Halloween Costume ideas 2015

संकटकाळात माणुसकीचे दर्शन हवे

आसमानी संकटांनी महाराष्ट्राचे जनजीवन विस्कळीत

सध्या महाराष्ट्र आसमानी  संकटाचा धैर्याने सामना करीत आहे. मात्र एकानंतर  एक येणाऱ्या संकटांनी जनजीवन विस्कळीत होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाने सर्वच क्षेत्राच्या नाड्या आवळल्याने पुरती हैरानी झाली आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून निसर्ग नावाचे चक्रीवादळ कोकण आणि मुंबई परिसरात घोंघावत आहे. मान्सूनपूर्व पावसाने सुद्धा महाराष्ट्रातील अनेक भागात घरांचे, शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. गरीबांच्या घरावरील पत्रे उडून संसारोपयोगी  साहित्याची नासधूस झाली आहे. शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वीजेचे पोल कोसळले आहेत. त्यामुळे सध्याच्या संकटकालीन परिस्थितीत माणुसकी दाखवित एकमेकांना सहाय्य करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात आजतागायत 72 हजार 300 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, त्यातील 2 हजार 465 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 हजार 333 जण कोरोनामुक्त झाले असून, 38 हजार 493 कोरोना अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. त्यात सर्वच  क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील मजुरांचे स्थलांतर वाढले आहे. खाजगी कंपन्या कॉस्ट कटिंग करीत आहेत.   
महाराष्ट्र शासन अतिशय धैर्याने कोरोनाचा मुकाबला करीत आहे. संकट मोठे असल्यामुळे प्रशासनाची कोरोनाचा मुकाबला करताना तारांबळ उडाली असून, त्यात पुन्हा आसमानी संकटाने वैतागून सोडले आहे. त्यामुळे प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहकार्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. कठीण काळात जो मदत करतो खऱ्या अर्थाने तोच सखा असतो. आणि जो व्यक्ती चांगल्या कामासाठी पुढे येतो तो एकटा नसतो. त्याच्यासोबत जनता तर येतेच शिवाय, त्याला ईश्वरीय मदतही कुठल्या ना कुठल्या मार्गाने मिळत असते. याप्रसंगी महाराष्ट्रातल्या जनतेने धैर्याने या संकटाचा सामना करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. पाऊस आणि वादळात मराठवाड्यात अतोनात नुकसान झाले आहे. पंचनामे बुधवारपर्यंत सुरू झाले नव्हते. त्यामुळे नुकसानीचा निश्चित आकडा समोर आलेला नाही.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद...

कोरोनाच्या संकटासंदर्भात आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी निसर्ग या चक्रीवादळासंदर्भात माहिती देत नागरिकांना काळजी घेण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले.  आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचा निर्णय घेतला, पण आपली परीक्षा संपत नाहीये. एकामागून एक संकट येत आहे. आता, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका असून अलिबागला हे वादळ येईल. त्यामुळे कुणीही पुढील दोन दिवस घराबाहेर पडायचं नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत.   
अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीसंदर्भात माहिती घेतली असून संबंधित यंत्रणांना सूचनाही केल्या आहेत. आवश्यक नसेल तिथे विजेची उपकरणे वापरणे टाळा. वादळ आल्यानंतर वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, त्यामुळे बॅटरीवरील चालणारी उपकरणे चार्ज करुन ठेवा. या वादळाच्या संकटासाठी स्थानिक प्रशासन सज्ज आहे, प्रशासनाला सहकार्य करा. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची गरज भासल्यास सोय केली जाईल.’ या वादळाच्या संकटामुळे बीकेसी कोव्हिड रुग्णालयातील रुग्णांना इतर ठिकाणी हलवले आहे. वादळाने शेडला धोका झाला तर परत बांधता येईल, पण कोणाला इजा पोहोचली नाही पाहिजे. कोरोनाचं संकट रोखून त्याला परतवण्याच्या मार्गावर आहोत, आता हे वादळाचं संकटही परतवून लावू, धैर्याने त्याचा सामना करु, संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू,असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
एकंदर परिस्थिती पाहता संकटे शमण्याचे नाव घेत नाहीत. कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करणे ही काळाची गरज आहे. कुणाबद्दलही आपल्या मनात भेद न ठेवता सर्वांना सहकार्य करण्याची गरज आहे. कुरआनमध्ये म्हटले आहे की, सर्व मानवजात एकाच आई-वडिलांपासून निर्माण केली गेली आहे. त्यामुळे आपसुकच विविध समाजातील लोक जरी त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमुळे वेगळे वाटत असले तरी ते भाउबंध आहेत. त्यामुळे कुणी मनात भेदभाव बाळगू नये की तो आमका, तो तमका. आणि कोणी तसा बाळगत असेल तर त्या व्यक्तीचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. या संकटकाळाच्या परिस्थिती एकमेकांना सहाय्य करीत मार्गक्रमण झाले पाहिजे. त्यातच सर्व समाजघटकांचे आणि देशाचे हित निहित आहे. एवढे लक्षात ठेवले पाहिजे .

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget