Halloween Costume ideas 2015

एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व ह. अबुबकर सिद्दीक रजि.

हजरत अबुबकर ’सिद्दीक’ यांचा जन्म इ.स.572 मध्ये मक्का या शहरात झाला. ते प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्यापेक्षा दोन वर्षाने लहान होते. त्यांच्या कुळगटाचे नाव ’तैईम’ होते. त्यांची एक मुलगी हजरत आएशा रजि. ह्या प्रेषित सल्ल. यांच्या पत्नी होत. हजरत अबुबकर रजि. यांचे मूळ नाव ’अब्दुल काबा’ अर्थात काबागृहाचा सेवक असे होते. ’सिद्दीक’ म्हणजे सत्यवचनी. ही पदवी स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना दिली होती. जेव्हा प्रेषित सल्ल. यांची मेराजच्या रात्री अल्लाहशी भेट झाल्याची घटना घडली व ती त्यांनी लोकांना सांगितली तर इतर लोकांना ती घटना स्वीकारण्यास थोडीशी अडचण वाटत होती. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता हजरत अबुबकर रजि. यांनी त्या घटनेवर विश्‍वास ठेवला होता. ते प्रेषित सल्ल. यांचे खंदे समर्थक होते व त्यांच्यावर जीव ओवाळून टाकण्यास सदैव तत्पर होते. त्यांचा प्रेषित सल्ल. वर एवढा विश्‍वास होता की, प्रेषित्व प्राप्त झाल्यानंतर मक्केतील पुरूषांमध्ये सर्वप्रथम त्यांनीच विश्‍वास ठेवला होता.
    ते मक्का शहरातील कुरैश कबिल्यांपैकी सर्वात श्रीमंत कबिल्यात जन्मले होते. स्वभावाने सभ्य आणि निर्व्यसनी होते. त्यांना मूर्तीपूजेचे जरासुद्धा आकर्षण नव्हते. इस्लामपूर्व काळात जेव्हा मक्केतील पुरूष इतरांना लुटण्यात, दारू पिण्यात आणि स्वैराचाराने वागण्यात तरबेज होते त्या काळातसुद्धा ह. अबुबकर सिद्दी़क यांनी न्याय व सदाराचाने वागून मक्केमध्ये आपल्या व्यक्तीत्वाचा वेगळाच ठसा उमटविला होता. त्यामुळे त्यांचे नाव आदराने घेतले जात होते.
    प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म इ.स. 570 मध्ये झाला, त्यांना प्रेषित्व इ.स.610 मध्ये मिळाले आणि  इ.स. 622 मध्ये त्यांनी हिजरत केली. या संपूर्ण कालाधीमध्ये अखंडपणे ह. अबुबकर सिद्दीक प्रेषित सल्ल. यांच्याबरोबर सावलीसारखे वावरत होते. ते एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी प्रेषित्वाच्या घोषणेपासून ते प्रेषित यांच्या पर्दा फरमाविण्या (निधन होणे) पर्यंत इमाने इतबारे साथ दिली. इस्लाममध्ये बाकीचे लोक नंतर येत गेले. इस्लाम जसा-जसा मजबूत होत होता तसा-तसा इस्लाममध्ये दाखल होणार्‍यांची संख्या वाढत होती. मात्र हजरत अबुबकर सिद्दीक यांचे वैशिष्ट्ये हे होते की, त्यांनी त्या दिवशी इस्लाम स्विकारला ज्या दिवशी इस्लाम स्विकारणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे असे समीकरण अस्तित्वात होते.
    इस्लाम स्विकारताच ते झपाटल्यासारखे धर्मप्रचाराला लागले. त्यांनी आपली संपत्ती धर्मप्रचारात खर्च करायला सुरूवात केली. अनेक गुलाम खरेदी करून त्यांना मुक्त करून इस्लाम स्विकारण्यास प्रेरित केले. त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना इस्लामची दिक्षा दिली. त्यांची एक पत्नी जिचे नाव कुतेला आणि एक मुलगा ज्याचे नाव अब्दुर्रहमान होते त्यांनी इस्लाम स्विकारण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी दोघांनाही बेदखल करून टाकले. त्यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीने इस्लाम स्विकारल्याचे पाहून अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी इस्लाम स्विकारला. प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या बाबतीत म्हटलेले होते की, हजरत अबुबकर रजि. यांच्या संपत्तीचा इस्लामच्या प्रसार आणि प्रचारासाठी जेवढा उपयोग झाला तेवढा कुणाच्याच संपत्तीचा झाला नाही.
    ते प्रेषित सल्ल. यांचे सर्वात विश्‍वासू सहकारी होते म्हणून इ.स. 622 मध्ये जेव्हा प्रेषितांना मक्का येथून मदिनाकडे हिजरत (प्रस्थान) करण्याचा ईश्‍वरीय आदेश झाला तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सोबती म्हणून त्यांचीच निवड केली होती. मदिनेत पोहोचल्यानंतर जेव्हा प्रेषित सल्ल. यांनी मुस्लिमांसाठी एक मस्जिद बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा मस्जिदीसाठी जमीन खरेदी करण्याचा मानही हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांनाच मिळाला. आज मदिनामध्ये जी आलिशान -(उर्वरित पान 7 वर)
मस्जिद आहे आणि जिला मस्जिद-ए-नबवी म्हणून ओळखले जाते ती हीच मस्जिद आहे. हिजरत करून मदिनामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी कापडाचा व्यापार सुरू केला व अल्पावधीतच एक प्रामाणिक कापड व्यापारी म्हणून नावारूपाला आले. अल्लाहकडून प्रेषित सल्ल. यांना जेवढे आदेश जिब्राईल अलै. मार्फत येत होते त्यांची अंमलबजावणी वगळता बाकी सर्व व्यवहारांमध्ये प्रेषित सल्ल. हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांच्या सल्याला खूप महत्व देत होते. बदरच्या ऐतिहासिक विजयानंतर जेव्हा कुरैशचे 70 कैदी पकडण्यात आले, तेव्हा हजरत उमरसह अनेकांनी त्यांना ठार मारण्याचा सल्ला दिला. परंतु हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांनी त्यांना ’फिदिया’ (मोबदला) घेऊन क्षमादान करण्याचा सल्ला दिला, जो की प्रेषित सल्ल. यांनी मान्य केला. त्यांच्या या कृतीमुळे कुरैशमधून इस्लामचे अनेक सहानुभूतीदार उत्पन्न झाले.
    मक्क्याचे कुरैश आणि मदिनाचे मुस्लिम यांच्यात हज करण्यावरून सन 6 हिजरीमध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा हुदैबिया येथे झालेल्या तहामध्ये अनेक अशा अटींचा समावेश होता ज्या सहाबा रजि. यांना रूचल्या नव्हत्या. पण हजरत अबुबकर सिद्दीक रजि. ठामपणे त्या कराराच्या समर्थनार्थ प्रेषित सल्ल. यांच्या पाठीमागे उभे राहिले व जगाने पाहिले की, त्या तहामुळे अवघ्या दोन वर्षात म्हणजे 8 हिजरीमध्ये मुस्लिमांनी मक्का शहरावर निर्णायक विजय प्राप्त केला होता.
    परदा फरमाविण्यापूर्वी प्रेषित सल्ल. जेव्हा 13 दिवस आजारी पडले तेव्हा मस्जिद-ए-नबवीमध्ये नमाजची इमामत (नेतृत्व) करण्याचा बहुमानही प्रेषित सल्ल. यांनी हजरत अबुबकर रजि. यांनाच दिला होता. नव्हे एकदा तर त्यांच्या इमामतीमध्ये दस्तुरखुद्द प्रेषित सल्ल. यांनी नमाज अदा केली होती. एका प्रेषिताने आपल्या अनुयायाच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करण्याची ही अभूतपूर्व घटना इस्लामी इतिहासात एकमेवाद्वितीय अशी आहे. पुढे हजरत उमर रजि. व इतर जानकार सहाबा रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या याच कृतीला प्रमाण माणून हजरत अबुबकर रजि. यांना प्रेषित सल्ल. यांचे वारस घोषित करून मदिनातील इस्लामी रियासतीचे प्रथम खलीफा (राज्य प्रमुख) म्हणून निवड केली.
    प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना मुलगा नव्हता. म्हणून त्यांचे जावाई हजरत अली रजि. जे की एक उमदे व्यक्तीमत्व होते, त्यांना खलीफा करण्यात यावे, असा जोरदार आग्रह मुस्लिमांच्या एका गटाकडून झाला होता. हा आग्रह एवढा तीव्र होता की, तो मान्य न झाल्यामुळे त्या लोकांनी हजरत अबुबकर सिद्दीक रजि.पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला व हाच गट पुढे शिया मुस्लिम म्हणून उदयाला आला. स्वतः हजरत अली रजि. सुद्धा आपल्या समर्थकांच्या इतक्या दबावात होते की, तब्बल सहा महिन्यानंतर त्यांनी हजरत अबुबकर रजि. यांचा खलीफा म्हणून स्वीकार केला व एकनिष्ठतेची शपथ घेतली.
