मानवाधिकारासाठी लढणारे वकील अशी ओळख असलेले उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होस्बेट सुरेश यांचे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील होसाबेटू येथे २० जुलै १९२९ रोजी होस्बेट यांचा जन्म झाला. मंगळुरू विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी विश्वस्वरय्या तंत्र विद्यापीठातून कला शाखेतूनच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कायद्याच्या शिक्षणासाठी मुंबई गाठली. मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९५३मध्ये त्यांनी वकिलीला सुरूवात केली. शासकीय विधि महाविद्यालय आणि के. सी. महाविद्यालयामध्ये त्यांनी विधि अभ्यासक्रमाचे अध्यापनही केले. सत्र न्यायालयात सहाय्यक वकील म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर २९ नोव्हेंबर १९६८ रोजी त्यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश, तर १९७९ मध्ये द्वितीय अतिरिक्त प्रधान न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. परंतु स्वतंत्र वकिली करण्यासाठी त्यांनी काही महिन्यांनीच म्हणजेच १९८० मध्ये न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आणि उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली. २१ नोव्हेंबर १९८६ रोजी त्यांची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. १९ जुलै १९९१ रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा न्याय आणि परोपकार अनुकरणीय होते. आपल्या कार्यकाळात आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. देशात जेथे जेथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले तेथे ते त्यांच्या संरक्षणासाठी त्वरित पाऊल उचलीत. काश्मीर व इतरत्र होणाऱ्या अत्याचारांविरोधात त्यांनी नेहमी आवाज उठविला. त्यांनी काश्मीर, ओरिसा (काला हंडी), गुजरात इत्यादी ठिकाणी तथ्य-शोध आणि अत्याचाराच्या थेट तपासासाठी प्रतिनिधीमंडळांसह दौरा केला होता. न्यायमूर्ती दाऊद यांच्या सहकार्याने १९९२-१९९३ च्या मुंबई दंगलीची त्यांनी चौकशी केली आणि धैर्याने सत्य समोर आणले. असंख्य प्रसंगी ते बोलले आणि उत्पीडित अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिम, दलित, आदिवासी आणि दुर्बल घटकांच्या समर्थनार्थ उभे राहिले. यूएपीए, पोटा, टाडा यासारख्या केंद्र सरकारच्या काळ्या कायद्यांविरूद्ध ते नेहमीच उभे राहिले आणि हे कायदे नाकारण्यासाठी व रद्द करण्यासाठीच्या चळवळींमध्ये अग्रणी होते. न्यायमूर्ती सुरेश यांचे ‘एपीसीआर’ (असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स) शी जवळचे संबंध होते. ‘एपीसीआर’च्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असत. त्यांनी आणि मी एकाच कार्यालयात ३० वर्षे कार्यरत होतो. फक्त केबिन स्वतंत्र होती. न्यायमूर्ती होस्बेट सुरेश यांच्या निधनानंतर, देशाने एक महान परोपकारी, मानवाधिकार चॅfिम्पयन आणि न्यायासाठी लढणारा, ‘एपीसीआर’ने एक महान सहानुभूतीदार आणि मी एक प्रामाणिक मित्र व सहकारी गमावला.
- यूसुफ मुछाला
(वरिष्ठ वकील आणि अध्यक्ष, ‘एपीसीआर’)
- यूसुफ मुछाला
(वरिष्ठ वकील आणि अध्यक्ष, ‘एपीसीआर’)
Post a Comment