समाजासमाजांत धर्मांधता आणि जातियवादाचे विष कालवून बहुजनांमधील एकतेला बाधा आणून बहुसंख्यकांच्या मतांसाठी सांप्रदायिक राजकारण करणारे मृत गर्भवती हत्तीणीच्या टाळूवरचे लोणीसुद्धा ओरपू लागले आहेत. केरळमधील अटप्पाडीच्या सीमेवरील सायलेंट व्हॅली जंगलातील एका गर्भवती हत्तीणीने फटाक्यांनी भरलेले अननस खाल्ले. ते शक्तिशाली फटाके तिच्या तोंडात फुटल्याने हत्तीणीचा जबडा तुटून जबर दुखापत झाली. त्यातच त्या हत्तीणीचा पलक्कड जिल्ह्यातील वेळियर नदीत मृत्यू झाला. शेती व फळबागा रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेतकरी दबावाने फुटणारे फटाके खाद्यपदार्थांत टाकून ठेवतात, हाही त्यातलाच प्रकार होता. मल्याळम भाषेत याला ‘पन्नी पडकम’ (डुक्कर फटाका) असे म्हणतात. स्फोटकांनी भरलेले अननस या गर्भवती हत्तीणीने खाल्ले आणि तिचा मृत्यू झाला. तिला कुणीही जाणीवपूर्वक स्फोटकांनी भरलेले अननस खायला घातले नाही. डिसेंबर २०१७मध्ये मध्य प्रदेशच्या विदिशा शहरात अशाच प्रकारे खाद्यपदार्थात बांधून ठेवलेला एक फटाका गायीच्या तोंडात फुटल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रायोजित ‘शंखनाद’ फेम मीडिया सेलकडून मुस्लिमांनी हे विस्फोटक गायीला खाऊ घातल्याचा प्रचार सुरू केला गेला. गर्दीने आसपासच्या टपरींवर जाळपोळ सुरू केली. गाय हा भाजप व संघ परिवारासाठी हुकमी एक्का राहिला आहे. चौकशीअंती विदिशाचे पोलिस अधीक्षक यांनी जाहीर केले की, हा डुक्करांना मारण्यासाठी शेतकरी वापरत असलेला ‘सुअरमार बॉम्ब’ आहे. २०१७च्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्राच्या मालवण तालुक्यात अशाच प्रकारे एक गाय असला बॉम्ब खाऊन मेली होती. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालानुसार २००९ ते २०१७ दरम्यान दरवर्षी ८० च्या संख्येने ६५५ हत्तींचा मृत्यू झाला होता. तर राज्यसभेत सादर केलेल्या अहवालानुसार २०१४ ते २०१९ दरम्यान भारतात ५१० आणि केरळमध्ये ४२ हत्ती मारले गेले. गेल्या १८ फेब्रुवारीला ओरिसा विधानसभेत देण्यात आलेल्या उत्तरानुसार गेल्या तीन वर्षांत राज्यातील २४७ हत्तींचा बळी घेण्यात आला होता. केरळमधील मंदिर उत्सवांमध्ये २००७ ते २०१३ दरम्यान हत्ती बिथरल्याच्या २,८९६ घटना घडल्या आहेत. त्यात ४२५ हत्ती माहुतांकडून मिळालेल्या अमानुष वागणुकीमुळे मृत्यू पावले. जानेवारी ते एप्रिल हे महिने तिथल्या जनतेसाठी आनंद व उत्सवांचे आणि हत्तींसाठी सर्वांत क्रूर असतात. सगळीकडे शिक्षित लोक असे करतात, हे कम्युनिस्ट आणि मुस्लिमांनी मुद्दाम घडवून आणले, त्यांना यापुढे कोणतीही मदत करायची नाही, यांसारख्या पोस्ट्स सोशल मीडियावर भाजपच्या आयटीसेलद्वारे पसविल्या गेल्या. ‘द हिंदू’, ‘एनडीटीव्ही’, ‘टाइम्स नाऊ’, ‘हिंदुस्तान टाइम्स’, ‘इंडिया टुडे’, ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’, ‘एएनआय’, ‘रिपब्लिक इंडिया’ व इतर अनेक प्रसारमाध्यमांनी पलक्कड जिल्ह्याऐवजी ‘मलप्पुरम’ जिल्ह्यात ही घटना घडल्याची बातमी दिली. त्यामुळे अधिकच घोळ झाला. हा जिल्हा मुस्लिमबहुल असून तेथील ७० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या केरळी व्यक्तीचे नाव एम. विल्सन आहे. सांप्रदायिकता पसरविणाऱ्या ट्रोल आर्मीकडून केरळमधील ९९ टक्के साक्षरता आणि मलप्पुरम जिल्ह्यातील मुस्लिमबहुल लोकसंख्या जबाबदार असल्याचे बिनबुडाचे आरोप सुरू झाले. लॉकडाऊनदरम्यान मुस्लिमांना लक्ष्य बनविण्याची पहिली घटना नाही. एप्रिलमध्ये ‘इंडियन एक्सप्रेसन’ने दिलेल्या माहितीनुसार उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या दंगलींमध्ये एकूण ८०२ लोकांना अटक करण्यात आली होती, त्यामध्ये सुमारे ५० जणांना लॉकडाऊनच्या काळात पकडण्यात आले होते. ‘द हिंदू’नुसार २२ मार्च ते १७ एप्रिल दरम्यान मुस्लिमबहुल विभागातून जवळपास २५-३० जणांना अटक करण्यात आली होती. ‘द क्विंट’नुसार दररोज सात-आठ जणांना पोलीस उचलून नेत आहे, यामध्ये बहुतांश मुस्लिम आहेत. या अटकसत्राचा संबंध सीएए-एनआरसी विरोधी आंदोलकांचा असल्याचे म्हटले जाते. त्याचप्रमाणे लॉकडाऊनदरम्यान तबलीगी जमातबाबत सांप्रदायिक मीडियाद्वारे समाजात विष पसविण्यात आले. यावरून असे वाटते की लॉकडाऊनदरम्यान सरकार आपली संपूर्ण व्यवस्था मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात राबवीत आहे. लॉकडाऊनदरम्यान हजारो महिला आणि लहान मुलांच्या शेकडो किलोमीटर उपाशीपोटी पायपीट करणाऱ्या विदारक दृश्यांबाबत मूग गिळून बसलेल्या मेनका गांधींचे पशुप्रेम अचानक जागे झाले. त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी प्रतिक्रिया दिली. ही घटना ६७ टक्के लोकसंख्या हिंदू धर्मीय असलेल्या पलक्कड जिल्ह्यात घडली असल्याचा खुलासा केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन आणि वनमंत्री के. राजू यांनी केला. तोवर आयटी सेलची सोशल मीडिया, व्हॉटसअॅप विद्यापीठ सेवकांनी मृत हत्तीणीच्या मढ्यावरील लोणी चाटायला सुरुवात केलेली होती. गेल्या सहा वर्षांत देशात गायीच्या नावाखाली मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये अनेक निरपराध मुस्लिम तरुण मारले गेले, महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या दोन दलित तरुणांच्या हत्या आणि अनेक दलितांच्या सवर्णांकडून हत्या केल्या गेल्या, तेव्हा हे संधीसाधू बोलघेवडे कुठे होते? असा प्रश्न पडतो.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Post a Comment