    काही लोकांचा असा समज आहे की, स्वतः हजरत अली रजि., हजरत अबुबकर ऐवजी खलीफा होण्यास उत्सुक होते. पण हे खरे नाही. हां! हे मात्र खरे आहे की, त्यांच्या सुविद्य पत्नी व प्रेषित सल्ल. यांच्या कन्या हजरत फातीमा यांची अशी इच्छा होती की, प्रेषित सल्ल. यांच्यानंतर खलीफा म्हणून हजरत अली रजि. यांची निवड व्हावी. खलीफा निवडीच्या या प्रक्रियेमध्ये एक व्यक्तीचा दूरदर्शीपणा इतका महत्त्वाचा ठरला की, इस्लामी इतिहासात त्याला तोड नाही. ती व्यक्ती म्हणजे हजरत उमर फारूख रजि. होय. त्यांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे मदिनापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या ’सुखैफा’ नावाच्या सभागृहामध्ये खलीफा निवडीची प्रक्रिया तात्काळ सुरू होऊन हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांना खलीफा म्हणून निवडले गेले. त्यांनी तातडीने केलेल्या या हालचालींमुळे फार मोठा रक्तपात टळला गेला. हजरत उमर रजि. यांनी खलीफा निवडीच्या प्रक्रियेमध्ये उशीर केला असता तर अंसारच्या एका मोठ्या गटाने हजरत साद रजि. यांनी खलीफा करण्याचा जो घाट घातला होता तो यशस्वी झाला असता व त्यांना सर्वांनी स्वीकारले नसते व प्रेषित सल्ल. यांच्या नंतर लगेच सत्तेसाठी आपसात रक्तपात झाला असता. हजरत उमर रजि. यांच्या दूरदर्शी पुढाकाराने तो टाळला गेला. ही माझ्या दृष्टीने इस्लामी इतिहासातील फार मोठी घटना आहे.
प्रथम खलीफांचे ऐतिहासिक भाषण
    खलीफा म्हणून निवड झाल्यानंतर हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांनी जनतेला उद्देशून जे भाषण केले ते भाषण इस्लामी इतिहासात अजरामर झाले व  इस्लामी लोकशाहीचे संविधान म्हणून गणले गेले. ते म्हणाले, ” लोकहो! मी अल्लाहच्या नावाने शपथ घेऊन सांगतो की, मी क्षणभरही कधी खलीफा होण्याची आकांक्षा धरली नव्हती वा त्याची मला आवडही नव्हती. हे पद मिळावे म्हणून मी अल्लाहकडे उघड वा मनातूनही कधी प्रार्थना केली नव्हती. हे पद मी केवळ एवढ्याचसाठी स्विकारली आहे की, या आणीबाणीच्या वेळी काही उपद्रव निर्माण होऊन इस्लामच्या हिताला धोका निर्माण होऊ नये. खरोखर माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे, की जी अल्लाहच्या मदतीविना व तुमच्या मनःपूर्वक सहकार्याविना पार पाडणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे. माझी इच्छा होती की, या पदावर माझ्यापेक्षा सामर्थ्यवान मनुष्य यायला हवा. मी तुमच्यापेक्षा अधिक चांगला नसतानाही तुम्ही माझी या पदासाठी निवड केलेली आहे.”
    ते पुढे म्हणाले,” जर मी सन्मार्गाने जात असेल तर मला मदत करा; जर मी चुकीच्या मार्गाने जात असेल तर मला सन्मार्गावर आणा. सत्य हाच ठेवा आहे; असत्य हा विश्‍वासघात आहे. तुमच्यातील दुबळे हे माझ्या दृष्टीने सबल आहेत, की जोपर्यंत (अल्लाहच्या इच्छेने माझ्याकडून) त्यांच्या हक्कांची पूर्तता होत नाही; आणि तुमच्यातील सबल हे माझ्या दृष्टीने दुर्बल आहेत, की जोपर्यंत त्यांच्याकडून जे येणे योग्य आहे ते मी (अल्लाहच्या इच्छेने) घेतलेले नाही. नीट ऐका ! ज्या लोकांनी अल्लाहच्या कार्यासाठी जिहाद करणे सोडून दिले त्यांच्यावर अल्लाहने कलंक आणलेला आहे; आणि जे लोक दुराचरणी आहेत त्यांच्यावर अल्लाहचा प्रकोप अनिवार्य आहे.”
    ते शेवटी म्हणाले, ” जोपर्यंत मी अल्लाहच्या व त्याच्या प्रेषितांची आज्ञा पाळत आहे तोपर्यंतच माझी आज्ञा पाळा; आणि जेव्हा मी त्यांची आज्ञा पाळणार नाही, तेव्हा माझी आज्ञा पाळू नका. अल्लाह तुमच्यावर दया करो.” (संदर्भ ः चार आदर्श खलीफा, लेखक शेषेराव मोरे, पान क्र. 50).    एकंदरित इस्लामी इतिहासामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. या नंतरचे सर्वोत्कृष्ट व्यक्तीमत्व म्हणून हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांना ओळखले जाते. त्यांची कारकिर्द अवघी अडीच वर्षाची होती. त्यानंतर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. मात्र या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यशासनाचे जे आदर्श नियम त्यांनी घालून दिले ते प्रलयाच्या दिवसापर्यंत फक्त इस्लामी लोकशाहीच नव्हे तर आधुनिक लोकशाहीलाही सारखेच उपयोग ठरतील असे आहेत.

- एम.आर.शेख  

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget