप्रदेश यांच्यातील आहे. अमेरिकेत आलेल्या युरोपीयांना ही सीमारेषा ‘अमेरिकनाइज्ड’ करेल. इथे व्यक्तिगत क्षमतेला प्राधान्य असेल, पूर्ण स्वातंत्र्य असेल, अफाट ऊर्जा घेऊन माणसे उपभोगाची साधने निर्माण करतील आणि हे सर्व लोकशाहीला पूरक असेल. अमेरिकी स्वप्नाचा हा पाया होता. जेम्स अ‍ॅडम्स यांनी 1931 मध्ये त्यांच्या ‘एपिक अमेरिका’ या पुस्तकात अमेरिकी स्वप्नाची व्याख्या करताना म्हटले आहे की, ‘प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार आणि कर्तृत्वानुसार आयुष्यात भरभरून मिळेल. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात अमेरिकी स्वप्नाची ही मुल्ये पेरली आहेत. हे अमेरिकी स्वप्न फक्त संपन्नतेचे नाही, उपभोगवादाचे नाही. हे स्वप्न समतेवर आधारलेल्या एका सामाजिक व्यवस्थेचे स्वप्न आहे. हे स्वप्न आहे प्रत्येक स्त्री पुरुषाला त्याच्यात दडलेल्या संपूर्ण क्षमता दाखविण्याचे, मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे, त्याला अपरंपार कष्टांची जोडदेण्याचे आणि या कर्तृत्वातून संपत्ती निर्माण करून समाजाकडून यशाची भरभरून पावती मिळवण्याचे. इथे तुमचा धर्म, पंथ, लिंग, भाषा, मूळ देश आणि खरे तर रंग हे काहीही आड येणार नाही.’ या स्वप्नाने जगभरच्या लोकांना भुरळ घातली आणि लाखो लोक या नव्या जगाकडे आले आणि तिथलेच झाले. 1961 मध्ये जॉन केनेडी 35वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यावेळी ‘आफ्रिकन- अमेरिकन’ लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता, सार्वजनिक सुविधा वापरण्यास बंदी होती, त्यांना अपमानस्पद वागणूक दिली जाई, हिंसेला सामोरे जावे लागे.
आपल्या देशात 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळताच हे अधिकार सर्वांना देण्यात आले. 1954 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी शाळांमध्ये कृष्णवर्णीय विद्यार्थांना वेगळे बसवू नये असा आदेश दिला. दक्षिणेतील अनेक राज्यांनी तो धुडकारला. अमेरिकेत नागरी हक्काचे आंदोलन पेटूलागले. बसमधील वंशभेदावर आधारित वेगळ्या आसन व्यवस्थेविरुद्ध मार्टिन ल्युथर किंग यांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे 1957 मध्ये अलाबामा राज्यात ही आसनव्यवस्था प्रथम रद्द झाली. अध्यक्ष आयासेन्होवर यांच्या हुकुमाने सैन्याने ‘लिटल रॉक सेन्ट्रल हायस्कूल’मधील विलगीकरण थांबवले. 1960 मध्ये चार महाविद्यालयीन काळे तरुण नॉर्थ करोलिनामधील वूलवर्थ जेवणाच्या काऊंटरवर गेले असता त्यांना जेवण नाकारण्यात आले. त्यांनी तेथे ठाण ठोकले. बघता बघता आणखीन 50 विद्यार्थी आले. आंदोलन पसरू लागले. 12 राज्यांधील 65 शहरांतील महाविद्यालयांमध्ये हे आंदोलन पसरले. 50 हजार तरुण त्यात सामील झाले. येणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा झाला. किंग यांना जॉर्जिया येथील अटलांटा येथे अटक झाली. जॉन केनेडी अध्यक्षीय उमेदवार होते. त्यांनी किंग यांच्या पत्नीला फोन केला. रॉबर्ट केनेडी यांनी न्यायाधीशांना फोन केला. किंग सुटले. केनेडींना 70% ‘अ‍ॅफ्रो अमेरिकन’ मते मिळाली आणि त्यांचा निसटता विजय झाला. त्यांनी अनेक ‘अ‍ॅफ्रो अमेरिकन’ लोकांना प्रशासनात मोठ्या पदांवर घेतले. नागरी हक्क आयोग भक्कम केला. शाळांमधील विलगीकरणाच्या विरोधात ते जाहीरपणे बोलले. मे 1961 मध्ये जेम्स फार्मर यांनी ‘काँग्रेस फॉर रेशियल युनिटी’तर्फे बसमध्ये वेगळी आसन व्यवस्था धुडकारून प्रवास केले. या आंदोलकांना ‘फ्रीडम रायडर्स’ म्हटले जाई. फ्रीडम रायडर्सना अटक करण्यात आल्याने आंदोलन पेटले. आंदोलनाला दुर्दैवाने हिंसक वळण लागले. अ‍ॅटर्नी जनरल रॉबर्ट केनेडी यांनी 400  फेडरल मार्शल फ्रीडम रायडर्सच्या संरक्षणासाठी पाठविले.1962 मध्ये जेम्स मेरेडिथ ज्यूनि. या ‘अ‍ॅफ्रो अमेरिकन’, माजी सैनिकाला मिसिसिपी विद्यापीठात प्रवेश नाकारण्यात आला. या विद्यापीठाशी अध्यक्ष जॉन केनेडी स्वत: बोलले. विद्यापीठाने माघार घेतली नाही. शेवटी केनेडी यांनी जेम्स यांच्याबरोबर फेडरल मार्शल्स पाठविले. जेम्स यांना प्रवेश मिळाला. गोऱ्यांनी दंगली सुरू केल्या. इकडे किंग यांचे सविनय कायदे भंगाचे आंदोलन चालूच होते. बर्मिंगहॅम त्यावेळी अत्यंत वंशवादी शहर होते. किंग यांना या शहरात अटक करण्यात आली. या अटकेत असताना किंग यांनी लिहिलेले पत्र ‘लेटर फ्रॉम बर्मिंगहॅॅम जेल’ या नावाने प्रसिद्ध आहे. किंग अटकेत  असताना मोर्चे चालूच राहिले. आंदोलकांवर कुत्री सोडण्यात आली, पाण्याचे फवारे मारण्यात आले. 1000 लोकांना अटक झाली. शेवटी अध्यक्ष केनेडी यांनी हजारो सैनिक पाठविले. गव्हर्नर जॉर्ज वालेस हे अत्यंत वंशवादी गृहस्थ स्वत: जून 1963 मध्ये शाळेच्या दारात काळ्या विद्यार्थ्यांना विरोध करण्यासाठी उभे राहिले. ‘काळ्या लोकांची वाट अडवू नका’ असे म्हणणारे बॉब डिलन यांनी लिहिलेले आणि गायलेले सुंदर गीत ‘दि टाईम्स दे आर ए चेंजिंग’ या लढ्याचे शीर्षकगीत बनले. या गीतात देशातील लोकप्रतिनिधींना सांगतात, दार अडवून उभे राहू नका, बाहेर असंतोष भडकत आहे, तो लवकरच तुमच्या खिडक्या आणि भिंती हादरवून टाकणार आहे, ते काळ बदलत आहेत, बदलणाऱ्या काळाचा कानोसा घ्या. केनेडी यांनी अलाबामा राज्याला नॅशनल गार्ड केंद्राच्या अखत्यारीत घेतले आणि विरोध मोडून काढून काळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. 11 जून रोजी त्यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. सिव्हिल राईट्सचा प्रश्न हा नैतिक, घटनात्मक आणि कायदेशीर आहे असे त्यांनी सांगितले. 28 ऑगस्ट 1963 रोजी दोन लाख अमेरिकींचा वॉशिंग्टन शहरात नोकऱ्या आणि स्वातंत्र्य या प्रश्नांवर मोर्चा निघाला, ज्यात मोठ्या प्रमाणावर काळे तर होतेच पण फार मोठ्या संख्येने गोरेही होते. लिंकन मेमोरियल येथे या मोर्चा पुढे किंग यांनी केलेले ऐतिहासिक भाषण ‘आय हॅव ए ड्रीम’ या शीर्षकाखाली अजरामर झाले. या भाषणाने किंग यांनी अमेरिकेला दुसरे एक स्वप्न दिले. ते म्हणाले, ‘‘शंभर वर्षांपूर्वी ‘इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशन’वर महान अमेरिकी व्यक्तींने सह्या केल्या आणि अन्यायाच्या ज्वालांमध्ये जळत असणाऱ्या लाखो निग्रो गुलामांना आशेचा प्रकाश दिसला. पण आज शंभर वर्षांनंतरही निग्रो स्वतंत्र नाहीत. त्यांना विलगीकरण आणि भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. आपल्याच देशातील प्रचंड भौतिक संपन्नतेच्या सागरात दारिद्र्याच्या बेटावर निग्रो एकाकी जीवन जगत आहेत. देशाच्या राजधानीत आम्ही आमच्या हक्काचा धनादेश वटवण्यासाठी आलो आहोत. जो स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या वेळी आम्हांला देण्यात आला होता. रक्कम अपुरी असे लिहून हा धनादेश परत आला आहे. पण न्यायाच्या बँकेचे दिवाळे निघाले आहे, संधींच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत हे मानण्यास आम्ही तयार नाही. अमेरिकी लोकशाहीने दिलेली वचने निभावण्याची वेळ आली आहे. निग्रोंच्या असंतोषाचा हा ग्रीष्म स्वातंत्र्य आणि समतेचा वसंत ऋतू फुलल्याशिवाय थंड होणार नाही. निग्रोंना त्यांचे नागरी हक्क दिल्याशिवाय अमेरिकेत आता शांतता नांदणार नाही. बंडाचे वादळ न्यायाचा लख्ख दिवस उजाडेपर्यंत देशाचा पाया हलवीत राहील. पण तरीही मी माझ्या लोकांना सांगू इच्छितो की स्वातंत्र्याची तहान कडवटपणा आणि द्वेषाचा प्याला भागवू शकणार नाही. (भाग - 1, क्रमशः)


डॉ.अभिजित वैद्य
puja.monthly@gmail.com
(लेखक पुरोगामी जनगर्जना या मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget